' चेहरा जळला पण आत्मविश्वास टिकून आहे! वाचा एका वेगळ्याच हॅंगआऊट कॅफेची गोष्ट – InMarathi

चेहरा जळला पण आत्मविश्वास टिकून आहे! वाचा एका वेगळ्याच हॅंगआऊट कॅफेची गोष्ट

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक : चेतन दीक्षित

===

आपल्या सगळ्यांना माहितीये कि तीन काळ असतात. घडून गेलेला असतो तो भूतकाळ. जो घडत असतो तो वर्तमानकाळ.

जो घडण्याची शक्यता असते तो भविष्यकाळ. ह्या कालचक्राची सुरुवात होते भूतकाळापासून.

भूतकाळ…खरंतर ज्यांनी कोणी ह्या नावांची निर्मिती केली असेल तो खरंच जीनीयस म्हटला पाहिजे… नाव आणि त्या काळाचा स्वभाव डिट्टो सारखा.

भुतासारखा पाठीवर येऊन बसणारा किंवा कधीच पाठ नं सोडणार… अर्थात हा भूतकाळ जर अदृश्य आठवणींसारखा असेल तर काळ हा त्यावर जालीम उपाय असतो.

भूतकाळातल्या कटू आठवणी कालांतराने बोथट होत जातातंच.

पण जर भूतकाळ हा दृश्य स्वरूपात असेल आणि त्याने तुमच्या दैनंदिन जीवनावर सखोल आणि दुर्दैवी परिणाम होत असेल तर हाच काळ त्या जखमा अजून कुरूप करतो!

दृश्य स्वरूपातल्या भूतकाळाला वागवणे आणि समाजात वावरणे हे अशक्यप्राय असते.

अशा वेळेस संबंधित व्यक्ती एक तर स्वतःला एका खोलीत बंद करून घेतात किंवा सरळ आत्महत्या करतात.

लक्ष्मी अगरवाल, साधारण उंचीची, गोड चेहऱ्याची मुलगी, लांबसडक केस…साधारण एका मुलीच्या मनात ज्या काही आशा, अपेक्षा, स्वप्नं असतात ती उराशी बाळगून जगणारी मुलगी.

तिच्या मैत्रिणीच्या ३२ वर्षाच्या भावाने तिला लग्नाची मागणी घातली. तिने नकार दिला. तिने दिलेला नकार त्याला सहन झाला नाही. त्याने रागाच्या भरात तिचा चेहरा ऍसिड टाकून विद्रुप केला.

हे ही वाचा –

===

 

laxmi agarwal inmarathi
OpIndia

 

तिचा भूतकाळ तिच्या चेहऱ्यासोबत विचित्रपणे वितळत तिच्या वर्तमानाला आणि भविष्यालासुद्धा घट्ट चिटकत होता.

काय वेदना झाल्या असतील! तिने काय सहन केले असेल! किती शस्त्रक्रिया कराव्या लागल्या असतील!? त्यात ती मुलगी…! आपल्या समाजात मुलीची किंमत तिच्या रुपावरुन ठरवली जाते.

अशा वेळेस लक्ष्मी जर घरात रडत बसली असती, कुढत बसली असती किंवा आत्महत्या जरी केली असती तर आपल्या दृष्टिकोनातून काहीच फरक पडला नसता.

अश्यांची कोण दखल घेतं? ती काही काळ नक्कीच रडली असेल, कुढत बसली असेल.

कदाचित आत्महत्येचा विचारसुद्धा केला असेल, कदाचित त्या काठावर गेली पण असेल…!

पण हे असले विचार परतवून तिने इतर ऍसिड अटॅकच्या बळींसाठी लढायचं ठरवलं…संबंधितांना शिक्षा झाल्यावर सुद्धा ही शांत बसली नाही.

२००६ साली जनहित याचिकेद्वारे तिने कायद्यांमध्ये बरेच बदल सुचवले. तिच्यासारख्या असंख्य स्त्रियांचे संघटन बांधले. चळवळ उभी केली.

दबाव आणला आणि २०१३ साली क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट २०१३ संमत केला गेलाय.

ज्या अन्वये ऍसिडऍटॅकच्या गुन्हेगाराला १० वर्षे ते आजन्म कारावास (सेक्शन ३२६ A) आणि पीडिताला नुकसान भऱपाई आणि त्याचबरोबर तसा प्रयत्न करणाऱ्याला ५ ते ७ वर्ष कारावास आणि पिडीताला नुकसानभरपाई (सेक्शन ३२६ B) अश्या दोन तरतुदी केल्या गेल्या आहेत.

इथेच ह्या लक्ष्मीचे कार्य थांबत नाही. ती “स्टॉप ऍसिड ऍटॅक” नावाची चळवळ चालवते. त्याचबरोबर “छांव” नावाची संस्था तिने स्थापन केलीये.

ज्याद्वारे तिच्यासारख्या असंख्य स्त्रियांचे आयुष्य कसे मार्गावर आणता येईल ह्यासाठी ती झगडत आहे.

