Site icon InMarathi

“उद्धव ठाकरे म्हणजे सतत संपर्क क्षेत्राबाहेरील मुख्यमंत्री…!”

siddharth shirole inmarathi

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

महाराष्ट्रात सध्या तीन पक्षांचे सरकार आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. मात्र, मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्ष प्रशासकीय कामकाजाचा तसेच अन्य कोणताही अनुभव नसल्याचा सातत्याने आरोप होतो.

त्यामुळे ते ‘मातोश्री’ बाहेर येत नसल्याचे म्हणत विरोधीपक्ष वारंवार टीका करतात.

 

 

याच पार्श्वभूमीवर माजी खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजिव आणि पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे विद्यमान तरुण आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी ट्विटर थ्रेडद्वारे मुख्यमंत्र्यांवर टीका करत महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री निष्क्रिय असून अशा मु्ख्यमंत्र्यामुळे पुण्याची चिंता असल्याचे म्हटले आहे.

 

 

नेहमीच सोशल मिडियावर सक्रिय असलेले सिद्धार्थ शिरोळे यांनी नुकतेच तब्बल २४ ट्विटसचे एक ट्विटर थ्रेड लिहिले आहे.

त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘‘जनमताचा पाठिंबा नसताना कुटील कारस्थानांमधून स्थापन झालेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सरकारचे नेतृत्त्व उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले. आमदार कोणत्याही पक्षाचा असो, मुख्यमंत्री म्हणजे एक आधार असल्याची भावना असायला हवी. पण इथे नेमके तेच होत नाही.

कोणत्याही आमदाराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आधार वाटतच नाही. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे हे मुख्यमंत्री स्वत:च्याच कोषात आहेत. त्यांच्यापर्यंत पोचणे आणि त्यांच्याशी संपर्क साधणे ही केवळ सर्वसामान्य जनताच नव्हे, आम्हा आमदारांसाठीही अत्यंत अवघड आणि दुर्मीळ गोष्ट आहे.’’

 

 

मुख्यमंत्र्यांसोबतच त्यांचे कार्यालयही प्रतिसाद देत नसल्याची तक्रार शिरोळे यांनी ट्विटरद्वारे केली आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘‘जसे मुख्यमंत्री, तसेच त्यांचे कार्यालय! मुख्यमंत्री कार्यालयाशी कोणत्याही कारणासाठी संपर्क साधला, तरीही अत्यंत धीमा आणि सुस्त प्रतिसाद मिळतो.’’

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी ठाकरे यांची तुलना करताना शिरोळे यांनी लिहिले आहे की,

‘‘उद्धव यांना कितीही आवडत नसले, तरीही देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील मुख्यमंत्री कार्यालयाच्या कारभाराशी तुलना होणारच. कारण २०२० मधल्या वेगाशी जुळवून घेणारे देवेंद्र फडणवीसजी कोणत्याही कामासाठी सर्वांसाठी उपलब्ध असायचे आणि एसएमएसद्वारे (SMS) प्रतिसादही द्यायचे. येथे उद्धव ठाकरे यांना तेही जमत नाही.

माझ्या मते, महाराष्ट्राच्या इतिहासातील ‘सतत संपर्क क्षेत्राच्या बाहेर’ असलेले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केला जाईल.’’

 

कचरा, वाहतूक, रस्ते यासह अन्य काही पुण्यातील प्रमुख समस्या आहेत. पुण्याचे आमदार म्हणून शिरोळे यांनी अनेकदा मुख्यमंत्र्यांना पुण्यातील समस्यांबद्दल लिहिल्याचे म्हटले आहे.

त्यांनी लिहिले आहे की, ‘‘पुण्यातील आमदार म्हणून शहराच्या समस्यांना वाचा फोडणे आणि योग्य त्या ठिकाणी दाद मागणे, हे माझे कामच आहे. पण आजवर मुख्यमंत्री यांनी माझ्या एकाही पत्राला किमान उत्तर देण्याचे सौजन्यही दाखविलेले नाही.

हे दुर्लक्ष आमदाराकडे नाही, पुणे शहराकडेच केले जात आहे. महाराष्ट्रात मुंबईखालोखाल पुणे हे सर्वार्थाने महत्त्वाचे शहर आहे. पुण्याचा विकास आणि त्याच्या अर्थकारणाचे पडसाद राज्यात आणि देशातही उमटतात, पण याची जाणीवही मुख्यमंत्र्यांना नाही, हे दुर्दैव आहे.’’

