हा अवलिया नसता तर कदाचित आज ‘वडापाव’ हा अस्सल मराठमोळा पदार्थही नसता
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
भारतात दर शंभर किलोमीटरवर भाषा बदलते, खाण्या पिण्याच्या आवडीनिवडी बदलतात असं आपण नेहमीच बघतो. प्रत्येक भागातील बोलण्यातली लकब वेगळी, कुठे तिखट जास्त आवडीने खाल्लं जातं तर कुठे गोड खाण्याची आवड जास्त आहे.
आपल्या महाराष्ट्रातसुद्धा आपण बघतो, की पश्चिम महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भाच्या मानाने तिखट आवडणारे लोक कमी असतात. संपूर्ण राज्यात आवडणाऱ्या एका पदार्थाचं नाव सांगणं कोणालाही कठीण जाईल.
पुण्याची मिसळ नाशिकच्या लोकांना आवडत नाही, तर औरंगाबादची इमरतीपेक्षा नागपूरच्या लोकांना त्यांची संत्रा बर्फी जास्त आवडते.
प्रत्येक मराठी माणसाला आवडणारा एक खमंग, रुचकर पदार्थ सांगायचा तर ‘वडा-पाव’ हेच नाव समोर येतं.
महाराष्ट्रातील कोणाला ‘वडा-पाव’ माहीत नाही किंवा आवडत नाही असे होऊच शकत नाही. नोकरदार वर्गाचा तर वडा-पाव हा विशेष आवडीचा आहे. सकाळी ऑफिसला जातांना असो किंवा संध्याकाळी घरी येतांना पार्सल असो, वडा-पाव हा आपल्याला ठराविक अंतराने नक्की मिळत असतो.
तुम्ही कारमधून कुठे तरी जात असाल किंवा बस स्टॉपवर उतरलेले असा किंवा लोकलचा प्रवास करून स्टेशनच्या बाहेर येत असाल, बारीक पाऊस पडत असेल आणि गरमा गरम वडा-पावचा वास येत असेल तर त्या वडा-पाव च्या गाडीकडे न वळता घरी जाणं एक आव्हान असतं.
‘जोशी वडेवाले’, ‘गोली’, ‘जम्बो वडापाव’ सारख्या कित्येक व्यवसाय चेन वडापाववर लोकांच्या असलेल्या प्रेमामुळे आज यशस्वी झाल्या आहेत.
डोसा, पोहे, दाबेली, भेळ, पाणी-पुरी सारखे पर्याय उपलब्ध असतांना कोणी ‘वडापाव’ पहिल्यांदा विकायला ठेवला असेल? कोणत्या गाड्यावरून वडापावची सुरुवात झाली असेल? जाणून घेऊयात.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – पाकिस्तानी लोकांना लागलंय ‘मुंबई पावभाजी’चं वेड…!! का नि कसं?? वाचा…
===
१९६६ मध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी “मराठी माणसानेसुद्धा दक्षिणेकडील लोकांसारखा नाश्त्यासाठी एखादा पदार्थ शोधावा” अशी हाक दिली होती. मराठी माणसाने हे साध्य करण्यासाठी उत्स्फूर्त प्रयत्न केले. साबुदाणा वडा, मेदूवडाचासारखे बरेच प्रयोग त्यावेळी करण्यात आले.
पण, या सर्वात बाजी मारली ती बटाटा वडा आणि पाव या दोन्हींना एकत्र आणून त्यावर पुदिना चटणी या मिश्रणाने. वडा आणि पावला एकत्र आणण्याचं आणि लोकांना काही तरी ‘वेगळं’ देण्याचं श्रेय ‘अशोक वैद्य’ यांना जातं.
दादर स्टेशनच्या बाहेर त्यांनी वडापावचा पहिला स्टॉल सुरू केला होता. वरळी, परेल सारख्या भागात काम करणारे हजारो कामगार हे दादर स्टेशन वरूनच येणं जाणं करायचे.
पोहे आणि ऑम्लेट पावच्या गाडीच्या बाजूला त्यांनी आपली गाडी लावलेली असायची. एक दिवस सहज म्हणून त्यांनी हा प्रयोग केला आणि तो काही क्षणातच सुपरहिट झाला.
कोणतंही ‘पेटंट’ किंवा ‘कॉपीराईट’ नसलेल्या वडापाव हा काही दिवसातच मुंबईतील सर्व गर्दीच्या ठिकाणी मिळू लागला. पिझ्झा, बर्गरची आवड असलेल्या पिढीला या आपल्या मराठमोळ्या पदार्थाने अक्षरशः मोहून टाकलं होतं.
नोकरीवर जातांना किंवा कामासाठी दिवसभर बाहेर फिरणाऱ्या लोकांसाठी वडापाव हे ‘ऑन द गो’ खाणं ठरू लागलं. ‘किंमत कमी आणि चवीची हमी’ असलेला वडापाव लोकांच्या लक्षात राहू लागला, चर्चिला जाऊ लागला!
