महामारीचा मोदींच्या लोकप्रियतेवर परिणाम झालाय का? सर्वेक्षणातून मिळालेली माहिती
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
कोरोना महामारीने लोकांच्या दैनंदिन जीवनात मोठे बदल घडवले. ‘न्यू नॉर्मल’ हा शब्द सगळ्यांच्याच आयुष्याचा भाग झाला. पण जसे सामान्य माणसांच्या आयुष्यात अनेक बदल घडले, तसे भारतीय राजकारणात सुद्धा बरीच उलथापालथ झालेली दिसतेय.
राजकीय गोष्टींमध्ये झालेल्या बदलांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर झालेला परिणाम हा सर्वाधिक चर्चिला जाणारा मुद्दा आहे, यात कुणाचंही दुमत नसेल.
मागील वर्षीच्या मार्च महिन्यात टाळ्या आणि थाळ्या वाजवायला सांगणं, रात्रीच्या वेळी अंधार करून दिवे लावायला सांगणं, अशा गोष्टींपासूनच याची सुरुवात झाली होती. सुरुवातीला लोकांना मज्जा वाटली, पण नंतर याच गोष्टी जनतेच्या नजरेतून टीकेचा विषय ठरू लागल्या.
त्यावेळी पडत्या फळाची आज्ञा म्हणून सगळ्यांनीच मोदींनी सांगितलेल्या गोष्टी अमलात आणल्या. मात्र आज त्यावरूनच त्यांची खिल्ली उडवण्यातही जनता मागे नाही.
प्रचारसभा
मोदीजी यावरच थांबले नाहीत, तर यावर्षीच्या सुरुवातीला त्यांनी कोरोनावर मात केल्याचं घोषित करून टाकलं. दुसरी लाट येणारच नाही, या आविर्भावात देशाचे पंतप्रधान आणि भारतीय जनता पार्टीचे नेते वावरू लागले.
बंगाल आणि इतर ४ राज्यात झालेल्या निवडणुका, त्यावेळी झालेल्या प्रचारसभा याविषयी अनेक महिने ‘घरात बसलेल्या’ जनतेने चर्चा सुरु केली. विरोधकांवर निशाणा साधला गेलाच, पण टीकेची सुई मुख्यत्वे करून पंतप्रधान मोदींच्या दिशेला असल्याचं दिसून आलं.
प्रचार सभेत गर्दीमध्ये मुक्तपणे वावरणाऱ्या मोदींनी, महामारीच्या काळात साधीशी पत्रकार परिषदही घेतली नाही, याविषयी सुद्धा चर्चांना उधाण आलं, हे वेगळं सांगायची गरज नाहीच!
कुंभमेळा
कोरोनाच्या लढ्यात देशवासीयांना “घरी बसा” असा सल्ला देणारे पंतप्रधान मोदी कुंभमेळ्यादरम्यान कुठे गेले होते? असा सवाल समस्त भारतीयांनी विचारला.
देशात कोरोनाची दुसरी लाट फोफावत असताना कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या लाखो साधूंव्दारे कोरोनाचा फैलाव होत नाही का? सामान्य माणसाच्या किमान गरजांवरही महामारीचं कारण देणारं केंद्र सरकार कुंभमेळ्यासारख्या प्रचंड गर्दीच्या कार्यक्रमांना हिरवा कंदिल कसं दाखवतं? सरकारला महामारीचं गांभीर्य नाही का? धर्माच्या नावाखाली सामान्यांचा जीव धोक्यात घालताना नियम, सक्ती या संक्लपना गेल्या कुठे? अशा अनेक प्रश्नांनी मोदींची प्रतिमा डागाळण्यात हातभार लावला.
कुंभमेळ्यात चाललेल्या कोरोना चाचण्यांचा काळाबाजार सरकार उघड्या डोळ्यांनी पाहता होतं. याचाच परिपाक म्हणजे कुंभमेळ्यामुले कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर भारतीयांसह परदेशातील अनेक तज्ञांनीही मोदींच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
महागाई सुद्धा…
या सगळ्या घटना घडत असतानाच, दुसरीकडे महागाई सुद्धा गगनाला भिडत आहे. पेट्रोल, डिझेलच्या मागोमाग CNG चे सुद्धा भाव वाढले. पेट्रोलने शंभरी पार केल्यावर पंतप्रधानांवर निशाणा साधून ट्रोलिंग झाल्याचं सगळ्यांनीच पाहिलं.
जेवणासाठी लागणारा, रोजच्या वापरात असणारा सिलेंडर सुद्धा महागला होताच. अन्नधान्यांचे भाव सुद्धा गगनाला भिडलेले पाहायला मिळाले. एकीकडे कोरोनाचे संकट आ वासून उभे असताना दुसरीकडे महागाईने सुद्धा लोकांच्या आयुष्याचं कंबरडं मोडलंय. याचंही खापर केंद्र सरकारवर आणि पर्यायाने देशाच्या पंतप्रधानांवर फोडलं जातंय.
मंत्रिमंडळात मोठे बदल
मोदींनी या सगळ्याचा परिणाम म्हणून, मंत्रिमंडळातही मोठे बदल केले. नावाजलेले चेहरे मंत्रिमंडळातून बाहेर पडलेले पाहायला मिळाले. टीकेचा धनी ठरू लागल्यानंतर काही ना काही पावलं उचलणं गरजेचं होतं, म्हणून हे बदल केले गेल्याचं जनता म्हणू लागली. यात तथ्य नव्हतंच असं म्हणता येणार नाही.
लोकप्रियतेवर प्रश्नचिन्ह
या सगळ्या पार्श्वभूमीवर, इंडिया टुडे यांनी एक सर्वेक्षण करायचं ठरवलं. या सर्वेक्षणातून समोर आलेली माहिती, ‘नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झाली आहे’ या वाक्याला दुजोरा देणारी आहे असं म्हणायला हरकत नाही.
या सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी ६६% लोकांची मोदींना असणारी पसंती, यंदा मात्र थेट ३८ टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. लोकांच्या पसंतीतून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी उतरत असल्याचं दिसतंय.
यात आणखी एक मुद्दा अधोरेखित करणं गरजेचं आहे. याच सर्वेक्षणात यादीत दुसऱ्या स्थानावर नाव मिळवलंय ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी! मागील वर्षी ३% असणारी त्यांची लोकप्रियता यंदा ११% वर पोचली आहे. म्हणजेच जनतेला पंतप्रधान म्हणून मोदी नको असले, तरीही भाजपला जनतेने पसंती दर्शवली आहे, हेदेखील सत्य आहे.
तिसऱ्या क्रमांकावर १०% लोकांच्या पसंतीसह राहुल गांधी आणि चौथ्या क्रमांकावर ‘आप’चे नेते आणि दिल्लीचे अरविंद केजरीवाल यांच्यासह बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विभागून आहेत. या दोघांनाही ८% लोकांची पसंती मिळाली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला आहे, यात फारशी कुणालाही शंका नसेल, मात्र या सर्वेक्षणाविषयी आणखी एक महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला देणं आवश्यक आहे. जवळपास साडे चौदा हजार लोकांच्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. ज्यातील ७१% व्यक्ती या ग्रामीण भागातील आहेत.
त्यामुळेच, या एका सर्वेक्षणाच्या आधारे कुठलंही भाकीत करणं योग्य, की अयोग्य हे ज्याचं त्याने ठरवणं अधिक योग्य, नाही का?
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.