आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
२०२१ मध्ये सुरू झालेल्या ‘कोरोना भाग २’ हा सुद्धा कोरोनाच्या पहिल्या भागाप्रमाणेच रौद्र रूप धारण करतांना दिसत होता. देशात सर्वात प्रगतशील राज्य म्हणून प्रचलित असलेल्या आपल्या महाराष्ट्राने कोरोना मध्ये सुद्धा आपला अव्वल क्रमांक राखला होता, मात्र आता तिसरी लाट येणार अशी चर्चा सुरु आहे.
- …म्हणून चक्क सचिन आणि गांगुली ‘भारताच्या दोन वेगळ्या संघांकडून’ खेळत होते!
- ही व्यक्ती नसती, तर भारतीय खेळाडूंना ऑलिम्पिक मैदानावर उतरताच आलं नसतं! वाचा
–
लॉकडाऊन सुरु झाला होता तेव्हा परत घरूनच काम, पगार कपात सारख्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं. या सर्व प्रश्नांमध्ये ‘लहान मुलांना घरातच ठेवणे’ हा प्रश्न सुद्धा तितकाच अवघड आजही आहे.
आपल्या लहानपणी ‘नवा व्यापार’ हा खेळ खूप लोकप्रिय होता. एकदा खेळणं सुरू झालं की दुपारचे दोन-तीन तास कसे निघून जायचे हे कळायचं सुद्धा नाही.
आपलं बालपण हे आजच्या मुलांसारखं गॅजेट्स आणि ‘प्ले स्टेशन’ने ग्रासलेलं नव्हतं हे आपलं नशीबच म्हणावं लागेल. ‘ल्युडो’ किंवा ‘चंपूल’ सारखे खेळ खेळल्याने आपल्याला आजच्या सारखं ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ शिकता आलं नाही. पण, आपल्या खेळांमध्ये एक व्यव्हार ज्ञान देण्याची क्षमता होती हे नक्की.
ज्या मुलांना सतत मैदानी खेळ खेळायची सवय असेल त्यांना बैठे खेळायची सवय लावायची हीच वेळ आहे. लुडो, साप-शिडी, कॅरमसारखे खेळ पुन्हा खेळणं सुरू करावं लागेल.
कारण, सध्या लहान मुलांचा स्क्रीन टाईम याकडे सुद्धा पालकांना सतत लक्ष द्यावं लागत आहे. त्यांना थोडं स्क्रीन पासून लांब ठेवून बैठे खेळाच्या विश्वात नेणं आता आवश्यक झालं आहे. ‘लुडो’ हा एक असा खेळ आहे जो की मुलं कधीही खेळायला तयार असतात.
तुम्हाला हे कळल्यावर आश्चर्य वाटेल की, २०२० च्या लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन खेळांच्या गर्दीत सुद्धा लुडो किंग या खेळाचं ऍप हे इतर कोणत्याही खेळापेक्षा सर्वात जास्त डाउनलोड झालं होतं.
२०१६ मध्ये तयार करण्यात आलेल्या या ऍपने कॅन्डी क्रश सागा, पबजी सारख्या प्रस्थापित खेळांना डाउनलोड आणि रोज खेळले जाणारे स्पर्धक यामध्ये मागे टाकलं आहे.
जगभरात आवडीने खेळल्या जाणाऱ्या लुडोचा कोणी? कधी आणि का शोध लावला असेल?
संशोधकांनी अशी नोंद केली आहे की, लुडो हा सर्वात पहिल्यांदा ६ व्या शतकात आपल्या महाराष्ट्रातील अजिंठा – एलोरा लेणींमध्ये खेळला गेला होता. अर्थातच, त्याचं नाव तेव्हा वेगळं होतं.
या लेण्यांच्या भिंतीवर आजही या बैठे खेळाच्या खुणा आहेत ज्या हे सांगतात की, आज इंग्रजी नावाने ओळखल्या जाणारा लुडो हा त्याच्या आजच्या पद्धतीपेक्षा थोड्या फार फरकाने भारतीयच खेळ आहे.
प्राचीन काळात हा खेळ एखाद्या पाटीवर किंवा कपड्यावर फळांच्या बिया सोंगट्या म्हणून वापरून शिंपले हे फासे म्हणून वापरले जायचे.
भारतीय इतिहासात प्रांतानुसार लुडोला ‘चौसर’ किंवा ‘चोपड’ किंवा ‘पच्चीसी’ या नावाने ओळखलं जायचं. हे नाव काही देशांमध्ये अजूनच वेगळी आहेत. जसं की, लुडोला स्पेन मध्ये ‘पर्चीसी’ हे नाव आहे. चीन मध्ये ‘चतुश पाडा’ आणि आफ्रिकेमध्ये ‘लुडू’ या नावाने ओळखलं जातं.
लुडोचा अतिप्राचीन प्रकार :
आपल्या महाभारतातील ‘चौसर’ हे आपण कधीच विसरू शकणार नाहीत. या चौसरमुळेच महाभारत घडलं होतं हे आपल्याला ठाऊकच आहे.
पांडव आणि कौरव यांच्या मध्ये खेळला गेलेला हा खेळ शकुनी च्या नातेवाईकाच्या हाडाने बनलेल्या फास्यांमुळे पांडवांना हरावा लागला होता. कारण, ते फासे फक्त शकुनीच्या इशाऱ्यावर आकडे दाखवत होते. पांडवांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या युधिष्ठीरला आपल्या पराभवात कुठे थांबावं? याचं भान राहिलं नाही.
