आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
जुन्या हिंदी सिनेमांमध्ये नायक, नायिका, खलनायक, गरीब आई आणि गाजर का हलवा ही आवश्यक पात्रं असायची.
मुलगा बीए पास झाला किंवा बाहेरून जरी घरात आला की आई त्याला,” आ गये बेट, मैंने तुम्हारे लिये गाजर का हलवा बनाया है, खा ले!” , म्हणायची आणि गाजरचा हलवा खाऊ घालायची.
मग तो बेटा ही मिटक्या मारत गाजरचा हलवा खायचा. यातला विनोदाचा भाग सोडला तर आपल्या लेखाचा विषय आहे बहुगुणी गाजर.
सगळ्यांनाच माहीत आहे की गाजर हे जमिनीखाली येणारे अत्यंत उपयोगी कंद आहे. इसवी सन पूर्व ९०० पासून गाजराचे उल्लेख आढळतात. पहिल्यांदा अफगाणिस्तानमध्ये गाजर आढळून आले होते.
साधारणपणे केशरी रंगाचे गाजर आपल्याला माहीत असतात. परंतु गाजरामध्येही वेगवेगळे रंग आहेत. पिवळा, लाल, जांभळा, गुलाबी, पांढरा असे वेगवेगळ्या रंगाचे गाजरही आढळून येतात.
पंधराव्या आणि सोळाव्या शतकामध्ये यूरोपामध्ये पहिल्यांदा केशरी रंगाच्या गाजराची लागवड केली गेली. आज जगभरात तेच गाजर जास्त वापरले जातात.
गाजरामध्ये असलेल्या साखरेमुळे त्याला थोडीशी गोड चव असते, पण काही गाजरं थोडीशी कडवटही असतात.
गाजर हे पोषणमूल्यांनी भरगच्च असे कंद आहे. गाजर हे जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांचे महत्त्वपूर्ण स्रोत आहे.
अर्धा कप गाजरामध्ये साधारण पुढीलप्रमाणे पोषणमूल्ये असतात.
कॅलरी २५ ग्रॅम, कर्बोदके ६ ग्रॅम, फायबर २ ग्रॅम, साखर ३ ग्रॅम, प्रथिने ०.५ ग्रॅम. आपल्या रोजच्या गरजेच्या ७३ %व्हिटॅमिन अ, ९ % व्हिटॅमिन के, ८ % पोटॅशियम आणि फायबर, ५ % व्हिटॅमिन सी, २ % कॅल्शियम आणि लोह
आरोग्यासाठी गाजराचे फायदे
१. डोळ्यांसाठी उपयुक्त :
गाजरामध्ये असलेल्या कॅरोटीन किंवा विटामिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. यामुळे दृष्टीच सुधारते असे नव्हे तर डोळ्यांचे विकार होण्यापासूनही रोखले जाते.
यामुळे रातांधळेपणाही कमी होतो. तसेच मोतीबिंदू लवकर तयार होत नाही. सूर्याच्या प्रखर किरणांपासून डोळ्यांचे रक्षण होते. पिवळ्या रंगाच्या गाजरामधले ल्यूटीन देखील डोळ्यांसाठी खूपच चांगले आहे.
अमेरिकेत सर्वात जास्त मॅक्युलर ऱ्हास झाल्यामुळे लोकांची दृष्टी जाते. त्यासाठी पिवळ्या रंगाची गाजरे खाणे हा एक चांगला उपाय आहे.
२. कर्करोगाचा धोका कमी होतो :
गाजरामध्ये असलेले फॉकरीनोल हे अँटीऑक्सिडेंट, कॅन्सर सेल्स वाढू देत नाही. कॅन्सर कमी करण्यास हे अँटिऑक्सिडंट मदत करते. यामुळे पोटाचा, स्तनांचा आणि प्रॉस्टेट कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो.
३. हृदयरोगाचा धोका कमी होतो :
एंटीऑक्सीडेंट शरीरासाठी, हृदयासाठी तसे चांगलेच असतात. परंतु गाजरामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. सुरळीत रक्तप्रवाह सुरू राहतो, त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
४. वजन कमी होण्यास मदत होते :
जर आवश्यकतेपेक्षा जास्त वजन वाढलं असेल तर वजन कमी करण्याचा सगळ्यात चांगला उपाय म्हणजे गाजराचा ज्यूस घेणे. याचं कारण म्हणजे एक ग्लासभर ज्यूस घेतला तर दीर्घकाळ तुम्ही फ्रेश राहता आणि आहारही कमी घेतला जातो.
