दाऊद, हर्षद मेहता अशा कित्येकांसोबत कनेक्शन असणारे हे ‘स्वामीजी’ होते तरी कोण?
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
समाजात वावरताना प्रत्येक व्यक्तीला काही प्रश्न पडत असतात ज्याची उत्तरं त्याच्याकडे नसतात. दोन योग्य पर्यायांपैकी एक योग्य पर्याय निवडण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण हे एक मार्गदर्शक म्हणजेच मेंटर किंवा ‘गुरू’चा सहारा घेत असतात.
काही गुरू हे तुम्हाला व्यक्तिगत आयुष्यात कसं वागावं? हे शिकवतात, तर काही तुमची नोकरी किंवा काय केल्याने वृद्धिंगत होऊ शकतो याबद्दल सल्ला देत असतात.
व्यावसायिक सल्ला देणारे काही लोक हे त्यासाठी काही किंमत मागत असतात. तर अध्यात्मिक गुरू हा सल्ला त्यांच्या समाधानासाठी किंवा समाज कल्याणासाठी हे कार्य करत असतात अशी आशा समाजाची त्यांच्याकडून असते.
अध्यात्मिक गुरू हे त्यांनी केलेल्या देवाची भक्ती किंवा जनसेवेमुळे लोकांमध्ये पुजले जात असतात. अध्यात्मिक गुरू असणे म्हणजे केवळ भगवे वस्त्र घालून मिरवणे नव्हे. कोणाचंही वाईट न चिंतणारी आणि दुसऱ्याला निस्वार्थ मदत करण्यास उत्सुक असणारी ती प्रत्येक व्यक्ती ही अध्यात्मिक असते.
===
हे ही वाचा – बाबा राम रहीम सारखे इतर ९ वादग्रस्त धर्मगुरू!
===
मागील काही वर्षात मात्र, भगव्या रंगाचा सहारा घेऊन दुष्कृत्य करणाऱ्या लोकांची जमात खूप सक्रिय झाली आहे. धार्मिक रंग परिधान केल्यानंतर आपलं कोणीच काही वाईट करू शकणार नाही असं या लोकांना वाटत असतं.
संभ्रम निर्माण करणाऱ्या अश्या कित्येक स्वघोषित गुरूंबद्दल आपण वाचलं असेलच. ९० च्या दशकातील गाजलेल्या ‘चंद्रा स्वामी’ या भगव्या वेशात राहणाऱ्या आणि गुंडांना, कुप्रवृत्तींना सहकार्य करणाऱ्या व्यक्ती बद्दल जाणून घेऊयात.
कोण होते चंद्रा स्वामी? कुठून आले होते?
हर्षद मेहता यांच्या आयुष्यावर तयार झालेली वेबसिरीज ‘स्कॅम १९९२’ला मध्यंतरी खूप लोकप्रियता मिळाली. या वेबसिरीजमध्ये दाखवलेले पात्र म्हणजे खऱ्या आयुष्यातील कोण व्यक्ती आहेत? हे लोकांनी ओळखलं आहे. राकेश झुनझुनवाला, राधाकृष्ण दमानी, मनु मानेक या लोकांबद्दल ही वेबसिरीज बघितल्यावर खूप लोकांनी गुगल सर्च केलं.
शेअरमार्केटला आपल्या बाजूने फिरवणारे हर्षद मेहता एका ‘स्वामीजी’कडून शेवटपर्यंत सल्ला घेत होते. दिल्लीत राहणाऱ्या या स्वामीजींवर हर्षद मेहता यांचा नितांत विश्वास होता.
===
हे ही वाचा – शेअर मार्केटचा “बच्चन” की लुटारू ब्रोकर? भारतात सर्वाधिक गाजलेल्या स्कॅमची कहाणी
===
हे स्वामीजी कोण आहेत? याचे बरेच हॅशटॅग काही दिवसांपूर्वी सुरू होते. इंटरनेटवर पूर्ण जग सापडतं. लोकांना हे पण सापडलं, की हे स्वामीजी इतर कोणी नसून ‘चंद्रा स्वामी’ होते जे हर्षद मेहता यांचे ज्योतिषी आणि आध्यात्मिक गुरू होते.