द्रौपदी वस्त्रहरण, पांडवांचा १४ वर्ष अज्ञातवास आणि त्यानंतर कुरुक्षेत्रावरील युद्ध हे सगळं फक्त ‘चौसर’ किंवा ‘द्युत’ मुळेच घडलं. लुडो ही त्याचीच सुधारणा होत तयार झालेली आवृत्ती म्हणून ओळखली जाते.
- स्वतःला सिद्ध करायला ‘गोल्ड मेडल’च आणावं लागणार का? विस्मृतीत गेलेल्या १२ खेळाडूंची व्यथा
- हॉकी नकोच… ‘क्रिकेट’ला आपला ‘राष्ट्रीय खेळ’ घोषित करावं : वाचा परखड मत!
–
लुडोचा भारतीय इतिहासातील वापर :
मुघल साम्राज्याचा राजा अकबर हा सुद्धा लुडो किंवा तत्सम एक खेळ खेळायचा.
शिंपले किंवा इतर कोणतीही गोष्ट फासे वापरण्या ऐवजी अकबर राजा हा माणसांना फासे म्हणून वापरायचा. आग्रा आणि फत्तेपुर सिक्रि मधील राजमहालात हा खेळ खेळता यावा म्हणून विशेष सदन बांधण्यात आले होते.
लुडोचं इंग्रजी रूप :
१८९१ मध्ये अल्फ्रेड कॉलीयर या इंग्लंडच्या व्यक्तीने या खेळात फाश्यांची सुधारित आवृत्ती आणून आपल्या पच्चीसीचं इंग्लंड मध्ये ‘रॉयल लुडो’ या नावाने पेटंट दाखल केलं.
तेव्हापासून आपला भारतीय खेळ हा जगभरात ‘लुडो’ या नावाने ओळखला जाऊ लागला. ब्रिटिश रॉयल नेव्हीने या बोर्ड गेम ला ‘उकर्स’ हे नाव सुद्धा दिलं होतं.
रंगीत झालेल्या आपल्या चौसर मध्ये हिरवा, लाल, निळा आणि पिवळा हे चार रंग भरले गेले. प्रत्येकाला चार सोंगट्या दिल्या गेल्या आणि प्रत्येक खेळाडू साठी खेळाच्या मध्यभागी एक त्रिकोणी ‘घर’ देण्यात आलं.
ज्या खेळाडूच्या चारही सोंगट्या सर्वात प्रथम आपल्या घरात जातील तो या खेळाचा विजेता असे काही नियम लावण्यात आले.
प्रत्येक खेळाडूला आपल्या चार सोंगट्या ठेवण्यासाठी त्या रंगाचे चौकोनी घर दिले गेले. या चौकोनी घरातून बाहेर पडल्यावर आपल्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत दिशादर्शक बाणांचं चिन्ह लुडोवर दाखवण्यात आलं.
चार जण एकत्र बसून खेळायचा खेळ असला तरीही यामध्ये इतर खेळांसारखी दोन खेळाडूंमध्ये भागीदारी नसते.
चार लोक एकत्र बसून एक खेळ खेळू शकतात, वेळेचा सदुपयोग करू शकतात या गोष्टी इंग्लंडच्या लोकांनासुद्धा लुडोबद्दल आवडल्या होत्या. लुडो खेळतांना आनंद मिळतो आणि हा खेळ आपल्याला त्याच्या नादी लावतो हे सर्वांनीच मान्य केलं आहे.
लुडो हा खेळ काहींना केवळ नशिबाचा खेळ वाटतो तर काहींना सरावाचा.
लुडो खेळतांना डोकं लावावं लागत नाही असं काहींचं मत आहे तर लुडो हे एका रणनीतीने खेळल्यास आपण जिंकू शकतो असं बऱ्याच जणांचं मानणं आहे.
लुडोमधून आपण या काही गोष्टी शिकू शकतो :
१. तुमच्या स्पर्धकाला कधीही सोपं समजू नका.
२. कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी चांगली सुरुवात ही आवश्यक असतेच. पण, काही वेळेस तुम्ही उशिरा सुरुवात करून सुद्धा एखादी स्पर्धा जिंकू शकतात.
३. कायम सतर्क रहा, ‘लुडो’ खेळणाऱ्या प्रत्येकालाच जिंकायचं असतं.
लुडोमध्ये प्रत्येक खेळाडूला त्याच्या रंगानुसार काही चौकोन हे ‘होम’ या नावाने खेळाडूंना दिलेले असतात. या चौकोनांमध्ये त्या खेळाडूच्या सोंगट्यांना इतर खेळाडू मारू शकत नाही.
आपली सध्याची परिस्थिती सुद्धा अशीच आहे. आपण कमीत कमी गरजा ठेवून आपण आपल्या ‘घरातच’ राहिलं पाहिजे हेच सगळेजण परत परत सांगत आहेत.
सुरक्षित रहा. तब्येतीची काळजी घ्या. कारण, लुडोमध्ये जिंकण्यासाठी आपल्याला दुसरी संधी असते. प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ती दुसरी संधी खूप कमी जणांना मिळते.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.