प्रेमाची स्वप्नं पाहताना “या” गोष्टींचा विचार न करता लग्नाच्या बेडीत अडकणं म्हणजे निव्वळ मूर्खपणा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
===
प्रेमात असताना त्या व्यक्तीचे आकर्षण खूप असते. सतत त्या व्यक्तीच्या सहवासात राहावेसे वाटते. ती व्यक्ती कायमसाठी आपल्या आयुष्यात यावी असे वाटते आणि साहजिकच लग्नाची घाई होते.
मात्र लग्नानंतर अतिपरिचयात अवज्ञा या न्यायाने, किंवा त्या व्यक्तीची दुसरी बाजू, दोष अधिक प्रकर्षाने समोर आल्याने हे लग्न अनेकदा घटस्फोटाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला दिसते.
असे होऊ नये म्हणून लग्नाच्या बेडीत अडकण्याच्या आधीच काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमचे लग्न दीर्घकाळ टिकेल आणि घटस्फोटाची पाळी येणार नाही.
तुम्ही तुमच्या जोडीदाराला बदलू शकत नाही –
अनेकदा प्रेमात असताना, किंवा लग्नापूर्वी आपण आपल्या जोडीदाराच्या न आवडणाऱ्या सवयी, विचार लग्नानंतर प्रेमाने बदलू असा विचार करत असतो.
परंतु लक्षात ठेवा, की सहसा माणसाच्या एकदा रुजलेल्या सवयी, विचार हे बदलण्याची शक्यता फार कमी असते.
त्या बदलल्या नाहीत की त्यांना कायमचं स्वीकारणंही कठीण होऊन बसतं.
नातेवाईकही जसे आता आहेत तसेच राहतील. बदलण्याची शक्यता नसते –
भविष्यात तुमचे सासू सासरे आणि इतर नातेवाईक बनणारी माणसे, जर आज तुमच्या मनाप्रमाणे, किंवा तुमच्याशी चांगले वर्तन करत नसतील, तर ते तुमच्या लग्नानंतरही बदलतील ही अपेक्षा ठेवून लग्न करू नका.
तुम्ही जर आज तुमच्या सासू किंवा नणंद, किंवा दिर बनणाऱ्या लोकांशी पटवून घेऊ शकत नसाल, त्यांचे स्वभाव तुम्हाला आवडत नसतील, तर लग्नानंतरही ते तसंच राहणार आहे.
कदाचित अजूनच तुमचे संबंध खराब होऊ शकतात आणि तुम्हाला जुळवून घ्यावं लागणार आहे याची मानसिक तयारी ठेवूनच लग्न करा.
मुलांच्या बाबतीत आधीच आपली मते नक्की करा-
तुम्हाला भविष्यात किती मुलं हवीत, हवीत की नकोत, एवढंच नव्हे तर झालेल्या मुलांचे संगोपन करण्याबद्दलच्या तुमच्या कल्पना, तुमचे विचार आधीच एकमेकांशी शेअर करा.
मुलं झाल्यावर त्यांना कसं वाढवायचं यावरून देखील अनेक जोडप्यांचे खटके उडतात. त्यांचं कुणी करायचं, त्यांना कुणी सांभाळायचं, आपलं करीअर सांभाळून मुलांचं कसं करायचं यावरून बरीच भांडणे होऊ शकतात.
अनेकदा जोडप्यांपैकी एकजण मुलांच्या बाबतीत कठोर शिस्तीचा असतो, तर एक जण उदारमतवादी असतो. अशावेळी प्रामुख्याने त्या दोघांत वाद होण्याची शक्यता वाढते.
पालकांची व्यसनं देखील मुलांच्या संगोपनात अडथळे ठरतात. त्यामुळे लग्न करण्याआधीच आपल्या जोडीदाराला असलेल्या व्यसनांचा विचार करून ठेवा.
विवाह हा एक कायदेशीर करार आहे हे लक्षात ठेवा –
विवाह हा केवळ रिलेशनशीप स्टेटस बदलण्यापुरता मर्यादित विषय नाही. यात तुमची आर्थिक गणितं, आर्थिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक वाटण्या देखील रातोरात बदलतात.
