' अहमदाबादेतल्या त्या ड्रायव्हरने मला जगावं कसं यावर अस्सल तत्वज्ञान दिलं होतं… – InMarathi

अहमदाबादेतल्या त्या ड्रायव्हरने मला जगावं कसं यावर अस्सल तत्वज्ञान दिलं होतं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : राजेश कुलकर्णी

===

मागे अहमदाबादला गेलो असता एक स्थानिक वाहन भाड्याने घेतले होते. वाहनचालक संभाषणात व पेहरावात अगदी टापटीप होता. गंमत म्हणजे हिंदीमध्ये एरवी दिसणारा गुजराती हेल नव्हता व मधूनमधून इंग्रजीही बर्‍यापैकी बोलत होता.

मध्ये एका ठिकाणी पार्किंगसाठी जागा नव्हती म्हणून त्याचा फोन नंबर घेतला. ‘Dr. xxxxx Solanki’ असा उल्लेख होता. ते वाचून अगदी दाटून आले.

आजवर कोणा पदवीधरावर किंवा त्याहीपेक्षा अधिक शिकलेल्यावर बेकारीच्या समस्येमुळे मिळेल तर काम करावे लागल्याची उदाहरणे पाहण्यात आली होती. पण असा एखादा डॉक्टर प्रथमच पहात होतो.

परत आल्यावर गाडीत बसल्यावर त्याला त्याबद्दल विचारले तर तो म्हणाला की ते डॉक्टरकीसाठी नाही तर ड्रायव्हरकीसाठी आहे. मग तो धक्का पचवत त्याला त्याच्या एकूण टापटिपीबद्दल विचारले.

 

driving inmarathi

 

गुटका वगैरे खाण्याच्या त्याला नसलेल्या सवयीबद्दल विचारले. तो एकदम तत्वज्ञानीच झाला. पुढचा सगळा प्रवास एकतर्फी संवादाचा झाला.

मी डॉक्टर नसलो तरी पदवीधर आहे. आपणच आपली इज्जत ठेवायला हवी. वर्षाला तीन शर्टपॅंटच्या जोड्या नव्या घेतल्या तर ते व आधीच्यातले चांगले कपडे मिळून व्यवस्थित राहता येते. त्यासाठी फार खर्च करावा लागत नाही.

लग्न ठरायच्यावेळी मी दुसर्‍याच्या गाडीवर काम करत होतो. एक मुलगी दाखवायला आली होती. माझ्या कमी उत्पन्नाकडे पाहून तिच्या वडलांनी नकार दिला.

मला ती आवडली होती व तिलाही मी आवडल्यासारखे वाटत होते. मी तिला बाहेर भेटलो.

“मला तू आवडलेली आहेस. मी आता जरी दुसर्‍याकडे नोकरी करत असलो तरी पुढेमागे माझा स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा आहे. घरून एकही पैसा न घेता. मला तुझ्या वडलांकडूनही पैसे नकोत.

तू तुझ्या आई-वडलांशी बोलून काय ते मला सांग. सुरूवातीला तुला थोडे कष्ट पडतील, पण दोन-तीन वर्षात तुला सुखी ठेवीन. आधी तुझी तयारी आहे का बघ आणि मग त्यांना विचार. आता लगेच उत्तर देऊ नकोस. मीच नंतर तुला पुन्हा भेटून तुझा निर्णय विचारीन.”

चार दिवसांनी मला मुलीच्या वडिलांनी बोलावल्याचा घरी फोन आला. म्हणजे ती वडिलांशी माझ्याबद्दल बोलली होती तर. मला म्हणाले की तुला नकार दिला म्हणून चिडून पोरीवर अॅसिड वगैरे टाकणार नाही ना?

यावर काय बोलावे हे कळले नाही. मग त्यांनीच विचारले की तू माझ्या मुलीमध्ये काय पाहिलेस ते सांग. तरी पंचाईत. म्हटले,

“मला तिच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास दिसला. तुम्ही व तिच्या आईने तिला घुंघट टाइप बनवलेली नाही हे दिसले. याआधी मला पसंत केलेल्या कितीतरी मुली छताकडेच पहात बसायच्या. म्हणून मीच त्यांना नकार दिला.

मला पुढे काही तरी स्वत:चे करायचे आहे. त्यात तिची चांगली साथ मिळेल असे वाटले. म्हणून तुम्ही नकार दिलात तरी विचारावेसे वाटले.”

