Site icon InMarathi

खंडणीसाठी बॉलिवूडकरांना धमकावून, स्वतःच त्याबद्दल पोलिसांना सांगणारा ‘चहावाला’!

ravi pujari inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बॉलिवुड आणि अंडरवर्ल्डचं नातं बदनाम आहे. एकेकाळी अंडरवर्ल्डचा पैसा बॉलिवुडमधे यायचा आणि गल्लाभरू सिनेमांची निर्मिती व्हायची. नव्वदीच्या दशकात अंडरवर्ल्डनं मुंबईत धुमाकूळ घातला होता. कुख्यात गुंड रवि पुजारी हा यापैकीच एक गुंड.

चहाच्या दुकानात काम करणार्‍या या पोर्‍यानं गॅन्गस्टर म्हणून जम बसवला आणि बॉलिवुडमधल्या पडद्यावर दबंगगिरी करणार्‍या भल्या भल्या नायकांना यानं धडकी भरवली.

अलिकडेच कुख्यात गुंड रवि पुजारीला मुंबईतल्या स्पेशल मोक्का कोर्टासमोर उभं केलं गेलं आणि बॉलिवुडमधल्या अनेकांनी ‘राहत की सांस’ वगैरे घेतली.

मागील वर्षी रवि पुजारीला वेस्ट आफ्रिकेतील सेनेगेलमधून भारतात आणलं होतं. कर्नाटकात त्याच्याविरूध्द अनेक केसेस आहेत, त्यामुळे आधी त्याला कर्नाटकात नेलं आणि आता मुंबईत आणलं आहे.

 

 

२०१६ च्या गजाली हॉटेल गोळीबार प्रकरणात तो मुंबई पोलिसांना हवा होता. असं म्हटलं जातं, की रवि पुजारीला मुंबईला गाडीनं आणलं जात असताना तो पोलिसांशी मराठीत गप्पागोष्टी करत होता आणि भूतकाळातल्या आठवणीही सांगत होता.

२०१६ नंतर फरार असणार्‍या रविविरूध्द शंभरहून अधिक केसेस दाखल केलेल्या आहेत. यापैकी सर्वात जास्त केसेस या बडे उद्योजक आणि बॉलिवुडमधल्या लोकांना खंडण्यांसाठी धमकी देण्याच्या आहेत.

मुंबई हादरवणार्‍या रवि पुजारीचा जन्म कर्नाटकातला. मुंबईत अनेकजणं जसे पोट भरायला येतात तसाच हाही आला. सुरुवातीला तो चहाच्या दुकानात पोर्‍याचं काम करत होता. यादरम्यानच त्याची ओळख काही गॅन्गस्टर्सशी झाली. त्यानंतर त्यानं काही काळ छोटा राजनसाठी काम केलं.

१९९३ साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटांनंतर छोटा राजन आणि दाऊद वेगळे झाले. एव्हाना या धंद्यात मुरलेल्या रविनंही आपली स्वतंत्र गॅन्ग बनवली. भारतातून पलायन करून भारताबाहेर राहून तो सूत्रं चालवत होता.

१९९२ साली छोटा राजनवर एक प्राणघातक हल्ला झाला होता आणि या हल्ल्यात रवि पुजारीचा हात असल्याच्या बातम्या होत्या.

 

 

कर्नाटकात जन्मलेल्या या मुलाला अनेक भाषा येत असल्याचं म्हटलं जातं. या धंद्यात कमावलेला सगळा पैसा त्यानं आफ्रिकेतील सेनेगेलमधल्या त्याच्या उद्योग धंद्यात गुंतवला होता.

हे ही वाचा – मुंबईच्या वेश्याव्यवसायाला वळण लावत, नेहरूंनाही निरुत्तर करणाऱ्या लेडी डॉनची कथा

सातत्याने बातम्यांच्या हेडलाईनमध्ये रहाणं हा त्याचा शौक होता. यासाठी तो बॉलिवुडमधल्या मंडळींना सतत धमक्या द्यायचा. कधी कधी तर तो स्वत:च मिडियातल्या लोकांना फोन करून त्यानं कोणाला धमकावलं आहे याची बातमी द्यायचा.

त्याचा यामागचा उद्देश हा असायचा, की त्याचं नाव चर्चेत रहावं आणि लोक त्याच्या नुसत्या नावालाच घाबरावेत. त्याला घाबरूनच कलाकार मंडळी त्याच्या मागण्या पूर्ण करत असत. इतकंच नाही तर, या पठ्ठ्यानं एकदा एक लाईव्ह मुलाखत देण्याचा पराक्रमही केलेला आहे. स्वत:ला या मुलाखतीत हिरो बनवितानं त्यानं दाऊदला पकडून देण्याची भाषाही केलेली होती.

 

 

मुंबईतल्या बिल्डर लॉबीला यानं सळो की पळो करून टाकलं होतं. त्यांच्याकडून भल्या मोठ्या रक्कमांची खंडणी मागायची आणि त्यांना घाबरवायला त्यांच्यावर प्राणघातक गोळीबार करायचे, ही त्याची नेहमीची स्टाईल होती.

महेश भट्टपासून रितेश देशमुखपर्यंत अनेकांना त्यानं अशा पध्दतीनं धमकावलं आहे. इतकंच नाही, तर पडद्यावर ‘बारा मुल्कों की पुलिस’ही ज्याला पकडू शकली नाही असा नामचिन डॉन साकारणार्‍या शाहरूखला आणि ऑन-ऑफस्क्रिन दबंगगिरीसाठी, माजोरडेपणासाठी परिचित असणार्‍या सलमानखानलाही त्यानं धकमावलं होतं.

