' पाकिस्तान सोबत “अमन की आशा”: भाबडा मूर्खपणा की अज्ञानी शहाणपणा? – InMarathi

पाकिस्तान सोबत “अमन की आशा”: भाबडा मूर्खपणा की अज्ञानी शहाणपणा?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

“भारत आणि पाकिस्तान ह्या दोन्ही देशांमंध्ये मैत्रीपूर्ण संबंध स्थापन व्हावेत. दोन्ही देशांनी गुण्यागोविंदाने नांदावे. ना आतंकवाद असावा, ना युद्ध, ना घुसखोरी. सगळं कसं अलबेल असावं! गरिबी, बेरोजगारी हे खरे मुद्दे असून एकमेकांशी न लढता ह्यांच्याशी लढावं दोघांनी!

पाकिस्तान शत्रू नाहीच मुळी, काश्मीरचा वाद आहे म्हणून हे भांडण चाललंय…एकदा का वाद संपला की नजर लागेल असे नांदतील दोघे सख्खे भाऊ म्हणून! म्हणून तेवढा काश्मीर प्रश्न सुटला पाहिजे.”

– ही ‘अमन की आशा’ मनात बाळगून आज अनेक भाबडे, अज्ञानी आणि अतिशहाणे लोक उपदेशाचे डोस पाजत हिंडताना दिसत आहेत. सुधींद्र कुलकर्णी, गुरमेहर कौर हे त्यातले काही जण.

ह्या गोष्टी 1947 पासून भारत सरकारला कळत नसतील का? प्रत्येक सरकारमध्ये एवढे मूर्ख लोक बसले होते का?

पाकिस्तान हा एक establishment म्हणून भारताचा उघड आणि सरळ शत्रू आहे. लोक ही सत्य परिस्थिती जितकी लवकर स्वीकारतील तितकं बरं राहील. हे शत्रुत्व जमिनीसाठी नाही. असं असतं तर भारताने कधीच पाकिस्तानला गिळंकृत केलं नसतं? 65ला लाहोर, 71ला बांगलादेश वेगळा केला होता, कितीसं अवघड होतं पाकिस्तानी जमिनीवर कब्जा करणं? पण आपण ते केलं? नाही!

हा वाद, हे भांडण जमीन बळकावण्यासाठी नाही. दुश्मनी काही अंशी काश्मीरसाठी असली तरी आता ह्यात अनेक गोष्टी येऊन मिळाल्यात आणि काश्मीरपेक्षा क्लिष्ट होऊन बसल्यात.

पाकिस्तानचे एकूण सहा प्रॉव्हिन्स आहेत. पंजाब, सिंध, बलुचिस्तान, FATA आणि NWFP (Federally Administrated Tribal Area आणि North West Frontier Province), गिलगिट-बालटीस्तान आणि खैबर पख्तुनख्वा.

सातवा भाग, ज्यावर पाकिस्तानचा कब्जा आहे तो म्हणजे पाकव्याप्त काश्मीर – आझाद काश्मीर! पैकी बलुचिस्तान हा आकाराने सर्वात मोठा तर पंजाब लोकसंख्येने सर्वात मोठा प्रदेश.

 

Pakistan 7 territories marathipizza

 

पाकिस्तानी पंजाबी मुस्लिम अत्यंत कट्टर, तिरस्कारी, आक्रमक आणि हिंदू/भारतद्वेष्टे आहेत. बहुतांश पाकिस्तानी राज्यकर्ते आणि लष्कर प्रमुख पंजाबी मुसलमान आहेत.

तुलनेने बलोच, पठाण, सिंधी लोक मवाळ आहेत. पंजाबी मुस्लिम नेहमी इतर भागातल्या मुस्लिम लोकांच्या हक्काची पायमल्ली करताना दिसून येतात.

हिंदू लोक इस्लामचे शत्रू असून ते इस्लामच्या पावित्र्यासाठी हानिकारक आहेत. काफिर आहेत. हिंदू लोक अपवित्र आणि द्वितीय दर्जाचे असतात. फार पूर्वी पाकिस्तान खूप मोठा देश असून ब्रिटिशांच्या मदतीने इस्लाम विरोधी हिंदू ताकदीनी पाकिस्तानी जमीन बळकावून हिंदुस्थान बनवला.

1965 साली पाकिस्तानने भारताच्या अनेक भागांवर कब्जा केला पण नंतर दया खाऊन तो भाग परत केला. 71 साली भारताने आपल्या भावांना चिथावून बांगलादेश वेगळा केला. भारतासोबत झालेली चार ही युद्धे आपण जिंकलेली आहेत.

– हे सगळं पाकिस्तानच्या textbooks मध्ये शिकवलं जातं. पैकी “हिंदू इस्लामचे शत्रू आहेत” हे तर चौथीच्या पोरांना शिकवलं जातं. 9-10 वर्षांच्या पोरांना. हिंदू आणि इसाई मुलांना कुराण शिक्षण अनिवार्य आहे.

विचार करा! द्वेष इथून पेरायला सुरुवात होतेय…!

