' भारतात या मंदिरांमध्ये रामायणातील महाखलनायकाची पूजा आजही केली जाते – InMarathi

भारतात या मंदिरांमध्ये रामायणातील महाखलनायकाची पूजा आजही केली जाते

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. प्रांत, भाषा, संस्कृती, खाद्यसंकृती, वेशभूषा अशा प्रत्येक गोष्टींमध्ये इथे विविधता आढळून येते.

‘जैसा देस वैसा वेस’ ह्या उक्तीप्रमाणे माणसाने सगळ्या परिस्थितीशी जुळवून घेतले आहे, आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे बदल घडवून आले आहेत.

प्रांत, भाषा इत्यादी गोष्टींमधे तर विविधता आहेच त्याचबरोबर श्रद्धास्थाने देखील निरनिराळी आहेत.

आपल्याकडे घराघरांमध्ये लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच रामायण-कथा माहित आहे. भगवान विष्णूंचा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीरामांची ही कथा आहे, ज्यामध्ये श्रीरामांच्या अनुषंगाने इतरही अनेक कथा आल्या आहेत.

ह्यातील घटनांमुळे “लोकोत्तर पुरुष” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्रांना आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श भाऊ, आदर्श राजा इत्यादी अनेक उपाधी दिल्या आहेत!

इक्ष्वाकु कुळातील पराक्रमी राजांपेक्षा सगळ्यात जास्त पूजनीय, वंदनीय प्रभू रामचंद्रांनाच मानले जाते ह्याचे कारण म्हणजे, रामचंद्रांचे कार्य इतर राजांपेक्षा श्रेष्ठ होते.

 

ramayana inmarathi
Indiatoday.com

 

त्यांचे आपल्या प्रजेप्रती प्रेम, निष्ठा कधीच कमी झाली नाही. आपल्या कुटुंबाप्रमाणेच त्यांनी प्रजेला सांभाळले.

मोठ्यांना आदर देणे, त्यांच्या सर्व आज्ञांचे पालन करणे, राजसत्तेचा मोह नसणे, परस्त्री बाबत कधीच वाईट हेतु न ठेवणे, आपल्या भावंडांमध्ये सख्खे-सावत्र असा भेदभाव न करणे, दशरथाच्या सर्वच भार्यांना आपल्या मातेचा दर्जा देणे, आपल्या पत्नीला-सीतेला जीवापाड प्रेम देणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे प्रभू रामचंद्र श्रेष्ठ ठरतात.

श्रीरामचंद्रांच्या आदर्श वागण्यामुळे आजही जागोजागी त्यांची पूजा केली जाते. ठिकठिकाणी त्यांची मंदिरे आहेत.

 

ram mandir inmarathi
enavakal.com

 

दसऱ्याला रामचंद्राचा विजय झाला. हा विजय अर्थातच उन्मत्त झालेल्या, मनुष्यत्त्व सोडून राक्षससारखे वर्तन केल्यामुळे ‘असुर’ झालेल्या रावणाविरूद्ध होता.

आजही रावणाच्या प्रतिमेचे दसऱ्याला  दहन केले जाते, उत्सव साजरा केला जातो.

पण तुम्हाला ठाऊक आहे ह्या रावणाची जशी श्रीलंकेत मंदिरे आहेत, तशीच भारतातही काही ठिकाणी ह्या रावणाची मंदिरे आहेत. तिथे रावणाची पूजा केली जाते.

दैत्य, असुर, राक्षस समजला जाणारा रावण वेदाध्यायी होता, त्याला दशग्रंथी म्हंटले जाते. म्हणजेच वेद, वेदांगे ह्यांचा गाढा अभ्यासक होता. अतिशय तेजस्वी, पराक्रमी असणारा हा रावण कुशाग्र, बुद्धिमान होता.

तो भगवान शंकराचा निस्सीम भक्त होता. कठोर तप करून त्याने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले होते आणि वरप्राप्ती करून घेतली होती.

अशा ह्या रावणाच्या भारतातील मंदिरांबदद्ल आज आपण माहिती करून घेऊया!!

 

 काकिनाडा रावण मंदिर, आंध्र प्रदेश

 

ravan temples india inmarathi
walkthroughindia.co

 

आंध्र प्रदेशात पूर्व गोदावरी जिल्ह्यात असणाऱ्या काकिनाडा ह्या गावामध्ये रावणाचे मंदिर आहे.

असे म्हटले जाते, की रावणाने ह्या ठिकाणी भगवान शंकराचे मंदिर बांधण्याचे ठरविले होते. आज तेथे शिवलिंगाचे भित्तीचित्र आहे.

रावणाची भव्य मूर्ती असणारे हे मंदिर समुद्र किनारी आहे. आजही येथे रावणाची पूजा केली जाते आणि हे पर्यटकांच्या आकर्षणाचे स्थान आहे.

