शाब्दिक कुरघोड्या करणाऱ्या वकिलांचा गणवेश “काळा कोट – पांढरा बॅंड” मागची कहाणी!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
दामिनी सिनेमातला तारीख पे तारीख डायलॉग म्हणणारा सनी देओल आठवा किंवा पिंक सिनेमातले नो मीन्स नो म्हणणारे आपले बच्चन साहेब आठवा!
ह्यांना पाहिलं किंवा हे असे कोर्ट रूम ड्रामा सिनेमे पाहिले की आपल्याला वाटतं की कोर्ट कचेरी मधली कारवाई अशीच असते, अशाच त्या मोठ्या रूम्स असाव्यात, लोकं आणि मिडियाची गर्दी असावी!
पण प्रत्यक्षात असं काही नसतं, सिनमात दाखवलेलं कोर्ट आणि खरी कारवाई यात जमीन आसमानाचा फरक असतो! फक्त एक गोष्ट जी आहे ती मात्र हुबेहूब असते!
ती म्हणजे या कोर्टरूम्स मध्ये एकमेकांवर शाब्दिक कुरघोड्या करणारे एकमेकांना आपले मित्र संबोधून शत्रू सारखे वागणारे वकील!
वकील म्हटलं की आपल्यासमोर येतो सुटाबुटातील एक सुशिक्षित माणूस, आणि लक्षात राहतो त्याचा काळा कोट!
काळा कोट घातलेली आणि गळ्याला पांढरा बँड लावून फिरणारी व्यक्ती दिसली की कोणालाही खात्रीशीर सांगता येईल की तो वकील आहे म्हणून!
पण कधी तुमच्या मनात विचार आलाय का की, वकिलांना काळा कोट आणि आणि गळ्यावर पांढरा बँड का परिधान करावा लागतो?
दुसरं काही परिधान करण्याची परवानगी नाही का?
याच सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊ या.
वकिलांच्या ड्रेस कोडची सुरुवात एडवर्ड तिसरा याने १३२७ साली केली.
त्याकाळी रॉयल कोर्टामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक न्यायाधीशासाठी एक पेहराव असावा असे सुचवले. पुढे १३ व्या शतकाच्या समाप्तीपर्यंत त्याने ठरवलेला पेहराव काहीसे बदल करून बंधनकारक करण्यात आला.
त्याकाळी सार्जंट आपल्या डोक्यावर केसांचचा विग घालून बसायचे आणि सेंट पेल्सकॅथेड्रलमध्ये प्रॅक्टिस करायचे. तेव्हा वकिलांची स्टुडंट, प्लीडर, बेंचर आणि बॅरिस्टर या चार भागांमध्ये विभागणी करण्यात आली होती.
त्या काळात सोनेरी लाल कपडे आणि खाकी रंगाचा गाऊन परिधान केले जात असत.
१६०० साली या ड्रेसकोडमध्ये काहीसा बदल झाला आणि १६३७ साली प्रीवी काऊन्सीलने सांगितलं की,
समाजानुसार न्यायलयाने कपडे परिधान केले पाहिजेत.
तेव्हापासून वकिलांनी पूर्ण अंग झाकले जाईल एवढ्या लांबीचा गाऊन घालण्याची प्रथा सुरु झाली. तेव्हा असं मानण्यात यायचं की,
गाऊन आणि विग न्यायाधीश आणि वकिलांना इतर व्यक्तींपासून वेगळं दर्शवतात.
१६९४ साली राणी मेरीच्या मृत्युनंतर राजा विल्यम याने सर्व न्यायाधीश आणि वकिलांना राणीच्या मृत्यूच्या शोकाचे प्रतिक म्हणून काळा गाऊन परिधान करून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. तेव्हापासून राजा विल्यमने दिलेला आदेश कधीही मागे घेण्यात आला नाही आणि वकील आणि न्यायाधीशांचा काळा कोट (गाऊन) हा ड्रेसकोड झाला.
न्यायाधीश आणि वकिलांनी देखील या पेहरावावर आक्षेप घेतला नाही आणि काळ्या रागांचा पेहराव मान्य केला.
भारतात अधिनियम १९६१ च्या अंतर्गत पांढरा बँड सह काळा कोट वा गाऊन परिधान करणे अनिवार्य करण्यात आले आहे. यामागची भावना अशी आहे की
या पेहरावामुळे वकिलांमध्ये एक शिस्त जोपासली जाते आणि त्यांच्या मनात न्यायाने लढण्याचा एक विश्वास निर्माण होतो. तसेच हा पेहराव त्यांना शांत आणि सन्मानजनक स्वरूप प्रदान करतो.
या पेहरावामुळे वकिलांना आणी न्यायाधीशांना समाजामध्ये ओळख मिळते.
काळ्या रंगाचा पेहराव परिधान करण्यामागे अजून एक दावा असा केला जातो की,
काळा रंग हा एकमात्र असा रंग आहे ज्यावर इतर रंग चित्रित केले जाऊ शकत नाहीत.
म्हणजेच न्यायाधीशांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असेल जो बदलता येणार नाही – आणि – वकिलांसाठी या काळ्या रंगाचा अर्थ असा आहे की स्वत:ची मते आणि विचार न्यायदेवतेसमोर मांडताना त्यांनी विवेकी आचरण करावे.
गळ्याला पांढरा बँड का?
१६४० सालापासून आपल्या शर्टाची कॉलर लपवण्यासाठी वकिलांनी लिननच्या पांढऱ्या कपड्याचा वापर करण्यास सुरुवात केली.
१८६० साली या कपड्याचे स्वरूप बदलून दोन आयताकारी भागांसारखा झाला (म्हणजे जे आताचे बँड आहेत तसा).
पांढरा रंग हा शांतीचे प्रतिक असून न्यायाधीश आणि वकिलांनी सत्याच्या बाजूने लढून समाजामध्ये शांती प्रस्थापित करावी अशी भावना पांढऱ्या रंगामागे असल्याचे सांगितले जाते.
आहे की नाही यामागे देखील एक मोठ्ठ कारण!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.