आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
“कुछ तो गडबड है” म्हणणारे एसीपी प्रद्युमन आठवतायत? वर्षानुवर्ष ठराविक वेळेत आपल्याला भेटणारे आणि प्रत्येक भेटीत नव्या कुशाग्र बुद्धीने नव्या गुन्ह्यांची उकल करणारी ही व्यक्ती खऱ्या आयुष्यात पोलिस नाही हे अनेकांना सांगूनही खरं वाटायचं नाही.
CID मालिकेच्या आजवरच्या प्रवासात अभिनेता शिवाजी साटम यांना खऱ्या नावापेक्षा ACP प्रद्युमन म्हणून ओळखणाऱ्यांची संख्या आजही जास्त आहे. तसंच काहीसं घडतंय अभिनेता अनुप सोनी याच्याबाबत! ‘क्राइम पेट्रोल’ या खळबळजनक कार्यक्रमातून समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत सगळ्यांना सावध करणारा हा कलाकार आता रील लाईफमधून रिअल लाईफमध्येही गुन्हेगारी विश्वात पाऊल टाकतोय.
थांबा, कोणताही गैरसमज करून घेण्यापुर्वी हे प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घ्या, कारण त्यानंतर तुम्हाला अनुप सोनीचं भरभरून कौतुक करावंसं वाटेल.
अभिनेता अनुप सोनी यांनी नुकतीच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि इंडस्ट्रीतील कलाकारांनीच नव्हे तर प्रेक्षकांनीही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु केला अर्थात कारणंही तसंच आहे.
अभिनेता अनुप सोनी यांनी लॉकडाऊनमुळे मिळालेल्या निवांत वेळेचा सदुपयोग करत चक्क ‘इंटरनॅशन फॉरेन्सिक सायन्स’च्या एज्युकेशन डिपार्टमेंटचा ‘क्राइम सिन्स इन्व्हेस्टिगेशन’ हा कोर्स यशस्वीरित्या पुर्ण केला आहे.
तुम्हाला असं वाटत असेल की हा केवळ पब्लिसिटी स्टन्ट असावा किंवा ‘शो’ बाबत नवी घोषणा असावी, मात्र प्रत्यक्षात टिव्ही शो किंवा अभिनयाशी याचा काहीही संबंध नाही.
झालं असं की गेल्या अनेक वर्षांपासून ‘क्राइम पेट्रोल’ या कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करणाऱ्या अनुप यांचा गुन्हेगारी विश्वाशी खूप जवळचा संबंध येत होता. गुन्हेगारी विश्वाचं खरं रूप समाजापुढे मांडताना त्यांनी या दरम्यान अनेक घटनांचा अभ्यास केला.
चोरी, दरोडा यांपासून स्त्रीयांवर होणार अत्याचार, कौटुंबिक कलह ते थेट अगदी सायबर क्राईमसारखे विषयही क्राइम पेट्रोलच्या माध्यमातून त्यांनी हाताळले. हा कार्यक्रम जरी नाट्यपुर्णरितीने मांडला जात असला तरी या कथा सांगताना, त्याच्या स्क्रीप्टचा अभ्यास करताना अनुप सोनी यांना क्राइम क्षेत्राबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती.
गेली अनेक वर्ष क्राइम पेट्रोलच्या निमित्ताने वेगवेगळ्या कथा, गुन्हेगारी विश्वातील बारकावे, गुन्हेगारांची मानसिकता यांचा त्यांनी अभ्यास केला होता. क्राइम पेट्रोलमध्ये ज्याप्रमाणे गुन्ह्यांची उकल केली जाते, त्याबाबतही अनेक वर्षांचा अनुभव अनुप यांच्या गाठीशी आहे.
–
हे ही वाचा – आरोपीला मिडियासमोर आणताना त्याचा चेहरा का झाकतात? ही आहेत कारणं!
–
मात्र हे ज्ञान केवळ कार्यक्रमापुरतं मर्यादित राहण्यापेक्षा या क्षेत्रात भविष्यातही काम करण्याची संधी मिळावी या हेतूने त्यांनी इंटरनॅशन फॉरेन्सिक सायन्स’ च्या एज्युकेशन डिपार्टमेंटचा ‘क्राइम सिन्स इन्व्हेस्टिगेशन’ हा कोर्स करण्याचा विचार केला.
अभिनेत्यांना इतर क्षेत्रांचा अभ्यास करण्याची इच्छा असूनही वेळेची कमतरता हे कारण दिलं जातं, मात्र अनुप यांनी लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या सक्तीच्या विश्रांतीचा उपयोग करत कोर्समध्ये नोंदणी केली.
ऑनलाईन अभ्यास करत त्यांनी गुन्हेगारी विश्वातील बारकाव्यांसह त्याची उकल करण्याची पद्धत, फॉरेन्सिक विभागाचं काम यांच्या विविध श्रेणी त्यांनी उत्तीर्ण केल्या आहेत.
सोशल मिडीयावरून त्यांनी ही माहिती दिल्यानंतर मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, दिग्दर्शक यांच्यासह चाहत्यांनीही त्यांची पाठ थोपटली.
भविष्यात या कोर्सद्वारे त्यांना प्रत्यक्ष फॉरेन्सिक विभागासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मात्र अनुप आपलं मनोरंजनाचं क्षेत्र सोडून नव्या क्षेत्रात पदार्पण करणार की या ज्ञानाचा वापर करत क्राइम पेट्रोल सारख्या आणखी रंजक कार्यक्रमांची निर्मिती करणार? हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.