अब्जाधीशाचा दिवाळखोर भाऊ! अनिल अंबानींच्या चुका तुम्ही समजून घ्यायला हव्या!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
‘हाताची पाच बोटं सारखी नसतात’ असं आपण नेहमीच म्हणतो. एकाच शाळेत, एका वर्गात शिकलेल्या मुलांच्या करिअर मध्ये आपल्याला नेहमीच तफावत जाणवते. इतकंच नाही तर एका घरात प्रत्येकाचे वेगवेगळं मत असलेले कित्येक घर आपण बघत असतो. एकाच घरातील दोन व्यक्तींमध्ये विरोधाभास असणं ठीक आहे.
पण, दोन सख्ख्या भावांच्या विचारसरणी, कामाची पद्धत यामध्ये जेव्हा ‘जमीन-आस्मान’ इतका फरक जाणवतो त्यावेळी चर्चा ही होतेच. हे घर जर का अंबानी यांचं असेल तर त्या चर्चेला विशेष महत्व सुद्धा मिळतं.
रिलायन्स इंडस्ट्रीचे संचालक धीरूभाई अंबानी यांचे सुपुत्र मुकेश आणि अनिल अंबानी यांच्यातील तफावत हा बिजनेस जगतात नेहमीच चर्चिला जाणारा विषय आहे.
मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी या दोन भावांच्या यशाची तुलना होण्याचं यावेळचं कारण हे आहे की, १३ वर्षांपासून भारतातील सर्वात श्रीमंत आणि जगातील श्रीमंत व्यक्तींमध्ये ६ व्या क्रमांकावर असलेल्या मुकेश अंबानी यांच्या सख्ख्या लहान भावाने आपली दिवाळखोरी जाहीर केली आहे.
===
हे ही वाचा – ‘रिलायंस जिओ’ला मिळालेल्या प्रचंड यशाचं रहस्य काय आहे? समजून घ्या..
===
मुकेश अंबानीने काय असं वेगळं केलं असेल? की ते इतके यशस्वी झाले किंवा अनिल अंबानी यांनी अश्या कोणत्या ढोबळ चुका केल्या असतील ज्यामुळे त्यांच्यावर दिवाळखोरीची वेळ आली असेल? जाणून घेऊयात.
अनिल अंबानी हे सुद्धा एकेकाळी जगातील १० श्रीमंत व्यक्तींपैकी एक होते. आज परिस्थिती अशी आहे की त्यांच्या सर्व कंपनी वर मिळून १.७५ लाख करोड रुपयांचं कर्ज झालं आहे.
अनिल अंबानी हे सध्या त्यांच्या व्यक्तिगत वस्तू विकून हे कर्ज फेडत आहेत अशी बातमी आहे. अतिमहत्वाकांक्षी असल्यावर, व्यवसायाचं सीमित स्वरूप असल्यावर आणि कर्जावर अति अवलंबून राहिल्यावर काय होतं त्याचं अनिल अंबानी हे एक उदाहरण असं व्यवसाय तज्ञ सध्या म्हणत आहेत.
धीरूभाई अंबानी यांनी कोणतंही मृत्युपत्र तयार करून ठेवलेलं नव्हतं. २००२ मध्ये धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर रिलायन्स उद्योग समूहाची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप या दोन कंपन्यांमध्ये विभागणी करण्यात आली.
रिलायन्सच्या व्यवसायाची समान विभागणी करण्यात त्यांच्या आई कोकिलाबेन अंबानी यांचा महत्वाचा रोल होता.
समान संपत्ती असतांना एका भावाने मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं केलं आणि दुसऱ्या भावाने केवळ कर्ज काढण्यावर भर दिला आणि दिवाळखोरीला आमंत्रण दिलं असा हा प्रवास आहे.
===
हे ही वाचा – शून्यातून एवढं उद्योगसाम्राज्य उभं करणाऱ्या धीरूभाईंच्या “ह्या” गोष्टी बरंच काही शिकवून जातात!
===
मुकेश अंबानी यांनी गॅस, पेट्रोकेमिकल आणि अनिल अंबानी यांच्याकडे वीजनिर्मिती, इलेक्ट्रॉनिक, इन्फ्रास्ट्रक्चर सारखे विभाग देण्यात आले होते.
मुकेश अंबानी यांनी नेहमीच दूरदृष्टीने निर्णय घेतले आणि जिओ, फायबर ऑप्टिक अश्या क्षेत्रांमध्ये आपली पकड मजबूत केली. मुकेश अंबानी यांचं व्यवसाय कौशल्य बघूनच जिओमध्ये फेसबुकने गुंतवणुकीची इच्छा व्यक्त केली आणि व्हाट्सअप्प नंतरचा सर्वात मोठा करार मार्क झुकेरबर्गने भारताच्या जिओसोबत केला.
