थांबा! तुमच्या आहारात प्रोटिन्सचा अतिरेक तर नाही ना? तातडीने विचार करा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखिका : वैद्य तनुजा गोखले, पुणे
===
चक्रावलात ना? आता काय करणार? अजूनही प्रोटिन्सच्या नावाखाली भरपूर कडधान्यं, डाळी, उसळी, त्यांची पिठं, थालिपीठं, प्रोटीन शेक्स नि प्रोटीन बार यांचा भडिमार चालू ठेवणार? कि मैद्याचे प्रमाण वाढवणार?! हो म्हणजे आता मैद्याचे पदार्थ खाताना मनाला टोचणी लागणार नाही ना?!
रोज यांची नवी संशोधने नि नवे नियम..
या समजुतींमुळे सोशल मीडिया अश्या high protein पदार्थांच्या कृती, जाहिरातींनी ओसंडून वाहत असतो.
खरंतर कडधान्ये आयुर्वेदानुसार कुधान्य म्हणजे नियमित खाऊ नयेत अशी आहेत. कडधान्यं पचण्यासाठी पचनशक्ती उत्तम असावी लागते. कडधान्यं कोरडेपणा वाढवणारी, वातूळ, विष्टम्भकर (मलावष्टंभ / दोष शरीरातून सहजगत्या बाहेर न पडू देणारी), पचायला जड नि न पचल्यास अग्निमांद्य व इतर अनेक व्याधी उत्पन्न करणारी असतात असे आमचे ग्रंथ सांगतात.
त्यांचे जडत्व कमी व्हावे म्हणून त्यांची टरफले काढून त्यांच्या डाळी करून खातात, तेव्हा कुठे त्या पचायला जरा बऱ्या होतात म्हणजे कडधान्यांच्या तुलनेत कमी उपद्रवी.
ही कडधान्यं रूक्ष म्हणजे कोरडी व वातूळ असल्याने, व पचायला मदत व्हावी म्हणून त्यांच्यावर स्नेहसंस्कार करणे गरजेचे आहे, पण तेल/तूप/लोणी हे सर्व वजन वाढू नये म्हणून तुम्ही टाळणार असाल ना?
–
हे ही वाचा – व्यायाम आणि डाएटशिवाय तुम्ही प्रदीर्घ निरोगी आयुष्य जगू शकता! कसं? जाणून घ्या…
–
मूग हे एकमेव कडधान्य पथ्यकर आहे पण म्हणून त्याचा अतिरेक नको.
काय पचतंय, झेपतंय ते बघून, नि वैद्यांना प्रकृती दाखवून काय नि कसे खावे / खाऊ नये याचा सल्ला घेऊन प्रोटीन्स, किटो, इ. फॅडं करावीत. (खरं तर करूच नयेत असे मी सुचवेन).
मी शुद्ध आयुर्वेदाची अभ्यासक व चिकित्सक आहे त्यामुळे मी स्वतः कधीही कॅलरी, प्रोटिन्स, कार्ब्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांची माहिती असूनही या भाषेत कधीही रुग्णासल्ला / पदार्थांचे वर्णन करत नाही. कारण तो अशास्त्रीय आहे असं माझं स्पष्ट मत आहे. अनेक वैद्यही या घटकांचा उल्लेख करून बोलतात, लिहितात, पण माझ्यामते ते आयुर्वेदाच्या पैठणीला ठिगळ लावण्याचे प्रकार आहेत. का ते या लेखावरून स्पष्ट होईलच.
माझे आक्षेप असण्याचे मुद्दे खालीलप्रमाणे –
१. Diet / nutritional chart म्हणजे पदार्थानुसार कोणत्या पदार्थांत काय घटक आहेत यांचे नुसते ठोकताळे असतात आणि सब घोडे बारा टक्के असा प्रकार. म्हणजे तांदूळ – अमूक इतके प्रोटीन्स, कॅलरी, इ.
गहू – वरीलप्रमाणे
२. प्रत्यक्षात प्रत्येक धान्य/कडधान्य/फळं/भाज्या/दुग्धजन्य पदार्थ इ. यांच्या अनेक जाती-प्रजाती / प्रकार / स्रोत आहेत. त्यांच्यानुसार या value कमी जास्त व्हायला हव्यात हे साधं logic आहे, तरीही ते तसा उल्लेख करत नाहीत
कारण त्यांचा तेवढ्या प्रकार व संस्कारांचा अभ्यास झालेलाच नाही.
उदा. Fat 1 ग्रॅम असेल तर ऊर्जा मिळेल 9 कॅलरी (किंवा किलोकॅलरी! = होय! दोन्ही एकच म्हणे! इतका अशास्त्रीय मापनप्रकार तरी म्हणे हेच केवळ शास्त्र! नि इतर सगळी … असो.)
