जेव्हा पुलंच्या एका पत्राने बाळासाहेबांसकट सर्वांचे धाबे दणाणले होते…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
पु ल देशपांडे हे व्यक्तीमत्व म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या अगदी जवळचं. काहींनी पुलंना प्रत्यक्ष पाहिलंय, अनुभवलंय, मात्र सध्याच्या तरुणाईला ती संधी मिळाली नसली तरी पुलंच्या प्रत्येक शब्दांतून, विनोदातून पुलं आपल्याला वारंवार भेटतात. हसवतात, अगदी आपल्या नैराश्यातही पुन्हा उभं राहण्याचं बळ देतात.
पुलंचा मिश्किल स्वभाव, त्यांच्या प्रत्येक शब्दातून समोरच्याला हसवण्याची हातोटी हे सारं पाहता पुलं कधी कोणावर चिडले असतील याची कल्पनाही करता येणार नाही.
काहीवेळा चिडलेल्या पुलंनी ‘मार्मिक’ शैलीतून समोरच्याला कोपरखळ्या मारल्या होत्या, त्याचे अनेक किस्सेही प्रसिद्ध आहेत. मात्र एकदा भर व्यासपीठावर संतापलेल्या पुलंनी आपला राग विनोदाच्या माध्यमातून नव्हे तर थेट आपल्या धारधार लेखणीव्दारे व्यक्त केला.
हा राग नेमका कुणावर होता हे ऐकल्यावर तर तुम्हाला धक्काच बसेल. हा राग होता तत्कालीन महाराष्ट्र सरकारवर. शिवसेना आणि भाजप युतीवर…
झालं असं की, शिवसेना – भाजप युती सत्तेत आल्यानंतर ‘महाराष्ट्र भुषण’ या मानाच्या पुरस्काराची नांदी झाली. पहिलावहिला पुरस्कार हा ‘शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला जावा’ अशी मागणी जोर धरत होती, मात्र ‘आपलेच सरकार आणि पुरस्कारही आपल्यालाच’ ही बाब स्वाभीमानी बाणा असलेल्या बाळासाहेबांना रुचली नसल्याने त्यांनी पुरस्कारास नकार दिला.
त्यानंतर बाळासाहेबांनीच या प्रकरणात रस घेत पहिलावहिला पुरस्कार ज्येष्ठ लेख, बाळासाहेबांचे गुरु पु ल देशपांडे यांना दिला जावा असा विचार मांडला आणिकेवळ राजकीयच नव्हे तर नाट्य, साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांकडून या निर्णयाचं स्वागत झालं.
मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिरात मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते पुलंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी वयोमानानुसार थकलेल्या पुलंसोबत त्यांच्या पत्नी सुनिताबाई देखील रंगमंचावर उपस्थित होत्या.
पुलंनी पुरस्कार स्विकारला, उभा महाराष्ट्र त्यांच्यासमोर नतमस्तक झाला. मात्र या सोहळ्यात पुढे जे काही घडलं त्याची कुणी कधी कल्पनाही केली नसेल.
पहिल्यावहिल्या महाराष्ट्रभुषण पुरस्कार्थीचे विचार ऐकण्यास सगळेच उत्सुक होते. प्रकृती अस्वस्थ्यामुळे पुलंनी आपलं मनोगत एका कागदावर लिहून आणलं होतं, आणि त्यांचे विचार त्यांच्या अर्धांगिनींनी वाचावे असं जाहीर केलं.
सुनिताबाईंनी पुलंचं पत्र त्यांच्यासह अनेक मान्यवरांसमोर वाचायला सुरुवात केली. पुलंचं लिखाण ऐकायला मिळणार म्हणून प्रेक्षक उत्सुक होते, मात्र त्यानंतरच्या लेटरबॉम्बने केवळ सभागृह नव्हे तर उभा महाराष्ट्र हादरला.
–
हे ही वाचा – “तुमचा दाऊद तर आमचा गवळी”, बाळासाहेबांच्या गर्जनेने अंडरवर्ल्डची झोप उडाली होती
–
पुलंनी आपल्या पत्रात शिवसेना – भाजप युतीवर सडकून टिका केली होती. ‘लोकशाहीचं नव्हे तर ठोकशाहीचं सरकार’ असल्याचं पुलंनी आपल्या पत्रात नमूद केलं होतं. अर्थात ही टिका एवढ्यावर थांबली नाही.
