' रामजन्मभूमी, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यामध्ये असलेलं “टाईम कॅप्सूलचं” कनेक्शन! – InMarathi

रामजन्मभूमी, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यामध्ये असलेलं “टाईम कॅप्सूलचं” कनेक्शन!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कित्येक वर्षे रामजन्मभूमी खटल्याचा भिजत पडलेला प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने २०१९ च्या उत्तरार्धात निकालात काढला.

रामजन्मभूमी न्यासाच्या बाजूने निकाल लावत आणि वक्फ बोर्डाला ५ एकर जमीन मशिदीसाठी देऊन धर्मनिरपेक्ष राष्ट्राच्या बुलंदीवर कोर्टाने शिकामोर्तब केलं.

कोर्टाच्या सूचनेनुसार समिती गठीत झाली आणि रामजन्मभूमी न्यासाचे काम सुरू झाले.

५ ऑगस्ट २०२० ला रामजन्मभूमीच्या भूमीपूजनाचा मुहूर्त ठरला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याचा न्यासाने मानस ठेवला.

त्यानुसार आमंत्रण – निमंत्रण गेले आणि पुन्हा एकदा अयोध्या – राम मंदिर – बाबरी मशीदच्या चर्चाना उधाण आले.

मोदींची चांदीच्या वीटेची भेट, लंकेतून आलेली सोन्याची वीट, मुस्लिम तरुणाची माती घेऊन पदयात्रा, असदुद्दीन ओवैसी यांची मोदींच्या भूमिपूजनाला जाण्यावर आक्षेप असे नवनवीन विषय कानावर पडत आहेत.

 

narendra modi inmarathi
mynation.com

 

आणि त्यात नवीन विषय आला टाईम कॅप्सूलचा!

तर झालं असं की, बातमी आली राम मंदिराच्या निर्माणाच्या वेळेस टाईम कॅप्सूल तयार करून २००० फूट जमिनीच्या खाली ठेवले जातील. या टाईम कॅप्सूल मध्ये राम जन्मभूमी संबंधित माहिती सुरक्षित ठेवली जाईल वगैरे.

जशी ही बातमी बाहेर आली तशी नव्या नव्या अफवा येऊ लागल्या. बऱ्याच जणांनी याचं स्वागत केलं. विषय आलाचं आहे, तर पाहूया नेमकं हे टाईम कॅप्सूल आहे तरी काय?

टाईम कॅप्सूल हे एक प्रकारचे कंटेनर असते ज्यामध्ये काही विशेष माहिती, दस्तऐवज आणि पुरावे ठेवले जातात. हे कंटेनर सगळ्या प्रकारच्या वातावरणाला तोंड देण्यास सक्षम असतात.

जमिनीत हजारो फूट आत गाडल्यानंतर सुद्धा हजारो वर्षे याला नुकसान पोहोचणार नाही अशी याची रचना आणि निर्मिती आहे.

जमिनीच्या खाली ज्या नैसर्गिक प्रक्रिया होतात त्याला सुद्धा हे टाईम कॅप्सूल तोंड देऊ शकतात. आणि हे गंजण्याचे किंवा सडण्याच्या शक्यता कमी आहेत.

टाईम कॅप्सूल हे तांब्यासोबत विशेष धातूंच्या मिश्रणाने तयार करतात. याची लांबी जवळपास तीन फूट एवढी असते. या तांबे मिश्रित धातूची विशेषता अशी आहे की हजारो वर्षे याच्यावर कसलाही परिणाम होत नाही.

 

time capsule inmarathi
jagranjosh.com

 

म्हणून पुराव्याच्या सुरक्षेसाठी या धातूंपासून बनवलेल्या या कॅप्सूलचा वापर केला गेला. एकूणच याची बांधणी आणि निर्मिती एवढी भक्कम असल्याने काही महत्वाच्या गोष्टी साठीच यांचा वापर केला जातो.

टाईम कॅप्सूलची कल्पना कधीची आणि कोणाची?

आता पर्यंतचा सगळ्यात जुनी टाईम कॅप्सूल हा ४०० वर्षापूर्वीचा आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये स्पेनच्या बर्गोस शहरामध्ये ही कॅप्सूल सापडली होती. या कॅप्सूलची रचना येशू ख्रिस्ताच्या मूर्तीशी मेळ खात होती.

या कॅप्सूल मध्ये १८ व्या शतकातल्या तत्कालीन युरोपातील आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषयावर भाष्य करणारी अनेक कागदपत्रे मिळाली.

याच कॅप्सूलला आतापर्यंतचा सगळ्यात जुनी कॅप्सूल म्हटलं गेलं आहे. आणि याच्यापेक्षा जुनी अशी कॅप्सूल अजून सापडलेली नाही.

हे टाईम कॅप्सूल गाडायचे नेमके कारण काय?

मध्ययुगीन जगाचा इतिहास पाहिला, तर वेगवेगळ्या धर्माच्या वेगवेगळ्या राजसत्तानी एकमेकांवर कुरघोड्या करून एकमेकांचा इतिहास नष्ट केलेला आपण पाहिला आहे.