२०१९ मध्ये आपली कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या विस्तारासाठी अनिल अंबानी यांनी मार्केटमधून मोठं कर्ज घेतलं. त्याच वर्षी मुकेश अंबानी यांनी मार्केटमध्ये ‘जिओ’ कंपनी सुरू केली आणि रिलायन्स कम्युनिकेशन्स ग्राहक आकर्षक दरांमुळे (सुरुवातीला फुकट) जिओ कडे वळले. अनिल अंबानी यांच्या कंपनीला जिओचा जबरदस्त आर्थिक फटका बसला.
अनिल अंबानी यांना टेलिकॉम, वीज आणि बांधकाम या क्षेत्रात मार्केट लीडर व्हायचं होतं. पण, यापैकी कोणत्याही एका व्यवसायाकडून अनिल अंबानी यांनी नफा कमावता आला नाही.
कित्येक प्रोजेक्ट त्यांनी असे केले ज्यामध्ये अनिल अंबानी यांना कामाच्या दिरंगाईमुळे नफ्यापेक्षा नुकसान अधिक झाल्याचं सांगितलं जातं. रिलायन्स नवल, पॉवर, कॅपिटल, इंजिनियरिंग इतक्या वेगवेगळ्या कंपन्या अनिल अंबानी यांनी सुरू केल्या. पण, एका सुद्धा कंपनीच्या बिजनेस मॉडेलवर त्यांनी व्यवस्थित काम केलं नाही.
अनिल अंबानी यांची टेलिकॉम क्षेत्रातील पडझड ही 2G घोटाळ्या पासून सुरू झाली. २००२ मध्ये रिलायन्स इन्फ्राकॉम या कंपनी ने 2G स्पेक्ट्रम साठी गुंतवणूक केली होती. रिलायन्स इन्फ्राकॉम ला 2G स्पेक्ट्रम मिळेपर्यंत २००८ उजाडला.
रिलायन्स इन्फ्राकॉमने तोपर्यंत २५,००० करोड या प्रोजेक्ट वर कर्ज काढून खर्च केले होते. २००८ मध्ये जेव्हा हा घोटाळा उघडकीस आला तेव्हा मार्केट हे 4G पर्यंत जाऊन पोहोचलं होतं. २०१८ मध्ये टेलिकॉम मधून बाहेर पडण्याचा अनिल अंबानी यांनी निर्णय घेतला.
जिओसोबत कोणताही करार करायचा असल्यास जिओने अनिल अंबानी यांचे कर्ज फेडावे असा सरकारी निर्देश मुकेश अंबानी यांना देण्यात आला. त्यामुळे ते या वेळी अनिल अंबानीला मदत करू शकले नाहीत.
अनिल अंबानी यांनी नंतर मनोरंजन क्षेत्रात पाऊल ठेवलं. आपल्या Adlabs एंटरटेन्मेंट या कंपनीमध्ये त्यांनी केवळ कर्ज काढून ही कंपनी उभी केली. बिग सिनेमा हा ग्रुपसुद्धा अनिल अंबानी यांना इतर व्यवसायांमध्ये वाढलेल्या कर्जामुळे २०१४ मध्ये विकावा लागला होता.
रिलायन्स पॉवर या अनिल अंबानीच्या कंपनी ने IPO द्वारे ११,००० करोड रुपयांची गुंतवणूक उभी सुद्धा केली होती. २००८ मध्ये १३ गॅस प्लांट उभे करण्याचं काम अनिल अंबानी यांनी हाती घेतलं होतं.
मुकेश अंबानी यांच्या कंपनीकडून गॅस विकत घेऊन लोकांना गॅस पुरवठा करण्यासाठी ‘दादरी गॅस’ हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. पण, त्याच वेळी गॅसच्या किमती वाढल्या आणि मुकेश अंबानी यांनी ठरलेल्या किमतीत गॅसचा पुरवठा करण्यसाठी असमर्थता दर्शवली.
===
हे ही वाचा – राफेल सौदा – जसा झाला तसा. वाचा आणि भ्रष्टाचार झालाय का हे तुम्हीच ठरवा!
===
मामला सुप्रीम कोर्ट पर्यंत गेला. पण, निकाल मुकेश अंबानी यांच्या बाजूने लागला आणि ‘दादरी’ प्रकल्पावर पूर्णविराम लागला.
