आंतरजातीय विवाहांच्या मदतीने ‘सामाजिक कल्याण’ साधायचं असेल, तर…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक – सुभ्रमण्य केळकर
(लेखक पॉलिटिकल सायन्सचे एम. ए. चे विद्यार्थी आहेत.)
===
आंतरजातीय विवाहांनी जातीअंत किंवा किमान जातीभेद मोडता येईल, असा विचार अनेकांनी मांडून झालाय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वा. सावरकर, राजर्षी शाहू महाराज अशा अनेकांनी असे म्हटले आहे. मी जेव्हापासून अशा गोष्टींचा विचार करत होतो तेव्हा काही प्रश्न उपस्थित होत गेले. यातून माझे याविषयीचे मत बदलत गेले, ते लिहिण्याचा आता प्रयत्न करत आहे.
डॉ.बाबासाहेबांनी स्त्रियांना ‘जातीचे महाद्वार’ असे म्हटले आहे, कारण त्यांच्यापासूनच जाती ह्या ‘जाती’ राहतात असे त्यांना वाटले असावे. स्वा. सावरकरांनी सांगितलेल्या सप्तबंदीमध्ये ‘बेटीव्यवहार’ याचा आवर्जून उल्लेख केला. त्यांनी समाजकार्य करताना असे आंतरजातीय विवाह घडवून आणले आहेत.
असेच काम शाहू महाराजांनीही करून इ.स. १९२० साली त्यासंदर्भात कायदाही केलेला होता. मात्र या सर्वांचा आदर करून मला वेगळे मत मांडायचे आहे.
आंतरजातीय विवाहांनी जाती संपतील हे पूर्णतः सत्य नसून ते अर्धसत्यच आहे असे मला वाटते. कारण “आंतरजातीय विवाह करून जाती नष्ट होतील यापेक्षा जाती नष्ट झाल्या तर आंतरजातीय विवाह होतील”असे मला वाटते.
दुसऱ्या जातीत विवाह करण्यासाठी त्या मुला/मुलीने जात विसरणे किंवा जातीला जास्त महत्त्व न देणे गरजेचे आहे. मात्र हेसुद्धा अनेकदा मुलीपुरतेच मर्यादित राहते. कारण मुलीलाच आपल्या जातीचा त्याग करावा लागतो (हा त्याग कायद्याने करता येत नाही. कोणतीही जात कायद्याने बदलता येत नाही.) असे म्हणण्याचे कारण, हे की आंतरजातीय विवाहानंतर वडिलांची जात मुलांना लागते.
हे एवढ्यावर मर्यादित नसून त्या मुलांना आपल्या वडिलांच्या जातीचा अभिमानही वाटू लागतो. यात आपल्या आईची जात काय याचा त्यांना काहीही फरक पडत नाही. म्हणजेच आंतरजातीय विवाहांनी जाती संपतात हे खोटे आहे. फारतर ‘त्या’ दोन्ही घरच्या लोकांनी तो विवाह स्वीकारला तर अशा विवाहांतून जातीयवाद काही प्रामाणात संपतो असे म्हणता येते.
आंतरजातीय विवाहातही मोठी गंमत आहे. आपली मुलगी (तथाकथित) खालच्या जातीत जाणार असेल, तर जास्त विरोध असतो, पण तीच मुलगी (तथाकथित) वरच्या जातीत लग्न करून जाणार असेल तर विरोध कमी असतो.
एवढंच कशाला, मुलानेही खालच्या जातीतील मुलीशी लग्न केले तर विरोध जास्त आणि वरच्या जातीतील मुलीशी लग्न केले तर कमी विरोध असतो. मी अशी उदाहरणे मित्र परिवारात पहिली आहेत, की अनुसूचित जातीतील लोकही आपली मुलगी अनुसूचित जमातीतील मुलाला देण्यास तयार नसतात. आणि असे उलटही घडते. म्हणजेच आंतरजातीय विवाहाला विरोध होण्याचे प्रमाण ‘सर्वच’ समाजस्तरात आहे.
याचे कारण दुसऱ्या जातीला कमी लेखणे हे असतेच पण त्यासोबतच वेगळे राहणीमान, संस्कार, जीवनपद्धती ही सुद्धा कारणे असतात.
अशावेळी मुलीलाच स्वतःमध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडवून सांभाळून घ्यावे लागते आणि म्हणूनही तो विरोध असतो. म्हणजेच आंतरजातीय विवाहाला विरोध करणारे सर्वच जातीयवादी असतात असे म्हणण्याचे काही कारण नाही असे मला वाटते.