जगाचं कशाला, भारतातच पहा. मराठेशाहीच्या पाडावानंतर रायगड किल्ल्याला ब्रिटिशांनी तोफा लावून उध्वस्त केलेलं.

औरंगजेबाने सध्याच्या अफगाणिस्तानमधील उंच बुद्ध मूर्ती तोफेने फोडल्या होत्या. काशी, मथुरा येथील ऐतिहासिक मंदिरे तोडून मशिदीची निर्मिती वगैरे.

 

mughal invaders inmarathi
vina.cc

 

तर, अशा कृत्यांमुळे एकंदरीत स्थानिक इतिहास, संस्कृती ही पुसली जाते. खोदकाम करताना मिळालेल्या अवशेषांवरून फक्त तिथे असलेल्या एकंदरीत परिस्थितीवर अंदाज बांधता येतो.

तर, याच अंदाजाला मुर्त्य स्वरूप द्यायचं काम हे टाईम कॅप्सूल करते. या टाईम कॅप्सूलला जमिनीत गाडून तत्कालीन इतिहास, संस्कृती, कला यांना सुरक्षित ठेवले जाते.

एक प्रकारे तत्कालीन काळातील लोक भविष्यातील लोकांसाठी एकप्रकारची माहिती किंवा संदेश ठेवून देत आहेत. येणारी पिढी तिथला इतिहास योग्य प्रकारे समजू शकतील त्यासाठी हा अट्टहास.

कितीही आक्रमणे, राजकीय सत्तापालट झाली तरी जमिनी खाली या सर्व गोष्टी त्या टाईम कॅप्सूलच्या रूपाने सुरक्षित असतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर असेचं टाईम कॅप्सूल गाडल्याचे आरोप आहेत –

मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हा २०११ मध्ये तत्कालीन विरोधी पक्षाने त्यांच्यावर टाईम कॅप्सूल जमिनीत पुरल्याचे आरोप केले होते.

त्यांच्या मते, मोदींनी गांधीनगर स्थित महात्मा मंदिराच्या खाली टाईम कॅप्सूल जमिनीत पुरून ठेवले आहेत.

यामध्ये किती तथ्य आहे हे मात्र आजपर्यंत कोणी सांगू शकलेलं नाही.

इंदिरा गांधी यांनी सुद्धा टाईम कॅप्सूल गाडून ठेवली आहे –

जेव्हा राम मंदिराच्या टाईम कॅप्सूलची बातमी आली, तेव्हा ही पहिलीच घटना नसल्याचे सांगून जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्रोफेसर आनंद रंगनाथन यांनी एक जुना फोटो ट्विटर वर शेअर केला.

 

indira gandhi capsule inmarathi
hindi.lifeberrys.com

 

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सुद्धा कॅप्सूलचा वापर केल्याचे त्यांनी सांगितले. १५ ऑगस्ट १९७३ रोजी लाल किल्ल्याजवळ त्यांनी ही टाईम कॅप्सूल पुरली होती.

१९७७ मध्ये जेव्हा इंदिरा गांधींनी सत्ता गमावली, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी ती टाईम कॅप्सूल जमिनीतून खोदून बाहेर काढली.

पण, आतापर्यंत त्या कॅप्सूल मध्ये नेमकं काय होत यावर काहीही भाष्य केले गेलेले नाही. त्यामध्ये असं काय होतं, की जे जतन केले जाणार होते याबद्दल काहीही माहिती सध्या उपलब्ध नाही.

खरंच रामजन्मभूमीच्या जमिनीत टाईम कॅप्सूल पुरले जाणार?

रामजन्मभूमी न्यासाचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी टाईम कॅप्सूल संबंधित वक्तव्य केले. त्यांनी सांगितले की जमिनीच्या २००० फूट खाली रामजन्मभूमीच्या इतिहासा संबंधित टाईम कॅप्सूल पुरले जाणार आहेत.

या रामजन्मभूमीच्या निर्मितीचा ५०० वर्षाचा इतिहास आहे. बाबराने मंदिर पाडून मशिदीची निर्मिती, बाबरीचा विध्वंस, कारसेवा, रथयात्रा आणि तीन दशकं चाललेली न्यायालयीन लढाई यासाठी या कॅप्सूलच्या मार्गे हे सर्व जतन केले जाणार आहे.

 

ram mandir inmarathi
lehren.com

 

पण, जेव्हा टाईम कॅप्सूलच्या बातम्या वातावरण गरम व्हायला लागले, तेव्हा न्यासाचे महासचिव चंपत राय हे समोर आले.आणि त्यांनी या टाईम कॅप्सूल संबंधित सर्व बातम्यांचे खंडन केले.

कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे त्यांनी आवाहन केले. तसेच रामजन्मभूमी न्यासकडून येणाऱ्या अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा अस देखील त्यांनी आवाहन केलं.

एकूणच, रामजन्मभूमीच्या ठिकाणी टाईम कॅप्सूल जतन केले जाणार की नाही हे अजून अधांतरीच आहे. तरी या अफवेमुळे का होईना टाईम कॅप्सूल म्हणजे नेमकं काय हे भारतीय जनतेला कळलं असेल!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?