Site icon InMarathi

गोव्याच्या खाद्यसंस्कृतीतलं ४०० वर्षं जुनं पेयं आजही कित्येक पर्यटकांना आकर्षित करतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माणूस हा तसा पहिल्यापासून अन्नाच्या, त्यातही चवीच्या शोधात भटकणारा प्राणी. त्याला जर संधी आणि जागा मिळाली तर तो अख्खी खाद्यसंस्कृती तयार करतो.

गोवा ही पोर्तुगीजांची वसाहत झाली आणि एक निराळीच कोंकणी आणि पोर्तुगीजन खाद्यसंस्कृती निर्माण झाली. गोवा म्हटलं की आठवतो अथांग निळाशार सागर, सोनेरी वाळूचे स्वच्छ किनारे, तिथले नारळपाण्यासारखे निर्मळ लोक, पाचुच्या रंगाचा निसर्ग आणि त्यात उठून दिसणारी पोर्तुगीज शैलीची बांधकामे.

 

 

इतकेच नाही तर कधीकाळी पोर्तुगीजांची वसाहत असल्याने गोव्याच्या स्थानिक आणि खाद्य संस्कृतीवर पोर्तुगीजांची छाप जाणवते. मित्रांनो, गोवा आणखी एका गोष्टीसाठी फेमस आहे. होय! अनेकांना जिला चाखण्याची उत्सुकता असते ती गोव्याची राणी – काजू फेणी!

हे ही वाचा या सुट्टीत, गोव्यात फिरताना या १० गोष्टी चुकूनही करू नका…

आता तुम्ही म्हणाल की फेणी तर माहिती आहे पण तुम्हाला हे माहिती आहे का ही फेणी जवळपास ५०० वर्षं जुनी अशी देशी पद्धतीची दारू आहे, आणि या काजू फेणीच्या आधीदेखील गोव्यात ‘नारळफेणी’ आणि ‘ताडफेणी’ तयार होत असे.

पोर्तुगीज गोव्यात आल्यावर काजू पासून पोर्तुगीज पद्धतीने फेणी बनवण्यात येवू लागली. जिचा गोव्याच्या खाद्यसंस्कृतीत मोठा वाटा आहे. आज आपण या फेणीचा इतिहास आणि ओळख करून घेऊ.

संस्कृत शब्द ‘फेना’पासून फेनी हा शब्द तयार झाला, ज्याचा अर्थ फेस असा होतो. फेनी ग्लास मध्ये ओतताना असा फेस येतो म्हणून तिला फेनी म्हंटले जात असावे.

 

 

फेणी एक पारंपारिक प्रकारचे मद्य असून नारळ, ताडगोळे किंवा काजूची बोंडे यांपासून ती बनवली जाते. त्यातील काजूची रोपे पोर्तुगीज ब्राझील मधून घेवून आले होते आणि त्यांनी गोव्याच्या किनारपट्टीवर या रोपांची मोठ्या प्रमाणात लागवड केली.

आज काजूफेणी गोव्याचे ‘ हेरिटेज ड्रिंक’ म्हणून ओळखली जाते. अनेक चित्रपट आणि त्यांच्या गीतांमध्ये देखील या फेणीने स्थान मिळवले आहे.

दारूच्या इतर प्रकारांसारखी फेणी प्यायल्यावर हॅंगओव्हर होत नाही हे तिचे आणखी एक वैशिष्ट्य. खाद्य संस्कृतीचे अभ्यासक असलेल्या के.टी.आचार्य यांनी त्यांच्या ‘ A Historical Dictionary of Indian Food’ या पुस्तकात फेनीचा उल्लेख केला आहे.

ते म्हणतात फेणी हे स्वत:चा अंगभूत सुगंध असलेले पेय असून पारंपारिक पद्धतीने बनवण्यात येत असल्याने कोणतेही केमिकल त्यात मिसळले जात नाहीत. काजुफळाचा अर्क असल्याने तिचा वास मात्र खूप उग्र असतो.

काजूफेनी हे पेय गोव्यातील पोर्तुगीज धर्मगुरूंनी बनवले असे मानले जाते. काजूच्या पिकलेल्या लाल बोंडांपासून हे पेय बनवले जात असून त्याची बनवण्याची विधी ही थोडी जिकरीची आहे.

 

 

सत्तारी हे गोव्यातील छोटे शहर गोव्याची ‘फेनी राजधानी ‘ म्हणून प्रसिद्ध आहे. काजूच्या झाडाच्या फळापासून बनविलेले ब्रॅंडी, फेनी पश्चिम भारतातील गोवा राज्यातून येतात. शॅम्पेन किंवा टकीलासारखे, हे कायदेशीररित्या संरक्षित उत्पादन आहे.

फेनीचे गोव्यात दोन लोकप्रिय प्रकार म्हणजे – नारळ फेणी आणि काजू फेनी. उत्पादनाच्या बाबतीत, नारळ फेणी काजू फेनीपेक्षा जुनी आहे.

