' अफगाणिस्तान व लंडन वरील अतिरेकी हल्ले आणि माध्यमांचा आक्षेपार्ह वृत्तांत – InMarathi

अफगाणिस्तान व लंडन वरील अतिरेकी हल्ले आणि माध्यमांचा आक्षेपार्ह वृत्तांत

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

८ मार्च २०१७ रोजी, (म्हणजे निव्वळ पंधरा दिवसांपूर्वीची गोष्ट) अफ़गाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलमधल्या एका रुग्णालयात इसिस या अतिरेकी संघटनेच्या अतिरेक्यांनी बंदुका घेऊन रुग्णालयात प्रवेश केला आणि अंदाधुंद गोळीबार करत किमान ४९ लोकांना ठार करून ६३ लोकांना जखमी केलं. १३ मार्च पर्यंत सुमारे १०० लोक मृत्यु पावल्याची वार्ता आली, आणि जखमी झालेल्यांच्या संख्येचा पत्ताच नव्हता.

बंदुकधारी अतिरेक्यांनी प्रवेश करण्यापूर्वी, आधी एका आत्मघाती हल्ल्यातून रुग्णालयाचं प्रवेशद्वार उडवण्यात आलं होतं.

रुग्णालयात त्या ’आधी काही महिने’ इंटर्न म्हणून कार्यरत असलेले काही ’डॉक्टर्स’ सुद्धा हातात बंदुका घेऊन अतिरेक्यांना येऊन मिळाले आणि त्यांनीही इतर रुग्णालय कर्मचार्‍यांवर आणि रुग्णांवर गोळीबार केला.

theguardian.com

अफ़गाण सैनिकांनी येऊन अतिरेक्यांना मारेपर्यंत हा प्रकार एकूण सात तास सुरु होता. यातून स्वाभाविक अर्थ असा निघतो की हा अतिरेकी हल्ला पूर्वनियोजित होता.

मला या घटनेबद्दल विकिपीडियातल्या बातम्या चाळताना माहिती मिळाली.

या प्रसंगाचा वृत्तांत देताना (दिला हेच नशीब म्हणा), गार्डियन, द इंडिपेंडंट, सीएनएन, बीबीसी न्यूज, ही मंडळी ’अतिरेकी’ हा स्पष्ट शब्द प्रयोग न करता ’बंदुकधारी’ असा शब्द प्रयोग करतात. युएसए टूडे तर आपल्या बातमीच्या शीर्षकात ’इस्लामिक स्टेट फ़ायटर्स’ म्हणजे ’इस्लामिक स्टेटचे लढवय्ये’ असा उल्लेख करते.

इंडिया टूडे या भारतीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तांताचा पहिला परिच्छेद काहीसा असा आहे :

Islamic State claimed responsibility for an attack on a military hospital in the Afghan capital, Kabul, on Wednesday in which gunmen dressed as doctors slipped into the facility and battled security forces inside the building for several hours.

यामध्ये “battled” या शब्दाचा वापर मला प्रचंड खटकला. त्यापुढची वाक्यरचना सुद्धा अतिशय आक्षेपार्ह वाटली. अनुवाद केल्यास ’बंदुकधार्‍यांनी सुरक्षा दलांशी इमारतीमध्ये तासनतास झुंज दिली/लढा दिला’ असं हे अतिरेक्यांप्रती गौरवास्पद वाटावं असं वाक्य.

याच वाक्यातील शब्दांचा क्रम जरासा बदलून असं काहीसं हे वाक्य रचता आलं असतं –

Islamic State claimed responsibility for an attack on a military hospital in the Afghan capital, Kabul, on Wednesday in which the security forces had to battle for hours against the gunmen who had managed to slip into the facility, being dressed as doctors.

(terror, terrorist हे शब्द इंडिया टूडेच्या संपूर्ण लेखात एकदाही आढळून येत नाहीत. द इंडियन एक्सप्रेसने नशीबाने त्यांच्या लेखात हे शब्द अनेकदा वापरलेले आहेत.)

