' गिरणी कामगारांची भूक भागवण्यासाठी सुरु झाली आणि ‘ती’ मुंबईकरांची फेव्हरेट बनली! – InMarathi

गिरणी कामगारांची भूक भागवण्यासाठी सुरु झाली आणि ‘ती’ मुंबईकरांची फेव्हरेट बनली!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येक गावाचा किंवा शहराचा एखादा तरी पदार्थ इतका प्रसिद्ध असतो की त्याचा आस्वाद घ्यायला खवैय्ये दुरून दुरून येतात. मायानगरी मुंबई तर अशा अनेक पदार्थांसाठी आणि हे पदार्थ एकदम हटके पद्धतीने विकणाऱ्या हॉटेल्ससाठी अगदी प्रसिद्ध आहे.

वडापाव, हार्ट-अटॅक हॉट डॉग, विविध प्रकारचे चीज सँडविच, ऑम्लेट, यांची अनेकानेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत. तसंच “सरदार पावभाजी” मुंबईत आपल्या निरनिराळ्या पावभाजी प्रकारांसाठी सुप्रसिद्ध आहे. ह्यांच्या हॉटेल मध्ये शिरताच आपल्याला पावभाजीच्या खमंग घमघमाटानंतर एक लांब लचक रांगच दृष्टीस पडते.

 

vadapav-inmarathi

हे ही वाचा – पाकिस्तानी लोकांना लागलंय ‘मुंबई पावभाजी’चं वेड…!! का नि कसं?? वाचा…

दिवसा रात्री कधीही पावभाजी खायला गेलं तरी ही रांग असतेच. सरदार पावभाजीचे अनेक चाहते आपली ऑर्डर घेण्यासाठी घाम गाळताना दिसतात. पण ह्या पावभाजीचं इतकं कौतुक कशाला, काय आहे असं ह्यात? हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच आता पडला असेल. चला तर मग जाणून घेऊया सरदार पावभाजीची कहाणी.

१८६१ ते १८६५ सालापर्यंत सुरु असलेल्या अमेरिकन नागरी युद्धादरम्यान जगभरात कापसाची मागणी वाढली. म्हणून ही मागणी पूर्ण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या कापसाच्या निर्यातीतही वाढ झाली. त्यासाठी गिरण्या रात्रंदिवस सुरु असायच्या, गिरणी कामगारांच्या हाती इतकं काम होतं की त्यांना जेवणासाठीसुद्धा नीट वेळ मिळत नसे.

 

sardar pav bahji inmarathi

 

अनेक ठेलेवाले भेळ, कुरमुरे अशा चटक मटक पदार्थांचे ठेले गिरण्यांबाहेर लावत. हे सगळे पदार्थ स्वस्त तर होते पण कोणाचंच पोट भरू शकत नव्हते.

अशावेळी, जेवणाची कसर तर पूर्ण व्हावी पण कामगारांच्या खिशाला सुद्धा कात्री लागू नये, अन्न विकत घेऊन पोट भरणं हे त्यांच्या आवाक्यात असावं अशा एखाद्या पदार्थाच्या निर्मितीची गरज होती. ही भूक भागवण्यासाठी ह्या ठेलेवाल्यांनी पावभाजीचा शोध लावला.

मसाला पाव आणि त्याबरोबर शिळ्या भाज्यांनी किंवा उरलेल्या बटाटे व टमाटे यांनी बनवलेली एक घट्टशी भाजी. हा प्रकार लोकांच्या इतक्या आवडीचा झाला की लोक इडली डोस्यांसारखे आता पावभाजी खायला बाहेर पडू लागले, पैसे खर्च करून पावभाजी चा आस्वाद घेऊ लागले.

हळू हळू ही पावभाजी पूर्ण भारतात पसरली आणि सगळ्यांची अगदी आवडीची झाली.

 

masala pav inmarathi

 

आजपासून बरोबर ५५ वर्षांपूर्वी ह्याच पावभाजीला ताडदेवातील सरदार पावभाजीवाल्यांनी एक नवीन ओळख मिळवून दिली. त्याही वेळीसुद्धा गिरणी कामगारांची भूक भागवण्यासाठी ६ पैशात सरदार अहमद यांनी एक लहानश्या ठेल्यापासून त्यांच्या उद्योगाची सुरुवात केली होती.

आजही किंमत वाढली असली, महागाई आभाळाला भिडली असली, ६ पैशांची प्लेट १४०-२०० रुपयांची झाली असली तरीही त्यांचे आउटलेट्स काही रिकामे दिसत नाहीत. कारण आहे त्यांच्या पावभाजीची तोंडात रेंगाळणारी चव.