पुलं म्हणाले, विचारस्वातंत्र्याचा मी आजवर पाठपुरावा करीत आलो आहे. अशा वेळी लोकशाहीतच केवळ शक्य असणाऱ्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले पक्ष राज्यावर आल्यावर जेव्हा ‘लोकशाहीपेक्षा ठोकशाही पसंत करतो’ वगैरे बोलायला लागतात, तेव्हा माझ्यासारख्याला किती यातना होत असतील ते कोणत्या शब्दांत सांगू? ‘
मुद्द्यांचं नव्हे तर गुद्द्यांचं राजकारण सुरु असल्याचं सांगत त्यांनी तत्कालीन युतीचा समाचार घेतला.
राज्य, राजकारण, राज्य शासन, राजकीय पक्ष वगैरे शब्द भ्रष्टाचार, गुंडगिरी, खुनाखुनी, जाळपोळ यांना पर्यायी शब्द झाल्यासारखी अवस्था झाली आहे…पुलंच्या पत्रातील ही वाक्य ऐकल्यानंतर मात्र सभागृहात भयाण शांतता पसरली होती. तरिही पुलंकडे निर्धाराने पहात सुनिताबाईंनी आपलं वाचन सुरु ठेवलं होतं.
आपल्या या पत्रानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजणार याची जाण असल्याने पत्राच्या अखेरिस पुलं म्हणाले, “विचार स्वातंत्र्याचा मी पुरस्कर्ता असून लोकांच्या हितासाठी मांडलेला विचार सत्ताधीशांना मानवला नाही, तरी सत्य लोकांपुढे आणलेच पाहिजे हा माझा नेहमी हट्ट राहिला आहे”.
त्या लांबलचक पत्रात पुलंनी तत्कालीन अनेक उदाहरणांचे दाखले देत शिवसेना- भाजप या दोन्ही पक्षांच्या वर्तवणूकीबाबत आपली नाराजी दाखवली होती.
सुनिताबाईंचं पत्रवाचन संपलं आणि तरिही सभागृह निःशब्द होतं.
पु. ल.देशपांडे आणि बाळासाहेब ठाकरे यांचं नातं तेंव्हाही सर्वांच्या परिचयाचं होतं. शालेय वयापासूनच पुलंना गुरु मानणा-या बाळासाहेबांचा त्यांच्यावर खूप जीव होता. मात्र असं असूनही पुरस्कार सोहळ्यात पुलंनी युतीवर केलेली टिका बाळासाहेबांच्या जिव्हारी लागली.
मात्र समोरून वार झाल्यावर शांत राहतील ते बाळासाहेब कसले, पुलंनंतर आपल्या भाषणात बाळासाहेबांनी आपली नाराजी व्यक्त केली. पुलंकडून अशा टिकेची अपेक्षाच नसल्याचे सांग “झक मारली आणि यांना पुरस्कार दिला” असंही बोलण्याच्या ओघात ते बोलून गेले. आम्ही ठोकशाहीवाले अहोत, मग आमचा पुरस्कार का स्विकारलात? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
–
हे ही वाचा – शाहरुख बंदूक घेऊन पार्टीत शिरला तेव्हा खुद्द बाळासाहेब त्याला सामोरे गेले…!
–
पुलंच्या पत्राने संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं होतं. काहींच्या मते पुलंनी पुरस्कार स्विकारायला नको होता, मात्र या प्रकऱणात सर्वात मोठी टिका झाली ती बाळासाहेबांवर!
पुलंना आपले विचार मांडण्यास स्वातंत्र्य असताना बाळासाहेबांनी अशा हीन शब्दात त्यांच्यावर टिका करावी हे योग्य नाही, पुलं हे त्यांचे गुरु असून गुरुवर असा शब्दिक वार करणं बरोबर नाही अशा अनेक टिकांचे लोण उठले.
पुढे अनेक दिवस जनसामान्यांसह वृत्तपत्रातूनही बाळासाहेबांवर टिका होत राहिली. अखेरीस आपली चूक उमजून बाळासाहेबांनी थेट पुणे गाठलं आणि लाडक्या भाईंसमोर नतमस्तक होत त्यांनी झालेल्या सगळ्या प्रकरणावर कायमचा पडदा टाकला.
गेल्या काही आठवड्यांपासून पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बचं प्रकरण गाजत आहे, मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात टिका करणा-या, कानपिचक्या देणा-या अनेक पत्रांनी यापुर्वीच खळबळ माजवली आहे.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.