' गेम थियरी आणि परमबीर सिंग : राज्याच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी – InMarathi

गेम थियरी आणि परमबीर सिंग : राज्याच्या राजकारणाला अनपेक्षित कलाटणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – चेतन दिक्षीत

===

अँटिलीया प्रकरण, वाझेंचा हस्तक्षेप, विधानसभेतला गदारोळ, नंतर एनआयएची एंट्री, सगळंच दिपवणाऱ्या गाड्या, मोठे मासे, अटकसत्र, या मार्गे जिलेटीनच्या कांड्यामागच्या कटाचा शोध सुरु आहे.

दररोज नवनवीन खुलासे येत आहे. येत आहेत कि पेरले जात आहेत ह्यावर काळच भाष्य करेल. पण ह्या अनुषंगाने ज्या काही घटना समांतर म्हणाव्या अश्या घडत आहेत. खरंतर त्या समांतर नाही आहेत.

 

sachin vaze inmarathi

 

त्यांचे बिंदू जिलेटीनच्या कांड्यांशीच येऊन जुळणार आहेत. पण या सगळ्या गदारोळात बळीचा बकरा म्हणून परमबीर सिंग ह्यांची जी बदली केली गेली. ती एक बदली इतिहासात नोंद करावी अशीच आहे.

साधारणपणे पोलीसखात्यात बदली होणे याला एका शिक्षेसारखीसुद्धा पार्श्वभूमी असते. संबंधित पोलिस अधिकाऱ्याचीच कर्तव्यपूर्ती जर संबंधित शासनाच्या म्हणण्यासारखी झाली नाही, तर त्याची बदली होते, हे उघड गुपित असतं. आणि या अश्या बदलीवर फार काही माध्यमांत चर्चा वगैरे झालेली मी फारशी पाहिलेली नाही कारण ती निमूटपणे स्वीकारली जाते.

===

हे ही वाचा – ‘सर्वात धडाडीचे’ म्हणून प्रसिद्ध असणारे नगराळे ३ वर्षांपूर्वी एका चुकीमुळे मागे पडले होते

===

परंतु परमबीर प्रकरणात ही बदली प्युनिटीव म्हणजे दंडात्मक असल्याचेच अनिल देशमुखांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सुचक वक्तव्य केले होते. परमबीर सिंगांना होमगार्ड दिलं गेलं. आणि परमबीर सिंग नाराज होऊन सुट्टीवर गेले.

ह्या अश्या पार्श्वभूमीवर प्रकरण शांत होतंय असं वाटत असतानाच त्यांचा लेटरबॉम्ब पडला आणि इतके दिवस कोणत्याही शासकीय कामानिमित्तसुद्धा ऑफलाईन बैठकांना टाळाटाळ करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगल्यावर बैठकीचा सपाटा लावला, तेही ह्या काळात जेंव्हा कोरोनाचे आकडे सर्वसामान्यांच्या उरात धडकी भरवत आहेत.

हा लेटरबॉम्ब काय आहे? ह्या संदर्भात माध्यमांत विस्तृत आलेले आहे. त्यामुळे ते इथे टाळतो.

 

parambir singh inmarathi

 

ह्या पत्रावर प्रतिक्रिया देताना अनिल देशमुखांनी परमबीरसिंगांवर अब्रू-नुकसानीचा दावा दाखल करण्याची भाषा केली होती. दोन दिवस झाले त्या भाषेला, परंतु अजून काही तशी पावले टाकल्याचे ऐकिवात नाही पण आज चक्क खुद्द परमबीर सिंगांनीच ह्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात “अनिल देशमुखांची ह्या पत्राच्या अनुषंगाने चौकशी व्हावी”, अशी याचिका दाखल केली आणि मुकुल रोहतगींनी त्यांचे वकीलपत्रसुद्धा घेतल्याची चर्चा आहे.

हे ऐतिहासिक आहे…

जेंव्हा एका माणसाला सर्व बाजूने घेरलं जातं आणि सुटकेचा एकही मार्ग दिसत नाही तेंव्हा शेवटचा पर्याय म्हणजे तो माणूस त्याला घेरणाऱ्यांच्याच अंगावर चालून जातो.

तसेही मरायचंच आहे तर दोघा – चौघा सहभागी लोकांना घेऊन जाऊ अशी भावना त्याच्या मनात येते. जी अत्यंत स्वाभाविक आहे.

एनआयए वाझेंची मजबूत चौकशी करतीये. एपीआय जरी म्हटला तरी तोही माणूसच आहे. आणि ही असली भ्रष्ट माणसे सर्वात घाबरट असतात. कदाचित त्याने संबंधितांची नावे एनआयएला दिली सुद्धा असतील.

परमबीर सिंगांना तर वाझे रिपोर्ट करत होते. त्यामुळे त्यांचे ह्या प्रकरणात अडकणे स्वाभाविकच असणारे. तशी भीती परमबीर सिंगांना वाटणेही स्वाभाविक आहे.

तिकडून गृहमंत्र्यांनी ह्या संदर्भात सगळा दोष परमबीर सिंगांवर टाकून त्यांची बदली केली. परमबीर सिंगांची चोहीकडून कोंडी झाली. सुटकेचा मार्ग कुठला उरला होता? मग शेवटचा पर्याय म्हणजे ऑफेन्सिव्ह डिफेन्स. म्हणजे हे पत्र..

