फलंदाज, कर्णधार – या लोकप्रिय प्रतिमेत हरवलेला “खरा धोनी”…
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : सौरभ गणपत्ये
===
महेंद्रसिंग धोनी निवृत्त होतोय. या बातमीला धक्कामुल्य म्हटलं तर काहीच नाही. म्हणजे भारताने कोरोना रुग्णांमध्ये ब्राझीलला मागे टाकलं तर जेवढी मोठी बातमी होईल तेवढंच धक्कामुल्य या बातमीला आहे.
राजीनामा त्याने केंव्हाच लिहून तयार ठेवला होता. त्याला होकार मिळाला एवढंच. त्यामुळे धोनीने निवृत्त होणं ही फक्त बातमी आहे. फार मोठी धक्कादायक घटना नाही.
गेली दोनेक वर्ष तो निव्वळ स्वतःच्या मर्जीविरुद्ध खेळत होता. त्याला ना झेपणाऱ्या जबाबदाऱ्या त्याच्या माथ्यावर थोपवल्या जात होत्या. विराट कोहलीऐवजी अजून एखादा कप्तान असता तर धोनीला जबरदस्त मोठी सलामी मिळून निवृत्ती मिळाली असती.
महेंद्रसिंग धोनी हा धडाकेबाज, फटकेबाज, धुवांधार आणि काय काय फलंदाज म्हणून प्रसिद्ध झाला हे धोनीचं सर्वात मोठं दुर्दैव आणि आपला क्रिकेटरसिक म्हणून खूप मोठा पराभव आहे.
नावाला क्रिकेट हा खेळ तीन प्रकारातले खेळाडू खेळतात. फलंदाज, गोलंदाज आणि यष्टीरक्षक. पण क्रिकेट आणि त्यातही मर्यादित षटकांच क्रिकेट हा केवळ फलंदाजांचा खेळ आहे.
एखाद्या सामन्यात सव्वा दोनशेचं लक्ष्य मोठं वाटतंय आणि बॉलर्स आनंदाने बॅटिंग करणाऱ्या संघाची वासलात लावतायत, असे सामनेच फार होत नाहीत. पण साडे तीनशे, चारशे होतायत आणि दोन्ही बाजूंच्या बॉलर्सना मार बसतोय हे बघायला प्रेक्षकांना मनापासून आवडतं.
मोठी मैदानं प्रेक्षक संख्या वाढवून लहान बनतायत, सीमारेषा जवळ येतायत, पूर्वी झेल जायचा तिकडे आता षटकार जातोय. रिव्हर्स स्विंग होतो म्हटल्यावर नियम बदलून दोन्हीकडून नवा बॉल येतो, बॅटचा दर्जा वाढलाय बॉलचा वाढवायला परवानगी नाहीय.
या अश्या वातावरणात बॉलर बनायची इच्छा असणाऱ्या मुलांचं कौतुक करायला हवं. तिसरा भाग राहिला क्षेत्ररक्षणाचा. त्याला मर्यादा असतातच.
महेंद्रसिंग धोनीचं मूल्यमापन हवं ते या आघाडीवर.
धोनी संघात यायचा काळ आठवून पहा. किरण मोरे बाहेर पडल्यावर नयन मोंगियाने २००१ पर्यंत यष्टिरक्षण प्रचंड कष्टाने सांभाळलं. पण सौरभ गांगुली संघात असताना मोंगियासारखा स्वतःसाठी बॅटिंग करणारा खेळाडू संघात राहणं शक्यच नव्हतं.
२००१ ची कलकत्ता कसोटी मोंगियाची शेवटची. त्यानंतर आपलं यष्टिरक्षणासाठी ‘धुंडो धुंडो रे साजना’ सुरु झालं. ते इतकं की चार वर्ष आपल्याला तहान लागून राहिली होती. मधल्या काळात आपल्याला दीप दासगुप्ता मिळाला. तो गोलकिपर जास्त होता. मग अजय रात्रा आला.