त्यामुळे जास्त कॅलरीज शरीरात जात नाहीत आणि वजन कमी होते. पण वजन कमी करायचा आहे म्हणून मग गाजराचा हलवा खाल्लात तर त्याचा काही उपयोग नाही.
कारण हलव्यातील साखरेने वजन कमी होण्याऐवजी वाढेल.
५. प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते :
गाजरामध्ये असलेल्या विटामिन सी मुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रोज गाजर खाल्ल्याने नक्कीच प्रतिकारशक्ती वाढेल.
६. शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते :
गाजरामध्ये असलेल्या विटामिन ए मुळे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडतील शरीरात चरबी साठून राहणार नाही. तसेच पित्तदेखील कमी होते.
७. पचनशक्ती सुधारते :
गाजरामध्ये असलेल्या फायबर मुळे पचनशक्ती चांगली राहते. तसेच ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्या लोकांनी गाजर खावे, त्यामुळे पोट साफ होण्यासही मदत होते.
८. डायबिटीज नियंत्रणात राहतो :
डायबिटीज असणाऱ्या लोकांना स्टार्च नसलेले अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. गाजर हे त्याच प्रकारात मोडणारे आहे. गाजरामध्ये असलेल्या फायबर मुळे शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
गाजरातील विटामिन ए आणि बीटा कॅरोटीन मुळे डायबिटीज नियंत्रणात राहतो.
९. स्त्रियांना मासिक पाळीतही याचा फायदा होतो :
ज्याप्रमाणे पुरुषांना गाजराचे अनंत उपयोग आहेत तसेच ते स्त्रियांनाही आहेत. बऱ्याच स्त्रियांना अनियमित मासिक पाळी येण्याचा त्रास असतो. तर काही जणींना मासिक पाळीत अति रक्तस्त्राव होतो.
परंतु या स्त्रियांनी जर रोजच्या आहारात गाजर खाण्यास सुरुवात केली तर त्यांचा हा त्रास कमी होईल. त्याच प्रमाणे मेनोपॉजच्या काळातही अनेक स्त्रियांना गरम वाटणे, अचानक मूड बदलणे, विनाकारण रडू येणे असे त्रास होत असतात.
त्याही स्त्रियांनी जर गाजराचे नियमितपणे सेवन केले तर त्यांचा त्रास कमी होईल.
१०. गाजरामुळे दातांचे आरोग्यही चांगले राहील :
कच्चे गाजर खाल्ल्यामुळे दातात अडकलेले अन्नकण निघून जाण्यास मदत होतेच पण त्याचबरोबर तोंडातील लाळ बनण्याची प्रक्रियाही वाढेल. ज्यामुळे हिरड्या मजबूत होतील. तसेच तोंडात कोणतेही बॅक्टेरिया वाढणार नाहीत.
११. केसांसाठी गाजराचा वापर :
केवळ शरीरासाठी नाहीतर केसांसाठीही गाजराचा उपयोग होतो. गाजर खाल्ल्याने त्यातल्या विटॅमिन ए आणि विटामिन ई मुळे टाळू वरचा रक्तप्रवाह सुरळीत होतो.
त्यामुळे केसांची वाढ चांगली होते आणि अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते. केस गळणे थांबते.
१२. त्वचेसाठी फायदा :
जर गाजराचा वापर रोजच्या जेवणात केला तर त्याचा निरोगी स्किनसाठी ही फायदा होतो. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स, डाग कमी होतात. सूर्याच्या प्रखर किरणांमुळे होणारे त्वचेचे नुकसान कमी होते.
शरीरातला कोरडेपणा कमी होतो त्यामुळे त्वचा तरुण दिसण्यास मदत होते. गाजराचा ज्यूस चेहर्यास लावला तर चेहरा टवटवीत दिसतो.
त्यामुळे रोजच्या आहारात कधी कच्चे, कधी कोशिंबिरीचा रूपात, कधी ज्यूस, कधी उकडून, कधी वाफवुन, तर कधी भाज्यांमध्ये परतून देखील गाजर खाल्ले जाऊ शकते.
दिवसभरात दोन कप गाजर पोटात गेले पाहिजे. त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच होईल.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.