– तर कोणतेही वनस्पतिज / प्राणिज स्नेहमाध्यम (म्हणजे fat हो!) तर तेल / तूप / लोणी / बटर इ. तुम्ही वापरलंत तर ते सर्व पदार्थ समान ऊर्जा देतील हे शक्य नाही.
उदा. डालडा पचायला जड, अग्नि मंद करणारा आहे, तर साजूक तूप पचायला सोपे (प्रमाणात खाल्लेत तर हं!), अग्निदीपन करणारे आहे.
३. पुन्हा आपल्या भारतीय पाकशास्त्र व परंपरेनुसार एकाच पदार्थावर अनेक प्रक्रिया करता येतात नि त्यानुसार त्याचे गुणदोष कमी जास्त होतात.
उदा – तांदूळ.. त्याच्या असंख्य प्रजाती आहेत..
अगदी लवकर पिकणाऱ्या नि पचणाऱ्या साठेसाळीपासून ते बासमतीपासून ते आंबेमोहोर-इंद्रायणी इ. (ज्यासाठी जास्त पाणी लागतं, भात चिकट होतो, असा भात प्रमेहींना त्रासदायक असतो.)
– कालसंस्कार म्हणजे तांदूळ जुना झाला की पथ्यकर होतो.
– भर्जनसंस्कार म्हणजे तांदूळ भाजला की हलका होतो.
म्हणूनच साळीच्या लाह्या पथ्यतम आहेत. पण हेच उकडलेल्या भाताचे चूरमुरे पथ्यकर नाहीत हा फरक आहे.
आता सांगा – इथे तुम्ही सर्व जाती-प्रजाती व संस्कार यांना कॅलरी व घटकांचा एकच नियम लावणार का?
या उलट आयुर्वेदानुसार वर्णन केलेले जे गुणदोष आहेत, ते त्या पदार्थाच्या प्रत्येक धान्यात आहेत, त्यांच्या संस्कारानुसार, जातीनुसार बदलतात.
भाजणे, उकडणे इतकेच नव्हे तर नवे जुने, साठवायची पद्धत, कोणत्या भूमीत, हवामानात, ऋतूत उत्पन्न झाले आहे, त्याला खतं / रसायनं वापरली कि नाही? इ. अनेकोनेक घटकांचा व संस्कारांचा विचार त्यानुसार आहारमूल्य ठरवले जायला हवे.
भारतीय आहारशास्त्र हे या सर्व गोष्टींचा विचार करून, प्रयोग करून, वारंवार तपासून त्या त्या ऋतूत नि भौगोलिक परिस्थितीनुसार अभ्यास करून तयार झालेल्या आयुर्वेद शास्त्रावर आधारीत आहे.
४. सर्वात महत्त्वाचा मुद्दा – ज्या शरीरात हे पदार्थ जातील त्या शरीरात त्याचे पचन कसे होईल, त्यातून गुण दोष किती निघतील म्हणजे त्या शरीराला फायदे-तोटे कसे होतील याचा विचार फार महत्त्वाचा आहे.
सरसकट वजन (BMI जो आता कालबाह्य झाला आहे) कृश-स्थूल-मध्यम शरीरयष्टी बघून / कामकरी कि बैठे काम, इ. अपुरे मुद्दे बघून कॅलरी चार्ट design करणे म्हणजे अर्धवट प्रयत्न आहे.
आता राजमा, गहू, मोठा ग्लास भरून लस्सी इ. हे जसा पंजाबी हरियाणवी, हिमाचली माणसाला पचेल तसा तो दक्षिणेकडे राहणाऱ्या माणसाला पचेल का?
बंगालचे उष्ण असे मोहरीचे तेल खोबरेल खाणाऱ्या कोकणात आवडेल नि नियमित झेपेल का?
आयुर्वेदानुसार पचनशक्ती / अग्नि (मंद / तीक्ष्ण / विषम), कोष्ठ (क्रूर / मृदू / मध्यम) आहे का? प्रकृती (वातज, पित्तज, कफज, द्विदोषज, त्रिदोषज), वय, स्त्री /पुरुष, देश (पाणथळ/किनारपट्टीलगत / वाळवंटी रूक्ष / साधारण)
काल / ऋतू, सध्याच्या तब्येतीच्या तक्रारी, आनुवंशिक आजार (जे टाळता येऊही शकतात योग्य काळजी घेतली तर), घरातील खाण्याच्या पद्धती (उदा. सर्व सहा चवींचे / मिठाचे / मसाल्यांचे/ तेलाचे प्रमाण, पदार्थ करायच्या पद्धती, शिळे / बाहेरचे / विकतचे पदार्थ खाण्याच्या सवयी, इ. तसेच खाण्याच्या बारीकसारीक सवयी, व्यवसाय/नोकरीचे स्वरूप जसे की शारीरीक दगदग /जागरण / आगीजवळ / पाण्याजवळ काम, जेवतानाची मनःस्थिती, एरवीचे ताण-तणाव, अपुरी झोप, व्यसनं, जीवनशैली इ. इ.)
