अखेरचा संपादक : गोविंदराव तळवलकरांसारखा संपादक होणे नाही
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
गोविंदराव तळवलकर गेले. त्यामुळे एक रितेपणाची भावना मनात दाटून आली होती. त्यांच्याबरोबर जवळपास १५ वर्षे काम केले. त्यांचे माझे संबंध एक संपादक आणि त्यांच्या हाताखाली काम करणारा त्यांचा कनिष्ठ सहकारी असेच औपचारिक होते. त्यांच्याशी जवळीक साधणे सहज शक्य होते, पण मी मुद्दामच त्यांच्या फार जवळ गेलो नाही. ते तसे दुरूनच खूप लोभस वाटायचे. मी जरी त्यांच्या फार जवळ जात नसलो तरी ते कधीकधी खूप जवळ येऊन आस्थेने बोलायचे. असे आस्थेने बोलणे तळवलकरांच्या बाबतीत दुर्मिळच, पण माझ्या पिढीच्या महाराष्ट्र टाईम्स (मटा) मधल्या तरूण पत्रकारांच्या नशिबी ते भाग्य बऱ्यापैकी होते.
विद्यार्थी दशेपासून तळवलकर हे माझे आवडते संपादक होते. त्यांना मी भरपूर वाचत होतो. पुढे पत्रकारितेत जायचे ठरल्यावर माझी निवड मटाच होती, पण तिथे प्रवेश करणे सोपे नव्हते. पण तळवलकरांनी संपादक म्हणून त्यांच्या पत्रकार सहकाऱ्यासाटी जे निकष ठरविलेले होते, त्या निकषात मी बसलो आणि मटात माझा प्रवेश झाला, तो अखेर निवृत्त होईपर्यंत.
तळवलकर माणूस म्हणून कसे होते या संबंधी संपूर्ण महाराष्ट्राला बरीच उत्सुकता आहे, पण संपादकपदाची वस्त्रे त्यांनी चढविली होती व त्या वस्त्रांतून बाहेर पडण्याची त्यांची अजिबात इच्छा नव्हती, त्यामुळे माणूस म्हणून पाहतानाही त्यांच्यातला संपादक वेगळा करता येत नाही. त्या संपादकपणात जेवढे माणूसपण फिट बसते, तितकेच माणूसपण त्यांनी स्वःत बाळगले होते. मला वाटते त्यांच्या या संपादकपणाचा त्यांच्या खाजगी आयुष्यावरही बराच परिणाम झाला होता. त्यामुळे गोविंद तळवलकर हे नाव घेतलं की, फक्त एक संपादक डोळ्यापुढे येतो, हा संपादक माणूस असणं हा योगायोग आहे की काय असं वाटत राहतं.
गोविंदरावांची महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणाची समज जबरदस्त होती असं विधान करण्याचं औध्दत्य मला करण्याची गरज नाही. पण त्या समजाला सामाजिक चिंतनाची जोड होती, त्यामुळे त्या चिंतनातून सिध्द झालेल्या निष्कर्षाच्याविरूध्द राजकारण जात आहे असे दिसले की, ते उफाळून यायचे आणि त्यांच्या लेखणीला धार चढायची.
त्यांच्या राजकीय चिंतनाच्या जवळपास जाणारं राजकारण यशवंतराव चव्हाण करायचे, म्हणून त्यांचं यशवंतरावांशी जुळायचं, यशवंतराव मोठे राजकारणी आहेत म्हणून नव्हे. त्यांचं शरद पवार यांच्याशीही बऱ्यापैकी जुळायचं, पण पवारांचं राजकारण दिशा सोडून भरकटतंय असं लक्षात आल्यावर त्यांनी त्यांनाही झोडण्यास कमी केलं नाही.
यशवंतरावांनी आणीबाणीत इंदिरा गांधीच्या विरोधात घेतलेली भूमिका अचानक बदलून त्यांच्याशी जुळवून घ्यायचं ठरवलं तेव्हा गोविंदरावांना सर्वाधिक दु:ख झालं आणि त्यांनी ते त्यांच्या अग्रलेखातून प्रखरपणे व्यक्त केलं. त्यावेळी त्यांनी यशवंतरावांनाही आपल्या टीकेचं लक्ष्य केलं. गोविंदराव अनेक राजकारण्यांचे मित्र, स्नेही होते, पण त्यांनी त्या स्नेहासाठी आपली लेखणी कधी बोथट केली नाही.