मग कसला व्यवसाय करण्याचे तुझा विचार आहे हे त्यांनी विचारले. मला आता नोकरी करतोय त्यातच पुढे माझा व्यवसाय करायचा असल्याचे सांगितले.

ते म्हणाले की गाडी चालवण्याचा व्यवसाय म्हणजे इतरांच्या संगतीमुळे दारू नाही तर गुटखा खाण्याची सवय लागते. त्यांना म्हटले की आताही मला या सवयी नाहीत आणि पुढेही लावून घेणार नाही.

मग म्हणाले, शपथ घेणार का? मी म्हटले, “उगीचच कशाला शपथ घेऊ? पोरगी देत असला तर घेतो.” मग ते मुलीला म्हणाले की बाप म्हणून जे काही विचारायचे ते तुझ्यासमोर विचारले.

 

marriage inmarathi

 

“तो तुला दोन वर्षे म्हणाला तरी पाच वर्षे कष्टाची असतील असे समज. धंदा म्हटल्यावर नंतरही कष्ट करावेच लागणार पण ते वेगळे. तुझी तयारी आहे का ते सांग.” माझ्या नशिबाने तिने होकार दिला.

यांनी काही सोडले नाही. “पोरगी आवडली आहे ना तुला, तिच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे की दारू-गुटका किंवा कसले व्यसन करणार नाही. कितीही जास्तीचे पैसे मिळाले तरी रात्रभर ड्रायव्हिंग करणार नाही. काहीही कायद्याविरूद्ध करणार नाही.”

हिचा बाप तर धंदा सुरू करण्याच्या आधीच तो बुडवायला बसला होता. पण पोरीसाठी शपथ घेतली आणि लग्न ठरले.

लग्न झाल्यावर स्वत:ची गाडी घ्यायला तिचे वडील मदत करतो म्हणाले. पण मीच म्हटले की लाखाचे कर्ज मिळतेय, माझ्याकडे थोडे पैसे आहेत. धंद्याला नवी गाडी घेण्याऐवजी थोडी जुनी गाडी घेतली तर पैशाला परवडते.

कंपनीचा प्रॉफिट आपल्याला द्यावा लागत नाही. आता तुम्ही पैसे देऊ नका. नंतर गरज पडली तर सांगेन. मग गाडी घेतली. थोडे गॅरेजचे कामही शिकून घेतले. दोन वर्षात दुसरी गाडी घेतली. तिसर्‍या वर्षात आणखी दोन घेतल्या.

गाडीवर ड्रायव्हर लोक घेताना त्यांना सांगितलेले असते की गाडीत लेडीज लोक असले किंवा कोणीही असले तरी मागे वळून पहायचे नाही. ते जे बोलत असतील त्याच्यात पडायचे नाही.

म्हातारा माणूस असेल तर त्यांनी न विचारता त्यांना सामान उचलायला मदत करायची. बाकीच्यांना सेल्फसर्व्हिसचा बोर्ड दाखवायचा. अगदीच गरज पडली तर हात द्यायचा पण एकट्याने उचलायचे नाही. (ती नोटीस मीदेखील पाहिली होती.)

स्वत: सिगरेट ओढायची नाही आणि गाडीत बसून पॅसेंजरलाही ओढू द्यायची नाही. नव्या पॅसेंजरना हे नियम विचित्र वाटतात. पण नंतर गरज असेल तेव्हा तेच फोन करून गाडी बोलवतात.

काही ड्रायव्हरना हे नियम झेपत नाहीत. सोडून जातात. त्यातले काही जण काही दिवसांनी परत येतात. आता ड्रायव्हर लोकांचा इंशुरन्स काढायला सुरूवात केली आहे.

 

driving 2 inmarathi

 

त्यामुळे ड्रायव्हर लोकांची गळती कमी झाली आहे. नवरा दारू पित असेल तर त्याची बायकोच मला सांगायला येते. आता बुकींगची वगैरे सगळी कामे बायको करते.

इंग्लिश बोलायलापण शिकली आहे. लेडीज ग्रुप असेल तर मधूनमधून गाडीवरही तीच जायची. पण आता मुले लहान असल्याने तिला गाडीवर जाणे जमत नाही.

डॉक्टरकी ते ड्रायव्हरकीवरून एवढे पुराण. पण निश्चितपणे ऐकण्यासारखे होते. चार वर्षांपूर्वीची गोष्ट.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?