या सर्वांचा विचार करून वैद्याने, आहार व विहाराचे (दिनक्रम- ऋतुचर्या) पथ्यापथ्य सांगून ते सुधारणे नि लागेल तेव्हा, तसे अवस्थेनुसार औषध देणे अपेक्षित आहे.
थोडक्यात हे सल्ले केवळ सरसकट तक्ते स्वरूपात न देता, personalized – व्यक्तीसापेक्ष देणे अपेक्षित आहे.
प्रोटीन्स जास्त खाल्ली जावीत म्हणून घरातील सरसकट सर्वांना उदा. सोयाबीन/ मोडवलेली कडधान्ये / पनीर / अंडी / दही / पचायला जड व क्वचित खावीत अशी थालिपीठं, इ. इ. सतत खायला घालणे हेही असेच अशास्त्रीय आहे कारण प्रत्येकाची त्या पदार्थाबद्दलची प्रतिक्रिया वेगवेगळी असू शकतेच / असतेच.
६. हल्ली प्रोटीन सप्लिमेंट्सचे खूळ इतके आहे की त्यासाठी हजारो रुपये मोजून पावडरींचे डबे आणले जातात. त्यात नक्की किती सत्त्व आहे आणि किती fillers/अनावश्यक/त्रासदायक रासायनिक घटक आहेत हे बघाच एकदा.
७. प्रोटीन्सच्या अतिरेकाने वजन वाढणे, कॅन्सरचा धोका, तोंडाला वास येणे, पोट बिघडणे, अपचन, हाडे ठिसूळ होणे, हृदयावर वाईट परिणाम, किडनीवर वाईट परिणाम होतात हे लक्षात असू द्या.
८. आहारात प्रोटिन्सचे प्रमाण किती हवे याचा तक्ता बघाल तर हे इतके धान्य-कडधान्य खाणे शक्य नाही.
उदा. वजनाच्या साधारण ०.८ ते २ पट प्रोटीन्स म्हणजे उदा. वय ५० वर्षे असेल तर किमान ४५ ग्रॅम प्रोटीन्स मिळविण्यासाठी २०० ते ४०० ग्राम कडधान्य रोज खाल्ली गेली पाहिजेत पण तेवढे कोणीच खाऊ शकत नाही म्हणून मागल्या दाराने विकतच्या नि महागड्या पावडरींचा शिरकाव..
त्यातून नक्की तेवढेच प्रोटीन मिळते का नि शरीरात शोषले जाते का काही दुष्परिणाम न करता हा संशोधनाचा विषय आहे.
–
हे ही वाचा – दिवसांत दोन वेळा, ५५ मिनिटांत पाहिजे ते खा, “दीक्षित-डाएट” बद्दल आयुर्वेद काय म्हणतं?
बरं, वय वाढेल तसे त्या प्रमाणात प्रोटीन्स जास्त घ्यावे असे ते म्हणतात. का?
– प्रत्यक्षात तर वय वाढेल तसे विशेषतः पन्नाशीनंतर शरीरात रुक्षता वाढते, केस – त्वचा कोरडे पडतात, डाळी-कडधान्य पोटाला त्रास देतात, गॅसेस होतात, सांधेदुखी होते इ. तक्रारी वाढतात म्हणजे वयानुसार प्रोटीन्स जास्त खाण्याचा सल्ला नक्कीच धोकादायक आहे.
९. आपण पदार्थ खातो ते उदा. पोळी, भात, इ. त्यातून निव्वळ प्रोटीन्स वेगळे काढतो, कार्ब्स वेगळे काढतो, इतर vitamins minerals वेगवेगळे करून खातो का हो? कि तो पदार्थ एकसंध खातो?
प्रत्येकाचे शरीर तो पूर्ण पदार्थ पचवायचा प्रयत्न करते, मग त्यातून नेमके तेवढेच प्रोटिन्स इ. घटक प्रत्येक माणसाला तेवढ्याच प्रमाणात मिळतील का?
प्रत्येकाची पचनशक्ती वेगवेगळी असते तर प्रत्येकाला मिळणारे प्रमाण, गुण दोष हेही व्यक्तीगणिक बदलणार ना?
