आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
===
“इस मोड से जाते है, कुछ सुस्त कदम रस्ते, कुछ तेज कदम राहें” गुलजार साहेबांच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्यामुळे आणि अशा कित्येक वेगवेगळ्या गीतकारांमुळे आपली फिल्म इंडस्ट्री ही इतर फिल्म इंडस्ट्रीपेक्षा वेगळी ठरते
आपल्या इंडस्ट्रीमध्ये गाणी म्हणजे सिनेमाचा श्वास. गाण्याशिवाय भारतीय फिल्म्स अपूर्ण आहेत. आता नवनवीन प्रयोग होत आहेत म्हणा. पण एखाद्या भारतीय सिनेमात गाणं नाही असे सिनेमे अगदी हाताच्या बोटावर मोजता यावेत इतकेच.
आणि याच गाण्याच्या परंपरेचं पाश्चात्य देशातल्या लोकांना भारी कौतुक. गुलजार साहेबांनी लिहिलेल्या “छैयां छैयां” या गाण्याने तर खुद्द शकिराला सुद्धा एकेकाळी थीरकायला भाग पाडलं होतं.
सध्याच्या काळात स्वानंद किरकिरे, पीयूष मिश्रा, इरशाद कामिल असे कित्येक नवीन गीतकार आणि त्यांची गाणी प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.
पण याच इंडस्ट्री मध्ये अशीही काही गाणी होऊन गेली जी गाणी ऐकल्यावर एकतर त्याचे विचित्र अर्थ काढले गेले आणि त्यातल्या काही शब्दांमुळे वाद निर्माण होऊन ते शब्द त्या गाण्यातून काढून टाकावे लागले.
–
हे ही वाचा – पडद्यावर अतिशय सुंदर दिसणारी ही सर्व गाणी एका वेगळ्याच तारेवरच्या कसरतीची उदाहरणं आहेत
–
लेखक, कवी ही मस्तमौला माणसं असतात. लिहिताना नकळत त्यांच्या हातून सुद्धा चुका होतात पण ही गाणी वादाच्या भोवऱ्यात अडकण्याच कारण म्हणजे त्यातले शब्द.
प्रेक्षक इतक्या बारीकसारीक गोष्टी लक्षात ठेवतात ते तुम्हाला या गाण्यामुळे निर्माण झालेल्या वादंगावरुन समजेल! चला तर बघूयात ती नेमकी कोणती गाणी आहेत जी केवळ काही शब्दांमुळे बदलायला लागली!
१) बेयॉन्से शरमा जायेगी (खाली पिली) –
सुशांत सिंग प्रकरण गाजत असतानासुद्धा स्टारकिड्सचा ऑनलाइन रिलीज झालेला हा सिनेमा. या सिनेमात इशान खट्टर आणि अनन्या पांडे हे मुख्य भूमिकेत होते.
या गाण्यात अमेरिकन पॉपस्टार बेयॉन्सेचा उल्लेख असल्याने आणि तिच्या नावाचे कॉपीराईट असल्याने या सिनेमाच्या निर्मात्यांना कायदेशी कारवाईला सामोरे जावे लागले होते.
त्याबरोबरच या गाण्यातले शब्द रंगभेदाला प्रोत्साहन देत आहेत असंही सोशल मीडियावर बोललं जात होतं. सिनेमा तर सपशेल आपटलाच पण नंतर या गाण्याचे शब्द बदलून “दुनिया शरमा जायेगी” असं करण्यात आलं!
२) सेक्सी सेक्सी सेक्सी (खुद्दार) –
९० च्या दशकात गोविंदा आणि त्याच्या गाण्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली होती. शिवाय त्याचं नाच हे आणखीन विशेष, गोविंदाच्या देखील बऱ्याच गाण्यांमध्ये खटकतील असे शब्द असायचे पण त्याच्या एका गाण्यामुळे बराच वाद निर्माण झाला!
१९९४ साली आलेल्या खुद्दार या सिनेमाच्या गाण्याचे शब्द होते “सेक्सी सेक्सी सेक्सी”. पण त्या काळात एका गाण्यात हा शब्द असणं हेदेखील खूप बोल्ड मानलं जायचं. शिवाय या गाण्यात करिश्मा कपूरचा सेक्सी अंदाज सुद्धा नव्हता.
त्यामुळे बऱ्याच विरोधानंतर या गाण्याचे शब्द “बेबी बेबी बेबी” असे करण्यात आले!
