Site icon InMarathi

पाकिस्तान ‘खरंच’ सुरक्षित देश आहे का(?) ही ५ कारणं वाचून संभ्रम नक्की दूर होईल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

न्यूझीलंडने सुरक्षेचं कारण देऊन पाकिस्तानमधला क्रिकेट दौरा रद्द केल्यानंतर पाकिस्तानचा एक वेगळाच चेहेरा आपल्याला बघायला मिळतोय.

त्यापाठोपाठ इंग्लंडनेदेखील त्यांचा दौरा रद्द केल्याने सोशल मिडियावर एकच ट्रेंड मुद्दाम व्हायरल केला गेला की “पाकिस्तान हा सर्वात सुरक्षित देश आहे!” वेस्ट इंडिजच्या विवियन रिचर्ड, क्रिस गेलसारख्या खेळाडूंपासून वासिम अक्रमसारख्या सेन्सीबल लोकांनी देखील हा ट्रेंड फॉलो केला.

 

 

वासिम अक्रमची पत्नी जी स्वतः परदेशात सेटल आहे तिनेसुद्धा पाकिस्तान हा सर्वात सुरक्षित देश आहे हे ट्विट केल्यानंतर तर नेटकऱ्यांना आणखीनच चेव चढला आणि लोकांनी या सगळ्या दुटप्पी लोकांना सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली.

खरंच पाकिस्तान हा सुरक्षित देश आहे का? असं या लोकांना का वाटत असावं? यामागची मुख्य ५ कारणं आपण आज या लेखातून जाणून घेणार आहोत, ही ५ कारणं वाचल्यावर तुम्हालाही नक्कीच पटेल की खरंच पाकिस्तान हा सर्वात सुरक्षित देश आहे!

१. मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल्स :

जगातल्या कित्येक सुरक्षा एजन्सीच्या हीटलिस्टवर असणारे कुख्यात दहशतवादी, गुन्हेगार, ड्रग लॉर्ड हे कित्येक वर्षांपासून पाकिस्तानच्या छत्रछायेत राहतायत.

९/११ सारख्या अमेरिकेतल्या भीषण आतंकवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने जेव्हा लादेनसाठी आफगाणिस्तानवर हल्ला केला तेव्हा याच लादेनला पाकिस्तानने त्यांच्या देशात रेड कारपेट एंट्री दिली.

 

 

जेव्हा अमरिकेने लादेनला अबुटाबादमध्ये घुसून मारलं तेव्हा तो सद्दाम हुसेनसारखा लपून बसला नव्हता तर पाकिस्तानी मिलिट्री संस्थेच्या काही अंतरावर एकदम राजेशाही थाटात तो जीवन व्यतीत करत होता, अश्लील फिल्म्स बघत होता.

१९९३ मुंबई ब्लास्ट नंतर दाऊदसारखा आतंकवादी कुठे जाऊन आश्रय घेतो तर पाकिस्तानात, एकेकाळी भारतीय विमानं जी हायजॅक केली जायची त्यांचं स्वागत कुठे केलं जायचं तर कराची किंवा लाहोर मध्येच, हायजॅक नंतर मसुद अजहरसारखा दहशतवादी कुठे जातो तर पाकिस्तानात!

जो देश अशा नामचीन गुन्हेगारांना, दहशतवाद्यांना सुरक्षित ठेवू शकतो तिथे सुरक्षेची समस्या कशी निर्माण होईल, न्यूझीलंड सरकार वेडं आहे, त्यांना पाकिस्तानसारखा सुरक्षित देश कुठेच सापडणार नाही. हो की नाही?

२. आतंकवादी संघटनांशी असलेलं सौख्य :

ज्या देशाचा पंतप्रधान खुलेआम ही गोष्ट मान्य करतो की त्यांच्या सैन्याने तालिबानसारख्या संघटनांना ट्रेनिंग दिलं होतं त्या देशाचे अशा संघटनांशी घनिष्ट संबंध असणारच ना?

कित्येक आतंकवादी संघटनांशी साटंलोटं असणाऱ्या पाकिस्तानसाठी ही खूप गौरवाची गोष्ट आहे की त्यांचा प्रधानमंत्री संसदेत लादेनसारख्या आतंकवाद्याला शहिद म्हणून घोषित करतो.

यावरून आपल्याला अंदाज येईलच की पाकिस्तानचे या संघटनांशी कीती सलोख्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत!

 

 

एखाद्या देशात सुरक्षेचा प्रश्न कधी निर्माण होतो जेव्हा आतंकवादी संघटना आणि सरकार यांच्यात खटके उडतात आणि यामुळे दहशतवादी हल्ले होतात आणि नॅशनल सिक्युरिटीचा मुद्दा समोर येतो.

पण पाकिस्तानमध्ये सरकार आणि या आतंकवादी संघटना हातात हात घालून चहा आणि बिर्याणीचा आस्वाद घेत असल्याने तिथे सुरक्षेचा प्रश्न कसा निर्माण होईल बुवा?

त्यामुळे न्यूझीलंड किंवा इंग्लंड कुणीही कितीही कारणं दिली तरी पाकिस्तान याबाबतीत तरी सुरक्षित देश आहे की नाही?

३. संतुष्ट अल्पसंख्यांक(मायनॉरिटीज) :

पाकिस्तानमध्ये मायनॉरिटी लोकं खूप समाधानी आहेत, हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल ना? आपण आपल्या पोटच्या मुलाला कसं जपतो, त्याच्याभोवती सुरक्षा कवच बनवतो तसंच पाकिस्तानी सरकारने तिथल्या अल्पसंख्यांक समुदायाच्या भोवती एक सुरक्षा कवच बनवले आहे.