यष्टिरक्षणासाठी बरा होता पण फलंदाजी वाईट होती. सोळा वर्षांचा पार्थिव पटेल संघात आला. पण त्याला साडे अठराव्या वर्षी ग्रहण लागलं. जाड चष्मेवाल्याला बिन चष्म्याचं यष्टीच्या मागे उभं करावं तसं तो करायला लागला.
मग त्याला काढून दिनेश कार्तिक संघात आला आणि त्याने निव्वळ यष्टिरक्षणावर एक मॅच जिंकून दिली. (२००४ साली ऑस्ट्रेलियावर १२ धावांनी विजय मिळाला होता, तिकडे हे रात्रा, दासगुप्ता, पटेल मागे उभे असते तर २ – १ चा पराभव ३ – ० असता, आजही क्षणचित्रे पाहून समजेल).
हा दिनेश कार्तिक चांगला होता. पण फलंदाजीत थोडा मागे पडत होता. अश्यावेळी आपल्याला थोडीफार बॅटिंग करू शकणाऱ्या एका चांगल्या यष्टिरक्षकाची गरज होती. आणि महेंद्रसिंग धोनी हा नावातच मारझोड असणारा खेळाडू संघात आला.
त्याच्या पहिल्याच काही सामन्यात त्याने फलंदाजीत छाप पाडली आणि तो सुपरस्टार झाला. त्याने त्याच्या कसोटीच्या पहिल्या शतकात शोएब अख्तरला कानफडात मारावी तसा हुक मारून पब्लिकमध्ये भिरकावून दिला होता.
(त्या सामन्यात शोएबने टेनिस एल्बोमधून सावरणाऱ्या सचिनवर इतकी आग ओकली, इतकी की सचिन बाद नसताना स्वतःहून पॅव्हेलियनमध्ये गेला असं म्हटलं गेलं.)
त्याची शरीरयष्टी, त्याचे ते वेगळे केस यामुळे तो अधिक लोकप्रिय झाला, इतका की पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ त्याला म्हणाले, तुला हे केस छान दिसतात, मला विचारशील तर बदलू नकोस.
पण धोनी वेगळा ठरला तो इथे. बॅटिंगवर तो तुफान लोकप्रिय होऊ शकला असता. पण आपल्याला बॅटिंगच करून चालणार नाही हे त्याने ठरवलं असावं असा संशय येतो.
कारण फलंदाजांची रांग होती. २००७ – ०८ चा कसोटीसंघ संघ आठवून पहा.
विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, कधीतरी फलंदाज म्हणून दिनेश कार्तिक, राहुल द्रविड, सौरभ गांगुली, (कधीतरी) युवराज सिंग, व्हीव्हीएस लक्ष्मण, आणि देवाधिदेव, साक्षात सचिन तेंडुलकर.
धोनी इकडे फलंदाज म्हणून काय वेगळा चमत्कार करून दाखवणार होता?
त्याने त्याचा रस्ता निवडला. त्याने फलंदाजी तर राखलीच आणि शिवाय स्वतःला यष्टिरक्षक म्हणून भयानक बिनतोड बनवलं. इतकं की आजही धोनी हा देशातला सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक असू शकेल.
ऋषभ पंत धोनीच्या आसपासही फिरकत नाही.
आपल्याला संघात वेळ पडल्यास विकेटकिपिंग करू शकणारा फलंदाज म्हणून नाही तर बरी बॅटिंग करू शकणारा एक उत्तम विकेटकिपर म्हणून निवडलं आहे हे धोनीने स्वतःला मनाशी इतकं बजावलं की त्याचा प्रभाव संघातल्या प्रत्येक खेळाडूवर पडला.
धोनी हा आपल्याला मिळालेला कोणी रिचर्ड्स नव्हता, धोनी क्लाइव्ह लॉइड होऊ शकतो का यावर वाद होतील. पण महेंद्रसिंग धोनी हा आपला रॉडनी मार्श, ब्रूस यार्डली तर होताच, शिवाय तो आपला ऍडम गिलख्रिस्ट होता.