त्या त्यांच्या पायावर उभ्या राहाव्यात ह्यासाठी काही प्रकल्प ती चालवते.

त्यापैकी एक प्रकल्प म्हणजे “शिरोज हँगआऊट”…!

हे ही वाचा –

===

 

sheroes hangout cafe marathipizza

 

नितु माहौर ग्राहकांचे स्वागत करते. ती दोन वर्षाची असताना तिच्या डोळ्यात तिच्या सख्ख्या वडिलांनी ऍसिड ओतलं होतं. ती जवळपास आंधळीच झाली आहे. तिची आई गीता सुद्धा त्याच हल्ल्यात जखमी झाली होती. ती सुद्धा ह्याच कॅफेत काम करते.

रितू – माजी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल खेळाडू – ऑर्डर्स घेण्याचे काम करते.

घरगुती वादातून तिच्या अंगावर ऍसिड फेकलं होतं, तेंव्हा ती १७ वर्षाची होती. त्यात तिचा एक डोळा गेला, नाक पूर्णपणे वितळलं, गाल फाटले, तिथून ऍसिड घश्यात गेलं.

चेहऱ्याची आणि गळ्याची त्वचा पूर्णपणे खराब झालीये.

रूपा काउंटरला बसते. जी एक उत्तम फॅशन डिझाइनर आहे. तिच्या सावत्र आईने, ती झोपली असताना तिच्या चेहऱ्यावर ऍसिड ओतलं. चेहऱ्यावरची त्वचा जळालीये.

पापण्याचा ठावठिकाणा नाहीये. वरचा ओठ विचित्र होऊन बसलाय. आंचल कुमारी अशीच अजून एक जिच्यावर, लग्नाचा प्रस्ताव धुडकावल्यामुळे, ऍसिडने हल्ला केला होता.

ह्या पाच जणी मिळून हा कॅफे चालवतात. येणाऱ्या जाणाऱ्यांचे अगदी हसून स्वागत करतात.

मनात विचार येतो, कि  असे कुरूप चेहरे पाहताना पाहणाऱ्यांच्या चेहर्यावरचे बदलणारे हावभाव माहित असताना त्यांच्याकडे हसून बघणे किती अवघड होत असेल त्यांना…!

 

sheroes hangout cafe team marathipizza

 

ह्या कॅफेतले एक जगावेगळे वैशिष्ट्य म्हणजे येथे मेनूकार्ड आहे. वेगवेगळ्या पदार्थांची यादी असते त्यात. पण उजव्या बाजूला त्याची किंमत नसते. ग्राहकांच्या इच्छेनुसार पैसे घेतले जातात.

नो घासाघीस…!

ज्या समाजात त्यांच्या रुपामुळे ज्यांना काही किंमत नाहीये अशा समाजात, ह्या पाच मुली “स्टॉप ऍसिड ऍटॅक” आणि “छांव” च्या माध्यमातून अशी सेवा देत आहेत, ज्याची किंमत त्यांनी ठरवलेली नाहीये.

त्याचीही जबाबदारी त्यांनी समाजावर टाकली आहे.

किती अवघड आहे हे सगळं? दुबळ्या व्यक्तीचे हे काम नाहीच. आणि म्हणूनच ह्या कॅफेचं नाव ठेवलंय, शिरोज हँगआऊट कॅफे… शिरो चे अनेकवचन…शिरो म्हणजे नायकाप्रमाणेच कर्तृत्ववान स्त्री.

दरवर्षी किमान एक हज़ार तरी ऍसिड ऍटॅकच्या घटना आपल्या देशात घडतात.

त्यातल्या बहुतांश घटना ह्या दाबल्याच जातात. कधी प्रेमप्रकरण, कधी मुलगी नको होती म्हणून, कधी मालमत्तेच्या वादातून तर कधी संबंधास नकार दिल्याने अश्या प्रकारचे हल्ले केले जातात.

 

acid attack inmarathi

 

संबंधित पीडितांचं नंतर काय होतं? कोणाला माहित असतं? मुळात कोणाला रस असतो? आम्हाला काहीच देणंघेणं नसतं…

आमच्या आयुष्याच्या परिघात “त्या” कधीच येत नाहीत. त्यांच्या जागी आमची आई, बहीण, बायको, मैत्रीण असू शकते हा विचार आमच्या मनाला शिवत नाही. आम्ही त्यांना “अछूत”  करून टाकतो.

ह्या समाजाने लादलेल्या अस्पृश्यतेतून एक लक्ष्मी उठते आणि समाजाच्या धारणा बदलून टाकण्याचा निश्चय करते. अर्थात तिला तश्शीच खंबीर साथ मिळते अलोक दीक्षितची.

केवळ स्वार्थाचा विचार करून खुराड्यात जगणाऱ्या आपल्यासारख्या सामान्यांना सणसणीत चपराक देऊन ही “लक्ष्मी” आमचंही जगणं “श्रीमंत” करून जाते आणि आपलं नाव सार्थ करते.

लक्ष्मी आणि तिच्या तमाम सहकाऱ्यांना एक कड्डक सलाम…!

 

हे ही वाचा –

===

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?