' शून्यापासून विश्व उभारत; सामाजिक क्षेत्रात मुशाफिरी करणारा हा उद्योजक माहित नसणं हेच दुर्दैव!! – InMarathi

शून्यापासून विश्व उभारत; सामाजिक क्षेत्रात मुशाफिरी करणारा हा उद्योजक माहित नसणं हेच दुर्दैव!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोकणातील रत्नागिरी मध्ये जन्मलेला एक माणूस मागे कोणतेही पाठबळ नसताना निव्वळ आपला प्रामाणिकपणा आणि चिकाटीच्या जोरावर मुंबईसारख्या ठिकाणी येऊन आपले उद्योग साम्राज्य उभारतो. यशस्वी झाल्यावरही आपले समाजाप्रती असलेले कर्तव्य न विसरता लोकोपयोगी कामांमुळे “दानशूर” या पदवीस प्राप्त होतो.

एखाद्या चित्रपटात शोभेल अशी ही जीवनकहाणी आहे भागोजीशेठ कीर यांची.

 

bhagojisheth keer inmarathi
saamana.com

 

१८६७ साली रत्नागिरी येथे एका गरीब भंडारी कुटुंबात भागोजींचा जन्म झाला. बाळोजी हे त्यांच्या वडिलांचे नाव. घरी अठराविश्वे दारिद्र्य. मोलमजुरी करून मिळणाऱ्या पैशातून कुटुंबाची गुजराण होई.

कोकणातील प्रतिकूलतेमुळे येथील माणूस जात्याच कष्टाळू असतो. भागोजीसुद्धा याला अपवाद नव्हते. शाळेत शिकत असतानाच इतर वेळेत कधी फुले विकून तर कधी अन्य लहानसहान गोष्टी विकून ते दोन-चार आणे मिळवत असत.

वयाच्या १२ व्या वर्षापर्यंत भागोजी शाळेत शिकले. पण घरातील परिस्थितीमुळे शाळेला रामराम ठोकून भागोजींनी मुंबईत जायचा निर्णय घेतला.

ज्या वयात सवंगड्यांबरोबर खेळायचे, अशा वयात भागोजींनी आपले नशीब अजमावण्यासाठी मुंबईला जाणाऱ्या बोटीवर पाय ठेवला.

“मार्गरब्धा: सर्वयत्ना: फलन्ति” या उक्तीचा प्रत्यय भागोजींना बोटीवरचा आला. बोटीवरच्या तांडेलाच्या मदतीमुळे भागोजी एक पैसाही न खर्च करता मुंबईत येऊन दाखल झाले.

या काळात ब्रिटिशांनी भारतात आपले पाय घट्ट रोवले होते आणि आधी मूठभर कोळी आणि इतर समाजाची वस्ती असलेली मुंबई नवे औद्योगिक आणि आर्थिक केंद्र बनू पाहात होती.

कापडगिरण्या, नौकाबांधणी असे नवनवीन उद्योग उभे राहू लागले होते. कामाच्या शोधात असणाऱ्यांसाठी मुंबई एकप्रकारचे वरदानच ठरत होती.

 

old mumbai inmarathi
pinterest.com

 

अशातच अवघ्या १२ वर्षांच्या या मुलाने मुंबईत पहिले पाऊल ठेवले. पुढे जाऊन हाच मुलगा आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांपैकी एक म्हणून गणला जाईल असा कोणी स्वप्नातही विचार केला नसेल.

कामाच्या शोधात फिरता एका सुताराने भागोजींना कामावर ठेवले. रंधा मारायला मदत करणे, हेच काम.

महत्त्वाकांक्षी माणूस साध्या साध्या गोष्टीतूनही संधी उत्पन्न करतो. रंधा मारून तयार होणारा भुसा जळणासाठी विकता येईल अशी कल्पना भागोजींच्या डोक्यात आली.

कामावरील निष्ठेमुळे त्यांनी सुताराचा विश्वास संपादन केला होताच. हा लाकडाचा भुसा विकायला भागोजींनी सुरुवात केली.

दिवसामागून दिवस जात होते. भागोजींच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण अखेर आला. गुणवान मनुष्याला त्याच्या गुणांची कदर करणारा मनुष्य मिळणे हे फार दुष्कर असते. पण या बाबतीत भागोजींचे नशीब जोरावर होते.

सुताराकडे काम करणाऱ्या या खटपट्या, पण प्रामाणिक मुलाला एका माणसाने पहिले. त्यांचे नाव पालनजी मिस्त्री – आज बांधकाम क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या “शापूरजी पालनजी” चे संस्थापक. त्यांना भागोजींची कष्टाळू वृत्ती आवडली.

 

shapoorji pallonji inmarathi
realtynxt.com

 

एक दिवस त्यांनी दुसऱ्या माणसाकरवी लाकडाच्या भुशात काही नोटा लपवून ठेवल्या. नेहमीप्रमाणे भुसा गोळा करताना भागोजींनी त्या पहिल्या. पण क्षणाचाही विलंब न लावता त्यांनी त्या नोटा योग्य व्यक्तीस परत केल्या.

ज्या वेळेस २ आण्यांचीही किंमत मोठी होती, तेव्हा अशा आयत्या मिळालेल्या लक्ष्मीमुळे भागोजी जराही विचलित झाले नाहीत. पालनजी मिस्त्री भागोजींवर बेहद्द खुश झाले.