महेंद्रसिंग धोनी मोठा झाला कारण तो अनेक वर्ष जगातला सर्वश्रेष्ठ यष्टीरक्षक होता यावर कोणालाही बोलावंसं वाटत नाही ही शोकांतिका आहे. त्याचा त्याला प्रचंड फायदा झाला.
कसोटी सामन्यात त्याची कामगिरी खास नसूनही तो निव्वळ यष्टीरक्षक म्हणून ऐसपैस राहिला. दुसरं म्हणजे एकदिवसीय सामन्यात सर्वात जास्त दर्शन त्याचं झालं.
म्हणजे फलंदाजाच्या मागे उभा असल्याने तो सतत दिसत असे. चेहऱ्यावरचा कमालीचा गोडवा, अंगभूत शिस्तबद्धता आणि यष्टिरक्षणातलं डोळ्यात भरणारं कसब यामुळे तो लार्जर दॅन लाईफ झाला.
सचिन तेंडुलकरला कप्तानीबद्दल विचारल्यावर त्याने शरद पवारांना धोनीचं नाव सुचवलं. कर्णधार म्हणून त्याची प्रत्येक सामन्यातली वागणूक आदर्श होती.
तो कधी आनंदाने फार नाचला नाही (सिक्सर मारून विश्वचषक जिंकून दिल्यावरही तो नाचला नाही), चेहऱ्यावरचा तणाव त्याने कधी दाखवला नाही. लोकांना मान देणं आणि स्वतः प्रकाशझोतातून दूर होणं त्याने कर्मयोग्याच्या थाटात केलं.
त्याच्या कारकिर्दीच्या प्रारंभी दीपिका पदुकोनशी त्याचं नाव जोडलं गेलं. मिस्टर इंडिया हळूच गुल व्हावा तसं ते प्रकरण अदृश्य झालं. एक सामना सचिन तेंडुलकरने शतक झळकावून जिंकून दिला.
लक्ष्य गाठेपर्यंत धोनी उतरला होता. विजय मिळाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये परतताना धोनी मध्येच थांबला.
सचिन पुढे एकटा गेला कारण संपूर्ण फोकस त्याच्यावर असताना आपलं मध्येच काय हा विचार कर्णधार असूनही धोनी करू शकत होता. म्हणून तो अत्यंत तल्लख आणि तितकाच चांगला व्यावसायिक खेळाडू झाला.
त्याच्या काळात त्याने सर्व प्रकारचे विश्वचषक जिंकून दिले. सामन्यात असताना त्याचा वावर गोलंदाजांना एक उब देई. इतकी, की ती प्रेक्षकांना जाणवत असे. मोठ्या भावासारखा त्याचा वावर होता.
मान तर त्याला इतका होता, की त्याला मंजूर नसेल तर तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली जात नसे. त्याच्या मर्जीविरुद्ध कोणी वागतही नसे इतकी त्याची नजर आणि समज तीक्ष्ण होती.
याला अपवाद फक्त रवींद्र जडेजाचा, त्याने चक्क काहीवेळा धोनीच्या विरुद्ध जाऊन दाद मागायला लावली आणि तो योग्यही ठरला.
त्याच्या क्षेत्ररक्षणात चित्याची चपळाई होती. म्हणूनच, महेंद्रसिंग धोनी म्हणजे हेलिकॉप्टर शॉट, एवढं बाजूला ठेवलं तर हा माणूस म्हणजे मोठा अध्याय आहे.
मध्यंतरी त्याच्यावर एक अनटोल्ड स्टोरी वगैरे सांगणारा अत्यंत बकवास सिनेमा येऊन गेला. बकवास म्हणायचं कारण एक तर त्याच्या प्रेमप्रकरणांशिवाय त्यात काही विशेष नव्हतं.