तत्कालीन पंतप्रधान पी व्ही नरसिंहा राव हे सुद्धा चंद्रा स्वामी यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायचे ही माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली आहे.
९० च्या दशकात आपण ‘चंद्रा स्वामी’ हे नाव तेव्हाच्या वर्तमानपत्रात, न्यूज चॅनल वर खूपदा ऐकलं होतं. माहितीचे मर्यादित स्रोत असलेल्या त्या काळात कित्येक लोकांचं खूप ‘फावलं’ असं म्हणता येईल.
पी व्ही नरसिंहा राव यांच्या कार्यकाळात चंद्रास्वामी यांना प्रधानमंत्री कार्यालयात दखल देण्याची सवय होती हे सुद्धा सत्य समोर आलं होतं. पी व्ही नरसिंहा राव हे पंतप्रधान असतानाच चंद्रास्वामी यांनी दिल्लीच्या कुतुब इन्स्टिट्यूशन या भागात आपला आश्रम बांधला होता, हा केवळ योगायोग नव्हता.
एखाद्या व्यक्तीकडून मार्गदर्शन घेणे हा काही गुन्हा नाहीये. पण, ती व्यक्ती जेव्हा तुमच्याकडून घेतलेली माहिती अतिरेकी किंवा देशद्रोही लोकांपर्यंत पोहोचवते, तो खरा गुन्हा आहे.
चंद्रास्वामी हे नाव वादाच्या भोवऱ्यात अडकण्याचं कारण हे आहे, की त्यांच्यावर राजीव गांधी यांच्या हत्येत सहभाग नोंदवल्याचा आरोप आहे. राजीव गांधी हे सत्तेत आले आणि त्यांनी चंद्रास्वामी यांचा पंतप्रधान कार्यालयातील हस्तक्षेप पूर्णपणे बंद करून टाकला होता.
१९८० आणि १९९० च्या दशकात चंद्रास्वामी यांचा राजकीय व्यक्तींवर चांगलाच प्रभाव होता हे सिद्ध झालं होतं. मोरारजी देसाई यांचं सरकार पाडण्यासाठी सुद्धा चंद्रास्वामी यांनी अप्रत्यक्ष प्रयत्न केले होते असं बोललं जातं.
ममता बॅनर्जी यांनी चंद्रास्वामी यांना राज्यसभा सदस्यत्व देण्यात यावं यासाठी एकदा शिफारस केली होती. इतकंच नाही तर, चंद्रास्वामी यांच्या शिष्यांच्या यादीत ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान मार्गारेट थेचर यांचा सुद्धा समावेश होता.
राजस्थानमधील बेहरोर या गावात जन्म झालेल्या चंद्रास्वामी यांनी तांत्रिक विद्या शिकलेली होती. आपल्या तरुणपणी चंद्रास्वामी यांनी बिहारच्या जंगलात काही वर्ष तपश्चर्या केली होती असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
राजकीय मार्गदर्शक झाल्यानंतर ते सर्वप्रथम प्रसार माध्यमांना माहीत झाले होते.
चंद्रास्वामी हे बॉलीवूड आणि हॉलिवूडच्या काही सेलेब्रिटींना सुद्धा अध्यात्मिक मार्गदर्शन करत होते. हॉलीवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलर, हिंदी अभिनेते राज बब्बर, ब्रुने देशाचे सुल्तान हे त्यांचे ‘हाय प्रोफाईल’ शिष्य होते.
कोणत्याही व्यक्तीला मार्गदर्शन करण्यात काही चूक नाही. चूक आहे ती, तुम्ही कोणत्या व्यक्तीला मार्गदर्शन करण्यास निवडतात? किंवा नकार देत नाहीत हे ठरवण्यात तुम्ही बरोबर किंवा चूक ठरत असतात.