‘एरिक्सन इंडिया’ सोबत या कंपनीने आर्थिक व्यवहार केला आणि नंतर तो करार अर्ध्यातूनच मोडला. अनिल अंबानी यांनी व्यवसायाकडे केलेलं दुर्लक्ष ही या कराराची सर्वात मोठी चूक समोर आली होती.
‘एरिक्सन इंडिया’ यांच्यासोबत व्यवहार करतांना अनिल अंबानी यांनी इतक्या आर्थिक चुका केल्या की त्यांच्या मोठ्या भावाला येऊन एरिक्सन इंडियाच्या कर्जाच्या विळख्यातून सोडवावं लागलं होतं.
२०१९ मध्ये सर्वांनी पहिल्यांदा दोन्ही भावांना एकत्र बघितलं जेव्हा अनिल अंबानी यांनी सार्वजनिकरित्या मुकेश अंबानी यांचे आभार मानलेले लोकांनी बघितले.
आपल्यावर असलेल्या कर्जाची नियमितपणे भरपाई न करणे, त्यासाठी योग्य ती आर्थिक तरतूद न करणे यामुळे ही कर्जाची रक्कम दर महिन्यांनी वाढतच गेलं.
अनिल अंबानी यांची चीनच्या बँकांच्या नोटीसने २०२० ची सुरुवात झाली. रिलायन्स कम्युनिकेशनचे शेअर्स पडले. अनिल अंबानी यांचं कर्ज इतकं वाढलं आणि परतफेडीची ऐपत इतकी कमी झाली की, त्यांनी बँकेला लिहिलेल्या पत्रात असा मजकूर लिहिला की –
“माझ्या सर्व गुंतवणूकीची किंमत आता शून्य रुपये इतकी झाली आहे. माझ्याकडे सध्या कोणतीही स्थायी मालमत्ता शिल्लक राहिलेली नाहीये. माझ्यावर असलेल्या कोर्ट केसचा सुद्धा मी खर्च करू शकत नाही. “
अनिल अंबानी यांच्या या विधानांवर परदेशी बँकांनी तिथल्या नियमानुसार विश्वास ठेवला आहे. पण, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसिज बँक या भारतीय बँकांनी अनिल अंबानी यांच्या सर्व वैयक्तिक आणि व्यवसायिक बँकांची चौकशी करायला सुरुवात केली आहे.
रिलायन्स कम्युनिकेशन्स, रिलायन्स इन्फ्राटेल आणि रिलायन्स टेलिकॉम ही बँक खाती सध्या सर्व आर्थिक संस्थांच्या रडार वर आहेत.
‘अंबानी’ हे आडनाव अनिल यांना किती दिवस जेल मधून जाण्यापासून वाचवू शकतं? याकडे सर्व मीडिया आणि कर्जदारांचं लक्ष लागून राहिलेलं आहे.
आज अनिल अंबानी हे एखाद्या सामान्य माणसाचं आयुष्य जगत आहेत. इंटरनेट वर त्यांचा सध्याचा फोटो बघितल्यावर कोणाचीही खात्री पटेल. रिलायन्स निप्पोन लाईफ इन्श्युरन्स ही कंपनी त्यांनी नुकतीच सुरू केली आहे ज्यामध्ये त्यांना नफा होण्याची आशा आहे.
अनिल अंबानी यांच्या अपयशाचे ३ प्रमुख कारणं सांगता येतील :
१. अतिमहत्वाकांक्षी स्वभाव
२. सतत कर्जावर अवलंबून राहणे
३. कोणत्याही एका व्यवसायावर लक्ष केंद्रित न करता सतत नवीन व्यवसाय करत राहणे.
“व्यवसायातील निर्णय हे भावनांवर अवलंबून न राहता उपलब्ध माहिती, पैसे, ज्ञान यावर अवलंबून घेतले पाहिजेत” हा नियम अनिल अंबानी यांना लवकर कळला असता तर एक भारतीय वयवसायिक दिवाळखोर झाला नसता.
नुकसान कुठे थांबवावं? आणि आपण व्यवसाय करण्यासाठी योग्य आहोत की नाहीत? या प्रश्नांची जरी प्रामाणिक उत्तरं अनिल अंबानी यांनी स्वतःला दिले असते आणि त्यानुसार पाऊलं उचलले असते तरी परिस्थिती नियंत्रणात राहिली असती.
कर्जाच्या दबावाखाली येऊन अनिल अंबानी यांनी कोणतंही चुकीचं पाऊल उचलू नये अशी इच्छा व्यक्त करूया.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.