आता हे उदाहरण लक्षात घ्या म्हणजे आणखी स्पष्ट होईल.
दोन वाहनांमध्ये इंधन, वेग, tyre मधील pressure, रस्ता, वातावरण, चालवणाऱ्याचे वजन, इ. सर्व variables constant ठेवले तरी दोन गाड्यांचे किमी/लिटर average हे एकसारखेच असेल असे नाही.
– मग शरीर ही तर इंजिनापेक्षा जटिल – complex जडणघडण व प्रक्रिया असणारा जिवंत विचार आहे.
तिथे सब घोडे बारा टक्के तत्त्व कसे लावता येईल?
खुलासा- ही माझ्या व्यवसायाची जाहिरात नाही, पण मी स्वतः असे सर्व जाणून घेऊन, परीक्षण करून मगच सर्व चांगले वाईट काय हे त्यामागचे शास्त्र समजावून देऊन मग गरज असल्यास औषध हे सूत्र अवलंबते. माझे रुग्ण त्यांच्या पिढ्यानपिढ्या सुदृढ राहाव्यात, औषधांवर कमीत कमी अवलंबून असावे असे मला वाटते नि तसे दिसतेही.
तर तात्पर्य काय?
– अति तेथे (आयुष्याची) माती
– नुसत्या आकडेवारीवर लक्ष देऊन फसू नका – त्यातील गमक – सार जाणून घ्या.
तसेही statistics नुसार कोणतेही निष्कर्ष हे अगदी चूकपासून अगदी बरोबरपर्यंत फिरवता येऊ शकतात आणि अन्नधान्य उत्पादक कंपन्या, औषधी कंपन्या हे सर्रास करतात हे लक्षात असू द्या.
या आहारशास्त्रांचे नियम / निर्देशही बदलत असतात – उदा. कोलेस्टेरॉल, खोबरेल तेल, रिफाईंड तेल, सफरचंद, ओट्स, कॉर्नफ्लेक्स, चिया नि अनेक यांव नि त्यांव पदार्थांचे बदलते निकष व सल्ले.. आज चांगलं म्हणतील तर उद्या ते बाद करतील.
यानुसार वरच्या link मधली बातमीही उद्या खोटी ठरू शकते पण आयुर्वेदानुसार सर्व नियम हे कालानुरूप सत्यच ठरले आहेत.
अगदी रामायण-महाभारत काळीही आयुर्वेद होताच, आजही आहे नि उद्याही राहील कारण पदार्थ बदलले, जीवनशैली बदलली तरी तत्त्व शाश्वत आहेत जे आजही ग्रंथांत सांगितल्याप्रमाणे काम करताना दिसतात.पण म्हणजे ग्रंथात दिलेलं असलं की वैद्य फक्त तेवढ्यावरच सल्ले देतात का? तर नाही.
या तत्त्वांचे सध्याच्या बदलत्या परिस्थितीत application कसे करावे? ज्याचे फायदा मिळतील पण तोटे कमी होतील याचा पूर्ण विचार वैद्याने करायचा असतो.
उदा. गायीचे दूध, साजूक तूपच घ्यावे हे बरोबर पण सध्या मिळणारे जर्सी गायी(?! जर्सी हा प्राणी गाय नाहीच पण त्यावर सविस्तर लिहिता येईल) तर जर्सीचे दूध-तूप हे ग्रंथात दिलेल्या गुणधर्मानुसार काम करत नाहीत त्यामुळे हे लक्षात घेऊन त्यानुसार पदार्थाचे प्रमाण, किती घ्यावे की टाळावे, संस्कार काय करावेत इ. वैद्यच सांगू शकतो.
मूळ विषयातील कडधान्य हे केवळ एक उदाहरण आहे. आरोग्यासाठी इतर अनेक पदार्थ विशिष्ट पदार्थ जाहिरात पाहून किंवा gym चा सल्लागार, सोशल मीडियावरील लेख, पाककृती इ. इ. वाचून नियमित खायचे असतील तर त्या आधी आयुर्वेद तज्ञ / वैद्यांच्या सल्ल्यानुसार ‘तुम्हाला’ चालू शकतील असे पदार्थ, प्रमाण, संस्कार इ. जाणून घेऊन मग सेवन करा न कि इतके ग्रॅम प्रोटीन्ससाठी इतके धान्य इ. इ.
म्हणूनच आपल्या आयुर्वेद तज्ञांचा सल्ला घ्या नि पाळा, बस इतकंच..
===
हे ही वाचा – नकोश्या कडवट डाएटपेक्षा हे पदार्थ म्हणजे वाढलेलं वजन आणि चरबी कमी करण्याचा पौष्टिक मार्ग!!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.