अनेक लोक याचा विचार न करताच लग्न करून बसतात. जेव्हा घटस्फोटासारखा प्रकार घडतो, तेव्हा हे आर्थिक प्रश्न आणि आर्थिक गणितच अधिक बघितली जातात.
त्यापेक्षा लग्न करतानाच या गोष्टींचाही करार करून ठेवा. किंवा निदान त्यावर विचार तरी करून ठेवा. किंबहुना लग्न करतानाच घटस्फोटाविषयी कायदे जाणून घ्या.
लग्नं, मुलं, आर्थिक बाबी इत्यादीसंबंधात अटी-शर्तींचा करार –
आजकाल लग्नापूर्वी असे करार करण्याची पद्धत आहे. विशेषतः परदेशात आणि सेलेब्रिटी लोक असे करतात.
तुम्ही जरी सेलेब्रिटी नसलात, तरी काही आर्थिक बाबींसंबंधी असे करार करू शकता. जेणेकरून विवाह संपुष्टात येऊन घटस्फोटाची पाळी आली, तरी तेव्हा फार गुंता आणि अडचणी उभ्या राहणार नाहीत.
याचा अर्थ आपण घटस्फोटाचा विचार लग्नाआधीच करतो असे नसते. आपण कार इन्शुअरन्स, मेडीकल इन्शुअरन्स काढतो, तेव्हा आपल्याला काही होईल असे गृहीत धरत नाही. तसंच आहे हे.
आर्थिक गोष्टींवर आधीच बोलून घ्या –
आपले आर्थिक ध्येय काय आहे? नोकरी करायचीय की व्यवसाय?
आपल्या इथे भारतात बऱ्याच मुलींना लग्नानंतर नोकरी करू नये म्हणून दबाव येतो, तर बऱ्याच मुलींनी ती घर सांभाळून करावी असा दबाव असतो. अशा परिस्थितीत मुलींनी स्पष्टपणे आपली इच्छा लग्नाआधीच स्पष्ट करावी.
नोकरी, करिअर, पैसा यांना आपल्या आयुष्यात किती महत्त्व असेल, आणि घरकामाला किती हे आधीच बोलून घ्यावे.
अनेकदा दोघेही करीअरीस्ट असतात, तेव्हा घर, मुलं यांच्याकडे लक्ष द्यायला दोघांनाही वेळ नसतो, अशा वेळी दोघे कसे काय निभावणार आहेत, याबद्दल लग्नाआधीच बोलून घ्यावं.
याशिवाय पैशाची व्यवस्था कोण कशी सांभाळणार आहे? घराचे बजेट कुणी सांभाळायचे? बचतीच्या गोष्टी कशा ठरवायच्या? हे मुद्देही महत्त्वाचे ठरतात.
आई-बाबा, नातेवाईक इत्यादींच्या जबाबदाऱ्या –
हल्ली बहुतेकांना एक किंवा दोनच मुलं असतात. लग्नाच्या आधी दोघांचेही पालक कुणाकडे राहणार आहेत? की ते स्वतंत्र राहणार आहेत? ते वयस्कर असतील, तर त्यांची जबाबदारी कशी सांभाळणार आहेत?
त्यांची आर्थिक जबाबदारी असेल, तर ती परस्परांना चालणार आहे का? बऱ्याचदा आपल्याकडे भारतात सासू-सासरे, आणि अन्य नातेवाईकांच्या जबाबदाऱ्यांवरूनच लग्नात समस्या निर्माण होतात.
मुलींनाही आपल्या आईबाबांची जबाबदारी लग्नानंतर घ्यावी असे वाटते. त्याबद्दल लग्नाआधीच बोलून घेऊन सगळ्या बाबी स्पष्ट कराव्यात.
एकमेकांचा स्वभाव आधीच पडताळून घ्यावा –
अनेकदा एक जोडीदार खर्चिक असतो, तर एक कंजूस. एकाला शांतता, एकांत आवडतो, तर दुसऱ्याला हल्लागुल्ला, माणसांची गर्दी आवडते.
एकाला संगीत आवडतं, तर एकाला खेळात रस असतो. एकाला राजकारणात तर दुसऱ्याला वेगवेगळ्या पदार्थ करून बघण्यात. एक घाबरट असू शकतो, तर दुसरा धाडसी. एक बडबड्या असू शकतो तर दुसरा अबोल.
