' जेव्हा ५० सीसीच्या ‘लुना’ने चक्क दमदार ‘डेक्कन क्वीनला’ हरवलं… – InMarathi

जेव्हा ५० सीसीच्या ‘लुना’ने चक्क दमदार ‘डेक्कन क्वीनला’ हरवलं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

ज्याकाळी पुणे ते मुंबई अंतर पार करायला बाकीच्या रेल्वे गाड्यांना ५ तास लागत हेच अंतर डेक्कन क्वीन पावणे तीन तासात पार करत असे. १ जून १९३० साली सुरु झालेल्या डेक्कनक्वीन कधीच वाफेच्या इंजिनवर चालली नाही.

पहिल्या दिवसापासून इलेक्ट्रिक इंजिनावर चालणारी पहिली प्रवासी गाडी, भारतातील पहिली डिलक्स गाडी, पहिली सुपरफास्ट गाडी, एका डब्यातून दुसऱ्या डब्यात जाण्याची सोय असणारी पहिली गाडी, महिलांचा आणि खानपान सेवेचा स्वतंत्र डबा असणारीही ही पहिलीच गाडी.

 

deccan queen inmarathi

 

भारतातील मानाची गाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेक्कन क्वीनच्या नावे आणखी एक विचित्र विक्रम आहे “लुना कडून हरण्याचा विक्रम”

लुना कोणाला माहित नाही? पुणेकर फिरोदियांच्या कायनेटिक ग्रुप कंपनीने जपानच्या होंडाच्या सहकार्याने लुनाची निर्मिती केली होती. इटालीयन प्याजिओच्या चिआओ नावाच्या गाडीची ही लायसन्स कॉपी होती.

१९७२ साली ही गाडी लॉंच झाली आणि आल्या आल्या भारतभरात या गाडीची हवा सुरू झाली. वजनाला अगदी हलकी, छोटी सुटसुटीत बाईक सायकलला एक उत्तम पर्याय होती.

पुण्यासारख्या सायकलींच्या शहरात तयार होणाऱ्या लुनाने झटक्यात मार्केट मारले. कित्येकांनी ही गाडी बुक केली.

kinetic luna inmarathi

 

सुरुवातीला अनेकांना शंका होती की,भारतात अनेक ठिकाणी रस्ते कच्चे आहेत तर ही गाडी तिथे कशी टिकेल? लुनाला स्पीड असणार की नाही? यासाठी फिरोदियानी लुनाची पब्लिसिटी करण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरल्या.

टीव्ही वर्तमानपत्रात याच्या जाहिराती झळकू लागल्या. तरुणांना आकर्षित करण्यासाठी क्रिकेटच्या सामन्यावेळी मॅन ऑफ द मॅच म्हणून ही लुना बक्षीस दिली जाऊ लागली.

फोर्स मोटर्सचे चेअरमन अरुण फिरोदिया यांना आठवते त्याप्रमाणे फेमस क्रिकेटर संदीप पाटील, चंद्रशेखर यांनी ही लुना जिंकली होती. दहावी बारावीच्या बोर्डात नंबर काढणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील लुना बक्षीस दिली जायची.

यापेक्षाही वरताण म्हणजे लुनाच्या वेगाची खात्री सगळ्यांना पटावी म्हणून थेट डेक्कन क्वीन एक्प्रेसबरोबर तिची रेस लावणार असल्याच जाहीर केलं. अनेकांना गंमत वाटली. ५० सीसीची ही छोटीशी मोपेड भारतातल्या सुपरफास्ट ट्रेनशी कशी काय स्पर्धा करू शकते?

हा फक्त पब्लिसिटी स्टंट आहे असा अनेकांना गैरसमज झाला. पण अरुण फिरोदिया सिरीयस होते.

 

arun firodia inmarathi

 

त्यांनी महाराष्ट्र राज्याचे विधानपरिषद सभापती जयंतराव टिळक यांच्याहस्ते पुणे स्टेशनवरून शर्यतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला आणि दादरला शर्यत संपणार तिथे मुंबईचे पोलीस कमिशनर यांना स्पर्धेचा विजेता घोषित करण्यासाठी परीक्षण करण्याची विनंती केली.

सकाळी ठीक ७.२० वाजता नेहमीच्या टायमिंगला डेक्कन क्वीन पुणे स्टेशन वरून सुटली. त्याचवेळी जयंतराव टिळक यांनी हजारोंचा जमाव आणि पत्रकारांच्या साक्षीने लुनालादेखील हिरवा झेंडा दाखवला.

लुनास्वाराने जीव तोडून गाडी हाकली. तेव्हा मुंबई पुणे जुना महामार्ग होता. आज आपण पाहतो तो एक्स्प्रेसवे अजून अस्तित्वात यायचा होता. खंडाळ्याचा प्रचंड मोठा घाट तिथला वळणावळणाचा रस्ता अशी अनेक आव्हाने लुना समोर होती. अनेकांनी पैज लावली होती की लुना लोणावळ्याच्या देखील पुढे जाऊ शकणार नाही.

 

old pune highway inmarathi

 

पण या साऱ्यांचा अपेक्षाभंग करून लुनाने आपल्या स्टाईलमध्ये घाटरस्ता पार केला. अरुण फिरोदिया सांगतात की वाटेत इमर्जन्सीसाठी मदत म्हणून आम्ही एक कार देखील लुनाच्या पाठोपाठ पाठवली होती. मात्र लुना एवढ्या सुसाट सुटली होती की कारला देखील तिला गाठणे अशक्य होत होतं.

लुनाने जेव्हा मुंबईत प्रवेश केला तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण फिरोदिया यांना लुना ही शर्यत पूर्ण करेल याची खात्री होती पण ती तब्बल १५ मिनिट लवकर दादरमध्ये दाखल होऊन सर्व शक्तिमान डेक्कन क्वीनला हरवेल हे खुद्द त्यांनी स्वप्नात देखील पाहिलं नव्हत.

पण हे खरोखर घडलं. टाळ्यांच्या गजरात लुना डेक्कनक्वीनच्या आधी दादर स्टेशनला पोहचली. तिला गाठायला डेक्कन क्वीनला १५ ते २० मिनिट लागले. ५० सीसी ची मोपेड लुना जिंकली होती.

 

luna kinatic inmarathi

 

मुंबईत वार्ताहर हा सोहळा बघण्यासाठी हजर होते. दुसऱ्या दिवशी प्रत्येक वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर लुनाचीच चर्चा होती. त्यानंतर ‘चल मेरी लुना’ च्या आडवं येण्याची हिंमत कोणाची उरली नाही.

===

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?