१९७७ साली बांधण्यात आलेल्या या घड्याळाचं अजब तंत्रज्ञान आजही अचंबित करतं
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
आपल्यासाठी घड्याळ ही वस्तू तशी काही खूप वेगळी किंवा नवीन नाही. रोजच्या आयुष्यातील ही एक अत्यावश्यक गोष्ट आहे.
आपल्या शरीराचा अवयव नसला तरी आपल्या हातामध्ये ते बांधलेलं असतं, भिंतींवर टांगलेलं असतं. रोजचीच वेळ दाखवणारे घड्याळ सवयीचे असल्यामुळे त्यात कोणालाही काही नवीन वाटणार नाही.
युरोपात कितीतरी इमारतींवर घड्याळ लावलेलं असतं. प्रत्येक तासाप्रमाणे त्याचे ठोके पडतात आणि लोकांचे लक्ष वेधून घेतात. संपूर्ण शहराला किती वाजले हे समजतं.
लंडनमध्ये असे एक मोठं घड्याळ वेस्टमिनिस्टर एरियामध्ये एका इमारतीवर आहे, त्याला ‘बिग बेन’ असे म्हणतात.
स्विझरलँडचं कुकू क्लॉक सगळ्यांनाच माहीत आहे. ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधील नॅशनल गॅलरी ऑफ व्हिक्टोरिया मध्ये एक ‘ग्रँड फादर क्लॉक’ आहे.
त्या काचेच्या घड्याळाच्या मागे एक आजोबा घड्याळ्याच्या पाठीमागून प्रत्येक मिनिटाची वेळ पेन्सिलने काढत उभे असतात, आणि तासाच्या वेळेला घंटेचे जितके वाजले तितके टोले देतात.
असे निरनिराळे घड्याळ जगभरात आपल्याला पाहायला मिळतात.
परंतु वाफेवर चालणारे घड्याळ आणि त्यावर होणारे पर्यटन हा मात्र वेगळाच विषय आहे. परदेशात अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती पर्यटन होऊ शकते हेच एका वाफेवरच्या घड्याळाने दाखवून दिले आहे.
वाफेवरचे हे घड्याळ आहे ते कॅनडा मधल्या व्हँकुव्हर या शहरात. १९७७ साली बांधण्यात आलेलं हे घड्याळ लोकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे.
व्हँकुव्हर मधल्या गॅस टाऊन, चायना टाऊन आणि स्ट्रथकोना यांना जोडणारा महामार्ग निर्माण करण्याचा महापौर टॉम कॅम्पबेल यांचा विचार होता. त्याला तिथल्या नागरिकांनी पूर्ण विरोध दर्शवला.
महामार्ग निर्माण करण्यासाठी पैसा खर्च करण्यापेक्षा, तोच पैसा आसपास असणाऱ्या ऐतिहासिक इमारतींचे नूतनीकरण करून त्यांनाच आकर्षणाचे केंद्रबिंदू निर्माण करण्यासाठी वापरावा असे ठरवण्यात आले. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल हा विचार होता.
त्याचाच एक भाग म्हणजे १९७७ साली हे वाफेवरचे घड्याळ निर्माण करायचे ठरवण्यात आले. याचा मुख्य उद्देश पर्यटकांना आकर्षित करणे हाच होता.
हे घड्याळ निर्माण करण्यासाठी लागणारा पैसा देखील दुकानदारांनी, व्यापाऱ्यांनी आणि काही दानशूर व्यक्तींनी दिला. या घड्याळासाठी एकूण ५८००० डॉलर्स निधी जमा करण्यात आला.
हे घड्याळ तयार केले ते कॅनेडियन क्लॉक मेकर रेमंड साँडर्सने. हे घड्याळ पूर्णतः वाफेवर चालतं. तरीदेखील त्याला एक इलेक्ट्रिक मोटार जोडलेली आहे.
याच्यावर एक शिट्टी लावलेली आहे. अर्ध्या तास झाल्यानंतर हे घड्याळ शिट्टी वाजवते. तसेच घड्याळ आजूबाजूने वाफही सोडते.
या घड्याळाला एक स्टीम इंजिनही लावलेले आहे. समोरच्या बाजूला दोन बॉल साखळीला बांधले असून त्याला पेंडुलम देखील आहे.
