राणे – ठाकरे संघर्षापेक्षाही “राणे – नाईक” कुटुंबांमधील वैर अधिक रक्तरंजित होतं!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या नारायण राणे विरुद्ध उद्धव ठाकरे यांच्यातील वाद पार विकोपाला पोहोचल्याचे आपण सगळेच बघत आहोत. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री नारायण राणे ह्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते.
हे आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे नारायण राणेंच्या विरुद्ध नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरमधील गोळवली येथे अटक करण्यात आली. महाराष्ट्रातील जनतेला राणे विरुद्ध ठाकरे हा वाद काही नवा नाही.
दोन्हीही कुटुंबातील लोकांनी अनेकदा एकमेकांविरुद्ध विधाने केली आहेत, धमक्या देखील दिल्या आहेत. यापूर्वी देखील नारायण राणेंवर यापेक्षा भयंकर आरोप झाले आहेत आणि त्यातून ते सहीसलामत सुटले देखील आहेत.
सामनाच्या अग्रलेखात असे स्पष्ट म्हटले आहे की , “नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरुन उठवले आणि अटक केली असे त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती. राणे यांना जेवणावरुन उठवणं वाईटच; पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरुन, भर संसारातून कायमचे कोणी उठवले याचा नव्याने तपास ‘ठाकरे’ सरकारने करायला हवा. कायद्याचे राज्य मोडण्याचा प्रयत्न करणे हे गांजा मारुन पडण्याइतके सोपे नाही.”
थोडक्यात ठाकरे आणि राणे यांच्यातील विवाद आता विकोपाला पोहोचलेत. परंतु एखाद्या कुटुंबाशी वैर पत्करण्याची राणे कुटुंबाची ही पहिलीच वेळ नाही. याआधी देखील श्रीधर नाईक आणि राणे यांचे वैर जगजाहीर होते.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
हे ही वाचा – शिवसेनेचा कडवा कार्यकर्ता ते कोंबडी चोर – राणेंच्या या नावामागचा खास इतिहास!
–
सध्या जितकी राणे व ठाकरे यांच्यातील संघर्षाबद्दल चर्चा होते आहे तितकीच ,किंबहुना त्यापेक्षा जास्त चर्चा राणे आणि नाईक यांच्यातील संघर्षाबद्दल झालेली आहे. हा संघर्ष अधिक भयंकर आणि रक्तरंजित होता. हा संघर्ष इतक्या टोकाला गेला होता की यातूनच नारायण राणेंवर चक्क खुनाचे आरोप झाले होते.
सिंधुदुर्गातील रमेश गोवेकर, अंकुश राणे, श्रीधर नाईक आणि सत्यविजय भिसे यांच्यापैकी काही जणांच्या हत्त्या झाल्या तर काही जण अचानक बेपत्ता झाले. नाईक आणि भिसे यांच्या हत्येत नारायण राणेंचा हात आहे असा गंभीर आरोप राणेंवर झाला होता. पण यापैकी कुठलाही गुन्हा राणेंविरोधात सिद्ध होऊ शकला नाही.
श्रीधर नाईक हत्याप्रकरणी राणेंना आरोपी म्हणून अटक देखील झाली होती. परंतु त्यांच्याविरोधात गुन्हा सिद्ध न झाल्याने कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली होती. परंतु आता ठाकरे सरकारने या फाईल्स परत ओपन करून त्याचा नव्याने तपास करायला हवा अशी सामनाच्या अग्रलेखात मागणी करण्यात आली आहे.
काय आहे हे श्रीधर नाईक प्रकरण? वाचा.
१९९०-९१ या काळात कोकणात कणकवली येथे नाईक कुटुंबाचा चांगलाच दबदबा होता. तिथल्या राजकारणात नाईक कुटुंबाला महत्वाचे स्थान होते. नाईक कुटुंबीय काँग्रेसला वाहिलेले होते.
