' जे गाणं चित्रपटातच नव्हतं, ते जावेद यांनी असं काही लिहिलं की झालं एव्हरग्रीन सुपरहिट! – InMarathi

जे गाणं चित्रपटातच नव्हतं, ते जावेद यांनी असं काही लिहिलं की झालं एव्हरग्रीन सुपरहिट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

नव्वदच्या दशकातली एक सुंदर नाजूक अभिनेत्री, मनिषा कोईराला. सौदागरमधून पदार्पण केलेली मनिषा एकदम छुईमुई गर्ल होती. माधुरी दीक्षित हे नाव तोवर दिल की धडकन बनलं होतं आणि तिच्या चेहरेपट्टीशी साम्य असणारं हे नेपाळी सौंदर्य सुभाष घईनं टशनमधे शोधू काढलं होतं.

अभिनय यथातथाच असला तरीही तिचं नाजूक दिसणं अनेकांना भुरळ पाडणारं ठरलं आणि हे नाजूक प्रकरण हिंदी सिनेमात स्थिर झालं.

 

manisha koirala inmarathi

 

१९४२ अ लव्हस्टोरीपर्यंत मनिषा अभिनयाचे प्रयत्न प्रामाणिकपणे करु शकते हे एक दोन चित्रपटांनी सिध्द केलं होतं. विधु विनोद चोप्रा हे नाव इंडस्ट्रीत आणि बाहेरही थोडं आदरानं, थोडं कौतुकानं तर बरचसं टवाळकीन घेतलं जायचं. याचं कारण होतं विधु विनोद चोप्राचं मै हुं ही नहीं इस (बॉलीवुड) दुनिया का ॲटिट्यूड.

आर. डी. बर्मन हे हिंदी चित्रपट संगीतात इतिहास रचलेलं नाव उतरणीला लागलं होतं. ज्याच्या तारखा मिळाव्यात, ज्याचं संगीत आपल्या चित्रपटाला मिळावं म्हणून निर्माते त्याच्या दारात वाट बघत असत आता त्यावर फ्लॉपचा शिक्का बसून कोणी दारात उभं करायला तयार नव्हतं.

===

हे ही वाचा आर डी… आगे भी होगा जो उसका करम!

===

आरडी नावाची जादु संपलेली होती. विधू विनोद चोप्रानं त्यांना पुन्हा संधी दिल्यावर ते फार भावनिक झाले. मात्र आता जमाना बदलला होता, लोकांची आवड बदललेली होती आणि या बदलाशी जुळवून घेत संगीत निर्माण करणं खुद्द आरडीला कठीण जात होतं.

मनासारखी एकही ट्यून सुचत नव्हती. त्यांना कमालिचं नैराश्य आलं आणि एकदा तर ते विधू विनोद चोप्रांसमोर तू माझ्या हातून हा चित्रपट काढून तर घेणार नाहीस नां? म्हणून रडलेही.

 

pancham and vidhu vinod inmarathi

 

दुर्दैव हे की, या चित्रपतटातली सगळी गाणी गाजली आणि नुसती गाजली नाहीत तर लोकांनी डोक्यावर घेतली, याला फिल्मफेअरही मिळालं मात्र हे नवंकोरं यश बघायला आरडी आपल्यात नव्हते. ते अनंताच्या प्रवासा निघून गेले होते.

विधु विनोद चोप्रानं नविन सिनेमाची तयारी सुरू केली आणि छुईमुई गर्ल मनिषा माधुरीनं नकार दिल्यानं यात आली. आरडीच्या गाण्यांची पुन्हा एकदा नशा नविन पिढीवर चढतेय का हे बघण्यासाठी आरडीकडे संगीत सोपवण्यात आलं.

सिध्दहस्त गीतलेखक जावेद अख्तर यांच्याकडे गाण्यांची जबाबदारी गेली. चित्रपटाची कथा जरी प्रेमकथा असली तरीही तिला स्वातंत्र्यसंग्रामाची पार्श्वभूमी होती.

ते भान बाळगत चित्रपटची तयारी सुरू झाली. लूक पासून सेटपर्यंत सगळ्याचीच प्रचंड चर्चा सुरू होती. गाण्यांचा समावेश करायचाच याबद्दल दुमत नव्हतं.

===

हे ही वाचा चित्रपट बनवताना पोटाची खळगी भरण्यासाठी अडवाणींना नडलेल्या प्रोड्यूसरची गोष्ट!

===

स्क्रिप्टमधे गाण्यांच्या जागाही तयार केल्या गेल्या. जावेद साहेबांनी पटकथा ऐकली तेंव्हा त्यांना त्यात एका रोमॅंटिक, हळूवार गाण्याची जागा दिसली. त्यांनी विधु विनोद चोप्राला सांगितलंही की एक गाणं यात चपखल बसू शकेल. मात्र विधू विनोद चोप्रा सहसा कोणाचं काही ऐकायचा नाही.

चित्रपटाचा हिरो गावातून जात असताना अनामिका असलेल्या नायिकेचं वर्णन करतो अशी ती सिच्युएशन जावेद साहेबांनी शोधली होती. बरेचदा सांगूनही विधु विनोद चोप्रानं काही ते मनावर घेतलं नव्हतं.

