Site icon InMarathi

प्रचंड गरिबीशी झगडून अनाथांचा मसीहा बनलेल्या बॉलिवूडच्या ‘बिंदास भिडू’चा प्रवास!

jacky shroff featured inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण हिंदी सिनेमात नेहमीच एक स्टोरी आवडीनं पहात आलो आहोत. गरिबाघरचा कष्टाळू मुलगा, त्याला कोणी मसिहा भेटतो आणि त्याचं आयुष्यच पालटून जातं. त्याच्या कष्टांचं चीज होतं आणि तो त्याच्यासारख्या इतरांचा मसिहा होतो.

ही हिरोगिरीची गोष्ट ऐंशीच्या दशकातला एका तरूणासाठी वास्तव बनली. या तरूणाचं नाव आहे, जॅकी श्रॉफ.

 

 

चाळीतल्या एका खोलीत आपल्या कुटुंबासोबत रहाणार्‍या जॅकीच्या कुटुंबासाठी आर्थिक चणचण नेहमीचीच! खरं तर दहा बाय दहाच्या खोलीत रहाणारा हा मुलगा कधीकाळी बॉलिवुडचा सुपरस्टार बनेल असं कोणी सांगितलं असतं तर विश्र्वासही बसणं कठीण होतं.

पण जॅकीचं नशिब त्याला या शो बिझनेसमधे घेऊन आलं आणि नुसतंच घेऊन आलं नाही, तर त्यानं आपली स्वतंत्र ओळख बनवली. ही झाली सुपरस्टार जॅकीची गोष्ट.

मात्र, त्याला मसिहा म्हणूनही ओळखलं जातं. याचं कारण गरीब-गरजूंना मदत करण्यात तो कधीही मागे नसतो.

पैशांच्या अभावापायी त्याला अकरावीनंतर शिक्षण सोडावं लागलं. घरी बसूनही चालणार नव्हतं. त्यानं अक्षरश: पडेल ते काम केलं. हॉटेमधे शेफ पासून जे काम मिळेल ते तो करत राहिला.

त्यानं फ्लाइट अटेंडंट म्हणून नोकरी मिळवण्याचे प्रयत्न केले मात्र शैक्षणिक गुणवत्तेमुळे त्याला ही नोकरी मिळाली नाही. पुरेसं शिक्षण नसल्यानं त्याला व्हाईट कॉलर जॉब मिळणं मुश्किल होतं.

===

हे ही वाचा कारकुनी कामासाठी आपला जन्म झाला नसल्याची ‘त्यांना’ जाणीव झाली आणि…

===

ज्या कामात पैसे मिळत असतील असं कोणतंही काम करायला तो कायम तयार असायचा. त्याला बॉलिवुडमधे आणलं अभिनेता देव आनंद यांनी. देव आनंद यांना जॅकी कसा भेटला याचा किस्साही फिल्मी आहे.

 

 

एकदा देव आनंद साहेब गाडीतून कुठे तरी चालले होते. खिडकीतून बाहेर त्यांना दिसलं की मळक्या शर्ट आणि फाटक्या जीन्समधला एक तरूण रस्त्यावर चारमिनार सिगरेट विकत होता.

त्याच्या डोळ्यातली चमक देवसाहेबांनी हेरली. योगायोग असा की ते आपल्या ऑफिसमध्ये पोहोचले आणि त्यांना हाच तरूण तिथेही दिसला. त्या दिवसांमध्ये देव आनंद त्यांच्या नव्या सिनेमाची जुळवा जुळव करत होते.

त्यांनी या मुलाला या सिनेमासाठी कास्ट केलं. हा सिनेमा कधी आला आणी कधी गेला कळलंच नाही. या सिनेमाचं नाव होतं, स्वामी दादा. या दरम्यान जॅकी आता मॉडेलिंगची कामंही करू लागला होता.

इकडे इंडस्ट्रीतले शोमॅन सुभाष घई त्यांच्या नव्या सिनेमाची तयारी करत होते. चित्रपटाचं नाव होतं, संगीत. संजय दत्तला घेऊन हा सिनेमा बनवला जाणार होता मात्र याच दरम्यान संजय दत्त ड्रग्जच्या केसमध्ये अडकला होता आणि त्याचं स्वत:चं भविष्यच दोलायमान असल्यानं चित्रपटही संकटात आला.

घईंची दुसरी निवड होती दक्षिणेतला स्टार कमल हसन. कमलनं यापूर्वी ‘एक दुजे के लिए’ हा हिट सिनेमा दिला होता मात्र तारखांचे घोळ आणि इतर अडचणींमुळे हा प्रोजेक्टही रखडला.

अखेरीस त्यांनी या सिनेमाचा नाद सोडून नव्या सिनेमाची तयारी सुरू केली. या सिनेमाचं नाव होतं, हिरो. यातल्या नायकासाठी त्यांना एकदम रफटफ नायक हवा होता.

 

 

जॅकीला त्यांनी बरेचदा बघितलं होतं. दाढीचे खुंट वाढलेला, अतरंगी कपडे घातलेला हा मुलगा आपला नायक बनू शकेल असं वाटल्यानं त्यांनी त्याला ऑडिशनला बोलवलं. ऑडिशनला मात्र तो एकदम गुळगुळीत दाढी करून, एकदम सभ्य कपड्यात पोहोचला.

