तोंडातून रक्त आलं तरीही गाण्याचा ध्यास न सोडणारा कलासक्त गायक!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
“याहू चाहे कोई मुझे जंगली कहे” हे शब्द आजही कानावर पडले तरी समस्त संगीतप्रेमी लोकांच्या नजरेसमोर दोनच व्यक्ती उभ्या राहतात एक म्हणजे शम्मी कपूर आणि दुसरी म्हणजे ग्रेट मोहम्मद रफी!
आजही कित्येक संगीतकार ह्याच जुन्या गाण्यांना रीमिक्स किंवा रिमेक करून करोडो रुपये आणि प्रसिद्धी मिळवत आहेत. ते म्हणतात ना जुनं तेच सोनं अगदी त्याप्रमाणेच ह्या जुन्या गाण्यांना रिमेक करत काही संगीतकारांनी त्या गाण्यांना न्याय दिला तर काही संगीतकारांनी त्यांची माती केली!
पण ह्या रिमेक रीमिक्स आणि रॅप च्या युगात आजही रेट्रो हिंदी म्युझिक म्हणजेच जुन्या चित्रपटातली गाणी ही तग धरून उभी आहेत.
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
—
आजही कित्येक लोकांच्या मनावर ही जुनी गाणी राज्य करतायत, त्याचं एकमेव कारण म्हणजे त्या संगीतातला गोडवा, आणि सचोटी आणि त्यासाठी प्रत्येकाने घेतलेली मेहनत!
मोठ्यातल्या मोठ्या गायकापासून लहानातल्या लहान टेक्निशियन पर्यंत प्रत्येक जण अगदी सचोटीने मेहनत घेऊन त्या गाण्यावर काम करत असे म्हणूनच आजच्या काळातली लोकं त्या गाण्यांशी लगेच कनेक्ट देखील होतात!
सैगल, एस. डी. बर्मन, पंचमदा, ओपी नय्यर, मदन मोहन, शंकर जयकिशन, लक्ष्मीकांत प्यारेलाल अशा कित्येक दिग्गज संगीतकारांनी त्यांचं आयुष्य वेचलं आहे ही अजरामर गाणी देण्यासाठी!
त्याप्रमाणेच किशोर कुमार, लता मंगेशकर, मन्ना डे, मुकेश आशा भोसले अशा कित्येक दिग्गज गायकांनी ह्या संगीतकारांच्या अप्रतिम रचनांना आवाज दिला ज्यामुळे ती गाणी अजरामर झाली!
त्यापैकीच एक अत्यंत गुणी, साधा आणि कीर्तीवंत कलाकार म्हणजे मोहम्मद रफी!
ह्या जगात अशी व्यक्ती मिळणं अवघडच जीला रफी साहेब आवडत नाहीत. कारण रफी ह्यांचा आवाज प्रत्येक स्तरातल्या माणसांच्या काळजाला हात घालणारा आहे, ज्याला आपण स्वर्गीय आवाज असे संबोधतो!
अत्यंत गुणी, मेहनती आणि यशस्वी कलाकार असून देखील रफी ह्यांना कुठल्याच गोष्टीचा गर्व नव्हता. अगदी रस्त्यावर आंधळ्या भिकाऱ्याच्या बाजूला बसून सुद्धा त्यांच्या दोस्ती ह्या सिनेमातले गाणे त्यांनी म्हंटल्याचे किस्से आपण सगळेच ऐकून आहोत!
शिवाय मोहम्मद रफी ह्यांनी गायलेल्या गाण्यांची यादी करायला घेतलं तर ती यादी कधीच संपणार नाही. कारण फक्त हिंदीच नाही तर मराठी, पंजाबी, बंगाली अशा कित्येक भाषांमध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या आवाजाने त्या गाण्यांना चार चाँद लावले आहेत!
रफी साहेबांनी प्रत्येक गायकाबरोबर गाणी म्हंटली आहेत तसेच त्यांच्या काळातल्या बहुतेक करून प्रत्येक संगीतकारावर त्यांच्या मधुर आणि थेट काळजाला भिडणाऱ्या आवाजचं गारुड होतं. त्यामुळेच रफी ह्यांच्या संगीत कारकीर्दीचा आवाका हा अफाट आहे!
आज रफी साहेब शरीराने इथं नाहीत पण त्यांच्या गायकीतून ते आपल्या प्रत्येकाच्या मनात आहेत आणि सदैव राहतील. गेल्याच महिन्यात ३१ जुलैला त्यांची पुण्यतिथि होती.
साऱ्या देशभरात आजही गाण्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या स्वरूपात रफी साहेबांचे स्मरण केले जाते!
रफी साहबांच्या स्वभावाचे त्यांच्या गायकीचे बरेच किस्से आपण ऐकले असतील पण आज आम्ही तुम्हाला रफी साहेबांची अशी एक आठवण सांगणार आहोत ज्यावरून तुम्हाला त्यांच्या मेहनतीचा आणि त्यांच्या डेडिकेशनचा अंदाज येईल!
