Site icon InMarathi

करीना नाही तर कंगना साकारणार सीतामाई; आतातरी रामायण ‘सात्विक’ वाटणार का?

kangana featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

बॉलिवूड आणि वाद हे समीकरण आपल्यासाठी काही नवीन नाही. शिवाय बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या तथाकथित लिब्र्ल आणि स्वतःला फार पुढारलेल्या विचारांचे समजणाऱ्या लोकांचे विचार काय आहेत ते आपल्याला ठाऊक आहेच.

याच साच्यात बसणारी बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर खान हिला बायकॉट करा असा सध्या एक ट्रेंड मध्यंतरी सोशल मीडियावर सुरू होता. ट्विटर, फेसबुक किंवा इतर साईट्स सगळीकडे आपल्याला असेच ट्रेंड बघायला मिळाले होते!

 

 

त्यामागचं कारण असं की निर्मात्यांनी २ वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या रामायण या प्रोजेक्टमध्ये मा सीतेची भूमिका साकारण्यासाठी करीनाने १२ करोड रुपये फि म्हणून मागणी केली होती, अर्थात या सगळ्यावर खुद्द करीना किंवा या सिनेमाच्या मेकर्सनी अजूनही भाष्य केलं नाहीये!

आता कालपासून एक वेगळीच चर्चा सोशल मीडियावर रंगतीये, ती म्हणजे अभिनेत्री कंगना रनौत हिची माता सीतेच्या भूमिकेसाठी वर्णी लागली आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी मंगळवारीच याची घोषणा केली आहे.

करीनाची फी खूपच जास्त असल्याने तिच्याऐवजी कंगनाला घेतलं आहे असंच प्राथमिकपणे बोललं जातंय. या सिनेमाचं दिग्दर्शन अलौकिक देसाई करणार असून कंगनाच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘थलाईवी’ सिनेमाचे लेखकचं ‘सीता’ या सिनेमाच्या लेखनाची धुरा सांभाळणार आहेत.

“कंगना निडर आहे शिवाय ती भारतीय महिलांचं प्रतिनिधित्व करते यामुळेच या प्रोजेक्टशी कंगनाचं नाव जोडल्याने आम्हाला आनंदच आहे”, असं सिनेमाच्या निर्मात्यांनी स्टेटमेंट दिलं आहे!

 

 

खुद्द कंगनानेही याबाबतीत तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन घोषणा करत तिच्या फॅन्सला सरप्राइज दिलं आहे.

===

यासाठी पहिले हृतिक रोशन आणि दीपिका पडूकोण यांची नावं समोर आली होती, नंतर हृतिक ऐवजी साऊथचा स्टार महेश बाबू हा प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत दिसणार आहे अशाही वावड्या उठल्या होत्या.

आता पुन्हा एकदा करीना कपूरचं नाव या प्रोजेक्टशी जोडून एक निगेटिव्ह पब्लिसिटी करण्याचा प्रयत्न बॉलिवूडकडून होताना दिसतोय.

 

 

खरंतर करीना, दीपिका, हृतिक यांची नावं जेव्हा समोर आली तेव्हाच लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती, शिवाय सगळ्या कलाकारांविषयी  सगळ्यांनी एकच गोष्ट नमूद केली ती म्हणजे या स्टार्सना त्या भूमिका तितक्या सचोटीने साकारता येणार आहेत का?

हे स्टार्स जे कायम या देशाच्या, संस्कृतीच्या विरोधातच बोलत असतात त्यांनी आजवर रामायण समजून घेण्याचा साधा प्रयत्न तरी केला आहे का? सध्यातर सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग असूनदेखील एका तरी स्टार किंवा सेलिब्रिटीने कधीतरी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून साध्या रामनवमीच्या शुभेच्छातरी दिल्या आहेत का?

मग या अशा कलाकारांना या पवित्र कलाकृतीत घेतलं तर रोष पत्करावा लागणारच ना! 

 

 

आजही जेव्हा लॉकडाउन दरम्यान टेलिव्हिजनवर रामानंद सागर यांचं रामायण पुन्हा दाखवलं गेलं तेव्हा अक्षरशः टीव्ही जगतातल्या टीआरपीची रेकॉर्ड तुटले, इतकी ती कलाकृति लोकांच्या मनात घर करून होती.