हे घड्याळ कधी बांधण्यात आले? कोणी तयार केले? कसे तयार केले? याची माहिती एका लाकडी फळीवर लिहून ठेवण्यात आली आहे. या घड्याळाच्या चारही बाजूनी आपल्याला वेळ कळते.
घड्याळाच्या खालच्या बाजूस असलेल्या स्टीम इंजिनमुळे तिथे जी वाफ तयार होते, त्याद्वारे साखळी आणि साखळीचे बॉल उचलले जातात. त्याद्वारे पेंडुलम देखील हलते आणि घड्याळ चालू राहते.
वाफेद्वारे घड्याळाचा आवाज देखील निर्माण केला जातो. इतर कोणत्याही घड्याळाप्रमाणे घंटा किंवा बेल यासारखे आवाज न देता हे घड्याळ शिट्टी वाजवते.
हे स्टीम इंजिन कसे काम करते हे घड्याळ बघणार्याला दिसते. कारण या इंजिनाभोवती काच बसवली आहे.
क्वचितच घड्याळाची वेळ कधी कधी चुकत होती म्हणून आता इलेक्ट्रिक इंजिनही बसवण्यात आले आहे. हे घड्याळ बघण्यासाठी तिथे पर्यटकांची गर्दी होते.
या घड्याळाबरोबर लोक फोटो काढून घेतात, आता हल्ली तर सेल्फी काढतात. हे घड्याळ पर्यटकांचे मोठं आकर्षण केंद्र बनले आहे.
विशेष म्हणजे १९७७ सालापासून यात कोणताही मोठा बिघाड झालेला नाही.
या घड्याळाचा आणखीन एक उपयोग म्हणजे तिथे निर्माण होणाऱ्या वाफेमुळे तिथे जे बेघर लोक फुटपाथवर झोपतात, त्यांना थंडीच्या दिवसात त्या वाफेमुळे उबदार वातावरणात झोप घेता येते.
परंतु हे घड्याळ जगातलं पहिलं वाफेवरच घड्याळ नाही. याच्या आधी इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम इथे जॉन इंशा याने पहिल्यांदा असे घड्याळ १८५९ मध्ये तयार केले होते.
सुरुवातीला हे एका पबच्या दारावर बसवण्यात आले होते. लोक हे घड्याळ पाहण्यासाठी पबकडे येऊ लागले. नंतर हा पब, ‘स्टीम क्लॉक टॅव्हर्न’ या नावाने प्रसिद्धही झाला होता.
नंतर ते घड्याळ १८८० मध्ये म्युझिक हॉलमध्ये ठेवण्यात आले. त्याचाही उद्देश पर्यटकांना आकर्षित करणे हाच होता.
परंतु गॅस टाऊन मधलं रेमंड सॉंडर्सने तयार केलेले हे घड्याळ खूपच प्रसिद्ध झालं आणि मग रेमंडला असे घड्याळ बनवण्याच्या ऑफर्स येऊ लागल्या.
त्यानंतर त्यांनी जगभरात एकूण सहा अशी घड्याळ बनवली. यापैकी एक ओटारु जपान येथे आहे, तर एक इंडियाना स्टेट म्युझियम येथे आहे.
जगभरात १५० प्रकारची अशी वेगवेगळी घड्याळं रेमंड सँडरसने बनवले आहेत. ही घड्याळं जगभरात सार्वजनिक कलाकृती म्हणून ठेवण्यात आली आहेत.
व्हँकुव्हर मधलं हे घड्याळ जर तुम्हाला पाहण्याची संधी मिळाली तर त्या संधीचा जरूर लाभ घ्यावा. हे घड्याळ पाहण्यासाठी कोणतेही चार्जेस भरावे लागणार नाहीत. सर्व लोकांना मोफत पाहता येते.
दर अर्ध्या तासाला हे घड्याळ शिट्टी वाजवते. आणि लोकांचे मनोरंजन करते. हे घड्याळ पाहण्यासाठी लोकांची गर्दी कायम असते.
घड्याळ कसं काम करतं हे देखील काचांमधून स्पष्ट दिसतं. म्हणूनच संधी मिळाल्यास अशा अनेक गोष्टी जरूर पहाव्यात.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.