आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
सणांची विविधता हे भारताचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. हिंदू दिनदर्शिकेतील प्रत्येक महिन्यात कुठला ना कुठला सण किंवा विशेष दिवस असतोच. सणवारांची रेलचेल असलेला श्रावण महिना नुकताच सुरु झाला आहे. श्रावण महिन्यात श्रावण सोमवारचे महत्व अनन्यसाधारण आहे.
भारतात प्रत्येक गावात महादेवाचे मंदिर आहे आणि प्रत्येक मंदिराची एक वेगळी आख्यायिका आहे. असेच एक महादेवाचे मंदिर आहे जे फक्त महाशिवरात्रीला उघडे असते आणि केवळ त्याच दिवशी भक्तांना येथे दर्शन घेण्याची संधी मिळते. हिंदू धर्मात जसे श्रावण महिन्याचे महत्व आहे तसेच शिवभक्तांसाठी माघ कृष्ण चतुर्दशी म्हणजेच महाशिवरात्री हा देखील अत्यंत खास दिवस मानला जातो.
असे म्हणतात का या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची भौगोलिक स्थिती विशेष असते त्यामुळे माणसाच्या शरीरातील नैसर्गिक ऊर्जा काही प्रमाणात वाढलेली असते. त्यामुळे हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा आहे. म्हणूनच महाशिवरात्रीला जागरण करून महादेवाची उपासना करण्यास सुरुवात झाली. तर सांगण्याचा उद्देश असा की महाशिवरात्री एकूणच संपूर्ण भारतभरात अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी केली जाते.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
महादेवाच्या सगळ्याच देवळात या दिवशी भक्तगण दर्शनासाठी जातात. त्यापैकी मध्यप्रदेशातील महादेवाचे एक मंदिर असे देखील आहे जे केवळ महाशिवरात्रीला उघडते.
मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यात एक प्राचीन शिवमंदिर आहे. हे प्राचीन देऊळ सोमेश्वर महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. रायसेन जिल्ह्यातील प्राचीन दुर्ग परिसरातील एका उंच डोंगरावर हे मंदिर बांधलेले आहे.
या देवळातील भगवान सोमेश्वर महादेवाचे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे असे म्हणतात. या देवळाचे वैशिष्ट्य असे की या देवळाचे दरवाजे वर्षातून एकदाच फक्त महाशिवरात्रीला उघडतात.
सूर्योदयापासून सकाळी सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हे देऊळ दर्शनासाठी उघडे असते. सूर्यास्तानंतर ह्या देवळाचे दरवाजे परत बंद केले जातात. त्यावेळी या देवळात पुरातत्व विभागाचे अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित असतात. वर्षातून केवळ १२ तास उघडे असलेल्या या देवळात सोमेश्वर महादेवाचे दुर्लभ दर्शन घेण्यासाठी अनेक लोक येतात.
तसे तर लोक या देवळाच्या परिसरात वर्षभरच दर्शनासाठी येतात पण या काळात देवळाच्या दाराला कुलूप असते. पण लोक दाराबाहेरूनच महादेवाच्या सानिध्यात आल्याचे समाधान करून घेतात आणि साकडे घालतात.
आपापला नवस बोलून देवळाच्या दारालाच लोक गंडे,दोरे आणि कापडं बांधतात. आपापला नवस पूर्ण झाल्यावर लोक परत देवळात जाऊन त्या कापडाची गाठ सोडतात.
या देवळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सूर्याची किरणे जेव्हा ह्या देवळातील शिवलिंगावर पडतात तेव्हा ते शिवलिंग सोन्यासारखे झळाळते. श्रावणात देखील ह्या ठिकाणी श्रद्धाळुंची गर्दी होते. तेव्हा मंदिरात भाविकांसाठी दर्शन, जलाभिषेकाची विशेष व्यवस्था केली जाते.
श्रावणात लोखंडाच्या जाळीतून लांबूनच भाविकांना महादेवाचे दर्शन घ्यायला मिळते. आणि एका पाईपच्या साहाय्याने शिवलिंगावर जलाभिषेक करता येतो.
स्थानिक लोकांच्या मते हे सोमेश्वर महादेव मंदिर खूप प्राचीन आहे. या देवळाबद्दल मध्यंतरी काही विवाद झाले होते. म्हणूनच पुरातत्व विभागाने या देवळाला कुलूप लावले. त्यानंतर १९७४ साली तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाश चंद्र सेठी स्वतः या देवळात आले आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांनी कुलूप उघडून तिथे स्वतः महादेवाची पूजा केली. तेव्हापासून केवळ महाशिवरात्रीला या देवळाचे दरवाजे उघडून भक्तांना महादेवाचे दर्शन घेऊन पूजा करायला मिळते.
अनेक लोक पायी डोंगर चढून महादेवाचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येतात. महाशिवरात्रीला या डोंगरावर जत्रा असते आणि हजारो लोक या देवळात येतात.
या ऐतिहासिक मंदिराविषयी प्राचीन काळापासून विवाद आहे. रायसेन दुर्गावर सोमेश्वर महादेव मंदिर तर आहेच शिवाय तेथे एक मशीद देखील आहे. त्यामुळे येथे धार्मिक कारणांवरून विवाद झाले. म्हणून पुरातत्व विभागाने येथे चक्क देवळालाच कुलूप लावले.
१९७४ पर्यंत ह्याठिकाणी कुणालाही प्रवेश नव्हता. परंतु १९७४ साली रायसेन नगर जिल्ह्यातल्या हिंदू संघटनांनी देऊळ उघडण्यासाठी एक मोठे आंदोलन सुरु केले. आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांना हे देऊळ एक दिवसासाठी का होईना पण उघडावे लागले आणि तेव्हापासून दर महाशिवरात्रीला हे देऊळ उघडण्याची व या ठिकाणी मोठी जत्रा भरण्याची परंपरा सुरु झाली.
–
हे ही वाचा – रुसलेल्या मेव्हण्यामुळे भगवान शंकराला मिळाली हक्काची सासुरवाडी…!
–
स्थानिक लोकांनी हे देऊळ रोज उघडे राहावे यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे अनेकदा निवेदन दिले आहे. अजूनही त्यासाठी भाविकांचे प्रयत्न सुरु आहेत. आता भगवान शंकराची कृपा कधी होते आणि कधी ह्या देवळाचे दरवाजे कायम उघडे राहण्याची शासनाकडून परवानगी मिळते याचीच शिवभक्त वाट बघत आहेत.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.