त्या वेळेस जेव्हा प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणारे अरुण गोविल जेव्हा स्क्रीनवर यायचे तेव्हा कित्येक वृद्धमंडळी टीव्हीची अक्षरशः पूजा करायचे.

रामानंद सागर यांच्या रामायणाने या देशातली एक पिढी मोठी केली आहे, आणि आजही जेव्हा टीव्हीवर ते रामायण लागतं तेव्हा इतर सगळ्या गोष्टी सोडून लोकं ते बघणं जास्त पसंत करतात.

रामानंद सागर यांच्या रामायणात ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांच्या चेहऱ्यावरची सात्विकता या सध्याच्या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या सेलिब्रिटीजच्या चेहऱ्यावर येईल का? त्यांना तितक्या सचोटीने राम आणि सीता ही पात्र समजतील का?

 

 

असे असंख्य प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले जेव्हा या स्टार्सची नावं समोर आली, पण आता कंगनाची निवड झाल्याने प्रेक्षकांना थोडं हायसं वाटलं आहे.

कंगना ही काही सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे असं माझं मुळीच म्हणणं नाही, पण अशा कथांच्या बाबतीत इतर हिरॉईन्सपेक्षा कंगना ही त्या भूमिकेत अगदी चपखल बसणारी अभिनेत्री आहे.

आजच्या काळात करोडो रुपये खर्च करून बॉलिवूडकर रामायण आणखीन भव्यपणे सादर करतीलदेखील पण त्यामागे त्यांचा काही छुपा अजेंडा नसावा हीच अपेक्षा एका सामान्य प्रेक्षकाची असते, आणि जी अगदीच रास्त आहे!

ओम राऊतसारखा जाणकार दिग्दर्शकसुद्धा रामायणाशी मिळतं जुळतं एक कथानक घेऊन आदिपुरुष नावाचा सिनेमा लोकांच्या भेटीला घेऊन येत आहे, त्यातही सैफ अली खान याला रावणाच्या भूमिकेसाठी घेतलं आहे, आणि सीतेच्या भूमिकेसाठी क्रीती सनॉन हिला घेतलं आहे.

 

 

यावरूनही बऱ्याच लोकांच्या मनात चीड आहे, राग आहे! कारण तान्हाजीमध्ये सैफने साकारलेल्या उथळ आणि बीभत्स उदयभानला लोकं अजूनही विसरले नाहीयेत. त्यामुळे ओम राऊतनी वेळीच निर्णय बदलून एखाद्या जाणकार कलाकाराला घ्यावे अशी मागणीदेखील होत आहे.

प्रभू राम किंवा सीता यांची भूमिका साकारणारे कलाकार या इंडस्ट्रीमध्ये नाहीच अशातला भाग नाही, किंवा वर ज्या ज्या लोकांची नावं घेतली ते सगळेच वाईट कलाकार आहेत अशातलाही भाग नाही!

===

पण रामानंद सागर यांच्या यांच्या कलाकृतीतल्या वानरसेनेतल्या वानरांची भूमिका करणाऱ्या कलाकारांपासून मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांपर्यंत सगळेच हे त्या भूमिकेशी समरस होऊन आणि ती भूमिका समजून उमजून काम करणारे होते.

त्यामुळे जेव्हा केव्हा रामायणावर आधारित एखादी कलाकृति तयार होणार तेव्हा नक्कीच तिची तुलना रामानंद सागर यांच्या रामायणाशी होणार हे नक्की!

 

 

म्हणूनच कुठेतरी असं वाटतं की या बॉलिवूडने या अशा धार्मिक ग्रंथांवर कलाकृति बनवूच नये आणि जरी बनवली तरी त्याच्या माध्यमातून सामान्य लोकांच्या धार्मिक भावना त्यांनी दुखावता कामा नये, इमानदारीने आणि कोणताही छुपा अजेंडा मागे न ठेवता त्यांनी जर कलाकृति सादर केली तर लोकं नक्कीच ती डोक्यावर घेतील!

आता कंगना जरी या सिनेमात सीतामाईच्या भूमिकेत दिसणार असली तरी, हा सिनेमा कसा सादर केला जातोय, त्याची कथामांडणी कशी केली जातीये हे सगळंसुद्धा तितकंच महत्वाचं आहे.

त्यामुळे कंगनाच्या निवडीबरोबरच योग्य कथानक, दिग्दर्शन आणि मार्गदर्शन सिनेमाला मिळणंदेखील गरजेचं आहे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version