 

कोरोनाबाबत लिहिताना शिरोळे यांनी ठाकरेंवर प्रखर टीका केली आहे. ‘‘जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. सर्व शास्त्रज्ञ लस शोधण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत. आपल्या पुण्यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटमध्येही संशोधन सुरू आहे.

पण मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांनी त्याची किती दखल घेतली? किती वेळा ‘सीरम’ला भेट दिली किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली?’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याचा संदर्भ देत शिरोळे म्हणतात, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे येऊन पाहणी करून जातात, पण मुख्य्यमंत्र्यांना तेही जमत नाही. पुण्यासारख्या जागतिक महत्वाच्या शहराला गेल्या वर्षभरात ठाकरे यांनी किती वेळा भेट दिली असेल? फक्त एकदा! हे त्यांचे ‘व्हिजन’ आणि ही त्यांची ‘महाराष्ट्रा’साठीची विकासनीती!’’

महाराष्ट्राचे विद्यमान सरकार विविध विकास प्रकल्पांच्या स्थगितीची झपाटा लावल्याचे म्हणत शिरोळे यांनी लिहिले आहे की, ‘‘पुण्यातील एकाही विकासकामासाठी लोकप्रतिनिधींसोबत ठाकरे यांनी एकही बैठक घेतलेली नाही.

पुरंदरच्या विमानतळाचे काम गेल्या सरकारने वेगाने पुढे नेले होते. तसेच येथील विविध विकासकामांनाही वेग आला होता. वाढत्या शहराच्या गरजा लक्षात घेता फडणवीस सरकारने अनेक प्रकल्प सुरू केले होते.

 

 

पण या सरकारने फक्त स्थगितीचा झपाटा लावला आहे. हायपर-लूपसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर संपूर्ण जगाची नजर आहे. आपल्याकडे पुणे-मुंबई हा मार्ग त्यासाठी निवडण्यात आला होता, पण येथेही ठाकरे सरकारने माघारच घेतली. कारण एकच – दूरदृष्टीच नाही.’’

राज्यातील सरकारचे हे धोरण असेच सुरु राहिले तर पुढे भयानक परिणाम भोगावे लागू शकतात, अशी चिंता शिरोळे यांनी व्यक्त केली आहे. ‘‘सरकारचा प्रमुखच निष्क्रिय असेल, तर संपूर्ण प्रशासनच काम करेनासे होते. उद्धव ठाकरे यांची प्रशासनावर अजिबात पकड नाही, याची असंख्य उदाहरणे गेल्या वर्षभरात आपण पाहिली आहेत.

याचे गांभीर्य कदाचित आता त्यांना कळणार नाही. अजून काही महिने, वर्षे हे सरकार टिकले, तर पुणे शहराला त्याचे परिणाम पुढची किमान १० वर्षे भोगावे लागतील. विकासाची मुळातच काही कल्पना आणि दृष्टी नसली, की ‘आला दिवस ढकला’ यापलीकडे काहीही होऊ शकत नाही.’’, अशा शब्दांत शिरोळे यांनी चिंता व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांचे कार्यक्षेत्र मुंबईपुरतेच मर्यादित असल्याचे लिहून शिरोळे पुढे म्हणतात, ‘‘ठाकरे सरकार संपूर्णत: प्रतिक्रियात्मक आहे. स्वत:हून निर्णय घेण्याची धडाडी आणि इच्छा गेल्या वर्षभरात अजिबात दिसली नाही. उद्धव ठाकरे बहुदा अनेकदा विसरतात, की ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत.

त्यांचे कार्यक्षेत्र मुंबईपुरते मर्यादित असल्याचेच त्यांच्या वर्तणुकीतून दिसून येते. उद्धव ठाकरे गेल्या वर्षभरात मुंबईच्या बाहेर, किंबहुना ‘मातोश्री’च्या बाहेर किती वेळा पडले,’ या प्रश्नाचं उत्तर माहितीच्या अधिकाराखाली मागविले, तर खरंच आश्चर्याचा धक्का बसेल.’’

 

 

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात वैद्यकीय सुविधा पुरविण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप शिरोळे यांनी केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘‘भारतामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळला. त्यानंतरच्या तीन-चार महिन्यांत शहराची आणि राज्याची परिस्थिती काय होती, हे सर्वांनाच ठाऊक आहे.