सुप्रसिध्द गायक अरिजित सिंगलाही त्यानं ५० कोटी खंडणी आणि फुकट कॉन्सर्ट अशी धमकी दिली होती.

भारतीय पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी त्यानं दुबईनंतर ऑस्ट्रेलियात आपलं बस्तान हलवलं होतं. मात्र अखेरीस त्यानं आफ्रिकेची निवड केली आणि तो तिथे जवळपास स्थायिकच झाला. इथे तो नाव बदलून राहू लागला आणि नमस्ते इंडिया नावाची फूड चेन चालवू लागला.

त्याला वाटलं होतं, की आता मुंबई पोलिस त्याचं काहीही वाकडं करु शकणार नाहीत. मात्र मुंबई पोलीस त्याच्या मागावर कायमच होते. तो बेसावध असतानाच २०२०मध्ये त्याची धरपकड करण्यात आली.

 

 

कर्नाटकातल्या उडुपीमधल्या मालपे गावात एका गरिब कुटुंबात जन्मलेल्या रवि पुजारीचे वडिल एका शिपिंग कंपनीत कामाला होते. ते काही वर्षांपूर्वी वारले. बहिण आणि आई कोठे असतात काय करतात याचा काहीच पत्ता नाही. रवि पुजारीशी यांनी काहीही संबंध ठेवले नाहीत.

स्वत:ला हिंदू डॉन म्हणवून घेणार्‍या रवि पुजारीनं कायम मुस्लिम धर्मियांना टार्गेट केलं. अनेक मुस्लिम व्यावसायिकांना धमक्या देऊन तो प्रचंड मोठ्या खंडण्या त्यांच्याकडून वसूल करत असे. हे व्यावसायिकही पोलिसांकडे न जाता गपचुप त्याच्या मागण्या मान्य करत असत असं म्हटलं जातं.

हे ही वाचा – या ‘लेडी डॉन’ च्या इशाऱ्यावर दाऊद आणि हाजी मस्तान सुद्धा नाचायचे…

रवि पुजारी याचा उजवा हात समजल्या जाणार्‍या मेंगलोरमधल्या विकी शेट्टीनं त्याच्यापासून वेगळं होत स्वत:चा धंदा चालू केला आणि हिंदू डॉन या रविच्या पदाला धक्का बसला.

बुर्कानिया येथे ॲन्टोनी फर्नांडिस नावानं वावरणार्‍या रविजवळ बुर्किनी पासपोर्टही होता. त्याला खात्रीच होती, की त्याला भारतीय पोलीस कधीच पकडू शकणार नाहीत. मात्र सेनेगएलची राजधानी असणार्‍या डकारमधल्या एका न्हाव्याच्या दुकानात त्याला पकडण्यात आलं.

यावरूनच भारतीय पोलिसांची त्याच्यावर किती बारकाईनं पाळत होती हे दिसून येतं. असं म्हटलं जातं की तीन बस भरून पोलिस सेनेगेलहून रवाना झाले होते. चारही बाजूंनी त्याला घेरून अगदी फिल्मी पध्दतीनं त्याला पकडण्यात आलं.

त्याच्या या धरपकड करण्याच्या प्लॅनमधे सर्वात आधी इंग्लंडमधे रहाणार्‍या त्याच्या मुलांची ओळख पटविण्यात आली. यानंतर डकारमध्ये रहाणार्‍या गुजराती लोकांच्या चौकशीतून रविची तिथे असण्याची खबर पक्की झाली.

मुंबई, गुजरात, कर्नाटक हादरविणारा हा डॉन स्वत: मात्र कडक सुरक्षेत रहायचा. त्याच्या आजूबाजूला सतत हत्यारबंद बॉडीगार्ड असत.

तो धमकवण्यात आणि दहशत निर्माण करण्यात तरबेज असला तरीही त्यानं आजवर कोणाचाही जीव घेतलेला नाही. इतर गॅंगस्टर्सनी केलेल्या दहशती कामांवर तो आपला दावा सांगायचा. यानं त्याची दहशत आणखीच फैलावत गेल्याचं म्हटलं जातं.

 

 

ऐंशीच्या दशकात मुंबईतल्या अंधेरीतील एका चहाच्या दुकानात कर्नाटकातला एक मुलगा कामाला लागतो काय, विनोद मटकर, रोहित वर्मासारख्या गॅंगस्टर्सच्या संपर्कात येतो काय आणि स्वत:ची गॅन्ग बनवतो काय. सगळंच एखाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल असं आहे.

याच हिंदी चित्रपटात वर्षानुवर्षं वापरून गुळगुळीत झालेला एक संवादही आहे, ‘कानून के हाथ बहुत लंबे होते है, इनसे बचना नामुमकीन है’…

फिल्मी आयुष्य जगून, फिल्मी लोकांना धमक्या देऊन पैसे कमावणार्‍या रविचा डॉन म्हणून अंतही फिल्मी होत आहे हा योगायोगच म्हणायला हवा.

===

हे ही वाचा – भारतातील काही कुख्यात गुन्हेगार आणि त्यांची भयावह कहाणी… वाचून थरकाप उडेल…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version