Site icon InMarathi

जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान नाहीत, वाचा “लपवलेला” इतिहास!

nehru featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

शाळेत प्रवेश घेतल्यापासून तर सामान्य ज्ञानाच्या कुठल्याही परीक्षेत जर हा प्रश्न आला की भारताचे पहिले पंतप्रधान कोण? तर आपण झोपेत सुद्धा भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांचेच नाव घेऊ.

पण जर का आपल्याला कुणी सांगितलं की भारताचे पहिले पंतप्रधान हे पंडित नेहरू नसून दुसरेच कुणी आहेत तर आपण जीव गेला तरी हे मान्य करणार नाही.

 

 

कारण भारताच्या इतिहासातील प्रत्येक दस्तऐवजात पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू यांचाच उल्लेख येतो. परंतु इतिहासात असाही उल्लेख आहे की बरकतुल्ला खान हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. होय! याचेही पुरावे उपलब्ध आहेत.

कन्फ्युज होण्याचे अजिबात कारण नाही कारण १९४७ साली इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान पंडित नेहरू ह्यांचाच होता. तर बरकतुल्ला खान हे ब्रिटिशकालीन भारताचे पहिले पंतप्रधान होते.

हे ही वाचा पंडित नेहरूंबद्दल जनमानसात घट्ट रुजवले गेलेले हे ९ समज चक्क धादांत खोटे आहेत…!

भारतावर ब्रिटिशांची सत्ता होती तेव्हा बरकतुल्ला खान ह्यांचे नाव पंतप्रधान म्हणून घोषित करण्यात आले होते. पण त्यांचे हे सरकार अल्पजिवी ठरले.

ब्रिटिशांनी त्यांचे सरकार लगेच पाडले आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू यांनी शपथ घेतली. म्हणूनच पंडित नेहरू यांचा उल्लेख सगळ्या दस्तऐवजांमध्ये आढळतो आणि बरकतुल्ला खान ह्यांचे नाव देखील सामान्य लोकांना ठाऊक नाही.

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बरकतुल्ला खान ह्यांचे अमूल्य योगदान आहे. त्यांचा जन्म ७ जुलै १८५४ रोजी भोपाळमध्ये झाला. त्यांचे संपूर्ण नाव अब्दुल हाफिज मोहम्मद बरकतउल्ला असे होते. त्यांचे शिक्षण भोपाळच्या सुलेमानिया स्कुल येथे झाले.

त्यांनी अरबी, फारसी तसेच इंग्रजीचे शिक्षण घेतले होते. त्यांचे शिक्षण सुरु असतानाच त्यांना उच्चशिक्षित अनुभवी मौलवी आणि विद्वानांना भेटण्याची संधी मिळाली. त्यातून त्यांच्या विचारांची जडणघडण झाली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते त्यांच्याच शाळेत अध्यापक म्हणून रुजू झाले.

 

 

शाळेत अध्यापन करत असताना त्यांची ओळख शेख जमालुद्दीन अफगाणी यांच्याशी झाली आणि त्यांच्या विचारांनी ते प्रभावित झाले. शेख जमालुद्दीन अफगाणी हे तेव्हा जगभरात मुस्लिम लीगच्या प्रचार व प्रसाराचे कार्य करत होते.

बरकतुल्ला खानदेखील जगभरातील मुसलमान लोकांच्या एकतेसाठी प्रयत्न करू लागले. ह्याच काळात बरकतुल्ला खान यांच्या आई वडिलांचे निधन झाले आणि त्यांच्या एकुलत्या एक बहिणीचे लग्न झाले. त्यामुळे ते एकटे पडले.

भोपाळची नोकरी सोडून ते मुंबईला आले आणि त्यांनी इंग्रजीचे शिक्षण सुरु ठेवले. ४ वर्षांत त्यांनी इंग्रजीचे उच्चशिक्षण घेतले व १८८७ साली पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले.