१९७०-८० च्या काळात मुंबईतील गिरणी कामगारांच्या संपानंतर कित्येक लोकांची नोकरी गेली होती. घर चालवणं अवघड झालं होतं. सेवानिवृत्त झालेल्या कित्येक गिरणी कामगारांनी घर चालवण्यासाठी तेव्हा वडापावच्या गाड्या सुरू केल्या.
आपल्याला दहा रुपयात मिळणाऱ्या या वडापावने गिरणी कामगारांच्या घरातील चूल पेटवण्यास मदत करून लोकांच्या संसारात लाख मोलाचं काम केलं होतं.
अशोक वैद्य यांच्या वडापावचे स्वतः माननीय बाळासाहेब ठाकरे हे खूप मोठे फॅन होते. ते नेहमी वैद्य यांचा वडापाव मागवायचे. त्यांनी बृहनमुंबई महानगरपालिकेला “अशोक वैद्य यांच्या वडापाव च्या गाडीला कुठलाही त्रास दिला नाही पाहिजे” असं सुद्धा सांगून ठेवलं होतं.
१९९० च्या दशकात भारतात मॅकडोनाल्डचे आउटलेट सुरू झाले. तरीसुद्धा महाराष्ट्रातील लोकांचं वडापावबद्दलचं आकर्षण काही कमी झालं नाही.
याचं कारण म्हणजे मॅकडोनाल्डचा बर्गर जगात कुठेही खाल्ला तरी त्याची चव सारखीच असते. पण, प्रत्येक वडापावची गाडी चालवणारे हे आपल्या पद्धतीने वडापाव खमंग, तिखट, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या, मिरची सोबत देऊन तयार करतात.
===
हे ही वाचा – नोकरी गेली, म्हणून लंडनमध्ये ‘इंडियन बर्गर’ विकून हा पट्ठ्या कोट्याधीश झाला
===
भारतीयांना हा बदलच खूप आवडतो. ‘रोज चवीला काही तरी वेगळं असावं’ अशी अपेक्षा असणाऱ्या मराठी माणसांनी पूर्ण राज्यात वडापावला पसंती दिली आणि एका अर्थाने वडापावला महाराष्ट्राची ‘ओळख’ बनवलं. इतर राज्यातील लोक महाराष्ट्रात आल्यावर आधी वडापाव वर ताव मारत असतात.
२१ व्या शतकात आपल्या वडापावला सुद्धा ‘कॉर्पोरेट लूक’ मिळाला. ‘जम्बो किंग’ सारख्या चेनने वडापाव ला ‘इंडियन बर्गर’ म्हणून लोकांसमोर आणलं आणि त्याची लोकप्रियता अजूनच वाढली.
लोकांची पहिली पसंती ही नेहमीच गाडीवरच्या वडापावला असली तरीही वडापाव च्या ‘फ्रॅंचायझी’ व्यवसाय स्वरूपाला सुद्धा लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला.
अशोक वैद्य यांच्या या पदार्थाबद्दल आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल आलंबन सिद्धार्थ या दिगदर्शकाने २०१५ मध्ये ‘वडापाव आयएनसी’ ही शॉर्ट फिल्म तयार केली होती. ही शॉर्टफिल्म लोकांना खूप आवडली होती.
२३ ऑगस्ट १९६६ रोजी अशोक वैद्य यांनी पहिला वडापाव तयार केला होता. त्यामुळे २३ ऑगस्ट हा दिवस खवैय्ये मंडळी ‘वडापाव दिवस’ म्हणून साजरा करतात.
६ जुलै १९९८ रोजी वयाच्या ५८ व्या वर्षी अशोक वैद्य यांचं निधन झालं. त्यांनी लावलेल्या वडापावच्या शोधामुळे महाराष्ट्रातील क्रिकेटर, अभिनेता, व्यवसायिक, कामगार यांना एकत्र आणण्याचं काम तोपर्यंत झालं होतं.
अशोक वैद्य यांचा मुलगा नरेंद्र हा अशोक वैद्य यांच्या निधनाच्या वेळी बी.कॉम.चं शिक्षण घेत होता. त्याने वडिलांनी सुरू केलेला वडापावचा स्टॉल सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. नरेंद्रला पुढे जाऊन फॅशन डिझायनिंग मध्ये करिअर करायचं होतं. त्याचा मोठा भाऊ त्यावेळी एमबीएचं शिक्षण घेत होता.
नरेंद्र वैद्य ने आज २३ वर्षांनी सुद्धा दादर स्टेशन वेस्टर्न लाईनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ समोर वडापाव चा स्टॉल सुरू ठेवला आहे. तो अशोक वैद्य यांच्या इतक्याच साधेपणाने लोकांना वडापाव विकत असतो आणि मुंबईच्या लोकांची छोटी भूक भागवत असतो.
अशोक वैद्य यांनी शोध लावलेल्या या वडापावमुळे किती तरी लोकांचा दिवस रुचकर होत असतो. त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानायला हवेत.
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
—
===
हे ही वाचा – डिलीव्हरी बॉयने सुरु केला अफलातून व्यवसाय कमावतोय महिना ८० हजार!
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.