Site icon InMarathi

बाळासाहेबांनी दिलीप कुमार यांना देशभक्ती सिद्ध करायला भाग पाडलं तेव्हा….

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

आजची सेक्युलर शिवसेना कडवी असण्याचा तो काळ होता. हिंदुहृदयसम्राट म्हणून ज्यांची ख्याती होती त्या बाळासाहेबांच्या एका इशार्‍यावर मुंबई बंद पडण्याचा, पेटण्याचा तो काळ होता. भारत आणि पाकिस्तानचे संबंध कधीच सौहार्दाचे नव्हते.

१९९३ च्या मुंबईतल्या दंगलीनं इथल्या मुस्लिमांचे आणि पाकिस्तानी अतिरेक्यांचे संबंध आधीच उघडे केले होते. इथून पळून गेलेले अंडरवर्ल्ड माफिया मुस्लिम देशांत आरामात रहात होते याची छायाचित्रही सतत प्रसिध्द होत होती.

 

 

पाकिस्तानच्या सीमेवरच्या खोड्या थांबत नव्हत्या. पाकिस्तानी सरकारचा पवित्रा नेहमीच मुंह में राम बगल मे छुरी असा होता. कितीही वाटाघाटी आणि शांतता प्रस्थापित करण्याच्या चर्चा झाल्या तरीही अतिरेक्यांना फूस लावणं, सीमा अशांत ठेवणं हे चालूच होतं.

अशातच भाजपचं वाजपेयी सरकार आलं. हिंदूंचा पक्ष म्हणून ज्याची ओळख तो पक्ष सत्तेत आल्यावरही पाकिस्तानशी आधीच्या सरकारप्रमाणेच सलोख्याचे संबंध राखण्याचा, प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आपले पंतप्रधान करत होते.

अतिरेकी कारवायांना खतपाणी घालणार्‍या पाकिस्तानच्या कलाकार, खेळाडू यांना भारतात येताना दहादा विचार करावा लागत असे, याचं कारण म्हणजे तेव्हा असणारी शिवसेना पर्यायानं बाळासाहेब नावाचा दरारा.

हिंदी चित्रपटातील दिग्गज अभिनेता दिलिप कुमार हे मुळचे पाकिस्तानातले. त्यांची पाकिस्तानी मातीशी असणारी नाळ लक्षात घेऊन पाकिस्तानच्या नवाज शरीफ सरकारनं १९९८ साली त्यांना तिकडचा प्रतिष्ठीत असा निशान-ए इम्तियाज पुरस्कार जाहिर केला.

 

 

दोन्ही देशातले संबंध सुधारण्यासाठी कलाक्षेत्र नेहमीच पुढे आलेलं आहे. हा पुरस्कारही शत्रू देशानं पुढे केलेला सौहार्दाचा हात मानून दिलीप कुमार यांनी स्विकारला. पुरस्कार सोहळ्यासाठी ते सुनिल दत्त यांच्या समवेत पाकिस्तानलाही जाऊन आले.

हे ही वाचा शाहरुख बंदूक घेऊन पार्टीत शिरला तेव्हा खुद्द बाळासाहेब त्याला सामोरे गेले…!

इथपर्यंत सगळं ठीक चाललं होतं मात्र पुढच्याच वर्षी म्हणजे १९९९ साली पाकिस्ताननं कारगिल युध्द छेडलं आणि दोन्ही देशात प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं. पाकिस्तानी कलाकारांना, खेळाडूंना भारतात येण्यास आणि इकडच्या खेळाडू, कलाकारांना तिकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला.

बाळासाहेब ठाकरे यांनी दिलिप कुमार यांनी पाकिस्ताननं दिलेला पुरस्कार परत करावा अशी जाहिर मागणी केली. बाळासाहेबांची मागणी हा आदेश समजण्याची रित असल्यानं आणि तिथे विरोध करणं अशक्य असल्यानं दिलिप कुमार यांनी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली.