अनेकदा तर आपल्याकडे एखाद्या मुलाने वरच्या जातीतील मुलगी केली तर त्याच्या कुटुंबियांसाठी ती चारचौघात सांगायची अभिमानाची गोष्ट असते.
काही लोक जे स्वतःला ‘चळवळीतील’ वगैरे म्हणवतात ते बदला म्हणून विशिष्ट जातीतील मुलींशी विवाह करण्यासाठी खूपच प्रयत्नशील असतात. ‘त्या’ जातीतील मुलींशी लग्न करा म्हणजे त्यांची खोड मोडता येईल असा प्रचार करून तरुणांच्या मनात बदल्याची भावना निर्माण केली जाते (यासंबंधी अनेक पोस्ट वाचायला मिळतील तसेच यूट्यूबला व्हीडीओ सुद्धा उपलब्ध होतील.)
असे करून आपण जातीभेदाची लढाई जिंकल्याची वगैरे त्यांची भावना होत असावी. म्हणजेच जातिनिर्मूलन न घडता आपल्या कृतीचा व जातीचा अभिमान अशा विवाहातून तयार होतो. म्हणूनच आशा विवाहाने किती जातीनिर्मूलन होते हा प्रश्नच आहे.
–
हे ही वाचा – “माझ्या बहिणीने मुस्लिम प्रियकराशी लग्न जरूर करावं, पण धर्मांतर न करता…!”
–
देशाच्या संविधानात जातीयवाद निर्मूलनाची सोय आहे. मात्र जाती निर्मूलनाची सोय नाही. सध्या भारतात जातींचे इहवादीकरण झाले आहे. म्हणजेच ‘सर्व’ जातींना आपल्या जातींचा अभिमान निर्माण झाला आहे. ‘सांगे वडीलांची कीर्ती तो एक मूर्ख’ हे समर्थ रामदासांचे वचन विसरल्याचा हा परिणाम असावा.
विशिष्ट जातीतील मुलीशी लग्न केल्याचा अभिमान मनात येवून आपल्या जातीबद्द्लचा अभिमान वाढत असेल तर आंतरजातीय विवाहांनी जात कशी काय नाहीशी होईल? आंतरजातीय विवाहांनी खरंच जातीनिर्मूलन होत असेल, तर ज्यांनी ज्यांनी असे विवाह केले आहेत ते जाती मानत नाहीत असे म्हणावे लागेल. पण तसे आहे का याचा ज्याने त्याने विचार करावा.
जाती व जातीयवाद यांचा विचार करताना आपल्याला नक्की काय संपवायचे आहे याचा विचार करणे गरजेचे आहे. दोन्ही संपवायचे असेल तर ते संपवण्याचा मार्ग कोणता? तर याचं उत्तर आहे जनजागृती. आपल्याला जातींचा अभिमान वाटत राहतो तोपर्यंत हे शक्य नाही.
महापुरुषांना जातीमध्ये विभागण्यास नकार देणे, लोकांची आर्थिक स्थिती सुधारणे, जात हा राजकारणाचा विषय न करणे, दुसऱ्या जातींना तुच्छ लेखणे किंवा शिव्या देणे बंद करणे अशा अनेक बाबींचा वापर करणे शक्य आहे. असे न केल्यास हा ‘आधुनिक जातीयवादाचा’ प्रकार असाच सुरु राहील असे वाटते. यासाठी एक चांगला मार्ग म्हणजे जनजागृती हाच आहे.
आत्तापर्यंत कमी झालेला जातीयवाद हा आंतरजातीय विवाहांचे फलित नसून जनजागृतीचे फलित आहे. आंतरजातीय विवाह करणारे अनेक लोक जाती मानतात व जातीयवादही करतात. तर आपल्याच जातीत विवाह करणारे अनेक लोक जातीयवाद करत नाहीत (कदाचित जात मानत असतीलही) असे आपल्याला दिसेल.
समता, संविधान, अन्याय वैगरे वगैरे बोलून दुसऱ्या जातींना दूषणे देणाऱ्यांना विचारा की ‘तुम्हाला नक्की जाती संपवायच्या आहेत की जातीयवाद?’ ते नीट उत्तर देऊ शकत नाहीत, कारण त्याचं जातिनिर्मूलन हे उद्दिष्ट नसून स्वजाती विषयीचा अभिमान वाढवणे हेच अनेकदा उद्दिष्ट असते. अर्थात सर्वच लोक तसे नाहीत हे सुद्धा तेवढेच खरे आहे.
हा जातीय अभिमानाचा मूर्खपणा सोडल्याशिवाय नुसते आंतरजातीय विवाह करून जाती संपणार नाहीत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
भारतात जाती निर्मूलनाच्या चळवळी खूप कमी प्रमाणात झाल्या, ज्या चळवळी केल्या गेल्या त्या जातीयवादाचे निर्मूलन, अस्पृश्यता निवारण किंवा समतेसाठीच्या चळवळी होत्या (अशा चळवळींची सुद्धा त्याकाळी गरज होतीच).