या क्षणापासून भागोजींचे आयुष्यच पालटले. घरदार सोडून नेसत्या वस्त्रानिशी मुंबईत आलेल्या भागोजींना प्रामाणिकपणाचे जणू फळंच मिळाले होते.

पालनजी मिस्त्री मुंबईतील त्या काळातील यशस्वी बांधकाम व्यावसायिक होते. भागोजींनी पालनजी मिस्त्रींबरोबर काम करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला लहानसहान काँट्रॅक्टस घेत त्यांनी बांधकाम क्षेत्रात पदार्पण केले. कामातील सचोटीमुळे भागोजी कमी वेळातच प्रसिद्ध झाले. अनेक कामे त्यांच्याकडे येऊ लागली.

मुंबई सेंट्रल स्थानक, मरिन ड्राइव्ह येथील भिंत, सेंट्रल बँक इमारत, स्टेट बँक इमारत, ब्रेबॉर्न स्टेडियम अशा अनेक प्रसिद्ध वास्तूंच्या निर्मितीत भागोजी सहभागी होते.

 

marine drive inmarathi
indiatours.com

 

वाढत्या यशामुळे अल्पावधीतच भागोजींचे “भागोजी शेठ” झाले. आपल्याला ज्या समाजाने मोठं केलं, त्याचं आपण देणं लागतो, हा विचार भागोजी जगले.

आपला बांधकाम व्यवसाय हा भागोजींनी निव्वळ व्यवसाय म्हणून मर्यादित न ठेवता त्याचा त्यांनी लोककल्याणासाठी वापर केला.

लहानपणी आपली आई लक्ष्मीबाई हिच्यामुळे भागोजींवर धार्मिक व आध्यात्मिक संस्कार फार उत्तम झाले होते. त्यांच्यावर संत गाडगे महाराजांचा मोठा प्रभाव होता. गाडगेबुवांच्या प्रेरणेने भागोजींनी आळंदी येथे धर्मशाळा बांधून अन्नछत्र सुरु केले.

 

gadgebaba inmarathi
lokmat.news18.com

 

याच दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांना इंग्रजांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केलेले होते. स्थानबद्धतेत असूनही सावरकरांनी रत्नागिरीत सामाजिक सुधारणांचा सपाटाच लावला होता.

समाज एकत्र यायला हवा असेल तर स्पृश्यास्पृश्य भेद नष्ट केला पाहिजे या हेतूने सावरकरांनी अस्पृश्यांना मंदिरांचे दरवाजे खुले करून दिले.

या सामाजिक सुधारणेचे प्रतिक म्हणजे अस्पृश्यांसह सर्वांना मुक्त्त प्रवेश असणारे “पतित पावन मंदिर” उभारण्याचा त्यांचा मनोदय होता.

भागोजींनी तात्यारावांची ही संकल्पना उचलून धरली आणि मंदिरांचे स्वखर्चाने बांधकाम करून दिले. सर्व जातींच्या लोकांना खुला प्रवेश असणारे “पतित पावन मंदिर” त्या काळचे पहिले अशा प्रकारचे मंदिर होते.

 

patit pavan temple inmarathi
.holidify.com

 

भागोजींनी केलेले हे कार्य आज सोपे वाटत असले, तरी तत्कालीन स्पृश्यास्पृश्यता पाळणाऱ्या समाजात हे फार धाडसाचे पाऊल होते.

अशा सामाजिक ऐक्य साधणाऱ्या कार्याबरोबरच आपल्या प्रमाणे इतर गोरगरीब मुलांची शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून त्यांनी रत्नागिरीत शाळा सुरु केली.

भागोजींसाठी समाजापुढे पैसा किती दुय्यम होता याचं अजून एक उदाहरण म्हणजे दादर येथील स्मशानभूमी होय.

दादर सारख्या मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी हिंदूंसाठी स्मशानभूमी उपलब्ध नव्हती. भागोजींनी परिसराची ही गरज लक्षात घेऊन दादर मधील आत्ताच्या शिवाजी पार्क जवळ मोठा भूखंड स्वतःच्या पैशाने विकत घेतला आणि चक्क तेथे स्मशानभूमी उभारली!

खुद्द दादरमध्ये राहणाऱ्या फार कमी लोकांना आज हे माहित असेल.

आज आपण जगभरात अनेक मोठमोठे उद्योगपती पाहतो जे आपल्या दातृत्वामुळे जास्त प्रसिद्ध आहेत. पण दुर्दैवाने स्वातंत्र्यपूर्व काळात होऊन गेलेला, आपल्या मातीतील भागोजी कीरांसारखा उद्योजक मात्र विस्मृतीत गेलेला दिसतो.

आपल्या कार्यामुळे भागोजी कीर यांना “दानशूर” या सार्थ उपाधीने संबोधले गेले. योगायोगाची गोष्ट अशी, की भागोजींचा जन्म आणि मृत्यू एकाच तिथीला – महाशिवरात्रीला झाला. सन १९४१ मध्ये भागोजींचे देहावसान झाले.

दुर्दैवाने रत्नागिरी आणि दादर मधील काही ठिकाणांना भागोजींचे दिलेले नाव वगळता कोठेही त्यांच्या नावाचा साधा उल्लेखही दिसत नाही.

आज सर्व सुखसोयींनी संपन्न अशा समाजात रहात असताना स्वातंत्र्यपूर्व काळात स्वतःच्या पैशातून आयुष्यभर लोकोपयोगी कार्य करणाऱ्या भागोजींसारख्या व्यक्तिमत्वाची ओळख सर्वसामान्यांना होणे गरजेचे आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?