एक तब्येतीच्या बारीकसारीक कुरबुरी सतत करतो, तर एक स्ट्रॉंग असतो. अशा रीतीने प्रत्येक माणूस स्वभावात वेगळा असतो या न्यायाने प्रत्येकाच्या आवडी-निवडी, स्वभाव व विचार वेगळे असतात.
लग्नानंतर परस्परांच्या या गोष्टी आपण कशा निभावणार आहोत त्याचा विचार लग्नाआधीच केला तर नंतर त्यावरून खटके उडणार नाहीत.
लग्नानंतर मित्र-मैत्रिणी इत्यादींशी संबंध –
आपल्याकडे लग्नानंतर इतर मित्र-मैत्रिणींशी भेटीगाठी, बोलणे कमी व्हावे अशी स्त्री-पुरुष दोन्ही जोडीदारांच्या अपेक्षा असतात.
बाहेरचं वर्तुळ कमी करून नवरा-बायको दोघांनी घराकडे अधिक लक्ष द्यावं आणि परस्परांना अधिक वेळ द्यावा असे गृहीत धरले जाते.
हे काही अंशी बरोबर असले, तरी व्यक्तिमत्व समृद्ध होण्याच्या दृष्टीने किंवा एखाद्याच्या आवडीमुळेही म्हणा, घर आणि जोडीदार यांच्या व्यतिरिक्तही मित्र-मैत्रिणी असणे, त्यांच्याबरोबर वेळ घालवणे, विचारविनिमय करणे हे अनेकांना आवडते. ते चांगलेही असते.
परंतु जोडीदाराला हे जर आवडत नसेल तर त्यावरून खटके उडू शकतात. त्याबद्दल आधीच बोलून घ्यावे. अनेकदा या बाबतीत संशयही आडवा येतो.
आपल्या व्यतिरिक्त जोडीदार दुसऱ्या कुणाशी लैंगिक संबंध ठेवत असेल का? असा संशय नेहमी घेतला जातो. याबाबतीत आधीच स्पष्ट असावं.
भविष्याचा विचार –
लग्न हे परस्परांना समृद्ध करणारं असावं, न की एकमेकांना जखडून ठेवणारं. सात जन्म आणि जन्मोजन्मीची साथ इत्यादी कल्पनेच्या जगातून बाहेर येऊन विवाह करताना विचार करावा.
वर पाहिल्याप्रमाणे विवाह हा एक करार असल्यामुळे कधी कधी तो संपुष्टातही येऊ शकतो. आणि घटस्फोटाची वेळही येऊ शकते. अशावेळी आपण काय करणार आहोत?
राहते घर, आर्थिक बाबी, नोकरी, मुलं इत्यादी सगळे निर्णय घेताना हा विचार सतत केलेला चांगला असतो.
सात जन्माचा विचार करण्यापेक्षा याच जन्मात एकमेकांना स्वातंत्र्य देऊनही एकमेकांवर प्रेम करता येतं, एकमेकांची काळजी घेता येते, एकमेकांची स्पेस जपता येते याचा विचार करून लग्न केल्यास ते अधिक टिकेल आणि अधिक सुखाचं होईल.
थोडक्यात आता पूर्वीसारखं, ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात’, ‘दिल्या घरी सुखी राहा’, ‘लग्न म्हणजे सात जन्माची सोबत’ वगैरे कवीकल्पनेतून आणि पारंपरिक कल्पनांतून बाहेर येऊन नीट समजून उमजून करायचा करार आहे.
प्रेमात असताना ज्या गोष्टी आड येत नाहीत त्याच गोष्टी लग्नानंतर खटकू लागतात. ज्याचा विचार केला नसेल, अशा समस्या पुढे येऊन ठाकतात.
एकमेकांच्या सवयी, व्यसनं, विचार, वर्तन, स्वभाव, नातेवाईक, आर्थिक बाबी इत्यादी सगळं विचारात घेऊन मगच लग्नाचं पाऊन उचललेलं केव्हाही चांगलं!
—
आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :
–
===
व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल
–
शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.