Site icon InMarathi

जुनी विटी, नवा डाव! “भावी” म्हटले जाणारे ‘पवार’ अॅक्शनमध्ये! वाचा परखड मत…

sharad pawar featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे

===

मध्यंतरी राजकीय रणनीतीकर प्रशांत किशोर शरद पवार यांची भेट झाली आणि तेव्हाच डोक्यात किडा वळवळला होता. प्रशांत किशोर म्हणजे सध्याचा सर्वोत्तम रणनीतीकार मानला जातो. शरद पवार म्हणजे तर राजकारणातला सर्वात ‘शातिर माणूस’!

या दोघांची भेट झाल्यावर डोक्यात तर्कवितर्क सुरु होणं साहजिकच होतं. महाराष्ट्रात सध्या अस्तित्वात असलेली, ‘महाविकास आघाडी कुणामुळे अस्तित्त्वात आली?’ असा प्रश्न विचारला, तर क्षणाचाही विचार न करता ‘शरद पवार’ हेच उत्तर कुणीही देईल.

महाविकास आघाडीचं हे सरकार शरद पवारच अस्तित्वात आणू शकतात आणि तेच हे सरकार पाडूही शकतात, ही चर्चा अगदी आघाडी निर्माण झाली त्या दिवसापासून सुरु आहे. त्यातच सध्या या तिन्ही पक्षांमधील कुरबुरी उघडपणे पाहता येतायत.

त्यामुळे, किशोर-पवार भेटींनंतर अनेकांच्या मनात पहिली शंकेची पाल चुकचुकली, ती म्हणजे शरद पवार महाराष्ट्रात काही नवी खेळी खळणार का?

 

 

प्रश्न वैध होता, पण योग्य नव्हता. हो, योग्य नव्हताच. शरद पवार यांचा राजकीय इतिहास पाहता, ते अशा छोट्या खेळी खेळतील, अशी शक्यता तशी कमीच होती. अखेर शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी, देशभरातील नेत्यांची बैठक होणार आहे, अशी बातमी आली आणि इतर सर्व शंकांना पूर्णविराम मिळाला.

===

हे ही वाचा – देशाच्या राजकारणातला खरा चाणक्य कोण? : इतिहासात डोकावून केलेला धांडोळा

===

काँग्रेस आणि सेनेला डावलणार?

आजही ‘भावी पंतप्रधान’ म्हणूनच त्यांचा सगळीकडे उल्लेख केला जातो. हा भावी शब्द कुणी खवचटपणे वापरतं, तर कुणी खरोखरंच आजही त्यांच्याकडे भारताचा होऊ घातलेला पंतप्रधान म्हणून पाहतं. आजवर कधीही पंतप्रधान होऊ शकले नसले, तरीही त्यांच्यात क्षमता आहे हे मात्र खरं…

 

 

युपीएची पुन्हा नव्याने स्थापना झाली, तरीही शरद पवार यांच्याकडे त्या आघाडीचं अध्यक्षपद येण्याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे ते काँग्रेससोबत असले, तरी त्यांना त्यांचा योग्य मान मिळणार का, हा प्रश्न आहेच.

महाराष्ट्रात राष्ट्रवादीसह सरकारमध्ये असूनही, काँग्रेसचं रडगाणं आणि स्वबळाची भाषा सुरु झाली आहे. शिवाय काँग्रेस म्हणजे बुडणाऱ्या जहाजाचं भगदाड ठरू शकतं, अशी त्यांची सध्याची स्थिती आहे. अशा काँग्रेसपासून दूर राहता आलं, तर कधीही बेहत्तर. त्यामुळे प्राधान्यक्रमाने इतर पक्षांना बैठकीसाठी पाचारण केलेलं असावं.

शिवसेनेचे खासदार आणि वरिष्ठ (!?) नेते संजय राऊत यांनी मात्र ‘शरद पवार हे देशाचे पंतप्रधान झाले तर’ या विषयावर आनंद आणि समाधान याआधी अनेकदा व्यक्त केलेलं आहे. तरीही या शिवसेनेलादेखील, पवार साहेबांनी तूर्तास देशपातळीवर दूर सारलेलं दिसतंय.