डेक्कन क्रोनिकल्स या वृत्तसंस्थेने, आणि मला वाटतं ’नतद्रष्ट टीव्ही’ने सुद्धा या घटनेची दखल घेतलेली आहे.

Deccan Chronicle – Islamic State jihadists claimed the attack via a verified Telegram account. The more powerful Taliban said they were not behind the raid. The militant group, Afghanistan’s largest, is known to distance itself from attacks on medical facilities or those that result in high civilian casualties.

“तालिबान हा लढाऊ समूह वैद्यकीय सोयीसुविधा असतील आणि जास्त लोक मरतील अशा ठिकाणी हल्ले करणं टाळण्यासाठी ओळखला जातो”

वाचणार्‍याला वाटावं की कित्ती कित्ती छान आहेत हे तालिबानवाले. किती दयाळू आहेत, नाही?

मग मी माझा मोर्चा लंडन मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याच्या वृत्तांताकडे वळवला.

खालिद मसूद नावाच्या पाकिस्तानी वंशाच्या अतिरेक्याने – बरं भारतात ही घटना घडली असती तर तो हमखास ’माथेफ़िरू इसम’ म्हणून घोषित झाला असता – तर ह्या अतिरेक्याने आधी आपल्या गाडीने चाळीसेक लोकांवर हल्ला केला. ज्यात दोघे-तिघे मेले आणि बरेच गंभीर जखमी झाले आणि नंतर एका पोलिसाला चाकूने जीवानिशी भोसकलं.

scmp.com/Reuters

इसिसने या घटनेची जबाबदारी स्वीकारली. गाडी एक आठवड्य़ापूर्वी भाड्याने घेतलेली होती आणि हल्ला संसदेच्या परिसरात झाला म्हणजे हाही हल्ला पूर्वनियोजित होता असं म्हणायला हरकत नाही. पण इंग्लंडने सुरक्षाविषयक कायदे जरा जास्तच कडक करू नये म्हणून तो काबूल एवढ्या मोठ्या पातळीवर झाला नसावा.

दोन्ही घटना निषेधार्ह आहेत – हे वेगळं सांगायची खरं तर गरज नसताना ते सांगितलेलं बरं म्हणून तसं आधी सांगून – आता जरा तुलना करून पाहूया.

काबूल – अफ़गाणिस्तान देशाची राजधानी
लंडन – इंग्लंड देशाची राजधानी

काबूलमध्ये हल्ला रुग्णालयात होतो
लंडनमध्ये तो संसदेजवळ होतो

दोन्ही हल्ले इसिसद्वारेच करण्यात येतात. (काबूल हल्ल्याबद्दल वाचताना इसिसशी संलग्न असलेली amaq {अमक} नावाची एक वृत्तसंस्था आहे हे मला नव्यानेच कळलं)

काबूलमध्ये आत्मघाती स्फ़ोट होऊन नंतर अनेक बंदूकधारी अतिरेकी घुसून गोळीबार करतात. सात तास चकमक सुरु राहते.

लंडनमध्ये एक पाकिस्तानी अतिरेकी बेदरकारपणे गाडी चालवून लोकांना चेंगरत जातो. तोच माणूस एका पोलिसाला चाकूने भोसकतो. मला वाटतं काही मिनिटांच्या अवधीत सुरक्षा दल त्यालाही मारतात.

काबूलमध्ये अंदाजे १०० जण मरतात. जखमींचा नेमका आकडा नाही.
लंडनमध्ये अतिरेक्याला धरून ४ जण मरतात, आणि सुमारे ४० जण जखमी होतात.

काबूलमधला प्रसंग होऊन आज लेख लिहीत असताना पंधरा (१५) दिवस उलटून गेलेले आहेत. एवढ्या दिवसांत काबूल हल्ल्याबाबत गुगलवर सध्या तब्बल ४८ लेख जमा झालेले आहेत. (अबब!) पैकी भारतीय इंग्रजी वृत्तसंस्थांवरचे लेख ३ आहेत.

लंडनमधील हल्ला होऊन आज एकच दिवस झाला आहे. लंडन हल्ल्याबाबत (फ़क्त) ७५० लेख गुगलवर उपलब्ध आहेत. पैकी भारतीय वृत्तसंस्थांचे किती असतील ते मी मोजायच्या फ़ंदात पडलो नाही.