घईंनी त्याला सगळ्यात आधी दाढी वाढवायला सांगितली आणि त्याच्या अभिनयावर काम करायला सुरवात केली. केवळ लूक पुरेसे नव्हते, त्यासाठी अभिनयही असायला हवा होता.

मात्र जॅकीवर देव आनंद यांचा इतका प्रभाव होता की अभिनयातही तो दिसू लागला. शेवटी घईंनी त्याला सांगितलं की तुला कॉपीच करायची तर शत्रुघ्न सिन्हा यांची कर कारण त्यांचा नायक शत्रुघ्न यांच्यासारखा बोलणारा, वागणारा आहे.

शत्रुसाहेबांना सेटवर आमंत्रित करून जॅकीचे धडे सुरू झाले. हळूहळू जॅकिला स्वत:चा सूर सापडत गेला. अखेर जॅकिचा पहिला सुपर हिट सिनेमा हिरो प्रदर्शित झाला आणि त्यानंतर पुढच्या दोन वर्षांत जॅकी १७ सिनेमांत काम करत होता.

अशा रीतीने रस्त्यावर सिगरेट विकणारा तरूण ते बॉलिवुडचा स्टार असा प्रवास या मुलानं पूर्ण केला.

 

 

इतकं झाल्यावर एखाद्याच्या डोक्यात हवा जाणं सहाजिक आहे. मात्र जॅकी याला अपवाद ठरला. तो पैसा आणि प्रसिध्दी मिळवूनही जमिनीवरच राहिला. इतकंच नाही , तर त्यानं वेळोवेळी त्याच्यासारख्याच परिस्थितीनं गांजलेल्यांना सढळ हातानं मदतही केली.

हिरो सिनेमात जी राजदूत वापरली होती ती जॅकीची फेवरेट बनली होती. त्याकाळात जरा यश मिळालं की ॲक्टर्स लगेचच कारमधून फिरायला लागत. जॅकी मात्र सगळ्या मुंबईत राजदूतवरुन बिनधास्त फिरत असे. यामुळे त्याची हिरोगिरी न करणारा आपल्यातला एक मुलगा अशी एक खास इमेजही बनली.

मुळात बाहेर त्याची जी क्रेझ होती ती त्याला माहितच नव्हती. त्याला फक्त हे माहित होतं की सिनेमा सुपरहिट आहे. मात्र हे नेमकं काय असतं यांची त्याला जाणीव होती.

 

 

एकदा एका शूटिंगसाठी तो बेंगलोरला गेला होता. तो ज्या हॉटेलमधे उतरला होता त्या हॉटेलमध्ये बच्चन कुटुंबही उतरलं होतं, ज्यांनी अख्खा मजला घेतला होता.

जॅकिची मनापासून इच्छा होती की बच्चनला एकदा भेटायचं. आणि अशातच एक दिवस श्वेता आणि अभिषेक हातात वही पेन घेऊन जॅकीची ऑटोग्राफ मागायला आले. त्या दिवशी त्याला कळलं की त्याला खरोखरच स्टारडम लाभलं आहे.

===

हे ही वाचाअनाथ मुलगा ते लोकप्रिय नट, प्रत्येकाने प्रेरणा घ्यावी असा अर्शद वारसी चा प्रवास! वाचा.

===

जॅकीच्या हळवेपणाचा आणखीन एक दाखला म्हणजे त्याच्या आईवर त्याचं असलेलं प्रेम. जेंव्हा जॅकी ग्लॅमर अनुभवत होता, मोठमोठ्या आलीशान घरात रहात होता तेंव्हा तो त्याच्या आईपासून तुटत चालला होता याची त्याला प्रकर्षाने जाणीव झाली जेंव्हा त्याची आई त्याला कायमची सोडून गेली.

मोठ्या घरात दुसऱ्या खोलीत आई झोपली असल्याने त्याला त्याच्या आईच्या जाण्याची बातमी उशिरा समजली, हेच जर तो त्याच्या चाळीच्या खोलीत रहात असता तर त्याला त्याच्या आईसाठी काहीतरी धावपळ करता आली असती.

 

 

फ्लॅट सिस्टिममुळे माझी आई सोडून गेल्याचं उशिरा कळलं हे जॅकी ने एका मुलाखतीत सांगितलं आहे!

अक्षरश: खोर्‍यानं पैसा ओढू लागलेल्या जॅकीचे पाय कायम जमिनीवर राहिले आणि याचा पुरावा म्हणजे, मुंबईतल्या नानावटी हॉस्पिटलमध्ये त्यानं एक खातं चालू ठेवलं आहे. गरिब आणि गरजूंना इथे त्याच्या खर्चातून मोफ़त उपचार मिळतो.

आजही शंभरहून अधिक कुटुंबांना त्याच्याकडून आर्थिक मदत जाते. जॅकीचा आणखिन एक भन्नाट किस्सा सांगितला जातो.

 

 

पाली हिल ते वाळकेश्र्वर या परिसरातील सर्व भिकार्‍यांकडे आणि रस्त्यावरच्या भटक्या मुलांकडे त्याचा मोबाईल नंबर आहे. लोकांना जेव्हा कधी कसलीही मदत लागते तेव्हा ते बिनधास्त त्यांच्या जग्गू दादाला फोन करतात.

===

हे ही वाचा – “तुला इंजिनिअरिंग पास होऊ देणार नाही” : तापसी पन्नूची कारकीर्द अगदीच रंगीबेरंगी आहे!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version