जिथे निव्वळ मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचं आमिष दाखवून त्यांनी शिवसेनेला महाराष्ट्रात सुद्धा खिशात घातलं, तिथे ते त्यांना देशपातळीवर काय किंमत देतील, याचा सध्यातरी विचारही न केलेला बरा…!!

 

===

हे ही वाचा – शरद पवार पंतप्रधान का होऊ शकले नाही: इतिहास माहित नसणाऱ्यांसाठी विशेष “धागा”

===

भाजप सरकारला शह बसू शकतो का?

एका बाजूला कोरोनाचं संकट, दुसरीकडे महागाई आणि मुख्य म्हणजे मोठमोठ्या वल्गना करत २०१४ पासून सत्तेत आलेला भाजप पक्ष, हादेखील इतरांपेक्षा काही वेगळा नाही याची प्रचिती आता सगळ्यांनाच येऊ लागली आहे.

कदाचित २०२४ च्या निवडणुकीतही भाजपचा पराभव होणार नाही, पण तो ‘दगडापेक्षा वीट मऊ’ या नात्याने! २०१४ साली भाजप हवा म्हणून स्वीकारला गेला होता, आणि आज मात्र तो केवळ एक पर्याय म्हणून स्वीकारला जाईल असं वाटतं.

राहुल गांधी नकोत, किंवा काँग्रेस नको अशा विचारांनी भाजपला आपलंसं करणारा मतदार वर्ग दुसरा भक्कम पर्याय उपलब्ध झाला तर त्याबाजूला वळेल का याचा विचार भाजपने नक्कीच करायला हवा. एवढंच नाही, तर भाजप चालेल पण मोदी नकोत, अशा विचारसरणीच्या मतदारांना सुद्धा योग्य मान मिळायाला हवा.

 

 

अन्यथा वसुंधरा राजेंमुळे राजस्थानात झाली, तशी गत देशात व्हायला वेळ लागणार नाही. अर्थात, त्यासाठी दुसरा पर्याय असायला हवा, हेदेखील सत्य आहे.

शरद पवार हा उत्तम पर्याय!

या सगळ्या पार्श्वभूमीवर, देशातील सध्याचं नेतृत्व असणाऱ्या मोदी-शहांना शह देण्याची क्षमता कुणात असेल, तर ते म्हणजे “भावी पंतप्रधान शरद पवार”…!! ते पंतप्रधान होऊ शकतील की नाही, हे आजही नक्की सांगता येणार नसलं, तरी नरेंद्र मोदींसमोर आव्हान उभं करू शकतील हे मात्र नक्की…

देशभरातील छोट्यामोठ्या पक्षांना एकत्र आणायची किमया पवार साहेब करू शकले, तर त्यांचे नेते बनू शकतात आणि असं झाल्यास (काही काळासाठी का होईना) त्यांचं पंतप्रधान होण्याचं स्वप्न साकार करू शकतात. हे खिचडी सरकार अस्तित्वात येऊ शकेल का, आलं तर टिकाव धरू शकेल का, या प्रश्नांची उत्तरं येणार काळ देईलच; मात्र शरद पवारांनी त्या दिशेला टाकलेलं पहिलं पाऊल महत्त्वपूर्ण आहे.

 

 

शरद पवारांची, पंतप्रधान होण्याची मनापासून सुप्त इच्छा असेल, तर ती पुरी व्हायला हरकत नाही. काँग्रेस नको म्हणून मोदींना पंतप्रधान करून पाहिलं, त्याच जनतेने या पर्यायाचा विचार करण्यात गैर काहीच नाही.

विरोधक भक्कम हवाच…

बरं या पुढे जाऊन दुसऱ्या बाजूचा विचार करूयात. वाईटात वाईट काय होईल, तर ही आघाडी स्थापन करून सुद्धा सरकार स्थापन करण्यात पवारांना अपयश येईल. यातही देशाचं हित नाही, असं नाही.