 

दशानन मंदिर, कानपूर- उत्तर प्रदेश

 

ravan temples india inmarathi1
hindi.lifeberrys.com

 

जवळपास १२५ वर्षे जुने, शिवाला भागात असणारे हे मंदिर इ.स. १८९० मध्ये राजा गुरु प्रसाद शुक्ल ह्याने बांधले आहे. दसऱ्याला इतरत्र रावणदहन केले जाते आणि ह्या मंदिरात रावणाची पूजा केली जाते.

संपूर्ण वर्षभर बंद असणारे हे मंदिर सर्व भाविकांसाठी फक्त दसऱ्याला उघडले जाते.

या मंदिराचे विश्वस्त के.के. तिवारी असे नमूद करतात, की निस्सिम शिवभक्त असणारा रावण अत्यंत बुद्धिमान होता, विद्वान होता. त्यामुळे त्याचे मंदिर बांधण्यात आले.

दसऱ्याला येथे मातीच्या दिव्यांनी रोषणाई करून रावणाची पूजा केली जाते. दसऱ्याला १०,००० च्या आसपास भाविक येथे येतात आणि रावणाची पूजा करतात.

 

रावणग्राम रावण मंदिर, विदिशा- मध्य प्रदेश

 

ravan temples india inmarathi2
indiatvnews.com

 

रावणाच्या नावाचेच गाव असणारे रावणग्राम हे ठिकाण मध्यप्रदेशातील विदिशा येथे आहे. रावणाची पत्नी मंदोदरी ही विदिशाचीच असल्याचे म्हटले जाते.

येथे दशानन रावणाची १० फूट मूर्ती आहे. विदिशामधे असंख्य रावण भक्त आहेत. महत्त्वाच्या प्रसंगी, सणा-सुदीला ह्या मंदिराते येऊन रावणाचे दर्शन घेण्याची येथे प्रथा आहे.

इतर वेळीही येथे भाविक रावणाच्या दर्शनासाठी येतात.

 

मंदसौर, मध्य प्रदेश

 

ravan temples india inmarathi3
indiatvnews.com

 

मध्य प्रदेशात मंदसौर जिल्ह्यात खानपूर येथे दशानन रावणाची पूजा केली जाते. येथे रावणाची ३५ फूट भव्य मूर्ती आहे. कानपूरमधील रावण मंदिराप्रमाणेच येथेही दसऱ्याला रावणाची पूजा केली जाते.

ह्या मंदिराच्या स्थापत्यकाल माहित नसला, तरी येथे हडप्पा कालीन ग्रंथ सापडल्याने हे मंदिर पुरातन असल्याचे मानले जाते.

 

रावण मंदिर, बिसरख, नोएडा, उत्तर प्रदेश

 

ravan temples india inmarathi4
indiatvnews.com

 

बिसरख हे ठिकाण रावणाचे जन्मस्थान मानले जाते. त्यामुळे तेथे महाविद्वान रावणाचे मंदिर असणे सहजिकच आहे.

ह्या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे ४२ फूट शिवलिंग आहे आणि रावणाची ५.५ फूट उंच रावणाची मूर्ती आहे.

येथील लोकं रावणाला महाब्रह्म मानतात आणि दसऱ्याला रावण दहन करण्याऎवजी येथे ह्या दिवशी रावणाच्या मृत्युचा शोक व्यक्त केला जातो.

 

रावण मंदिर, चांदपोल, जोधपूर- राजस्थान

जोधपूर येधील चौरी हे एक महाछत्र आहे. येथे पुरातन महादेव अमरनाथ आणि नवग्रह मंदिर आहे. याच मंदिराच्या परिसरात रावणाचे मंदिर आहे.

भाविक श्रद्धेने रावणाचे दर्शन घ्यायला येथे येतात. इतकेच नाही, तर येथील मुद्गल ब्राह्मण रावणाचे वंशज आहेत असे म्हटले जाते.

शिवनगरी, हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील शिवनगरी ह्या ठिकाणी सुप्रसिद्ध वैजनाथ कसबा आहे जिथे रावणाचे मंदिर आहे.

येथील लोकांची रावणावर श्रद्धा आहे. इतकेच नाही, तर त्यांचे असे मानणे आहे. की रावणाकरिता ही जागा सुरक्षित होती. येथे रामाच्या बाणापासून त्याचे रक्षण झाले असते.

 

ravan temples india inmarathi5

 

रावण मंदिर, कोलार- कर्नाटक

कर्नाटक मधील कोलार येथे रावणाची पूजा केली जाते कारण तो शिव शंकराचा महान भक्त होता. येथे फसल (धान्य) महोत्सवात रावणाची देखील पूजा केली जाते, त्याची पालखी निघते.

आता रावण वाईट की देवासमान हा वादाचा मुद्दा!! पण असुर असणारा रावण भारतातील अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे हे मात्र खरं!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?