 

vaze parambir inmarathi

 

ह्या सगळ्यात अजून एक विशेष गोष्ट म्हणजे परमबीर सिंगांनी ह्या पत्रात शरद पवारांचं सरळ सरळ नाव घेतलंय. ह्याआधी तेलगीच्या प्रकरणात पवारांचं नाव आलं होतं.

नंतर त्याचं काय झालं हे आपण सर्व जाणतो. पण त्या काळात आणि ह्या काळात एक मोठा फरक म्हणजे केंद्रात आत्ता काँग्रेस नाहीये. आणि ती येण्याची सध्यातरी शक्यता नाहीये.

संजय बारूंच्या “ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर” मध्ये एक महत्वाचा उल्लेख आहे. मनमोहनसिंग पंतप्रधान बनल्यावर त्यांना शरद पवार आणि लालूप्रसाद यादव ह्यांचं खूप सहकार्य मिळालं. बारू म्हणतात ह्याचं मुख्य कारण म्हणजे नोकरशाहीवर असलेली त्यांची कमांड.

 

sanjay barua inmarathi

 

आत्तापर्यंत पवारांचे पत्ते मानणारे हे नोकरशहा पवारांवर उलटले नाहीत कारण पवार त्यांच्यावर कधी उलटले नाहीत.

महाराष्ट्रात अगदी तेच झालं. अनिल देशमुख जरी गृहमंत्री असले तरी ह्यामागे मेंदू कोणाचा हे शेम्बडं पोरगं पण सांगेल. म्हणजे ह्या बदलीमागे त्यांचा हात असल्याची शक्यता नाकारणं अवघड आहे. परमबीर सिंग पवारांवर उलटले कारण पहिला वार हा समोरून झाला होता.

पवारांच्या बेभरवशी राजकारणाचा फटका परमबीर सिंग पचवू शकले नाहीत.. म्हणून हा बॉम्ब पडलाय आणि त्या पत्राद्वारे “शरद पवार” हे नाव सर्वोच्च न्यायालयात अधिकृतरीत्या गेले.

हि याचिका त्या काळात गेलीये जेंव्हा मोदी – पवार हे संबंध आधीसारखे मधूर नाहीयेत आणि केंद्रीय सत्तेच्या नाड्या दूरान्वयेही पवारांच्या हातात नाहीयेत.

त्यामुळे सुरुवातीला “स्थानिक” प्रकरण म्हणून पवारांनी ज्या प्रकरणाची हेटाळणी केली त्याच प्रकरणाने पवारांना “राष्ट्रीय” पातळीवर तोंडघशी पाडलं.

===

हे ही वाचा १४ वर्षात १५ बदल्या, असं करतात तरी काय मुंढे साहेब?

===

अर्थात इथे कोणालाच कसलेही प्रमाणपत्र देण्याची गरज नाहीये. असले “अर्थपूर्ण” संबंध सर्वश्रुत होतेच. फरक एवढाच झालाय कि ती मूठ अश्या माणसाने उघडलीये ज्याच्याकडेच त्याची किल्ली होती. आणि ज्याच्याकडे आपल्या मुठीची किल्ली असते त्याला दुखवून चालत नसते. हा साधा नियम पाळला गेला नाही..

अर्थात ह्यामध्ये मी पवारांचीसुद्धा चूक मानत नाही. “गेम थेअरी” नावाचा एक सिद्धांत आहे. गुन्हा घडतो. दोघे संशयित असतात. दोघांना वेगवेगळ्या खोलीत बंद केलं जातं. आणि एकाने गुन्हा कबुल केला तर त्याची शिक्षा कमी होणार असते अथवा शिक्षा होणारच नसते. अर्थात हे अवलंबून असते दुसर्या खोलीत डांबलेल्या संशयिताच्या कबुलीवर.

 

sharad pawar inmarathi

 

दोघेही गोंधळात पडतात आणि अश्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर स्वतःला वाचवण्यासाठी ते काय आणि कसे जबाब देतात ह्याचे विश्लेषण म्हणजे हा सिद्धांत. मार्केटमधल्या स्पर्धेत सुद्धा हा वापरला जातो. हा सिद्धांत महाराष्ट्राने राजकीय पटलावर मांडलेला पाहिला, परमबीर सिगांच्या निमित्ताने.

पोलीस खाते आणि संबंधित नेते हे वरील सिद्धांतातील संशयित आरोपींप्रमाणेच गोंधळलेले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून परस्परविरोधी विधाने स्वाभाविक आहेत. कारण एनआयएला सचिन वाझेने नेमकं काय सांगितलं? ह्याची स्पष्ट कल्पना कोणालाच नाहीये.

त्यामुळे येत्या काळात ह्या सर्वात अजून रंगत चढत जाणार हे नक्की आणि अंधारात खडे मारता मारता कोण प्रकाशात येईल? खरंच कोणी प्रकाशात येईल का? त्याचा ह्या सरकारवर काही परिणाम होईल का? का अजून कुठला नेता क्वारंटाईन होईल? किती काळासाठी? हे पाहणे रंजक ठरणार आहे..

आणि ह्या अनपेक्षित कलाटणीचे श्रेय बिनदिक्कत परमबीर सिंगांचेच..पाहुयात..

===

हे ही वाचा अंडरवर्ल्डचं कंबरडं मोडणारे ‘इनकॉउंटर स्पेशालिस्ट’ आहेत तरी कोण?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?