भारतातील ख्यातनाम समाजशास्त्रज्ञ जी एस घुर्ये यांच्या मते भारतात अनेक चळवळी जाती निर्मूलनासाठी नव्हे तर स्वतःच्या जातींबद्दल अभिमान बाळगण्यासाठी सुरू झाल्या. कदाचित आपल्या जातीबद्दलचा न्यूनगंड नाहीसा करणे हा त्याचा हेतू असू शकेल. मात्र याने जातिनिर्मूलनाकडे वाटचाल झाली नाही.
–
हे ही वाचा – “मी ब्राह्मण आहे आणि माझा ब्राह्मण आरक्षणास पुढील कारणांमुळे विरोध आहे”
–
भारतात जाती संपवण्यासाठी ज्या काही थोड्याफार चळवळी झाल्या त्यात महात्मा बसवेश्वर यांची लिंगायत आणि गणपती महाराज यांची ‘अजात’ चळवळ यांचे नाव घेता येईल. पण आताचा विचार करता या चळवळीतही जातीय भेद तयार झाल्याचे पाहण्यात येते.
आता जातींचे इहवादीकरण झाल्याने जातींचा समाजजीवनातील वापर नित्याचा झाला आहे आणि अशावेळी जाती संपविणे सर्वात कठीण काम आहे.
गणपती महाराजांच्या प्रेरणेने ज्यांनी आपल्या जातीच्या रकान्यात ‘अजात’ असे लिहिले होते ते लोक इतरांप्रमाणे त्यांनाही शासकीय सुविधांचा लाभ मिळावा म्हणून आपल्या पूर्वीच्या जाती शोधून तशी प्रमाणपत्रे बनवीत आहेत. त्याचप्रमाणे लिंगायतांमध्ये माळी लिंगायत, मराठा लिंगायत असे अंतर्गत भेद पाहण्यात येतात.
आंतरजातीय विवाह जाती निर्मूलनाच्या दृष्टीने यशस्वी करण्यासाठी काय करता येईल याचा विचार करतांना मला एक उपाय सुचला तो सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याने सध्या होत असलेल्या आंतरजातीय विवाहांनी सामाजिक कल्याण साधून भविष्यात जातीयवाद आणि जाती संपवणे शक्य होईल. ‘तो उपाय म्हणजे अपत्यांनी वडिलांची जात न लावता आईची जात लावणे हा होय.
असे केल्याने केवळ जाती संपतील असे नाही तर भारतातील ‘पुरुषप्रधान’ संस्कृतीत स्त्रियांना अधिक महत्त्व मिळेल. म्हणजेच स्त्रीवाद्यांनी हा विषय मनावर घेण्यास हरकत नाही. आता याचे फायदे सविस्तर पाहू…
१) कोणी म्हणेल आईची जात लिहिण्यापेक्षा जातच लिहिली नाही तर काम सोपे होईल. मात्र माझ्या मते त्याने काही होणार नाही. कारण हाच प्रयत्न अजात चळवळीत झालेला होता. शासकीय सुविधा जातींवर आधारित असल्याने (आणि आणखी काही काळ त्याची गरज असल्याने) हा उपाय मानण्यास कोणीही तयार होणार नाही.
२) सध्याच्या आंतरजातीय विवाहानी जाती निर्मूलन होत नाही त्याचे कारण अपत्याला वडिलांची जात लागते अशावेळी आईची जात काय आहे त्याने अपत्याला काहीही फरक पडत नाही. वडिलांच्या जातीचा त्याला अभिमान असतो आणि जातीय चळवळी, संघटना यात सहभाग घेण्यास ती/तो मोकळा होतो. मात्र आईची जात लावल्याने तो वडिलांच्या घरात राहील पण त्याची जात वेगळी असेल. त्यामुळे जातींचा फाजील अभिमान तयार होण्यास वाव राहणार नाही.
३) मुळातच स्त्रिया जातीय संघटनांमध्ये जास्त सक्रिय नसतात, जातीयवाद सुद्धा त्यांचा मनात खूप कमी असतो (पुरुषांच्या तुलनेत), तसेच त्यांना जातींचे भांडवल करण्याची विशेष सवय नसते किंवा तिला यासाठी वेळ नसतो म्हणून आईची जात असल्याने अपत्याकडे जातीय कट्टरता येणार नाही.
