भारतीय लोकांची खाण्याची आवड ही सर्वश्रुत आहे. परिस्थिति कशीही असो, लोक खाण्या-पिण्यात कधीच काटकसर करत नाहीत. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात असं समोर आलं आहे की, ऑनलाईन ऑर्डरची सुविधा आल्यापासून फूड इंडस्ट्री ही सतत मोठी होत आहे.
कधीच मंदी येणं शक्य नसलेल्या या क्षेत्रात नॉएडा येथील रजत जैस्वाल या पायलटने ‘व्हॉट-अ-बर्गर’ या स्टार्टअपच्या रूपाने पाऊल ठेवलं आणि २०२० मध्ये ३० कोटी रुपये टर्नओवरचा पल्ला गाठून सर्वांनाच चकित केलं.
dare2compete.com
‘सिनियर कमांडर’ म्हणून एका खाजगी विमानसेवा कंपनीसाठी काम करणाऱ्या रजत जैस्वाल आणि त्याचा मित्र फर्मान बेग यांनी विदेशी ‘बर्गर’ला भारतीय तडका दिला आणि खवैय्यांची मनं जिंकली.
फेब्रुवारी २०१६ मध्ये सुरू झालेल्या या स्टार्टअपने मागच्या ५ वर्षात १६ शहरांमध्ये मिळून ६० आऊटलेट्स सुरू केले आणि आज ते ‘मॅकडोनाल्ड’, ‘केएफसी’, ‘बर्गर किंग’ सारख्या विदेशी कंपन्यांना टक्कर देण्यास सज्ज झाले आहेत.
३५ वर्षीय रजत जैस्वालने खाण्याची आवड आणि विमान क्षेत्रातील अस्थिरता हे दोन्ही लक्षात घेऊन ‘व्हॉट-अ-बर्गर’ चा प्रस्ताव त्याच्या इंग्लंडमध्ये रहाणाऱ्या मित्र फर्मान बेगसमोर ठेवला. वैमानिक असलेला रजत या व्यवसायाला वेळ कसा देऊ शकेल? असा सहाजिकच प्रश्न फर्मान बेग समोर होता.
रजत जैस्वालने या प्रश्नाचं उत्तर देतांना सांगितलं की, “कोणताच वैमानिक हा रोज विमान उडवत नसतो. आम्हाला महिनाभर आधी त्या महिन्याचं वेळापत्रक मिळत असतं. त्यानुसार मी माझ्या व्यवसायाकडे आणि कामाकडे लक्ष देणं मला सहज शक्य होणार होतं. मी विमान उडवतांना बर्गरचा विचार करणार नाही आणि जमिनीवर असल्यावर विमानाकडे बघणार नाही.” हा विश्वास त्याने मित्राला दिला आणि दोघांनी एकत्र येऊन ‘व्हॉट-अ-बर्गर’चं बिजनेस मॉडेल तयार केलं.
पहिले तीन महिने या दोन मित्रांनी ‘बर्गर आवडला नाही, तर पैसे परत ही मोहीम राबवली. ही मोहीम आणि ‘व्हॉट-अ-बर्गर’चा बर्गर हे दोन्ही खवैय्यांना खूप आवडलं. एकाही ग्राहकाने पैसे परत मागितले नाही. लोकांचा प्रतिसाद बघून रजत आणि फर्मान यांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला.
भारतीय लोकांच्या खाण्याच्या सवयी बघून व्हॉट-अ-बर्गरने ‘बटर चिकन बर्गर’, ‘पनीर बर्गर’ या दोन प्रकारच्या बर्गरवर सुरुवातीपासूनच जोर दिला. बर्गरच्या या दोन प्रकारांचा व्हॉट-अ-बर्गरच्या पूर्ण टर्नओवर मध्ये मोठा वाटा आहे.