सरदार पावभाजी सेंटरवर ग्राहकांच्या मागणीनुसार विविध प्रकारची पावभाजी मिळते. चीज पावभाजी, कांदा, लसूण आणि बटाटा नसलेली जैन पावभाजी, भाज्यांचे मोठे तुकडे असलेली खडा पावभाजी, तिखट आणि मिडीयम पावभाजी अशा अनेक वेरायटीज तिथे उपलब्ध आहेत.

सरदार पावभाजीचं एक वौशिष्ट्य म्हणजे, तिथली फक्त पावभाजीच प्रसिद्ध नसून लसणीची झणझणीत चटणी आणि अनेक प्रकारचे डेजर्ट्स सुद्धा प्रसिद्ध आहेत. कॅरॅमल कस्टर्ड आणि चॉकलेट मुझ, हे दोन गोडातले पदार्थ तर सतत एकमेकांशी स्पर्धा करताना दिसतात.

सरदार पावभाजीचं एक अजून वैशिष्टय आहे. ते म्हणजे त्यांच्या पावभाजीत केला जाणारा अमूल बटरचा भरगोस वापर. पावभाजी बटर शिवाय कधीच पूर्ण होऊ शकत नाही. बटर जणू पावभाजीचा एक अविभाज्य घटकच आहे. आणि सरदार पावभाजीवले हे बटर आणि पावभाजीचं समीकरण तंतोतंत पाळतात आणि आपल्या पावभाजी साठी फक्त आणि फक्त अमूल बटरचाच वापर करतात.

त्यांच्या पावभाजीच्या प्रत्येक प्लेटमध्ये भरभरून बटर घातलेलं असतं. पावभाजी करतानाही आणि सर्व्ह करतानाही बटर वाढण्यात कोणीही अजिबात हात आवरते घेत नाही.

 

sardar pav bahji 1 inmarathi

 

सरदार पावभाजी सेंटरचं वातावरण कोणालाही तोंडाला पाणी आणल्याशिवाय राहत नाही. तिथे गेल्यावर तुम्ही तिथल्या पावभाजीची चव चाखून बघितली नाही असं होऊच शकत नाही.

पावभाजीचा खमंग सुवास, कोणाला पाव हवे आहेत का हवे असल्यास ते वाढण्यासाठी सतत हातात सरदार स्पेशक मसाला पावाचा ट्रे घेऊन फिरणारे वेटर सगळं अगदी आपल्याला पावभाजी खाण्यासाठी उत्तेजित करतच.

ह्या पावभाजी सेंटर वर कॉलेजात जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते नवीन लग्न झालेली जोडपी, लहान मुलं,म्हातारी माणसं, प्रेमी युगुलं इतकच काय मोठमोठे प्रसिद्ध कलाकार, सेलिब्रिटी अगदी सगळे सगळे पावभाजीचा आस्वाद घेताना दिसतात.

१९६६ साली निव्वल गिरणी कामगारांचं पोट भरण्याच्या उद्देशाने सुरु केलेला हा उपक्रम आजही लोकांच्या इतक्या आवडीचा आहे कारण सरदार पावभाजीच्या कोणत्याही डिशच्या चवीत काडीमात्र सुद्धा बदल झालेला नाही, त्यांची क्वालिटी अजिबात घसरलेली नाही.

 

mill worker inmarathi

हे ही वाचा – हा अवलिया नसता तर कदाचित आज ‘वडापाव’ हा अस्सल मराठमोळा पदार्थही नसता

पूर्वीप्रमाणेच आजही सगळ्यात जास्त प्राधान्य स्वच्छता, चव आणि पावभाजीच्या दर्जाला दिलं जातं. त्यात उत्कृष्ट प्रकारचे मसाले, तेल, अमूल बटर, अमूल चीज ह्यांचाच मुख्यतः वापर केला जातो.

“क्वालिटी आणि पावभाजीत सर्व्ह केल्या जाणाऱ्या बटरच्या क्वांटिटीत आम्ही कधीही तडजोड केलेली नाही” असं सरदार पावभाजीचे विद्यमान संचालक निस्सार अन्सारी यांचे म्हणणे आहे.

सध्या लॉकडाऊन आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपण सगळे सरदार पावभाजी सारख्या आपल्या अनेक आवडत्या ठिकाणांना मिस करतोय खरं, पण एक दिवस असा येईलच जेव्हा ही सगळी दुकानं पुन्हा आपल्या संपूर्ण ऊर्जेने पूर्ववत होतील.

चविष्ट व्यंजनांचे सुगंध पुन्हा एकदा दरवळतील आणि आपण पुन्हा एकदा ह्या सगळ्यांचा मनमुराद पणे आनंद लुटू शकू.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?