शिवडे चा प्रियकर आणि त्याच्या प्रेमाची “कथा”
आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page
===
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. माणूस प्रेमात काय करेल याचा भरोसा नसतो. अगदी काल्पनिक जगातील जलपर्वत चढणारा बाहुबली असो की खऱ्या आयुष्यात प्रेमासाठी अख्खा डोंगर पोखरून काढणारा मांझी असेल.
अश्याच या आंधळ्या प्रेमाची प्रचिती पिंपरी चिंचवडकरांना आली.
शुक्रवारी सकाळी पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर भागातील लोकांना एक वेगळंच दृश्य बघायला मिळालं.
त्यांना पिंपळे सौदागरच्या चौका चौकात जरा विचित्र बॅनर लावलेले दिसले. ज्यावर फक्त एकच मजकूर लिहलेला होता
“Shivde I Am Sorry”.
एकाच प्रकारचे अनेक बॅनर बघून लोक अचंबित झाले की नेमका हा कोणाचा प्रकार असावा?

या बॅनरनुसार एक व्यक्ती शिवडे नावाच्या व्यक्तिची माफी मागत होती.
दुपार पर्यंत हे बॅनर परिसरात चर्चेचा विषय बनले होते.
संध्याकाळी वाकड पोलिसांनी हे बॅनर छापणाऱ्या प्रिंटरचा, पोस्टर लावणाऱ्याचा आणि ज्याने हे काम सांगितलं त्या माणसाचा शोध लावला. त्यांनी सर्वांनी निलेश खेडेकर या व्यक्तीचं नाव घेतलं.
निलेश हा पिंपरीच्या घोरपडी पेठचा प्रवासी असून त्यानेच रात्रीतून बॅनर्स बनवुन घेतले.
२५ वर्षीय खेडेकर हा एका उच्चभ्रू व्यापारी कुटुंबाचा सदस्य असून त्याने त्याचा प्रेयसीची मनधरणी करण्यासाठी आणि माफी मागण्यासाठी हे सर्व केलं. कारण काही दिवसांपूर्वी त्याचा प्रेयसी सोबत झालेल्या त्याचा वादामुळे त्यांचं नातं तुटलं होतं.
ते नातं पुनरुज्जीवित करण्यासाठी त्याने हे “कलात्मक” पाऊल उचलले.
त्याने हे सर्व बॅनर अश्याप्रकारे लावले आहेत की मुंबईहून येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला ते बॅनर सहज नजरेस पडलं पाहिजे. या मागे कारण असं आहे की त्याची प्रेयसी राहायला मुंबईला गेली होती आणि ती शुक्रवारी पिंपरीत येणार होती.
केशवनगर मध्ये राहणाऱ्या मित्राची मदत त्याने याकरिता घेतली. ज्याने त्याला प्रिंटर वाल्याचा संपर्क दिला.

एका रात्रीत त्यांनी ३०० लहान मोठे फ्लेक्स छापले. दुसऱ्या दिवशी बॅनर लावणाऱ्या मुलांच्या एका गटाला या कामासाठी हाती घेण्यात आलं.
हे सर्व बॅनर बनवायला आणि प्रिंट करायला ७२००० रुपये खर्च करण्यात आला होता. अशी माहिती पकडण्यात आलेल्या मुलाने पोलिसांना दिली.
शुक्रवारी सकाळी त्यांनी ४ किमीचा साई चौक ते कल्पतरू सोसायटी मार्गावर ३०० होर्डिंग लावले होते.
जेव्हा हे बॅनर लोकांनी बघितले आणि ते सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवले गेले, लोकांना
शिवडे कोण आहे आणि हा माफी मागणारा कोण आहे?
हा प्रश्न पडला व लोक ते जाणून घेण्यासाठी वेगवेगळे तर्क लावू लागले. संध्याकाळी पोलिसांना समजलं की खेडेकर नावाच्या व्यक्तीने त्याचा प्रेयसीची माफी मागायला हे बॅनर लावले होते.
याबाबत पोलिसांनी त्याला समन्स बजावले पण मुंबईत असल्यामुळे त्याला येता आले नाही.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्या विरोधात शुक्रवार ऐवजी शनिवारी तक्रार दाखल केली आहे. या कामात खेडेकरला मदत करणाऱ्याला केशव नगर येथून अटक करण्यात आली आहे.
त्याने ते बॅनर निलेश संजय खेडेकरच्या सांगण्यावरून लावले होते अशी माहिती पोलिसांना दिली.
हा सर्व प्रकार जेव्हा खेडेकरला समजला तेव्हा त्याला धक्का बसला आणि त्याला त्याची चूक लक्षात आली.
त्याने हे सर्व त्याचा प्रेयसीच्या माफी साठी केलं होत. ह्याने संपूर्ण प्रकरण त्याचावर उलटलं. नंतर तो खेद व्यक्त करताना म्हटला कि मला एक कलात्मक पद्धतीने तिची माफी मागायची होती. पण आता मला माझी चूक लक्षात आली आहे.
यामुळे माझी , माझ्या प्रेयसीची आणि तिच्या फॅमिलीची खूप बदनामी झाली आहे.
खेडेकर हा एका श्रीमंत घरचा मुलगा असून MBA चा अभ्यास करतोय तसेच तो त्याचा फॅमिली बिझनेस मध्ये डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे.
या संपूर्ण प्रकारामुळे पिंपरी चिंचवडकरांचं खास मनोरंजन झालं असून , सोशल मीडियाला नवीन ट्रेंड देखील मिळाला आहे.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

त्याच प्रेम लक्षात घ्या, पोलिसांना विनंती आहे, ती शिवडी त्याला खूप प्रिय असेल म्हणून त्याचा आटापिटा