' भारतीयांच्या मनगटावर घड्याळ बांधणाऱ्या पहिल्या स्वदेशी कंपनीचा उदयास्त! – InMarathi

भारतीयांच्या मनगटावर घड्याळ बांधणाऱ्या पहिल्या स्वदेशी कंपनीचा उदयास्त!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

जेव्हा चोवीस तास, सातही दिवस, बारा महिने तेरा काळ चॅनल्स व इंटरनेटवर मनोरंजनाचा धबधबा वहात नव्हता त्या काळची गोष्ट आहे… रेडीओ आणि दूरदर्शन हे दोनच पर्याय घरबसल्या करमणुकीचे होते.

सिनेमा थिएटर्स मोजकी आणि ठराविक शोज्‌ असणारी होती. त्यावेळच्या जाहिरातीसुद्धा मनोरंजक आणि संस्मरणीय असायच्या! त्यातलीच एक जाहिरात…

‘‘मुस्कुराती घडी… खूबसुरत घडी… इरादों की घडी… हमारी घडी… एच. एम. टी.!
विश्वास की घडी… इंतजार की घडी… सपनों की घडी… खुषीयों की घडी…
हमारी…. धडकनों… में बसी… एच. एम. टी. ! राष्ट्र के समय प्रहरी !!’’

 

hmt watch ad inmarathi

 

हातात घड्याळ असणं ही मोठं झाल्याची खूण असण्याच्या त्या काळात एच.एम.टी.ची घड्याळे लोकप्रिय होती. खरंतर फक्त हीच घड्याळे सर्वत्र सहज उपलब्ध होती. कारण एच.एम.टी. या भारत सरकारच्या कंपनीद्वारा घड्याळांचे उत्पादन केले जात होते.

जपानच्या सिटीझन वॉच कंपनीच्या सहकार्याने १९६१ साली सुरू झालेल्या एचएमटी कंपनीच्या पहिल्या ताफ्यातील घड्याळांचे अनावरण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले आहे.

मनगटावरील घड्याळे कमी किमतीत उपलब्ध करून, स्वतंत्र भारतातील तरुणांमध्ये वक्तशीरपणाला प्रोत्साहन देणे ही त्यांची त्यामागची कल्पना होती.

मूळ कल्पनेशी एकनिष्ठ राहण्यासाठी कंपनीने त्यांच्या उत्पादनांची नावे ही अस्सल भारतीय ठेवली जसे कांचन (सोने), आदित्य (सूर्य) आणि जनता. एच.एम.टी.ने अंध व्यक्तींसाठी ब्रेल घड्याळांचेही उत्पादन केले होतो.

पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, माधवराव सिंदिया, कपिल देव यांसारख्या लोकप्रिय व्यक्तींमुळे प्रसिद्ध पावलेली ही घड्याळं भारतामध्ये १० पैकी ९ जणांच्या हातावर असायची. १९६१ मध्ये सुरू झाल्यापासून कंपनीने १० करोड घड्याळं विकल्याचा विक्रम आहे.

 

nehru hmt inmarathi

 

सत्तरच्या दशकात एचएमटीने या क्षेत्रामध्ये वर्चस्व प्रस्थापित केले होते. एक काळ या कंपनीचा दबदबा इतका होता की घड्याळ मिळण्याचा प्रतिक्षा कालावधी दहा महिन्यांपर्यंत असायचा.

त्याकाळी लग्नात आहेर म्हणून बजाज स्कूटर आणि म्युझिक सिस्टीमबरोबर एच.एम.टी.चे ‘कांचन’ हे सोनेरी घड्याळ देण्याची पद्धत रूढ होती. मात्र पुढे ८० च्या दशकामध्ये परिस्थिती बदलली.

क्वार्टझ तंत्रज्ञानाचा वापर असलेली घड्याळे एच.एम.टी.ने बाजारात आणली. ती साध्या घड्याळांच्या तुलनेत बऱ्यापैकी महाग होती. त्यामुळे भारतीय ग्राहकांनी त्यांना थंड प्रतिसाद दिला. कंपनीला बराच तोटा झाल्याने पुन्हा मेकॅनिकल घड्याळांकडे वळण्याचा आणि क्वार्टझ्‌ घड्याळांचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय झाला.

१९८४ साली टाटा कंपनीने घड्याळांच्या उत्पादनात मुसंडी मारली. आयातीचे नियम शिथिल झाल्यामुळे त्यांनी क्वार्टझ्‌ तंत्रज्ञान संदर्भातील आवश्यक गोष्टी आयात केल्या आणि नाममात्र रुपये ३५०/- पेक्षा कमी किंमतीमध्ये आकर्षक घड्याळे बाजारात आणली.