आणि दुसरं म्हणजे संपूर्ण सिनेमा त्याच्या हातात विकेटकिपिंगचे ग्लोव्हज कधी दाखवले हे आठवावं लागतं. बायोपिक किती फालतू असावा हे एक उदाहरण.
त्याच्या या धीरगंभीर स्वभावाचा त्याला एवढा फायदा झाला की त्याच्या खराब कामगिरीतही लोक त्याच्यामागे भक्तासारखे उभे राहिले. (कामगिरीत सातत्य नसताना हा फायदा रोहित शर्माला मिळाला, आणि जेंव्हा रोहितची कामगिरी बिनतोड होऊ लागली तेंव्हा त्याला मुंगळ्यासारखे नवीन चाहते मिळाले).
वाईट वागणूक असल्यास आपल्यामागे सदिच्छा नसतात. कामगिरी खालावली की कारकीर्द संपू शकते. चेन्नई सुपरकिंग्सचा संघ वादग्रस्त होता. त्याच्यावर बंदी आणली गेली. पण कर्णधार म्हणून धोनीवर ओरखडाही नाही उमटला. हे त्याचं जबरदस्त यश.
विश्वचषक जिंकण्याची अजोड कामगिरी केल्यानंतर इंग्लड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आलेले लाजिरवाणे पराभव लोक विसरत नाहीत, पण धोनीला शिव्याशाप कमीच आले.
२०१५ नंतर त्याची फलंदाज म्हणून धडाकेबाज कामगिरी कमी झाली. २०१८ सालापासून तो शरीरभाषेतून ओरडून ओरडून निवृत्ती मागत होता.
त्यावर्षी चेन्नई सुपरकिंग्सने आयपीएल जिंकली तर कर्णधार धोनी तो कप सोडून मुलीशी खेळण्यात समाधान मानत होता. स्वतःच्या कुटुंबासाठी आपल्याला वेळ काढायचाय, हा त्याच्या आयुष्याचा फोकस होता.
पण त्याला ते विराट कोहलीने करू दिलं नाही. सामन्यात अडचणींशी लढायची वेळ आली, की विराट सीमारेषेवर जाऊन उभा राहायचा आणि धोनी मोर्चा सांभाळायचा. इतरही वेळी धोनीलाच विचारून तिसऱ्या पंचाकडे अपील जात राहिलं.
विराट हा कधीच कर्णधार म्हणून विराट झाला नाही. त्याला ‘महेंद्रसिंग कोहली’ हाच कर्णधार हवा होता.
विराटचा हट्ट नडला. २०१९ च्या पराभवाचं खापर धोनीवर फुटलं कारण मात्र थकलेला धोनी आता बॅटिंगमध्ये १०० टक्के देऊ शकत नव्हता. त्याने मनाने तेंव्हाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडलं असावं.
त्याची निवृत्ती सचिन तेंडुलकरसारखी ग्रँड होऊ शकली असती. कोरोनाव्हायरसला तेही मंजूर नव्हतं.
वाघ शूर की सिंह मोठा, यावर वांझोट्या चर्चा होतात. कुत्रा कोल्हा आणि लांडगा यांच्यात कोण सरस या चर्चा होता. गेंडा पाणघोडा, म्हसोबा की बैल यांची तुलना होते.
हत्तीशी तुलना करायला दुसरं कोणीच सापडत नाही. जंगलात तोच मोठा असतो. बाकीचे फक्त ‘असतात’.
अप्रतिम इंग्रजी, तुफान निरीक्षण, अत्यंत तीक्ष्ण नजर, खेळाची जबरदस्त समज आणि मूळची लोकप्रियता यांच्या जोरावर धोनी नक्कीच सुनील गावस्करच्या तोडीचा समालोचक बनू शकेल.
निव्वळ ते ऐकणं हा क्रिकेट खेळणाऱ्या लहान मुलांसाठी शिकवणीचा भाग असेल. केवळ तेव्हढ्यावरही तो खेळाडूंच्या नवीन पिढ्या घडवू शकेल.
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.