तुमच्या शरीराचं वजन वाढत चाललंय का? मग ‘हे’ करा अन् वजनवाढ टाळा!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
आजकाल निम्म्याहून अधिक लोकांना सर्वात जास्त भेडसावणारी चिंता आहे ती वाढणारं वजन आटोक्यात कसं ठेवावं याची!!!
बदलत्या जीवनशैलीची सर्वात मोठी देणगी आहे ताणतणाव, आहारावर झालेला परिणाम आणि त्यामुळं कमी वयात जडलेल्या व्याधी.
फार जुन्या काळात नको या २५-३० वर्षात एकंदरीत बदललेल्या जीवनमानात थोडं लक्ष देऊन बघा…काय बदल झाले आहेत? मनोरंजनापासून ते घरापर्यंतच्या सर्व संकल्पना किती वेगाने बदलल्या आहेत बघा.
मुलांच्या शाळा, शिक्षणपद्धती, विदेशी कंपन्यांचा भारतात झालेला प्रवेश, वेगवेगळे खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने यामुळे आमूलाग्र बदल झालेली आपली जीवनशैली!!!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
एकेकाळी साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा मूलमंत्र होता. कितीही श्रीमंत असा, पण त्याचा देखावा करु नये असं जुने -जाणते लोक सांगत.
हाॅटेलमध्ये जेवायला जाणं म्हणजे अत्यंत कमीपणाचं लक्षण मानलं जायचं. मैदानी खेळ सक्तीनं खेळायला लावले जात. फारच हौशी लोक तालमीत जात. आपली कामं आपली आपणच करण्याला प्राधान्य दिलं जात होतं.
टिव्हीचा वापर मर्यादित प्रमाणात होता.कार्यक्रमही मोजकेच असायचे. एकत्र कुटुंबपद्धती होती त्यामुळं बंधनं सांभाळत लोक जगत होते. परदेश प्रवास, ब्रँडेड कपडे, इंपोर्टेड सौंदर्यप्रसाधने वापरुन रंगरंगोटी करणं हा गोष्टी नव्हत्याच.
पण बदलत्या काळानुसार हे सगळं या पिढीनं अंगिकारलं आणि मागील पिढीनं नाईलाजाने स्विकारलं.
पिझ्झा पास्ता, नुडल्स, ब्रेड बिकीटं असे मैद्याचे पदार्थ खाऊन वाढत चाललेली जाडी हे काळजी करायला लावणारं प्रकरण ठरत आहे आणि बहुतेक सर्व आजारांचं मूळ जाडी, वाढलेलं वजन हेच सांगितलं जातं.
अगदी विवाहीत जोडप्याला वंध्यत्वासाठी, पण वजन कमी करायला सांगितलं जातं. ब्लडप्रेशर मधुमेह या रोगांवर उपचार करताना जाड लोकांना वजन कमी करा असा सल्ला दिला जातो.
व्यवस्थित घेतलेला आहार हा शरीरातील ऊर्जा टिकवून कामं करण्यासाठी उत्साह देतो. रोजच्या आहारामध्ये थोडासा केलेला बदल वाढतं वजन आटोक्यात ठेवायला मदत करतो.
कोणतीही गोष्ट योग्य रीतीने राबवली, तर जगात अशक्य काहीच नाही. सतत वाढून टोचणारा वजनाचा काटा पाहून निराश होऊन जाऊ नका. काही पथ्यं पाळा, शिस्त लावून जीवनशैलीत बदल करा आणि वजनवाढ टाळा!!!
१. नियमित व्यायाम-
खूपदा आपण आरंभशूर असतो. वजन वाढू लागलं, की ठरवतो उद्यापासून व्यायाम करायचाच. पण, एकतर हा “उद्या” उगवत तरी नाही किंवा व्यायामाचा नेम पूर्णतः पाळला जात नाही.
सुरवातीला दोन चार दिवस, आठवडाभर व्यायाम केला जातो आणि काहीतरी निमित्ताला टेकून व्यायाम बंद केला जातो.
जो व्यायाम करणार आहात त्यात सातत्य ठेवा. फिरायला जात असाल तर नेमाने जा..जिमला जात असाल तर चुकवू नका. ठरलेला व्यायाम सातत्याने करा.
२. डाएट चार्ट बनवा-
वजनवाढीचं सगळ्यात मोठं कारण अरबट चरबट खाणं. ते बंद करा. आणि खाण्याचंही वेळापत्रक बनवा.
त्यासाठी आवश्यक असलेलं प्रोटीनयुक्त अन्नच घ्या. त्यानुसार आवश्यक असलेल्या विशिष्ट भाज्या, दलिया, ताक, वगैरे गोष्टी जेवणात समाविष्ट करा.
बनवलेल्या चार्टनुसारच जेवणखाण ठेवा. अध्येमध्ये चरत रहायची सवय सोडून द्या.
३. तल्लफ आवरा-
एखादी गोष्ट आवडते…खूप आवडते…खूप खूप खूप म्हणजे खूपच आवडते!!! आवड, हौस, हव्यास आणि व्यसन हे टप्पे असेच असतात.