घौरी, अब्दाली, शाहीन, बाबर, गझनवी ही नावे कोणाची आहेत? भारतावर आक्रमण करणाऱ्या मुस्लिम आक्रमकांची. हिंदूंचे शिरकाण करणाऱ्या क्रूर इस्लामी माथेफिरूंची. हे लोक पाकिस्तानी होते का? घौरी, अब्दाली अनो गझनवी हे अफगाण होते. बाबर बरलास होता.

तरीही ही नावे पाकिस्तान आपल्या क्षेपणास्त्रांना देतो तो योगायोग खचितच नाही. इतकी deep rooted hatred व्हिडीओ बनवून किंवा अमन कि आशा सारखे कॅम्पेन चालवून संपेल?

मुसलमानांनी हिंदूंवर 800 वर्ष राज्य केलं, त्यांना पायाखाली ठेवलं.

ही पाकिस्तानी लोकांची – लोकांची म्हणजे सत्ता करणाऱ्यांची – आवडती लाईन आहे. गदर, बॉर्डर सारख्या अत्यंत राष्ट्रवादी सिनेमात देखील आपण मुस्लिम धर्मीय शत्रू म्हणून कधीच दाखवत नाही.

पाकिस्तानमध्ये सरळ सरळ हिंदू म्हणजे इस्लामचे शत्रू असं स्पष्ट सांगणारे सिनेमे बनतात. हे करून काय साध्य होईल?

पाकिस्तानचा जवळपास GDP हा रेमिटन्सवर, अर्थात इतर देश मदत म्हणून जो पैसा देतात, त्यावर आधारित आहे. त्यामुळे जो कोणी पैसे देईल त्याच्या तालावर नाचणे पाकिस्तानला अपरिहार्य आहे.

कधी सौदी, कधी अमेरिका, कधी चीन!

इतके दिवस war on terrorच्या नावाखाली अमेरिकेने पाकिस्तानला नाचवलंय आता CPEC च्या बहाण्याने चीन नाचावतोय, आणि पाकिस्तान ठुमके लगावेल. दुसरा उपाय नाही!

चीनला त्याचे पावणे दोन अब्ज लोक पोसायचेत, त्यासाठी त्याला इंडस्ट्री चालवणं भाग आहे. चिनी मालाची निर्यात होणं भाग आहे. स्वतःला पर्याय म्हणून चीन भारताला कसं उदयाला येऊ देईल?

एक अशांत भारत चीनसाठी उपयुक्त आहे. ह्यातच सगळं काही येत नाही का?

चीनला पाकिस्तानी समुद्रीकिनारा वापरून मालाची निर्यात मध्य आशिया आणि युरोपीय देशात स्वस्त रित्या करता येते. त्यासाठी शांत पाकिस्तानची, स्टेबल पाकिस्तानची त्याला गरज आहे.

पुढे मागे चीन पाकिस्तानच्याच जमिनीवर कारखाने उभे करण्याचे मनसुबे बाळगून आहे.

पाकिस्तानच्या पाच ही प्रमुख नद्यांचा उगम हिमालयात होतो. सिंधू, झेलम, चिनाब, रावी आणि सतलज.

 

Pakistan rivers and lakes marathipizza

पाकिस्तानच्या दुर्दैवाने ह्या नद्या भारतातून पाकिस्तानमध्ये जातात. गिलगिट-आझाद काश्मीर-पंजाब आणि सिंध ह्या पाकिस्तानी राज्यातून त्या जातात. पाकिस्तानची शेती मुख्यतः पंजाब प्रांतात आहे जी ह्या नद्यांच्या पाण्यावर अवलंबून आहे. बरेचसे वीजनिर्मिती केंद्र देखील ह्याच नद्यांवर आहेत.

ह्या सर्व नद्या काश्मीरमधून पाकिस्तानात जातात हे एक प्रमुख कारण आहे त्यामुळे पाकिस्तानला काश्मीर हवे आहे.

काश्मीरचे स्वातंत्र्य मागणाऱ्या विद्यार्थ्यांना हा विचार का करता येत नाही देव जाणो!

पाकिस्तानला काश्मीरच्या स्वातंत्र्यात अजिबात रस नाही. मानवी हक्क वगैरेशी त्याचं काही घेणं देणं नाही. पाकिस्तानला फक्त काश्मीर स्वार्थासाठी हवंय. पाकिस्तानी काश्मीरमधल्या लोकांना विचार पाकिस्तानची असलीयत.

काश्मीर हातात येताच पंजाबी लोक आणि सैन्य काश्मीरवर झडप घालून सगळे रिसोर्सेस पंजाबकडे वळवतील. काश्मिरी लोकांच्या तोंडाला पाने पुसली जातील. तेंव्हा आझादीचे नारे देणाऱ्यांना पॅलेट गन नव्हे तर रेल गनला समोर जावं लागेल!

इस्लाममध्ये गझवा-ए-हिंद नावाची एक संकल्पना आहे. मोहम्मद पैगंबर ह्यांनी एकदा भाष्य केले होते की इस्लामी फौज हिंदुस्थानवर आक्रमण करेल आणि तिथल्या बादशहाना साखळदंडात कैद करून आणेल…दिल्लीवर विजय मिळवेल…! ही संकल्पना पाकिस्तानमध्ये आक्रमकरित्या शिकवली-पसरवली जाते.