४) आईची जात लागल्याने आणि वडिलांच्या घरात राहील्याने दोन्ही जातीबद्दल समतेची भावना तयार होण्यास मदत होईल. ‘घरातच जातीय विभाजन झाल्याने सामाजिक जातीय विभाजनाला आळा बसेल.’
५) जे पुरुष स्वतः आंतरजातीय विवाह करतात मात्र त्यांच्या मनातून जातीयवाद संपलेला नसतो त्यांना आळा बसेल. कारण अपत्यांची जात वेगळी असेल.
६) कोणी म्हणेल यामुळे शासन जातीय आधारावर ज्या सोयी-सुविधा देते त्यांचा उपभोग नीट घेता येणार नाही. मात्र माझ्या मते तसे काही होणार नाही. तथाकथित खालच्या जातीच्या मुलाने तथाकथित वरच्या जातीच्या मुलीशी विवाह केला तर त्यांची मुले तथाकथीत वरच्या जातीची असतील व त्यांना सुविधा मिळणार नाहीत.
अशी स्थिती असल्यास सुविधांची गरजच राहणार नाही. कारण जातीवर आधारित सुविधा ह्या जातीय भेदभाव आणि ऐतिहासिक अन्याय या आधारावर दिल्या जातात. आणि इथे विवाहच तथाकथित वरच्या जातीतील मुलीशी झाल्याने भेदभावाचा किंवा असमानतेचा प्रश्नच राहणार नाही.
७) उलट झाल्यास म्हणजेच तथाकथित वरच्या जातीतील मुलाने खालच्या जातीतील मुलीशी लग्न केल्यास त्यांच्या अपत्याला आईच्या जातीप्रमाणे जातीआधारित लाभ मिळतील. पण असे झाल्यास आईच्या जातीबद्दलची अस्पृश्यता नाहीशी झालेली असेल हे लक्षात घेणे गरजेचे आहे, आणि हीच जातीयवादाविरुद्धची प्रमुख मागणी आहे.
८) असे केल्यास पुढील पिढीतील मुलांचे विवाह ‘आंतरजातीयच’ होतील, (ज्याने पुढील काळात आंतरजातीय विवाहांचे प्रमाण वाढेल) कारण इथे मुला/मुलीची आणि वडिलांची जात वेगळी असल्याने दोघांपैकी कोणासाठीतरी विवाह आंतरजातीयच ठरेल.
९) असे वाढत गेल्यास उच्चनीचतेसाठी किंवा अस्पृश्यतेसाठी जातीय आधार राहणार नाही आणि जे आर्थिकदृष्ट्या गरीब असतील त्यांना शासनाकडून आता आरक्षणासहित इतर सुविधाही मिळत आहेत त्यांचा लाभ घेता येईल.
१०) त्याने जातीय ‘बदला घेण्यासाठी’ इतर जातीतील मुलींशी लग्न करण्याचे विकृत प्रमाणही कमी होईल.
११) या उपायाने महापुरुषांनाही जातीत वाटणे बंद होईल.
१२) अपत्याने आईची जात आणि वडीलांचे आडनाव लावले तर आडणावांनुसार जातीय विभागणी कमी होईल.
१३) पुरुषप्रधान संस्कृतीला आळा बसेल (याचे पुन्हा वेगळे खूप फायदे सांगता येतील)
१४) असे करत राहिल्यास कालांतराने दीर्घकाळात तरी माननीय सर्वोच्च न्यायालयाने २०१०च्या ‘रामसजीवन खटल्या’मध्ये म्हटल्याप्रमाणे देशातून कोणत्याही कारणासाठी जात हा निकष वापरण्याचे बंद करण्यास मदत होईल.
वरील फायदे पाहता आंतरजातीय विवाह करणाऱ्यांनी तरी असे करण्यास सुरुवात करावी. ज्या मुलीनी असे विवाह केले आहेत त्यांनी आपली जात आपल्या मुलांना द्यावी, असे केल्याने वरील फायद्यासहित त्यांच्या नवऱ्याने खरंच जात विसरून त्यांच्याशी विवाह केला होता का हेसुद्धा कळेल.
असे करणे कायद्याने शक्य आहे का? असा प्रश्न कोणाच्या मनात असल्यास तसे शक्य असल्याचे अनेक निकालांत माननीय न्यायलायाने म्हटल्याचे मी वाचले आहे.
शक्य नसेल प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी नागरी समाजाने प्रयत्न करावेत. केवळ अपत्याला आईची जात लावल्याने असे अनेक फायदे होत असतील तर ह्या उपायाचा विचार करण्यास हरकत नाही असे मला वाटते. धन्यवाद…
===
हे ही वाचा – ‘जाती’ वर विचार करणाऱ्या प्रत्येकाने पाहावा असा माहितीपट : ‘अजात’ !
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.