इंग्लंडला गेल्यानंतर त्यांची भेट भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारांचे मुख्य संरक्षक श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी झाली. श्यामजी कृष्ण वर्मा यांना भेटल्यावर बरकतुल्ला खान ह्यांच्या मनात देखील देशभक्तीची भावना जागृत झाली व देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्यांनी ठरवले.

 

 

भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी लेखन सुरु केले. त्यांच्या प्रभावी लेखनशैलीमुळे अनेक क्रांतिकारक त्यांना ओळखू लागले. आपल्या लेखनातून त्यांनी भारताचे स्वातंत्र्य तसेच ब्रिटिशांच्या अमानवी अत्याचाराबद्दल सुद्धा आवाज उठवला.

ब्रिटिश सत्तेविरुद्ध सतत बंड करत असल्याने इंग्लंडमध्ये बरकतुल्ला खान यांना विरोध होऊ लागला. अखेर या विरोधामुळे बरकतुल्ला खान ह्यांनी १८९९ साली इंग्लंड सोडले व ते अमेरिकेला गेले.

अमेरिकेला गेल्यानंतर त्यांनी तिथेच राहून अनिवासी भारतीयांना भेटणे सुरु केले व अनेक संमेलनांचे आयोजन केले.अमेरिकेत निर्वाह करण्यासाठी त्यांनी तिथल्या शाळांमध्ये अरबी भाषा शिकवणे सुरु केले. तिथे राहून त्यांनी ब्रिटिश सरकारचा विरोध करणे सुरूच ठेवले.

आपल्या लेखणीतून तसेच भाषणांतून त्यांनी ब्रिटिश सरकारवर कडक ताशेरे ओढले. त्यांच्या “हसरत मोहानी” ह्या पत्रात ते म्हणतात की, “ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे की आज २ कोटी हिंदुस्थानी हिंदू, मुस्लिम उपासमारीने मरत आहेत. संपूर्ण देशावर आज उपासमारीची वेळ ओढवली आहे पण ब्रिटिश सरकारला तर केवळ हिंदुस्थानात मसाल्यांचा व्यापार कसा चालेल ह्याची चिंता आहे. हिंदुस्थानातून लुटलेल्या या धनाचा ब्रिटिश लोक केवळ व्याजासारखा उपयोग करतात.

 

 

ब्रिटिश शासनात दिवसेंदिवस लूट वाढत चालली आहे. ही लूट थांबवण्यासाठी तसेच गुलामगिरीतून मुक्तता मिळवण्यासाठी भारतातील प्रत्येक हिंदू व मुसलमानाने एकत्र येईन काँग्रेसबरोबर स्वातंत्र्याचा लढा लढायला हवा आणि हिंदू मुस्लिम एकतेचा आदर्श निर्माण करावा.”

मध्यंतरी काही काळासाठी ते जपानला गेले. त्या काळात अनेक भारतीय क्रांतिकारक जपानमध्ये वास्तव्यास होते. जपानमध्ये राहूनदेखील त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणे सुरूच ठेवले. यामुळे तिथल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना जपान सोडून जाण्यास भाग पाडले.

जपानहून ते परत अमेरिकेला आले तेव्हा त्यांना समजले की तिथले अनिवासी भारतीय गदर पार्टी तयार करत आहेत. त्यांनी देखील गदर पार्टीत जाण्याचा निर्णय घेतला. ह्याच काळात त्यांनी मेक्सिकोमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांचे एकत्रीकरण करण्याचे कार्य देखील केले.

१३ मार्च १९१३ साली त्यांनी अमेरिकेत सोहन सिंह बहकना आणि लाला हरदयाळ यांच्यासह नेतृत्व करत गदर पार्टीची स्थापना केली. गदर पार्टी हे भारताच्या स्वातंत्र्यासाठीचे अभियान होते. बरकतुल्ला खान यांचे स्वप्न होते की भारत स्वतंत्र व्हावा आणि भारतात लोकशाहीचे व धर्मनिरपेक्ष सरकार असावे.