मुळात स्थानिकांनी गोव्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या खोबर्‍यापासून फेनी बनविली, पण नंतर पोर्तुगीज वसाहतवाद्यांनी काजूच्या झाडाची ओळख भारताला करुन दिली जो या मद्याचा नवीन स्रोत बनला.

साधारण फेब्रुवारी ते मे या काजुच्या हंगामात काजूची पिकलेली बोंडे वेचली तसेच निवडली जातात. त्यानंतर ती एकत्र करून त्यांचे तुकडे केले जातात आणि छोट्या छोट्या मातीच्या भांड्यांमध्ये भरून जमिनीत काही काळासाठी पुरले जातात.

त्यानंतर ते तुकडे त्यांच्या मूळ रसासोबत मातीच्या मोठ्या भांड्यांमद्धे घालून, हवाबंद करून चुलीवर तीनदा उकळले जातात. त्यानंतर त्या रसाची वाफ गोळा केली जाते व लाकडाच्या ड्रम्समध्ये भरून ठेवली जाते. ज्यामुळे तिला हलका पिवळसर सोनेरी रंग येतो.

 

 

‘उरॅक’ हा फेणीचा एक स्थानिक प्रकार असून तो कमी उग्र आणि कमी अल्कोहोलिक असतो. पण उरॅक हे हंगामी पेय आहे. विशेषत: ते एप्रिल, मे मध्येच उपलब्ध असते. चवीला विशिष्ट गोड आणि काजू फळाच्या चवीचे असते. ‘उरॅक पुढे काझूलो म्हणून ओळखले जाते, जे चवीला खूप मादक असते.

फेणीमध्ये अल्कोहोल चे प्रमाण ४३ ते ४५ % असते. त्यामुळे हे पेय चवीला खूप उग्र लागू शकते. गोवेकरांसाठी, फेनी ही खाद्यसंस्कृतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे. मध्यंतरी हे अधिक श्रमजीवी पेय म्हणून पाहिले जात असे आणि दिवसा मजुरांना शॉट म्हणून दिले जायचे.

आता मात्र फेंनी, स्थानिक जत्रांमध्ये आणि लहान, रस्त्यांवरील रेस्टॉरंट्समध्ये तसेच फॅन्सी कॉकटेल प्रोग्राम्समध्ये, मेजवान्यांमध्ये , जेवणामध्ये नेहमीच उपलब्ध असते. आजकाल प्यूअर फेनी सोबतच मीठ, लिंबाचा रस, लीमका, कोला सारखी सॉफ्ट ड्रिंक्स मिसळून फेनीचे कॉकटेल सर्व्ह केले जाते.

सोबत हिरवी मिरची असेल तर फेनीचा स्वाद अजून वाढतो. ‘स्पिरीट ऑफ इंडिया’ हा पहिला फेनी ब्रँड दोन वर्षांपूर्वी अमेरिकेत उपलब्ध झाल्यापासून, कॉकटेल मेनूकडे जाण्याचा प्रयत्न वाढत चालला आहे.

 

 

मद्य म्हणून प्रसिद्ध असले तरी फेनीचे काही औषधी गुणधर्म देखील आहेत. दातांच्या समस्या, हिरड्यांची सूज, तोंडातील काही अल्सर यांवर उपचार म्हणून फेनी उपयुक्त आहे.

काही जणांच्या मते जेवणाच्या शेवटी फेनीचे सेवन केल्यास चरबी कमी व्हायला मदत होते. सर्दी,खोकला यांमध्येही फेनी औषध म्हणून काम करते. शरीराला उबदार ठेवणे, श्वसन प्रणाली शुद्ध करणे, बद्धकोष्ठता आणि पोटाशी संबंधित इतर समस्यांवर उपचार करण्यास देखील मदत करते.

फेनीमध्ये एंटीसेप्टिक गुणधर्म आहेत जे जखमा बरे करण्यास मदत करतात. फेनी शरीर शुद्ध करण्यास आणि आतड्यांसंबंधी योग्य हालचाल करण्यास मदत करते. औषध म्हणून वापरल्यास फेनी शरीरसाठी अधिक गुणकारी आहे.

फेनीची खरी चव घ्यायची असेल तर एका मूळ गोवन कुटुंबात तयार केलेल्या फेनीचा आस्वाद घेवून बघा आणि तिच्या चवीत आणि सुगंधात रंगून जा!

 

 

वाढलेल्या मागणीमुळे मध्यंतरीच्या काळात फेनीची मूळ चव आणि पारंपारिकता हरवत चालली होती पण गोवा सरकार आणि फेनी व्यवसायिकांच्या संयुक्त प्रयत्नांनी फेनीला ‘हेरिटेज ड्रिंक’ चा दर्जा मिळाला असून आपली भारतीय फेनी आता अमेरिकन समुद्र किनार्‍यांची तहान भागवण्यास सज्ज झाली आहे.

===

हे ही वाचा तब्बल ४५१ वर्षे पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेल्या “गोव्यात” झालेला हा नरसंहार थरकाप उडवतो!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version