खमंग चव, कामाचे अधिक तास आणि पार्टी ऑर्डर्स स्वीकारणे या तीन गोष्टींमुळे व्हॉट-अ-बर्गरला उत्तर भारतात अल्पावधीतच चांगला व्यवसाय करता आला. त्यांनी सुरू केलेल्या इतर बर्गर मध्ये ‘आलू आचारी बर्गर’, ‘पनीर टिक्का सँडविच’चा समावेश केला जातो.
बर्गर हे पिझ्झा पेक्षा कमी वेळात आणि प्रवासात सुद्धा सहज खाल्लं जाऊ शकतं, म्हणून रजत जैस्वाल यांनी फूड इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय करण्याचा विचार करतांना ‘बर्गर’ची निवड केली.
tripadvisor.in
‘बर्गरचे २० प्रकार एकत्र घेऊन त्यांना ४९ रुपये ते १८९ रुपये इतक्या किमतीत लोकांना विकायचे’ या सोप्या बिजनेस मॉडेलवर त्यांनी काम केलं आणि त्यांना यश मिळत गेलं. आऊटलेट्सची जागा छोटी ठेवल्याने वेगवेगळ्या शाखा सुरू करतांना वाढणारा आर्थिक भार हा या टीमच्या आटोक्यात राहिला.
कमीत कमी अंतरावरून माल घेणे आणि तयार बर्गर ‘कोल्ड चैन’च्या पद्धतीने जास्तीत जास्त लांब पाठवणे यामुळे व्हॉट-अ-बर्गरच्या व्यवसायात उत्तरोत्तर नफा वाढत गेला. २०१७ चा १ कोटी टर्नओवर आणि २०१९ चा २९.५५ कोटी टर्नओवर हेच या व्यवसायाची प्रगती व्यक्त करते.
रजत जैस्वाल यांनी येत्या काळात बिर्याणी हा पदार्थसुद्धा आपल्या पदार्थयादीत वाढवण्याचं ठरवलं आहे. ३५ वयोगटाच्या खालील लोक बर्गर खाणं जास्त पसंत करतात आणि ३५ ते ४० वयोगटातील लोक हे बिर्याणीची मागणी करत असतात असा या टीमचा अभ्यास आहे आणि म्हणून ते हा बदल करत आहेत.
व्हॉट-अ-बर्गर हे सध्या दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यात आऊटलेट्स सुरू आहेत. येत्या काळात केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रात मिळून एकूण ५०० स्टोअर्स सुरू करण्याचं या टीमचं नियोजन आहे.
justdial.com
रजत जैस्वाल आणि फर्मान बेग यांना पूर्ण विश्वास आहे की, भारतीय कंपनी ही आंतरराष्ट्रीय कंपन्यांना व्यवसायात कधीही मात देऊ शकते. गरज आहे ती त्यांच्या आवडीच्या चवीत बर्गरसारखे पदार्थ तयार करण्याची आणि अपेक्षेपेक्षा जास्त चांगली सेवा देण्याची.
२००९ मध्ये पायलटची नोकरी करणाऱ्या रजत जैस्वाल ने आजवर ७००० तासांपेक्षा जास्त विमान चालवलं आहे. आज स्वतःची ६० स्टोअर्स चालवणं हेसुद्धा तितकंच आव्हानात्मक काम आहे असं रजत जैस्वाल या प्रवासाचं वर्णन करत असतात.
ज्या शहरात विमान घेऊन जाणार तिथल्या व्हॉट-अ-बर्गरच्या स्टोअरमध्ये जाऊन ते त्याची पाहणी आणि चव पारखत असतात, सुधारणा सुचवत असतात.
आपल्या दोन्ही कामांवर सारखंच प्रेम असलेल्या आणि ‘जे काम करेल ते सर्वोत्तम’ असा दृष्टिकोन असलेल्या रजत जैस्वालचं आज बिजनेस वर्ल्ड मध्ये खूप कौतुक होत आहे.