सरकारचा विरोधक हा नेहमीच भक्कम हवा. शरद पवार यांच्या रूपात, तो पर्याय निर्माण होऊ शकेल. देशपातळीवर विरोधी फळी भक्कम असेल, तर भाजपला मनमानी कारभार करता येणार नाही, अशी आशा करूयात.

याशिवाय, बंगालमध्ये जे दीदींचं झालं, ते केंद्रात मोदींच्या बाबतीत होण्याची शक्यता बळावेल, हेदेखील खरं. ममता दीदींनी गड तर राखला, पण स्वतःची खुर्ची राखू शकल्या नाहीत. मागच्या दाराने खुर्चीत बसण्याची वेळ त्यांच्यावर आली. जिंकूनही त्या हरल्या, असं म्हटलं तरी हे वावगं ठरू नये.

 

 

मोदींची किंवा भाजपने २०२४ च्या निवडणुकीत दुसरा पर्याय द्यायचं ठरवलं असेल, तर पंतप्रधानपदाच्या त्या नव्या उमेदवाराची अशी गत होण्याची शक्यता आहेच. शरद पवार ही आघाडी उभी करण्यात यशस्वी झालेच, तर भाजपला सुद्धा त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये बदल करावे लागतील, ही विशेष बाब सुद्धा ध्यानात घेण्यासारखी आहे.

===

हे ही वाचा – भाजप समर्थकांनी शरद पवारांना “५०-५५ जागांचे नेते” समजण्याची चूक करू नये…

===

महाराष्ट्रातील नेता पंतप्रधान झाल्याचा आनंदच वेगळा असेल…

मोदींना पर्याय म्हणून भाजपमध्येच नितीन गडकरी हे नाव सुद्धा चर्चेत आहे, अशी कुजबुज सुरु असते. तुमच्या आमच्यासारखा सामन्यानमद्ये नक्कीच असते. भाजपकडे झुकतं माप असणारी मंडळी सुद्धा मोदी-योगी नकोत, गडकरी चालतील असं बोलताना दिसतात.

महाराष्ट्रातल्या नेत्याला देश पातळीवर एवढं मोठं होण्याची संधी इतर पक्षांप्रमाणेच भाजपही देणार नाही, ही यातली खरी मेख आहे. महाराष्ट्रातील नेत्याला अशी गरुडझेप घ्यायची असेल, तर स्वतःचेही पंख मजबूत हवेत. गडकरींचे पंख मजबूत नाहीत, असं अजिबात म्हणणं नाही, पण स्वबळावर ही ताकद शरद पवारही दाखवू शकतात यातही शंका नाही.

 

 

शरद पवारांना, पक्ष काय म्हणेल यावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. शिवाय, सगळ्यांना एकत्र आणण्याचं शिवधनुष्य जर त्यांनी पेललं असेल, तर नेता म्हणून पहिला मान आणि हक्क त्यांचाच असेल, हेदेखील सत्य आहे. महाराष्ट्रातून पंतप्रधान होण्याची संधी मिळण्याची अधिक शक्यता, सध्यातरी फक्त पवारांनाच आहे, असं मला तरी वाटतं.

महाराष्ट्रातील नेता देशातील एवढ्या मोठ्या पदावर विराजमान होणार असेल, तर त्याचा आनंद नक्कीच असेल… त्यामुळे संध्याकाळच्या ऐतिहासिक दिल्ली भेटीकडे लक्ष नक्कीच असेल. हो, आणि या भेटीबद्दल त्यानंतर महाविकास आघाडीतील नेते संजय राऊत काय म्हणतात, हेही महत्त्वाचं आहेच, नाही का?!! काय म्हणता मंडळी…??

 

===

हे ही वाचा – जेव्हा शरद पवार सुद्धा म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन’, ‘मी पुन्हा येईन’…!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version