Site icon InMarathi

बाजीगर, शोलेसहीत या ५ चित्रपटांचा ‘क्लायमॅक्स’ ऐनवेळी बदलला गेला!

movies climax inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

एखादा लेखक जेव्हा एखादी कथा लिहायला घेतो तेव्हा त्याच्या मनात त्या कथेची रूपरेषा ठरलेली असते. एक कच्चा आराखडा तयार असतो. पण जशी जशी कथा पुढे जाते तसे तसे त्या कथेत अनेक बदल होत जातात. असे फार कमी वेळेला घडते की जशी ठरवली आहे तशीच कथा कागदावर उतरली.

बॉलिवूडच्या अनेक हिट चित्रपटांच्या बाबतीतसुद्धा असे घडले आहे की जो शेवट आपल्याला दाखवला गेला तो ऐनवेळेला बदलला आहे. आधी जो शूट केला होता तो शेवट आणि आपल्याला दाखवला तो शेवट वेगळाच होता.

 

 

हा शेवट दाखवल्यामुळे चित्रपटाची कथा आणखी प्रभावी ठरली आणि हे चित्रपट प्रेक्षकांच्या कायम आठवणीत राहिले.

यातील काही चित्रपट तर हिंदी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड म्हणून ओळखले जातात. चला तर बघूया याच चित्रपटांपैकी पाच चित्रपट ज्यांचा क्लायमॅक्स शेवटच्या क्षणी बदलण्यात आला होता.

१. शोले

हिंदी चित्रपटसृष्टीत मैलाचा दगड म्हणून ओळखला जाणारा ‘शोले’ हा चित्रपट बघितला नाही असा भारतीय माणूस विरळाच! शोले या चित्रपटाची जादू अजूनही रसिकांच्या मनावर कायम आहे. जय-वीरूची मैत्री, बसंतीचा नाच, ठाकूरचे दुःख आणि गब्बरसिंगचे डायलॉग अजूनही लोकांना पाठ आहेत.

 

 

शेवटी जेव्हा जय मरतो तेव्हा डोळे पाणवतातच! शोलेने अमिताभ बच्चनच्या बुडणाऱ्या करियरला हात दिला आणि मग बच्चनसाहेबांनी मागे वळून पाहिले नाही. चित्रपटाच्या शेवटी गब्बर शेवटी पोलिसांच्या तावडीत सापडला आणि लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की या चित्रपटाचे दोन शेवट शूट करण्यात आले होते. एक शेवट म्हणजे जो आपण बघितला की ठाकूर गब्बरला मारून टाकण्याआधीच तिथे पोलीस पोहोचतात आणि गब्बरला अटक करतात.

पण ओरिजिनल शेवट असा होता की ठाकूरने ठरवल्याप्रमाणे त्याच्याच हातून गब्बरचा अंत होतो. खिळ्याचे बूट घालून तो गब्बरला मारून मारून शेवटी जबर जखमी करतो आणि त्याचा जीव घेतो. पण सेन्सॉर बोर्डाला हा शेवट पटला नाही.

 

 

गब्बरला पायांनी तुडवून मारणे सेन्सॉर बोर्डाला रुचले नाही. हा सीन खूप हिंसक झाला असता. पण दिग्दर्शकांकडे दुसरा पर्याय नव्हता कारण ठाकूरला हात तर नव्हते त्यामुळे तो बंदूक चालवू शकत नव्हता.

त्यामुळे गब्बरला तुडवून मारणे हाच एक मार्ग होता. पण सेन्सॉर बोर्डाने परवानगी न दिल्याने हा शेवट बदलून अखेर गब्बरला पोलिसांच्या स्वाधीन करणे हा शेवट करावा लागला.

२. बाजीगर

जसा अमिताभ बच्चनसाठी शोले हा कारकिर्दीतील महत्वाचा चित्रपट ठरला तसाच शाहरुख खानसाठी बाजीगर हा चित्रपट खूप महत्वाचा होता. त्याच्या कारकिर्दीतील एक उत्तम आणि हिट चित्रपट म्हणून बाजीगरचे नाव घेतले जाते.

 

 

या चित्रपटाच्या शेवटी अजय त्याच्या शत्रूचा बदला घेताना स्वत: देखील जखमी होतो आणि मदन चोप्रा (खलनायक) व अजय दोघेही मरतात असा शेवट आपण बघितला.

परंतु या चित्रपटाचा शेवट आधी वेगळा करण्यात आला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक अब्बास मस्ताननी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की या चित्रपटाचे दोन शेवट तयार करण्यात आले होते.

