Site icon InMarathi

पडदा उघडतोय…यापैकी कोणता सिनेमा मोठ्या पडद्यावर बघायला तुम्ही उत्सुक आहात?

movies 2021 inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

गेल्याच आठवड्यात महाराष्ट्र सरकारने शाळा, मंदिरं, सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. लसीकरण पूर्ण न करताच शाळा सुरू करण्याच्या निर्णयावरून विविध स्तरातून टीकासुद्धा झाली, पण एकंदरच या निर्णयाचे स्वागतच होताना दिसत आहे.

गेली दीड वर्षं ठप्प असलेल्या मनोरंजन सृष्टीलासुद्धा चालना मिळणार असल्याने कित्येकांचा जीव भांड्यात पडला आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशनच्या अहवालानुसार या कालावधीत मनोरंजन सृष्टीला तब्बल ९००० करोड रुपयांचा फटका बसला आहे.

कित्येक लोकांचं पोट या व्यवसायावर अवलंबून आहे त्यामुळे लवकरात लवकर हे उद्योग सुरू करून लोकांची विस्कटलेली घडी पुन्हा बसवायचा सरकारचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे.

 

 

थिएटर सुरू करण्याबाबत अद्याप काहीच नियमावली सरकारने जाहीर केली नसली तरी एकंदरच या मनोरंजन सृष्टित एक उत्साह बघायल मिळतोय. बऱ्याच मोठमोठ्या सिनेमांची घोषणासुद्धा यानंतर करण्यात आली आहे.

सध्या बॉलिवूडकरांबद्दलचं प्रेक्षकांचं मत तितकंसं चांगलं नसून आता थिएटर सुरू होऊनही मोठं बॅनर किंवा मोठ्या स्टारचं नाव पाहून लोकं सिनेमा बघायचा जायची शक्यता फार कमी आहे.

लोकांना जगभरातला दर्जेदार कंटेंट ओटीटी प्लॅटफॉर्मवर बघायची इतकी सवय झाली आहे की हजारो रुपये एका बिनडोक स्टारसाठी खर्च करून आपला वेळ घालवण्यापेक्षा लोकं त्याची ओटीटीवर येण्याची वाट बघणं जास्त पसंत करतायत, असं आत्ताचं चित्र बघून तरी स्पष्ट होत आहे.

 

याचा अर्थ असा नाही की लोकं सिनेमा बघायला जाणारच नाहीत, चांगला दर्जेदार कंटेंट असेल तर लोकं आवर्जून गर्दी करतील. पण केवळ बॉलिवूडमधल्या मोठ्या बॅनरचं नाव किंवा स्टारचा चेहेरा बघून लोकं बॉक्सऑफिसवर गर्दी करतील असे दिवस आता राहिलेले नाहीत.

नुकतीच काही सिनेमांच्या रिलीज संदर्भात घोषणासुद्धा करण्यात आली आहे. ते सिनेमे कोणते आहेत ते जाणून घेऊयात!

१. सूर्यवंशी :

 

 

रोहित शेट्टीच्या कॉप यूनिवर्समधली सूर्यवंशी ही फिल्म गेल्या दीड वर्षापासून रखडली आहे. गेल्या वर्षीच्या मार्चमध्ये हा सिनेमा रिलीज होणं अपेक्षित होतं पण लॉकडाउननंतर हा सिनेमा लांबणीवर पडला तो पडलाच.

मध्यंतरी बऱ्याच अॅक्टरनी त्यांचे सिनेमे ओटीटीच्या माध्यमातून प्रदर्शित केले. खुद्द अक्षय कुमारनेसुद्धा लक्ष्मीसारखा सिनेमा हॉटस्टारवर प्रदर्शित केला. पण सूर्यवंशी हा सिनेमा मोठ्या पडद्यासाठीच बनलेला असल्याने या सिनेमाच्या मेकर्सनी ओटीटीपासून स्वतःला लांबच ठेवलं.

थिएटर सुरू होणार हे समजताच खुद्द अक्षय कुमार आणि रोहित शेट्टी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या सिनेमाची रिलीज डेट नक्की केली. आता हा सिनेमा २२ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

यामध्ये अक्षय कुमार, कतरिना कैफसारखे स्टार्स मुख्य भूमिकेत असून अजय देवगण आणि रणवीर सिंगसुद्धा पाहुणे कलाकार म्हणून दिसणार आहेत.

हा सिनेमा खरंतर बराच काळ लांबणीवर पडल्याने आता कीती लोकं या मोठ्या स्टार्सकडे बघून थिएटरमध्ये गर्दी करतील हे येणारा काळच ठरवेल!

२. ८३ :

 

 

भारतीय क्रिकेट टीमने पहिला वर्ल्ड कप १९८३ मध्ये जिंकला आणि लोकांनी कपिल देवला अक्षरशः डोक्यावर घेतला. याच घटनेवर बेतलेला ८३ हा सिनेमासुद्धा कोरोनामुळे बराच वेळ रखडला आहे.