३) अच्छे दीन कब आयेंगे (फन्ने खां) –
अनिल कपूर, राजमकुमार राव आणि ऐश्वर्या राय अशा तिघांच्या या सिनेमात भारतीय जनता पक्षाच्या एका टॅगलाइनचा वापर केला गेला. “अच्छे दिन आयेंगे” म्हणतच पंतप्रधान मोदींनी त्याच्या कॅम्पेनला सुरुवात केली होती.
आणि नेमकी हीच गोष्ट पक्षातल्या नेत्यांना खटकली आणि बऱ्याच विरोधानंतर गाण्यातल्या शब्दात बदल करण्यात आले ते म्हणजे “अच्छे दिन अब आये रे!”
४) आय वॉन्ट फक्त तू (जोकर) –
अक्षय कुमारच्या या सुपरफ्लॉप चित्रपटाचं गाणंसुद्धा वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या जोकर या सिनेमातलं एक आयटम सॉन्ग बरंच चर्चेत आलं ते केवळ त्यातल्या एका शब्दामुळे.
“आय वॉन्ट फक्त तू” या गाण्यातला फक्त हा शब्द वेगळ्या अर्थाने लोकांना ऐकू येऊ लागला आणि गाण्याच्या ओघात तो शब्द खूप प्रक्षोभकसुद्धा वाटत होता!
मूळ मराठी शब्द असला तरी त्याचं साधर्म्य एका आपत्तीजनक इंग्रजी शब्दाशी असल्याने सिनेमाच्या मेकर्सना तो शब्द काढून त्या ऐवजी “आय वॉन्ट जस्ट यू” असं टाकायला लागलं. चित्रांगदा सिंग हिच्यावर हे आयटम सॉन्ग चित्रित झालं होतं!
५) आजा नचले (आजा नचले) –
२००७ सालच्या “आजा नचले” हा सिनेमा म्हणजे धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा कमबॅक सिनेमा होता. याकडून लोकांना बऱ्याच अपेक्षा होत्या, पण सिनेमा ठीकठाकच निघाला पण बऱ्याच वर्षांनी माधुरीला मोठ्या पडद्यावर पाहून तेंव्हाची लोकं खुळावली होती!
याच सिनेमाच्या टायटल सॉन्ग मधल्या एका शब्दामुळे वाद निर्माण झाला होता.
–
हे ही वाचा – हॉलिवूडने आपल्या हिंदी चित्रपटांमधील महत्वाचा भाग त्यांच्या चित्रपटांत कसा वापरून घेतलाय पहा!
–
यातल्या एका कडव्यात “मोहल्ले में कैसी मारामार है, बोले मोची भी खूदको सुनार रे” हे शब्द होते त्यातल्या मोची या शब्दामुळे जातीयवादाचा भडका उडाला आणि दलित नेत्यांनी या शब्दाला विरोध दर्शवला.
नंतर त्या ऐवजी “मेरे दर पर दिवानों की बहार है” हे शब्द त्या गाण्यात बसवले गेले आणि ते गाणं आजही हिट लिस्ट मध्ये आहे!
६) राधा (स्टुडंट ऑफ द इयर) –
करण जोहरच्या वास्तवाशी दूरदूर पर्यंत संबंध नसलेल्या बिग बजेट कमर्शियल स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलंच झोडपलं. पण या सिनेमाने वरुण, आलीया आणि सिद्धार्थ हे ३ कलाकार सिने इंडस्ट्रीमध्ये आले.
यातल्याच ‘राधा’ या गाण्यात “सेक्सी राधा” हे शब्द बऱ्याच लोकांना खटकले त्यामुळे कित्येकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या.
हा सगळा विरोध पाहता मेकर्सनी “सेक्सी राधा” ऐवजी “देसी राधा” केलं आणि गाणं सुपरहीट झालं!
या बरोबरच कमीने सिनेमातल्या एका गाण्यात एका समुदायाचा उल्लेख आल्याने तो शब्द त्या गाण्यातून काढून टाकला गेला. शिवाय गुलजार यांच्याच “छैयां छैयां” गाण्यातल्या “पाव के नीचे जन्नत होगी” या शब्दांवरून सुद्धा खूप वादंग उठला.
पण ही गाणी आजही लोकं आवडीने ऐकतात, आजही ही गाणी तितकीच लोकप्रिय आहेत. तुमच्या लक्षात नसेल तर तुम्ही स्वतःच एकदा ही गाणी पुन्हा जरूर ऐकून बघा!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.