 

titan watch inmarathi

आक्रमक जाहिरात व चोख वितरणव्यवस्थेमुळे लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळून टायटन हा ब्रॅण्ड प्रस्थापित झाला. त्या तुलनेत एच.एम.टी. ही सरकारी कंपनी असल्याने तत्परतेत आणि कार्यक्षमतेत ती मागे पडू लागली.

एच.एम.टी,च्या व्यवस्थापनाने बदलत्या काळानुसार नवीन डिझाईन्स, आकर्षक पॅकेजिंग, तरूण ग्राहक या गोष्टींचा विचार करण्यामध्ये उशीर केला. या सर्व आघाड्यांवर प्रतिस्पर्ध्यांनी वेगाने पावले टाकली.

२००० – ०१ या आर्थिक वर्षामध्ये आलेला ५९.१८ कोटी रुपये तोटा वाढत गेला. २०१२ – १३ या आर्थिक वर्षामध्ये तर २४२.४७ कोटी रुपये इतका वाढला. कर्मचाऱ्यांचे पगार न देण्याची नामुष्की येण्याइतकी दारुण परिस्थिती ओढवली.

२०१४ च्या सुमारास एचएमटी घड्याळाचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला गेला. ३० वर्षे एचएमटी कंपनीच्या बंगळूरु शाखेमध्ये काम करणारे पी. जयपालन यांनी सांगितले, ‘‘माझ्यासाठी तो दिवस अविस्मरणीय होता. मी नुकताच शालेय जीवनातून बाहेर पडलो होतो आणि माझ्या वडिलांनी मला माझे पहिले घड्याळ घेण्यासाठी १२० रुपये दिले होते.

 

hmt watches inmarathi

 

त्याकाळात घड्याळ स्वतः विकत घेण्यापेक्षा कोणीतरी भेट देण्याची पद्धत जास्त होती. ते पैसे घेऊन मी दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता एचएमटी शोरूमच्या रांगेत माझे पहिले घड्याळ विकत घेण्यासाठी काही तास रांगेत उभा होतो.’’

ते पुढे सांगतात, ‘‘पदवीनंतर मी कंपनीच्या आफ्टर सेल्स डिपार्टमेंटमध्ये कामाला लागलो, जे माझे स्वप्न होतं. माझ्यासाठी हे दुर्दैव आहे की घड्याळांच्या शेवटच्या बॅचबरोबर माझीही इथली कारकीर्द संपुष्टात येत आहे.’’

नंतर अचानक परिस्थितीने वेगळे वळण घेतले आहे. ऑनलाईन घड्याळे खरेदी करणाऱ्या फ्लिपकार्ट, इबे अशा विविध कंपन्यांच्या वेबसाईटवर एच.एम.टी.च्या घड्याळांना मागणी येऊ लागली. जुन्या ग्राहकांच्या स्मरणातील ही घड्याळे नव्या पिढीतील ग्राहकांनाही आवडू लागली.

भारतातील सर्वांत मोठा ऑनलाइन विक्रेता असलेल्या फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर सध्या ह्या कंपनीची १३४ मॉडेल्स दिसत असून इबे कंपनीकडे एचएमटीचे एनएएसएल ०३ हे स्वयंचलित घड्याळ रु. ८४०० इतक्या किमतीला उपलब्ध करून देत आहे.

 

watches inmarathi

 

देशविदेशातील घड्याळ संग्राहकांकडून या घड्याळांना विशेष मागणी येत आहे. पुरंजन मोहन सारखा सोळा वर्षांचा फेसबुकवरील घड्याळ संग्राहक ग्रुपचा सदस्य असो किंवा उत्तराखंडमधील प्रतीक शुजन्यासारखा हौशी घड्याळ संग्राहक असो… इंग्लंडमधील माईक पर्ल हा निवृत्त लायब्ररिअन असो वा जर्मनीतील फ्रान्झ मॅटिस हा घड्याळ प्रेमी असो, सर्वांनाच एच.एम.टी.च्या घड्याळांनी आकर्षित केले आहे.

मॅटिसच्या मते, “एच.एम.टी.च्या घड्याळांचे उत्पादन बंद होणे दुदैवी आहे. योग्य प्रकारच्या मार्केटिंगच्या मदतीने आजही हा ब्रॅण्ड आधुनिक जगात स्वतःचे ठळक असे स्थान निर्माण करू शकतो.

या घड्याळांचे उत्पादन सुरू झाल्यास जास्तीत जास्त ग्राहक आणि संग्राहक दोघांनाही ही घड्याळे विकत घेऊन इतिहास निर्माण करता येईल.’’

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?