चंद्रास्वामी यांनी जेव्हा दाऊद इब्राहिम या कुख्यात गुंडाला सुद्धा आपली सेवा देण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांच्याकडे सहाजिकच संशयास्पद नजरेने बघितलं जाऊ लागलं.
चंद्रास्वामी जेव्हा दुबईला गेले होते, तेव्हा दाऊद इब्राहिम ने त्यांचं जंगी स्वागत केलं होतं अशी पोलिसांकडे बातमी होती.
यामध्ये अजून भर पडली जेव्हा चंद्रास्वामी यांनी अदनान खशोगी या अवैध हत्यारं बाळगणाऱ्या व्यक्तीला सुद्धा व्यवसाय वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे? याचं याचं मार्गदर्शन केलं होतं.
चंद्रास्वामी हे काही तरी गौडबंगाल आहे हे सर्वांना जाणवत होतं. पण, कोणतीही तक्रार किंवा गुन्ह्यांची नोंद न झाल्याने पोलीस त्यांच्यावर काही कारवाई करू शकत नव्हते.
काही दिवसांनी चंद्रास्वामी यांच्यावर काही आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल झाले आणि मग त्यांचे चक्र उलटे फिरायला सुरुवात झाली होती.
कोणत्या गुन्ह्यांची नोंद होती?
१९९६ मध्ये चंद्रास्वामी यांना लखूभाई पाठक या लंडनमधील भारतीय व्यवसायिकाला १ लाख युएस डॉलर्स रुपयांचा गंडा घालण्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती.
फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन म्हणजेच परदेशातील बेहिशोबी पैसे भारतात आणण्याच्या आरोपात चंद्रास्वामी यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
चंद्रास्वामी यांची अधोगती तेव्हा सुरू झाली जेव्हा काँग्रेस पक्षानेच हे जाहीर केलं, की राजीव गांधी यांची हत्या होण्यामागे चंद्रास्वामी यांचा हात होता.
===
हे ही वाचा – या ५ लोकप्रिय नेत्यांच्या राजकीय हत्यांबद्दल ऐकून आजही प्रत्येक भारतीय हळहळतो
===
२०१४ मध्ये दिल्लीतल्या एका व्यावसायिकाने चंद्रास्वामी यांच्यावर ३ करोड रुपयांना फसवण्याची पोलिसांकडे तक्रार केली होती.
हंसल मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘स्कॅम १९९२’ या वेबसिरीजमुळे कित्येक बंद करण्यात आलेल्या फाईल्सबद्दल लोकांना माहिती मिळाली असं म्हणता येईल. या वेबसिरीजमध्ये ‘कार्तिक कृष्णन’ या कलाकाराने चंद्रास्वामी यांची भूमिका केली होती.
मीडिया त्यावेळी काय करत होता?
राजेंद्र जैन या पत्रकाराने चंद्रास्वामी यांच्याबद्दल सर्व पुरावे एकत्र केले होते. पण, त्या आधीच राजेंद्र जैन यांचा खून करण्यात आला होता. चंद्रास्वामी यांच्या भोवती या खुनाच्या संशयाची सुई कित्येक महिने फिरत होती. या प्रकरणाचा तपास सीबीआय ने केला होता. पण, ठोस पुराव्या अभावी हे प्रकरण पुढे सरकलं नाही.
आपल्या वादग्रस्त करिअरमुळे लोकांना माहीत झालेल्या चंद्रास्वामी यांचं २०१७ मध्ये दिल्लीमधील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. आपल्या इर्षेमुळे चंद्रास्वामीसारखे लोक हे अध्यात्मिक गुरूंबद्दल सामान्य लोकांच्या मनात एक साशंकता निर्माण करतात.
आयुष्याच्या सुरुवातीला देवाची उपासना केलेली असूनही चंद्रास्वामीसारखे लोक स्वतःचा शेवट अश्या पद्धतीने करवून घेतात हे दुर्दैवी आहे. त्यांच्या अश्या वागण्याने कोणत्याही धर्माचं नुकसान होत नाही, नुकसान होतं ते त्या व्यक्तीचंच.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.