 

 

आता भाजपवर देशातून या प्रकरणाबाबत दबाव यायला सुरवात झाली होती. तत्कालीन राजकारण आणि कारगील युध्दामुळे देशातील इतकं नाजूक बनलं होतं की कोणचीही मनं दुखवून चालणार नव्हतं. दिलिप कुमार मात्र पुरस्कार परत न करण्यावर ठाम होते.

त्यांनी थेट अटलजींची भेट घेत त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केल्यावर अटलजींनिही त्यांच्या मागणीचा विचार करत तेंव्हाचे भाजपचे पार्टी जनरल सेक्रेटरी नरेंद्र मोदी यांच्याकडे या प्रकरणाचा पाठपुरावा सोपविला.

नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की हा पुरस्कार दिलीप कुमारनी परत करावा असं तत्कालीन परिस्थिती बघता अनेकांना वाटत असलं तरीही ही वैयक्तित बाब असल्यानं सरकारनं यावर दबाव आणणं योग्य होणार नाही. त्यामुळे हा पुरस्कार परत करणं न करणं हे त्यांच्या विवेक बुध्दीवर सोडणंच उचित राहिल.

दोन्ही बाजूंनी आता वाद प्रतिवाद चालू झाले. शिवसेनेनं त्यांच्या देशभक्तीवरच प्रश्नचिन्ह उभं केलं. यानं दिलीप कुमार संतापले आणि देशभक्ती सिध्द करण्यासाठी असल्या पुरस्कारांची आपल्याला काहीएक गरज नसून देशासाठी हा एकच काय असे शंभर पुरस्कारही परत करण्याची तयारी असल्याचं सांगितलं.

 

 

मात्र कलाकाराला त्याच्या कलेसाठी पुरस्कृत केलं गेलं असताना त्याचा संबंध राजकाराणाशी जोडून जे राजकारण खेळलं जात होतं त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली.

पुरस्कारासाख्या गोष्टीवरून जो काही राडा चालला होता त्याला त्यांनी सर्कस संबोधत, तिकडे जवान कारगिलमधे शहिद होत असताना इथल्या नेत्यांना राजकारण सुचत असल्याचं सांगत खरमरीत शब्दात आपल्यावर निशाणा साधणार्‍यांना उत्तर दिलं.

प्रकरण फारच चिघळल्यावर पंतप्रधानांनी या हस्तक्षेप करत दिलीप कुमार यांच्या देशभक्तीवर कसलीही शंका घेऊ नये किंबहुना भारताला त्यांचा अभिमानच असल्याचं स्पष्ट केलं. मात्र शिवसेना काहीच ऐकायला तयार नव्हती आणि पुरस्कार वापसीवरच हटून बसली होती.

पुरस्कार परत करावा किंवा पाकिस्तानात निघून जावं असा इशारा दिलिप कुमार यांना देण्यात येत होता. त्यांच्या घराबाहेर निदर्शनं केली जात होती.

सायरा बानू यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितलं होतं की, संपूर्ण आयुष्य इथे घालवल्यावर, कलाक्षेत्रात आपल्या कामानं नाव उंचावल्यावरही देशभक्ती अशा पध्दतीनं सिध्द करावी लागणं दुर्दैवी आहे. शिवाय हा पुरस्कार स्विकारण्यापूर्वी भारत सरकारलाही याची कल्पना देण्यात आली होती.

हे ही वाचा या ‘सामान्य’ माणसाने ‘हवेत असलेल्या’ दिलीप कुमार यांना एका क्षणात जमिनीवर आणलं

 

राष्ट्रपतींच्या होकारानंतरच हा पुरस्कार स्वीकारल्यावरही जर अशा घटना घडणार असतील तर या देशात मुस्लिम धर्म असल्यानंच निशाणा साधला जात आहे असं म्हणावं लागेल. देशाची सीमा कारगील युध्दामुळे तर देश पुरस्कारावरून पेटला होता.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version