एक वेळ तर अशी होती, की पुण्यामध्ये सर्वांत जास्त रुग्ण आढळत होते. तरीही ठाकरे सरकारचे प्राधान्य मुंबईच होते. मुंबईच्या बाबतीत त्यांनी जी काही धोरणे आखली, ती धोरणे पुण्यात आणण्यासाठी त्यांना दोन-तीन महिने लागत होते.

कोविड सेंटरपासून वैद्यकीय सुविधांपर्यंत सर्वच आघाड्यांवर या सरकारचा सपशेल पराभव झाला आहे आणि दुर्दैव म्हणजे, सरकारला हे अजूनही कळत नाही.’’

कोरोनाबाबत त्यांनी पुढे लिहिले आहे की, ‘‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वांचेच दैनंदिन जीवन विस्कळीत झाले होते. आता परिस्थिती सुधारण्यासाठी ठाकरे सरकारने काहीही पावले उचललेली नाहीत. पुण्यातील व्यावसायिकांना पुन्हा पायांवर उभे राहण्यासाठी या सरकारने किती पॅकेज दिले? शून्य! इथून पुढच्या काळात आर्थिक पुनर्उभारणी सर्वाधिक महत्त्वाची असणार आहे. पण अर्थव्यवस्था, आर्थिक चक्र, विकास या सगळ्यांशी ठाकरे सरकारचा दूरूनही संबंध दिसत नाही.’’

 

 

पुण्यातील स्थानिक प्रश्नांबाबत लिहिताना शिरोळे यांनी पुरंदरच्या विमानतळ विषयावरही भाष्य केले आहे. तसेच पुणे संपूर्ण देशाशी कनेक्ट असल्याचेही त्यांनी लिहिले आहे.

‘‘पुरंदरचा विमानतळ असो वा ‘पीएमआरडीए’चे डेव्हलपमेंट प्लॅन आणि मेट्रोचा प्रकल्प असो, असे प्रकल्प रखडल्यामुळे विकासाची गती खुंटते, हे तर सत्य आहेच; शिवाय वाढलेल्या खर्चाचा भुर्दंडही आपल्याच माथी पडतो. पण रखडलेल्या प्रकल्पांमुळे वाढणाऱ्या खर्चाची काहीही चिंता ठाकरे सरकारला नाही.

ही पुनर्उभारणी का महत्त्वाची आहे, याचेही भान सरकारला नाही. पुणे आर्थिकदृष्ट्या प्रगत शहर आहे. येथे फक्त पुणेकरच अवलंबून आहेत, असं नाही. राज्यभरातून, देशभरातून अनेक व्यवसाय, व्यावसायिक आणि कुटुंबे पुण्याशी जोडली गेली आहेत.’’, अशा शब्दांत त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केले आहे.

वाढीव वीजबिलांच्या विषयाला स्पर्श करताना शिरोळे यांनी लिहिले आहे की, ‘‘पुणे शहराच्या प्रगतीवर परिणाम म्हणजे अप्रत्यक्षरीत्या राज्यावर आणि देशावर होणार आहे, याची जाणीव सरकारला आहे का? असेल, तर तशी पावले का उचलली गेली नाहीत आणि याची उत्तरे देणार कोण?

कोरोनामुळे पोळलेल्या नागरिकांना दिलासा देणे, ही सरकारची जबाबदारी आहे. पण ठाकरे सरकारने वीजबिलांचा जो काही खेळ केला, त्यावरून त्यांना सरकार म्हणजे नफा कमावण्याचे साधनच वाटत आहे की काय, अशी शंका येते. डोळ्यांसमोर स्वत:ची जनता पोळली जात आहे आणि तरीही वाढीव वीजबिले पाठवून ठाकरे सरकारने फक्त असंवेदनशीलताच दाखविली आहे.’’

आपल्या ट्विटर थ्रेडचा शेवट करताना शिरोळे यांनी पुण्याविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिले आहे,

 

 

‘‘उद्धव ठाकरेंसारखा निष्क्रिय मुख्यमंत्री लाभल्यामुळे मला खरोखरीच पुणे शहराच्या भवितव्याविषयी चिंता वाटते आहे. आता हे सरकार किती दिवस राहील आणि तितक्या दिवसांमध्ये शहराच्या आणि राज्याच्या प्रगतीचे किती नुकसान करून ठेवेल, याचा अंदाज बांधायचीही भीती वाटते.’’

तुम्हाला काय वाटतं? शिरोळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केलेले प्रश्न योग्य आहेत की अयोग्य?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Exit mobile version