गाण्यांचा शास्त्रीय दृष्ट्या अभ्यास केला गेला तर १९५२ साली आलेला बैजू बावरा हा सिनेमा संगीताच्या दृष्टीने आजही उत्कृष्ट मानला जातो!
मुघल साम्राज्यातल्या राजगायक तानसेन ह्याला चॅलेंज करणाऱ्या बैजू बावरा ह्या गायकाची ही कहाणी होती. म्युझिकल ड्रामा असलेला हा सिनेमा त्यातल्या गाण्यांसाठीच जास्तकरून पसंत केला गेला!
भारत भूषण आणि मिना कुमारी ह्यांनी या सिनेमात मुख्य भूमिका निभावल्या होत्या. सिनेमा उत्तमच होता पण यातली गाणी ही खूप विशेष होती!
कारणही तसंच होतं. प्रसिद्ध संगीतकार नौशाद ह्यांनी यातल्या गाण्यांना चाल दिली होती तर शकिल बदायुनि ह्यांनी ह्या गाण्यांचे शब्द लिहिले होते. शिवाय उस्ताद आमिर खान, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी ह्यांनी त्या गाण्यांना आवाज दिला होता!
दुग्धशर्करा योग काय असतो ते यावरून तुम्हाला समजलं असेलच. मग काय गाणी तर सुपरहीट होणारच होती. आणि संगीताची पार्श्वभूमी असलेला सिनेमा म्हंटल्यावर ती गाणी सुद्धा त्या ताकदीची हवीतच!
ह्यातली कित्येक गाणी आजही लोकांच्या तोंडावर आहेत. इनसान बनो, दूर कोई गाये, आज गावत मन मेरो ह्या अशा गाण्यांनी त्या सिनेमाला एक वेगळाच टच दिला!
शिवाय शास्त्रीय संगीत, राग ह्यांची खूप सुरेख सांगड ह्या सिनेमात लोकांना अनुभवायला मिळाली, अर्थात नौशाद सारखे संगीतकार असल्यावर तो अनुभव मिळणं सहाजिकच आहे म्हणा!
“तू गंगा की मौज मै जमुना का धारा” हे लतादीदी आणि रफी ह्यांच्या आवाजातलं गाणं ऐकताना आजही मनात वेगवेगळ्या भावना दाटून येतात. एकंदरच ह्यातल्या गाण्यांमुळे हा सिनेमा आणखीन खास बनला हयाबद्दल दुमत नाही.
रफी साहेबांच्या गायकीची खासियत म्हणजे त्यांच्या आवाजाची रेंज. वरच्या पट्टीतली गाणी सुद्धा ते अगदी सहज म्हणतात, ह्यामागे त्यांचा रियाज आणि मेहनत याच २ गोष्टी आहेत!
ज्या उच्च स्वरात रफी साहेब गायचे त्या स्वरात इतर गायकांनी गाणं म्हणजे किंचाळण्यासारखंच असे! कारण एवढी मोठी रेंज फक्त रफी साहेबच गाठू शकत.
ह्या सिनेमातले एक गाणे सुद्धा असेच विलक्षण होते. ते म्हणजे “ओ दुनिया के रखवाले.” हे गाणं आजही लोकांना आठवलं तरी त्यांच्यासमोर येतो तो म्हणजे गगनाला भिडणारा रफी साहेबांचा आवाज!
हे गाणं आणि त्या गाण्यातल्या सप्तकातला परमोच्च बिंदु गाठण्यासाठी रफी साहेबांनी खूप मेहनत घेऊन तो पॉइंट गाठून दाखवला. गाणं तर सुंदर रेकॉर्ड झालं.
पण जेंव्हा रफी साहेब गाणं रेकॉर्ड करून आले तेंव्हा मात्र त्यांच्या गळ्यातून रक्त आलं होतं. ह्या घटने नंतर काही काळ रफी गाऊ शकले नव्हते!
काही लोकांनी रफी आता संपले असं म्हणायला ही सुरुवात केली. काहींनी तर रफी आता गाणार नाहीत असं सुद्धा म्हंटलं!
पण अखेर रफी साहेब ह्यांनी कमबॅक केलाच आणि ह्याहीपेक्षा कित्येक अवघड आणि वरच्या सुरातली गाणी रेकॉर्ड करून संगीत प्रेमींच्या मनात स्वतःच स्थान मिळवलं ते कायमचं!
संगीतावर इतकी निष्ठा असलेला सच्चा, मेहनती आणि तितकाच निर्मळ मनाचा कलाकार पुन्हा होणे नाही, मोहम्मद रफी पुन्हा होणे नाही. अशा स्वर्गीय आवाज असलेल्या मोहम्मद रफी ह्यांना इनमराठी टीम तर्फे मानाचा मुजरा!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.