याच मायनॉरिटीजचा पाकिस्तानच्या घाणेरड्या राजकारणाशी संबंध येऊ नये म्हणून त्यांनी त्यांच्या संविधानात अशी तरतूदच करून ठेवली आहे की कोणीही अल्पसंख्यांक व्यक्ति तिथला प्रधानमंत्री किंवा राष्ट्रप्रमुख होऊ शकत नाही, बघा आहे की नाही पाकिस्तानला तिथल्या लोकांची काळजी!

 

 

याच अलसंख्यांक लोकांना बाहेर पडून त्रास होऊ नये म्हणून रोज पाकिस्तानमध्ये मंदिरं, गुरुद्वारे इत्यादि गोष्टी नष्ट केल्या जात आहेत कारण जर अल्पसंख्यांक बाहेर पडले तर त्यांना त्रास होईल त्यातून नवीन समस्या तयार होतील, म्हणूनच अशाप्रकारे पाकिस्तान त्यांची खास काळजी घेत आहेत.

आज पाकिस्तानात १% पेक्षा कमी हिंदू लोकं आहेत यावरून लक्षात येतं पाकिस्तानने हा मुद्दा कसा हाताळला आहे ते, मायनॉरिटीजची लोकसंख्या त्यांनी नियंत्रणात आणली कारण त्यांची लोकसंख्या वाढली तर समस्या वाढणार, त्यामुळे त्यांना त्रास होणार.

जगाच्या पाठीवर प्रत्येक देशातल्या मायनॉरिटीजच्या समस्या तुम्हाला बघायला मिळतील, पण पाकिस्तानातल्या मायनॉरिटीजचा तक्रारीचा सूर तुम्हाला कधीच ऐकायला मिळणार नाही कारण कुणी मायनॉरिटीज शिल्लकच नाहीत. 

बघा तिथल्या मायनॉरिटीजची कशी काळजी घेतय पाकिस्तान आणि इंग्लंड आणि न्यूझीलंड उगाच पाकिस्तानला व्हिलन ठरवून मोकळं झालंय!

४. सर्वोत्कृष्ट गुप्तचर संस्था :

पाकिस्तानकडे “त्यांची सर्वात बेस्ट” इंटेलिजेंस एजन्सी आहे ती म्हणजे ISI! काश्मीर मध्ये जेव्हा रातोरात आर्टिकल ३७० आणि ३५ अ भारताने हटवलं तेव्हा ISI ला काहीच कुणकुण लागली नाही.

 

 

१९७१ मध्ये पाकिस्तानचे २ तुकडे झाले तेव्हासुद्धा यांच्या बेस्ट एजन्सीला काहीच माहिती नव्हती. पुलवामानंतर आपल्या सैन्याने जी कारवाई केली त्याविषयीसुद्धा त्यांना काहीच माहिती नव्हती!

आणि हीच बेस्ट एजन्सी असल्यामुळे पाकिस्तानला कोणत्याच गोष्टीची चिंता नाही आणि म्हणूनच तिथे होणाऱ्या घडामोडींचं टेंशन त्यांना नाही त्यामुळेच पाकिस्तान हा सर्वात सुरक्षित देश आहे.

५. आतंकवादी हल्ल्यांची सवय :

पाकिस्तान सर्वात जास्त सुरक्षित असण्याचं हे तर सर्वात महत्वाचं कारण आहे. तिथल्या जनतेला तिथे होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांची आता सवयच झाली आहे.

ज्याठिकाणी दहशतवादी हल्ले क्वचितच होतात तिथल्या लोकांनाच याची जास्त भीती वाटते, पण पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला होणे ही एका लग्नात फटाके फोडण्यासारखी गोष्ट आहे.

 

तिथल्या लोकांसाठी असे हल्ले अगदी रोजचेच झाले आहेत, त्यांना त्याची भीती वाटत नाही. एका अहवालानुसार गेल्यावर्षी जेव्हा कोरोनाने जगभरात थैमान घातलं होतं त्या वर्षातसुद्धा पाकिस्तानमध्ये ३०० पेक्षा जास्त दहशतवादी हल्ले झाले आहेत.

त्या लोकांसाठी ही गोष्ट खूप किरकोळ असल्याने ते हीच अपेक्षा इतरांकडूनदेखील करतात, की जोवर काही होत नाही तोवर कुणीच काही बोलायचं नाही, सिक्युरिटी एजन्सी किंवा धमक्या हे सगळं ती लोकं जास्त मनावर घेत नाहीत.

याच काही मुख्य कारणांमुळे पाकिस्तानचे सेलिब्रिटीज आणि इतर लोकं सोशलमीडियावर बेंबीच्या देठापासून बोंबलून सांगतायत की पाकिस्तान हा सुरक्षित देश आहे, याचा अर्थ तुम्ही कसाही घ्या पण पाकिस्तानी लोकांची ही बाजू तुम्ही समजून घ्यायलाच हवी.

भले त्यांचा प्रधानमंत्री तालिबानी लोकांसाठी पैसे गोळा करत असला तरी पाकिस्तान हा सुरक्षित देश आहे हे छातीठोकपणे सांगायलासुद्धा कमालीची हिंमत लागते. काय मग आता तुम्हीसुद्धा ही कारणं वाचून मान्य करणारच ना की “पाकिस्तान हा खरंच सुरक्षित देश आहे!”

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version