काही मौलाना-मौलवींच्या मते ही घटना घौरी-पृथ्वीराज चौहानच्या रूपाने होऊन गेली आहे हा भाग अलाहिदा, पण तरीही आजही लाखो करोडो पाकिस्तानी लोक ह्या आशेवर आहेत की अजून ही घटना घडायची आहे.

ह्या आणि अशा गोष्टी तरुणांत भिनवल्या जातात, पद्धतीशिररित्या त्यांचा ब्रेनवॉश करून, हिंदू म्हणजे इस्लामचे हाडवैरी सांगून त्यांचे कसाब बनवले जातात.

 

kasab-mumbai-terror-attach-marathipizza

काश्मीर सतत पेटवत ठेवणे, काश्मिरी लोकांना भारताविरुद्ध भडकवणे आणि मग गृहयुद्धाकडे लोटणे हा पाकिस्तानचा उघड उद्देश आहे. त्यांना काश्मीर भारतापासून तोडून तिथल्या रिसोर्सेस आणि पाण्यावर ताबा मिळवायचा आहे ही साधी गोष्ट आहे.

हाफिज सईद, मसूद अझहर ह्यांच्यासारखे लोक पाकिस्तान पाळतो ते उगाच नाही. मुंबई आतंकवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असणारा हाफिज सईद मिनार ए पाकिस्तानवर जाहीर सभा घेतो आणि ह्या सभेला पोहोचणाऱ्या लोकांसाठी पाकिस्तान सरकार तर्फे विशेष रेल्वे सुरु करण्यात येतात! ते ही अमेरिकेने देखील हाफिजला आतंकवादी घोषित केल्यानंतर.

ही भारताने शांतीची आशा दाखवत पाकिस्तानशी मैत्री दाखवण्यासारखी बाब निश्चितच नाही.

कदाचित राजकीय फायद्यांसाठी पाकिस्तानी establishment ने कट्टरवाद पाळला, रुजवला असेल खरा. पण आता ह्याने भयानक रूप धारण केलंय. परिस्थिती पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या हातातून केव्हाच निघून गेलीय.

लहान लहान मुलांच्या मनात भारताविषयी, इतर धर्मीयांविषयी द्वेष आणि तिरस्कार खोलवर पेरून, सैन्याबद्दल फाजील आत्मविश्वास आणि आततायीपणा निर्माण करून पाकिस्तानने स्वतःच्या लोकांची तर वाट लावलीच, पण आता भारतातही हे लोण पसरत चाललंय. भारतात म्हणजे काश्मीरमध्ये.

एकीकडे काश्मीरच्या जमिनीचा स्वार्थ बाळगायचा आणि दुसरीकडे इस्लामी कट्टरवाद पसरवून ह्या स्वार्थाचं धार्मिक आधारावर समर्थन करायचं, ही पाकिस्तानची नीती आहे.

शिवाय कट्टरवाद आणि हिंदूद्वेषाचे आणखी एक महत्वाचे कारण आहे. पाकिस्तान एक failed state आहे. सर्व अंगांनी नापास. असे देश टिकाव धरू शकत नाहीत. गृहयुद्धच्या दिशेने जातात. पंजाबी मुस्लिमांच्या जाचाला, स्वार्थाला आणि जुलुमाला सिंध, खैबर, आझाद काश्मीर आणि खास करून बलोच लोक भयंकर कंटाळलेत. वेळोवेळी उठाव आणि भांडणे होतच असतात. अशावेळी कट्टरवाद आणि हिंदूद्वेष कामी येतो.

हिंदू लोक इस्लामचे दुश्मन असून भारत आपल्याला जगू देणार नाही ही भावना पाकिस्तानला बांधून ठेवते. भारतद्वेष हा पाकिस्तानला एकत्र ठेवण्याचा धागा आहे! दुसरी कुठलीही गोष्ट त्याना ‘एक पाकिस्तानी’ ठेवू शकत नाही.

भारत द्वेष संपला तर ते बलोच-पंजाबी-सिंधी-पठाण आहेत.

हे अगदी थोडे कंगोरे आहेत. अशा अनेक क्लिष्ट गोष्टी आहेत. भारत पाकिस्तान भांडण हे इजराईल-पॅलेस्टाईन भांडणासारखंच क्लिष्ट आहे. ह्यात केवळ एक कारण कधीच नव्हतं, नाही आणि नसेल. काश्मीर मुद्दा बसून बोलून सोडवा मग गळ्यात गळे घालून नाचूया वगैरे attitude केवळ आणि केवळ मूर्ख लोक बाळगू शकतात. “द्वेष सोडा – प्रेम करा” असं म्हणून द्वेष संपत नसतो.

राजकीय फायदे नव्हे, देशहीत पाहावं लागतं.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Suraj Udgirkar

A small town person who loves to write, read & then wrangle about it. usual business.

suraj has 23 posts and counting.See all posts by suraj

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?