याच काळात शिवसेनेचा कोकणात शिरण्याचा जोरदार प्रयत्न सुरु होता. कोकण हा सुरुवातीला काँग्रेसचा गड म्हणून प्रसिद्ध होता. त्याठिकाणी शिवसेनेला स्थान मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले.
हळूहळू शिवसेनेने काँग्रेसच्या या गडाला धक्के देण्यास सुरुवात केली होती. तरीही कणकवली येथे नाईकांना पुरून उरणे सोपे नव्हते. येथे नाईकांमुळे काँग्रेस मजबूत स्थितीत होती. त्याकाळी कोकणात “राडे” करण्याची पद्धत नव्हती. कोकणातले राजकारण शांततेत सुरु असे.
याच काळात राणे मालवणच्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर एक वर्षाने कणकवलीतील धडाडीचे काँग्रेसचे कार्यकर्ते श्रीधर नाईक यांची अचानक भीषण हत्या करण्यात आली. राजकीय वैमनस्यातून नारायण राणेंनी ही हत्या घडवून आणल्याची चर्चा त्याकाळी रंगली होती.
या प्रकरणात नारायण राणे यांच्यासह १३ जणांवर आरोपपत्र दाखल झाले होते. नारायण राणे ह्यांनी युवा नेते श्रीधर नाईक यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. नाईक यांचे कुटुंबीय व मित्रपरिवाराने या प्रकरणात नारायण राणेंवर आरोप केले होते.
तब्बल ५ वर्षे हा खटला चालला. परंतु पुराव्याअभावी यात राणेंची निर्दोष मुक्तता झाली. मंत्री असताना देखील राणेंना या प्रकरणात कोर्टात हजेरी लावावी लागली होती.
नारायण राणे मंत्री असल्यामुळेच या खटल्यातील साक्षीदारांवर दडपण आलं आणि त्यांनी साक्ष फिरवली आणि कोर्टाला राणेंविरुद्ध पुरावे मिळू शकले नाहीत आणि ते या प्रकरणात निर्दोष म्हणून सुटले असा आरोप विरोधकांद्वारे केला जातो.
त्यानंतर २००२ साली कणकवलीजवळ शिवडाव गावाजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्यविजय भिसे यांची हत्या झाली. शिवसेना- राष्ट्रवादीमध्ये असलेल्या संघर्षातून ही हत्या झाल्याची चर्चा गावात झाली.
या हत्येत देखील राणेंचा हात असल्याचे बोलले जात होते. परंतु या प्रकरणातही राणेंची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यानंतर २००५ साली राणेंनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्ष जवळ केला आणि कोकणातून निवडणूक लढवली.
२००५ आणि २००९ साली नारायण राणेंना कोकणात टक्कर देणारे कुणीही नव्हते. परंतु २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीत मात्र नारायण राणेंना हार पत्करावी लागली आणि त्यांना मात देणारे होते श्रीधर नाईक ह्यांचे पुतणे वैभव नाईक!
राणे व नाईक यांच्यात १९९० च्या दशकापासून पासून सुरु झालेला हा संघर्ष २०१४ मध्ये देखील कायम होता. खास करून जिल्ह्याच्या राजकारणात तर हा संघर्ष अगदी टोकाला गेला होता. अजूनही या संघर्षाची चर्चा कणकवली आणि सिंधुदुर्गात होते.
आता सामनाच्या अग्रलेखात म्हटल्याप्रमाणे नाईक आणि भिसे यांच्या खुनाचा तपास परत नव्याने सुरु झाला तर आधी निर्दोष मुक्तता होऊन देखील आता मात्र नारायण राणे संकटात सापडू शकतील का याचे उत्तर येणारा काळच देईल.
===
हे ही वाचा – बाळासाहेबांमुळे एका रात्रीत नारायण राणे ‘बेस्ट’चे चेअरमन कसे झाले?
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
—
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.