८३ च्या वर्ल्डकपवर आणि खासकरून कपिल देव यांच्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या या सिनेमाकडून लोकांना अपेक्षा आहेत. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात रणवीर सिंग, साकेब सलीमपासून ते आपला मराठमोळा आदित्य कोठारेसारखे कलाकार दिसणार आहेत.

नुकतंच रणवीर आणि दीपिका या दोघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या सिनेमाची डेट घोषित केली आहे. येत्या क्रिसमसच्या मुहूर्तावर म्हणजेच २५ डिसेंबर २०२२ रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.

मध्यंतरी दिग्दर्शक कबीर खानच्या मुघलांच्या संदर्भातल्या वक्तव्यामुळे त्याच्यावर सडकून टीका झाली होती, शिवाय एकंदरच लोकांच्या मनात बॉलिवूडप्रती असलेली चीड बघता हा सिनेमा बिग बजेट जरी असला तरी याला कसा प्रतिसाद मिळेल हे सांगता येणं तसं कठीणच आहे.

३. लाल सिंग चड्ढा :

 

 

आमीर खान करीना कपूर यांचा लाल सिंग चड्ढा या सिनेमाचीसुद्धा बऱ्याच दिवसांपासून चर्चा सोशल मीडियावर रंगतीये. या सिनेमाची पटकथा अतुल कुलकर्णी याने लिहिली असून सुप्रसिद्ध हॉलीवूड अॅक्टर टॉम हँक्सच्या ‘फॉरेस्ट गंप’ या चित्रपटाचा हा रिमेक असणार आहे.

रिमेक जरी असला तरी हा सिनेमा पूर्णपणे भारतीयांच्या दृष्टिकोनातून लिहिला गेला असल्याचं याच्या मेकर्सचं म्हणणं आहे. थिएटर सुरू होणार ही बातमी बाहेर येताच करीना कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन सिनेमाची रिलीज डेट शेअर केली आहे.

खरंतर हा सिनेमा या दिवाळी किंवा क्रिसमसच्या मुहूर्तावर येणं अपेक्षित होतं पण इतरही बरेच सिनेमे असल्याने आमीर करीनाचा लाल सिंग चड्ढा हा २०२२ च्या व्हॅलेंटाईन डेला प्रेक्षकांच्या भेटीला येईल अशी करीनाने घोषणा केली आहे.

मध्यंतरी तुर्की भेटीवरून आमीर खान चांगलाच ट्रोल झाला होता शिवाय आत्ता त्याच्या घटस्फोटानंतर तर तो नेटकऱ्यांच्या हीटलिस्टवरच आहे. त्यामुळे खुद्द आमीर जरी सिनेमात असला तरी हा सिनेमा लोकं कशाप्रकारे स्वीकारतील हे सांगणं कठीण आहे.

४. भवाई :

 

 

हर्षद मेहता हे पात्र छोट्या स्क्रीनवर उभं करणारा आणि छोट्या स्क्रीनमधून संपूर्ण मनोरंजनसृष्टीला आपली दखल घ्यायला भाग पडणाऱ्या प्रतीक गांधीचा भवाई हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे.

सर्वप्रथम या सिनेमाचे रावण-लीला असे ठेवण्यात आले होते पण जेव्हा या सिनेमाचा ट्रेलर रिलीज केला गेला तेव्हा याच्या नावावरून आणि त्यातल्या काही सीन्सवरुन चांगलाच वाद रंगला होता.

नंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी त्यात बदल करून त्याचं नाव भवाई ठेवलं असून त्यातले आपत्तिजनक सीन्सही काढण्यात आल्याचं जाहीर केलं आहे.

येत्या ऑक्टोबरमध्ये हा सिनेमा लोकांच्या भेटीला येणार आहे, त्यामुळे या सिनेमालासुद्धा लोकं कसा प्रतिसाद देतील याबाबत सगळेच साशंक आहेत.

याबरोबरच साऊथच्या राजामाउलीचा RRR. भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी, ओम राऊतचा आदिपुरुष, नागराज मंजुळेचा झुंड, मारवल सुपरहीरो कॅटेगरीमधला द एटर्नल्स, किंवा जेम्स बॉन्डचा नो टाइम टू डाय असे बरेच मोठे सिनेमे येत्या काळात प्रदर्शित होणार आहेत.

 

तुम्ही यापैकी कोणता सिनेमा बघायला उत्सुक आहात ते आम्हाला कॉमेंटमध्ये कळवायला विसरू नका.

निश्चितच लोकांना आता उत्तम कंटेंट बघायची सवय लागली असल्याने मोठ्या स्टारकडे बघून कुणीच सिनेमा बघायला गर्दी करणार नाही हे नक्की, पण तरी याव्यतिरिक्त तुम्ही कोणता सिनेमा थिएटरमध्ये बघणं पसंत कराल ते आम्हाला नक्कीच कळवा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version