एकात अजयचा मृत्यू होतो असे दाखवले होते तर दुसऱ्या शेवटात अजयला पोलीस अटक करतात असे दाखवले होते. चित्रपटाच्या निर्मितीत ज्या लोकांचा सहभाग होता त्यापैकी प्रमुख लोकांचे असे मत होते की अजयला अटक होताना दाखवले तर लोकांची सहानुभूती मिळणार नाही.

 

 

त्यापेक्षा शेवटी त्याचा मृत्यू दाखवला तर चित्रपटाची कथा अधिक प्रभावी ठरेल आणि लोकांना हा शेवट अधिक आवडेल. म्हणून शेवटी अजय मरतो असा शेवट आपल्याला दाखवला गेला.

३. आँखे

२००२ साली आलेला आँखे हा चित्रपट अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सुश्मिता सेन, अर्जुन रामपाल या दिग्गजांच्या अभिनयाने नटलेला होता. चित्रपटाची कथा सस्पेन्स थ्रिलर होती.

 

 

चित्रपटाच्या शेवटी असे दाखवले होते की विजय सिंह राजपूत म्हणजेच जे पात्र अमिताभ बच्चन यांनी रंगवले होते त्या पात्राला अटक होते आणि तुरुंगात टाकले जाते आणि अक्षय कुमार व अर्जुन रामपाल ह्यांची पात्रे सुश्मिता सेनच्या मृत्यूनंतर तिच्या लहान भावाला सांभाळण्याची जबाबदारी घेतात.

परंतु चित्रपटाचा ओरिजिनल शेवट वेगळा केला होता. यात असे दाखवले होते की एका भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याला लुटीच्या पैश्यांतील काही भाग देण्याची लाच दाखवून विजय सिंह राजपूत पोलिसांच्या तावडीतून सुटतो आणि नंतर अक्षय कुमार व अर्जुन रामपाल ज्या ट्रेनची वाट बघत थांबलेले असतात तिथे येऊन पोहोचतो.

 

 

त्याला तिथे बघून अक्षय कुमार आणि अर्जुन रामपाल आपले पिस्तूल बाहेर काढतात आणि विजय सिंह राजपूतच्या खुनशी हास्याबरोबर चित्रपटाचा शेवट होतो. संपूर्ण जगात हाच शेवट दाखवला गेला होता. फक्त भारतात विजय सिंह राजपूतला तुरुंगवास होतो असे दाखवले होते.

४. पीके

आमीर खानचा पीके बऱ्याच गोष्टींसाठी चर्चेत आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर यश मिळवले होते.

 

 

पीकेवर पुस्तक लिहिणारी जग्गू, तिचे कौतुक करणारे तिचे कुटुंब आणि सरफराजला शेवटी सगळ्यांनी स्वीकारणे आणि आपल्या ग्रहावर परत गेलेला पीके त्याच्या ग्रहावरील आणखी लोकांना बरोबर घेऊन परत पृथ्वीवर येतो असा शेवट आपण बघितला होता.

परंतु या चित्रपटाचा शेवट देखील बदलण्यात आला होता. आधी या चित्रपटाच्या शेवटी सरफराज आणि जग्गू पीकेची आठवण काढून बॅटरी रिचार्ज डान्स करतात असे दाखवले होते. पण या शेवटापेक्षा जो शेवट आपल्याला दाखवला तो मनाला अधिक भावणारा होता.

 

५. पिंक

“नो मीन्स नो” या संवादामुळे आणि अमिताभ बच्चन यांच्या संयत अभिनयामुळे प्रसिद्धी पावलेल्या पिंक चित्रपटात एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे.

 

 

ज्यावेळी एखादी मुलगी नाही म्हणते तेव्हा “तिच्या नकारात होकार दडलेला असतो” हे फालतू लॉजिक न लावता तिच्या नकाराचा अर्थ “नाही” असाच असतो तेव्हा कन्सेंटचा आदर करायला शिका असा संदेश ह्या चित्रपटात देण्यात आला होता.

या चित्रपटाच्या शेवटी असे दाखवले होते की कोर्टात सगळे पुरावे सादर करून, साक्ष देऊन नंतर मुली केस जिंकतात. त्यांना निर्दोष मुक्त केले जाते.

खरं तर ओरिजिनल शेवट असा होता की पुरावे कमी पडल्यामुळे मुली केस हरतात. पण लोकांना या विषयाचे गांभीर्य लक्षात यावे यासाठी चित्रपटाचा शेवट बदलून तो सकारात्मक करण्यात आला, जेणेकरून लोकांचा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि या विषयावर जनजागृती होऊ शकेल.

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version