म.टा. चा सांस्कृतिक दबदबा वाढविण्यात तळवळकर यांचा सिंहाचा वाटा होता. ते डावीकडे झुकलेले पण मध्यममार्गी संपादक होते. विचारांचा आग्रह ते धरत असले तरी विचारांचा अतिरेकीपणा त्यांना मान्य नव्हता. राजकारणात नेहरूंनी जो डावा मध्यममार्ग स्वीकारला होता, तोच तळवळकरांनी मटाचे संपादकीय धोरण म्हणून स्वीकारला होता. त्यामुळेच तेथे दि. वि. गोखल्यांसारखे उजव्या, दिनू रणदिवेसारख्या डाव्या, समाजवादी मंडळीना सारखे स्थान होते. ही मंडळी त्यांच्या विचारांचा अतिरेक करणार नाहीत याची काळजी तळवळकर घेत असत. महाराष्ट्राच्या राजकारणातील मटाची भूमिका ही अतीशय महत्त्वाची मानली जात असे. यशवंतराव चव्हाण यांच्या सर्वसमावेशक राजकारणाचे तळवळकर यांना आकर्षण होते. त्यामुळे ते त्यांचे उघड समर्थक होते. पण म्हणून त्यांनी त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाचे समर्थन केले असे नाही.
तळवळकरांचे रागलोभ, आवडीनिवडी मात्र तीव्र स्वरूपाच्या होत्या व त्यांचा संपादक म्हणून दबदबा जसजसा वाढत गेला तशा त्या अधिकधिक तीव्र होत गेल्या.
त्यांचे मटामधील सहकारी असलेले दि. वि.गोखले हे संघविचारांचे होते. पण या दोघांमध्ये अत्यंत निकट असा सहकार भाव होता व ते एकमेकांचे चांगले मित्र होते. गोखले यांनी संपादक होण्याची कोणतीही महत्त्वाकांक्षा बाळगली नव्हती व आपण तळवलकरांच्या नेतृत्वाखालीच काम करायचे हे त्यांनी ठरवून टाकले होते. तळवलकरांना संपादकाच्या जबाबदारीतला प्रशासनाचा भाग आवडत नसे व त्यात त्यांना फारसा रसही नव्हता. ते ऑफिसमध्ये आल्यावर अग्रलेख लिहायचे आणि नंतर दिवसभर जाडजूड पुस्तक काढून वाचत बसायचे. त्यांना काही वेळेला राजकारणी, साहित्यिक, कलावंत आदी बडी मंडळी यायची, त्यातही त्यांचा वेळ जायचा. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या अडचणी, प्रशासकीय बाबी यासाठी त्यांना वेळ मिळायचा नाही. अचानक मोठी बातमी आली तर वर्तमानपत्रात ती कशी द्यायची वगैरे गोष्टीत मग गोखले लक्ष घालायचे. पण या सर्व गोष्टीवर तळवलकरांची बारीक नजर असायची.
त्यांनी मराठी वृत्तसृष्टीवर एखाद्या सम्राटासारखे राज्य केले.
राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकू शकणारे ते एकमेव संपादक होते. महाराष्ट्रात नामवंत संपादकांची एक मोठी फळी तयार झाली पण या फळीच्या शीर्षस्थानी तळवलकरच होते आणि सर्व संपादकांनी त्यांचे हे थोरपण मान्य केले होते.
त्यांच्या जाण्याने आम्हा आजीमाजी मटावासियांच्या डोक्यावरचं छत उडून गेलंय. त्यांच्या निवृत्तीनंतर फार थोडा काळ मी त्यांच्या संपर्कात होतो. नंतर तोही हळूहळू थांबला, पण ते अखेरपर्यंत लिहिते होते, त्यांच्या या लेखांतून त्यांची भेट होत असे. त्यांचे लेख वाचताना लक्षात यायचं की या माणसाचा सुंभही जळालेला नाही आणि पिळही गेलेला नाही.
तळवलकर हे मराठी पत्रकारितेतले अखेरचे संपादक होते, असे मी मानतो. आता तसा संपादक होणे नाही.
===
लेखक ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषक आहेत.
संपर्क: diwakardeshpande@gmail.com
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.