हे स्वप्न साकार व्हावे ह्यासाठी गदर पार्टीने एक साप्ताहिक प्रकाशित करणे सुरु केले. या साप्ताहिकात बरकतुल्ला खान क्रांतिकारांसाठी लेख लिहीत असत.

 

 

याच दरम्यान भारताच्या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या राजा महेंद्र प्रताप, चंपक रामन आणि अब्दुल वाहिद खान ह्यांनी हे आंदोलन जर्मनीपर्यंत पसरवले. हे कार्य करताना राजा महेंद्र प्रताप व बरकतुल्ला खान ह्यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली.

या दोघांनी मिळून भारतीय सैनिकांना ब्रिटिश सरकारविरुद्ध उभे राहण्याची प्रेरणा दिली. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी अफगाणिस्तान, टर्की तसेच बगदादचा दौरा केला. या दौऱ्यानंतर त्यांनी १९१५ साली भारतात अस्थायी सरकार स्थापन केले.

या अस्थायी सरकारला दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांच्या विरोधात असलेल्या जर्मनीने देखील मान्यता दिली. जर्मनीसह टर्की, अफगाणिस्तान, जपान व रशिया सारख्या ब्रिटिशविरोधी देशांची देखील या सरकारला मान्यता होती.

या सरकारमध्ये पंतप्रधान, राष्ट्रपती ह्यांची निवड झाली होती तसेच काही मंत्र्यांनी पद व गोपनीयतेची शपथ ग्रहण केली होती.

या सरकारमध्ये राजा महेंद्र प्रताप सिंह ह्यांची राष्ट्रपती म्हणून तर बरकतुल्ला खान यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली होती आणि त्यांनी या पदाची शपथ देखील ग्रहण केली होती. या सरकारचा लोकांवर इतका प्रभाव वाढू लागला की इंग्रजांना हे सरकार पाडावे लागले.

म्हणूनच हे सरकार अल्पजीवी ठरले. तरीही हे भारताचे पहिले सरकार व बरकतुल्ला खान हे भारताचे पहिले पंतप्रधान मानले जातात. आऊटलूकमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार गदर पार्टीच्या सरकारमध्ये उबैद आलं सिंधी गृह मंत्री, मौलवी बशीर युद्ध मंत्री व चंपक करण पिल्लई हे विदेशी मंत्री होते.

 

 

१९१९ साली ब्रिटिश सरकारने गदर पार्टीचे साप्ताहिक बंद केले. तसेच त्यांना अफगाणिस्तान आणि रशियातून मिळणारी मदत बंद केली.

अशा रीतीने हे सरकार ब्रिटिश सरकारने टिकू दिले नाही. परंतु रासबिहारी बोस, लाला हरदयाळ, सचिन सन्याल, भूपेंद्रनाथ दत्त

यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी लढा थांबू दिला नाही. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांना सहकार्य करत ब्रिटिशांविरुद्ध अधिक जोमाने लढा दिला.

या सगळ्या लढ्याचा बरकतुल्ला खान ह्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला. अमेरिकेत कॅलिफोर्निया मध्ये एका सभेला संबोधित करताना अचानक त्यांची प्रकृती ढासळली आणि काही दिवसांतच २२ सप्टेंबर १९२७ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

त्यांची इच्छा होती की त्यांचे अंत्यसंस्कार भारतभूमीवरच व्हावे. परंतु त्यांची ही इच्छा अपुरीच राहिली. त्यांचे अंत्यसंस्कार अमेरिकेतच झाले आणि भारतीय लोक सुद्धा त्यांना सपशेल विसरले. त्यांचा उल्लेख देखील फारसा कुठे केला गेलेला दिसत नाही.

भारतमातेच्या या थोर परंतु दुर्लक्षित सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली!

===

हे ही वाचा नेहरूंचा सामाजिक क्षेत्रातील वैज्ञानिक दृष्टिकोन : भाबडा की डोळस

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version