मला स्वत:ला या काबुलमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत विकिपीडियामुळे कळलं. विकिपीडीयावरची माहिती बरोबर असतेच असं नाही, असं म्हणतात. पण इथे डकवली जाणारी माहिती किमान हेतुपूर्वक चुकीची असल्याचं माझ्या तरी ऐकिवात आलेलं नाही. तरीही लंडनवरील हल्ल्यावरील विकिपीडीयावरचा लेख आणि काबूल हल्ल्यावरचा लेख यांच्या लांबीत असंतुलित तफ़ावत आहेच.

===

काही दिवसांपूर्वी ट्रॉम्बे पोलीस स्टेशनवर धर्मांध मुस्लिम समुदायाने हल्ला चढवला होता. तेव्हा एका मराठी वृत्तपत्राने असंच असंतुलित वार्तांकन केलं होतं. अधिक माहितीसाठी वाचा: “कट्टर हिंदुत्ववाद” आणि पोलीस स्थानकावर हल्ला करणारा “हिंसक जमाव”

===

तरी नेमकी माहिती दोन्ही लेखांत असल्यामुळे यापुढे विश्वासार्हता गमवूनही गुगल एसईओ वर ताबा मिळवून असलेल्या पहिल्या दोन पानांवरच्या वृत्तसंस्थांवर त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या बातम्या समजून घेण्यासाठी जायचं टाळून मी विकिपीडियाचा आधार घेणार आहे.

आणि त्यांच्या दृष्टीने तितक्याशा महत्त्वाच्या नसलेल्या किंवा अनावश्यक बातम्यांबद्दलची माझ्या परीने मागणी वाढवण्याच्या हेतुने मी अशा वेळी मात्र या सगळ्या साईट्सवर टिचक्या मारणार आहे (तरीही ’खर्‍या’ वृत्तांतासाठी विकिपीडियाचाच आधार घेणार आहे. कारण लंडनमधला अतिरेकी पाकिस्तानी असून त्याचं नाव मला विकिपीडियावरच्या पहिल्या परिच्छेदात कळलं होतं. जे इतर वृत्तसंस्थांमध्ये दिसतही नव्हतं.)

एका अर्थी ही तफ़ावत साहजिक आहे. इंग्रजी वृत्तपत्रं इंग्रजांच्या देशातील घडामोडींना जास्त महत्त्व देणार हे स्वाभाविक आहे. तसंच अफ़गाणिस्तान म्हटलं की, ’हं… तिथे तर हे नेहमीचंच असतं.’ असाही एक आविर्भाव असतोच. जानेवारीतच काबूलच्या संसदेबाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात २५ जण मृत्युमुखी पडले तर ४५ जण जखमी झाले होते.

तसंच इंग्लंडमध्ये लाखो भारतीय राहात आहेत. अफ़गाणिस्तानमध्ये जेमतेम ३००० च्या घरांत असतील (भारतीय वंशाचे अफ़गाण न गणता, फ़क्त भारतीय नागरिक).

पण वृत्तांतांचे वाचक म्हणून आपली जबाबदारी आपण ओळखायला हवी.

अफ़गाणिस्तान आपल्या अतिशय जवळचा देश आहे. आपला मित्र आहे. तेव्हा आपण आपल्या शेजारी घडणार्‍या घटनांचं महत्त्व स्वत: लक्षात घेऊन, तिथल्या बातम्यांची मागणी वाढवायला हवी.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved

कौस्तुभ अनिल पेंढारकर

मी व्यवसायाने लेखक (content writer/copywriter) आणि अनुवादक आहे. मी मराठीतून इंग्रजीत आणि इंग्रजीतून मराठीमध्ये भाषांतराची कामं स्वीकारतो. संपर्क साधण्यासाठी लिंक्ड-इन प्रोफाईलवर संदेश पाठवावा.

kaustubh-pendharkar has 4 posts and counting.See all posts by kaustubh-pendharkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?