 

javed akhtar inmarathi

 

जितकी आहेत तितकी गाणी पुरेशी आहेत असं त्याचं म्हणणं होतं. गाण्याच्या मिटींगसाठी जावेद अख्तर आणि विधु विनोद चोप्रा आरडींकडे गेले असता. जावेद अख्तरनी सहज बोलता बोलता आरडींच्या कानावर ही गोष्ट घातली. विधू विनोद म्हणाले की ऐकवा गाणं.

आता गंमत अशी की, गाण्याच्या बाबतीत जावेद साहेब आग्रही असले तरीही गाणं तयार नव्हतंच. गाणं ऐकवा म्हंटल्यावर जावेदसाहेबांकडे लिखित बोल नव्हतेच.

त्यांनी सजच वर्णन केल्यासारखी एक ओळ समोर केली, एक लडकी को देखा तो ऐसा लगा. ही ओळ ऐकून आरडी लगेचंच उत्सुक झाले. यावर उत्तम गाणं बनू शकेल असं त्यांना वाटलं.

जावेद अख्तरनी अर्धं करियर पटकथा लेखक म्हणून घालवलेलं असल्यानं त्यांच्या सुचनेचा किमान विचार करणं भागच होतं कारण उगाचंच म्हणून ते कोणती सूचना करणार नाहीत हे उघडच होतं.

विधु विनोद चोप्रा यांनाही आता वाटू लागलं की गाणं घालणं योग्य होईल. या गाण्यामुळे सिनेमाला एक छानशी गती, र्‍हिदम येतोय. त्यांनी जावेद साहेबांना म्हणलं द्या गाणं. आता विधु विनोद चोप्राचा ईगो जितका त्याहून दुप्पट ईगो जावेदसाहेबांकडे असणं सहाजिकच होतं.

त्यांनी तिथल्या तिथे सुनावलं,”लेना हि नहीं था तो मैं गाना लिखू क्यू”? आरडी मधे पडत म्हणाले की, ठीक आहे. नसेल लिहिलं तर आता लिहा. जावेद अख्तर म्हणाले आधी तुम्ही धून बनवा मी त्याबरहुकूम शब्द रचतो.

यावर आरडींनी कुरघोडी करत सांगितलं की ठीक आहे पण अंतर्‍यामधे या सुंदर लडकीसाठी सगळ्या उपमा आल्या पाहिजेत. जावेद साहेब तयार झाले मात्र आधी धून यावर अडून राहिले.

आरडी म्हणाले की अरे धून बनाओ क्या? समझो बन चुकी. आणि हार्मोनियम पुढ्यात ओढून त्यांनी त्यावर सुरावटी छेडायला सुरवातही केली.

 

javed and pancham inmarathi

 

हार मानतील ते जावेदसाहेब कसले? शिवाय त्या काळात जावेद अख्तर हे अक्षरश; अर्ध्या तासात गीत लिहिण्यासाठी ओळखले जात असत. बसल्या बैठकीत गाणी लिहिण्यात त्यांचा हातखंडा होता.

या गाण्याच्या अनुभवाबाबत नंतर एकेठिकाणी बोलताना जावेद अख्तर म्हणाले की, आरडी यांच्या मेंदूत विचार नाही तर सतत संगीत वाजत असायचं. अक्षरश: अर्ध्या अर्ध्या मिनिटांत ते एखादी भन्नाट धून बनवून टाकयचे. आपल्याला अंतरा सूचेपर्यंत त्यांचा मुखडा तयार असायचा. हे माहित असूनही मी त्यांना हे आव्हान का दिलं असेल? हा प्रश्न मला आजही पडलेला आहे.

===

हे ही वाचा बच्चनने ही फिल्म नाकारल्यामुळे चित्रपटसृष्टीत इतिहास रचणारे सलीम-जावेद वेगळे झाले

===

तर बॉल पुन्हा जावेद अख्तर यांच्याकडे टोलवला गेला. साक्षात सरस्वती जिथे वास्तव्याला तिथे शब्दांची काय कमतरता? जावेदसाहेबांनी हे आव्हान स्विकारलं आणि तिथल्या तिथे धडाधड उपमा सुचवल्या.

मात्र या उपमा शोधतानाही त्या सोज्वळ असल्या पाहिजेत असा जावेद अख्तर यांचा आग्रह होता. दारू, नशा असे शब्द त्यांना अजिबात नको होते. कशा बशा दोन अंतर्‍या इतक्या उपमा शोधत त्यांनी ते गाणं अर्धं मुर्धं पूर्ण केलं मात्र तिसर्‍या अंतर्‍यापर्यंत ते थकून गेले.

त्यांनी या दोघांकडे थोडी सवलत मागितली. शुध्द, सात्विक, सोज्वळ गाण्याच्या मिटरमधे बसणार्‍या उपमा शोधण्यासाठी त्यांना दोन दिवस लागले. मात्र यानंतर जे गाणं तयार झालं ते हिंदी चित्रपट संगीतात अजरामर झालं.

 

Ek ladki ko dekha to inmarathi

 

एक दोन नाही तर तब्बल २१ उपमा वापरून हे तरल गाणं बनलं. या गाण्यासाठी गायक कुमार सानूला, गीतलेखनासाठी जावेद अख्तर यांना आणि संगीतासाठी आरडी यांना पुरस्कार लाभला. अर्थात हा पुरस्कार या गाण्याचा वाजवी हक्कच होता हे शंभर टक्के.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?