एखादी गोष्ट आवडणं ही एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आवड असते. थोडी जास्त आवडू लागली की ती हौस होते. हौसेची मर्यादा ओलांडली, की तिचा हव्यास होतो आणि हौसेने मर्यादा ओलांडली की तिचं व्यसन होतं.
तल्लफ हा त्या व्यसनाचाच प्रकार. लहर आली की चहा प्यायचा..लहर आली म्हणून बटाटेवडे खायचे..हे करु नका. टाळा!!! कारण तल्लफ आली म्हणून खाल्लं हे करुनच जाडी वाढते आणि आपल्याला समजतही नाही.
४. स्वतःला बक्षिस द्या-
वजन कमी करण्याचा प्रयत्न करताना एक टारगेट ठरवा आणि त्याचवेळी हे टार्गेट पूर्ण केलं की काय घ्यायचं हे पण ठरवा.
उदा. एखादा मस्त ड्रेस, किंवा आणखीही आवडती वस्तू. म्हणजे “एवढ्या कालावधीत मी इतकं वजन कमी केलं, तर मला हा ड्रेस घेईन”..मग तो मापात यावा म्हणून आपोआपच तुम्ही प्रयत्न करत राहता. बघा…जिंकता का बक्षिस!!!
५. लवकर जेवा-
–
हे ही वाचा – वजनवाढीच्या भितीने तूप नको म्हणताय? मग तुपाचे हे फायदे वाचाचं
–
लवकर हा आपल्या परंपरेतला फार महत्त्वाचा शब्द आहे. लवकर निजे लवकर उठे त्या ज्ञान आरोग्य आणि संपत्ती भेटे हे पूर्वापार चालत आलेलं वाक्य आहे.
लवकर उठून लवकर आवरा, लवकर आणि व्यवस्थित जेवा. संध्याकाळीही लवकर जेवायची सवय करा. पचनशक्ती सुधारते. तक्रारी कमी होतात आणि वजनवाढीचं संकट टळू लागतं.
६. उठल्यानंतरच रुटीन नीट पाळा –
सकाळी लवकर उठून कोमट पाण्यात विशिष्ट औषधी वनस्पती किंवा मसाले मिसळून प्या. जसं मध, लिंबाचा रस,किंवा ग्रीन टी. यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते.
चहा कॉफी ऐवजी असंच काहीसं घेत जा. याचा परिणाम नक्कीच दिसेल.
७. जंक फूड टाळा-
वेफर्स किंवा पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज असं जंक फूड शक्यतो टाळा. कारण वजनवाढीचा भस्मासूर या जंकफूडचीच देणगी आहे. त्यानं तुम्हाला खाण्याआधी तुम्हीच हे असे पॅकेटबंद तळकट, तेलकट पदार्थ टाळा.
८. साखर खाऊ नका –
वजनवाढीत मोठी भूमिका साखरही बजावते. साखरेऐवजी गूळ मध किंवा गुळाची पावडर यांचा वापर करा.
९. अन्न सावकाश चावून खा –
एक घास बत्तीस वेळा चावावा असं सांगितलेलं आठवतं का? त्यामुळं अन्नपचन सुलभ होते. घाईघाईत खाल्लेलं अन्न पचवण्यासाठी आतड्यांना जास्त श्रम पडतात. पचनसंस्थेवर त्याचा ताण येतो.
१०. भरपूर पाणी प्या-
मानवी शरीर ज्या पंचमहाभूतांचे बनलेले आहे त्यातील पाणी हे एक. त्याची शरीराला नितांत आवश्यकता असते. दिवसाला कमीत कमी दोन ते चार लिटर पाणी प्यावे.
वजन आटोक्यात आणण्यासाठी याचाही उत्तम उपयोग होतो.
११. हिरव्या भाज्यांचा समावेश –
कंदमूळ, हिरव्या कच्च्या भाज्या यांचं सेवन करा. त्याचबरोबर चहा कॉफी ऐवजी हर्बल टी, काढा यांना प्राधान्य द्या.
१२. जेवताना एकाग्र चित्ताने जेवा-
आजकाल लोक जेवताना मोबाईल, लॅपटॉप घेऊनच जेवतात. टिव्हीसमोरच जेवायला बसतात हे बंद करा. शांतपणे जेवण जेवा.
मन भरकटवणाऱ्या गोष्टी जेवताना करु नका. वादावादी टाळा. सहाही रस जेवणात असू द्या.
१३. स्वयंपाक करा-
स्वयंपाक करुन बघा…एकदा अंदाज येईल जेवण बनवताना काय काय करावं लागतं. त्या कष्टांमुळं अन्न टाकायची,अन्नाला नावं ठेवायची सवय मोडेल आणि चांगलं आरोग्यदायी जेवण जेवायची सवय लागेल.
–
हे ही वाचा – वजन घटवण्यासाठी आहार कमी करायची गरज नाही, विश्वास बसत नाहीये? मग हे वाचा
–
१४. चौरस आहार घ्या-
उत्तम आरोग्यासाठी चौरस आहार आणि षड्रस अन्न जेवणात असू द्या. तिखट, गोड, कडू, आंबट, खारट, तुरट या चवींचा समावेश असलेला आहार म्हणजे षड्रस. असा आरोग्यपूर्ण आहार तुमचं आरोग्य आणि वजन आटोक्यात ठेवायला मदत करतो.
===
महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.