' अमाप संपत्ती ते स्वतःचा खास तुरुंग : विचित्र कृत्यांमुळे या ‘किंग ऑफ कोकेन’चं आयुष्य रहस्यच आहे – InMarathi

अमाप संपत्ती ते स्वतःचा खास तुरुंग : विचित्र कृत्यांमुळे या ‘किंग ऑफ कोकेन’चं आयुष्य रहस्यच आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पाब्लो एमिलियो एस्कोबार गॅव्हिरीया (१ डीसेंबर १९४९ ते २ डीसेंबर १९९३) हा कोलंबियाचा ड्रग माफिया होता. तो एका मोठ्या गुन्हेगारी संघटनेचा नेता होता.

गुन्हेगारी जगतात तो ‘किंग ऑफ कोकेन’ म्हणून ओळखला जात होता. एस्कोबारने या धंद्यात कोट्यवधी रुपये कमावले, शेकडो लोकांच्या हत्येचे आदेश दिले आणि स्वतःची अमाप संपत्ती बाळगली.

स्वतःची विमानं, खाजगी प्राणीसंग्रहालय, स्वतःचे सैन्य, मोठमोठे प्रासाद बाळगले आणि अनेक गुन्हेगारांना वठणीवर आणून स्वतःच्या वर्चस्वाखाली ठेवले.

पाब्लोचे पूर्वजीवन –

 

pablo escobar inmarathi1
pinterest.com

 

पाब्लोचा जन्म मेडेलिन, कोलम्बिया येथे एका मध्यमवर्गीय घरात झाला. तो जसा तरुण झाला, तसा त्याच्या महत्त्वाकांक्षा वाढत गेल्या. आपण एक दिवस देशाचा अध्यक्ष बनणार असं तो आईवडील आणि मित्रांना सांगत असे.

त्याच्या आयुष्याची सुरूवात एक भुरटा चोर म्हणून झाली. त्याच्याबद्दल बऱ्याच दंतकथा आणि अफवा देखील आहेत. असं म्हणतात, की सुरुवातीला तो थडग्यांवरचे उंची दगड चोरून त्यावरची नावे काढून ते दगड पुन्हा विकत असे.

त्यानंतर तो मोटारगाड्या चोरून विकू लागला. सत्तरच्या दशकात त्याला या चोरीच्या धंद्यापेक्षा एक मोठा गुन्हेगारी व्यवसाय त्याला सापडला. तो म्हणजे बेकायदेशीर ड्रग्सचा व्यवसाय.

बोलिव्हिया आणि पेरू या देशातून कोकेन खरेदी करायचे. त्याची पावडर बनवून नंतर ते अमेरिकेत विक्रिसाठी पाठवून द्यायचे हा नवीन व्यवसाय त्याने सुरू केला. या धंद्यात त्याला रग्गड पैसा मिळू लागला.

सत्तेत वाढ –

१९७५ मध्ये मेडेलिनमधील एका स्थानिक ड्रग व्यावसायिकाची फॅबिओ रेस्ट्रेपो याची हत्या झाली. ती हत्या पाब्लोच्या आदेशावरून करण्यात आली होती.

त्याच्या हत्येनंतर त्याची संघटना पाब्लोने ताब्यात घेतली आणि त्याचा व्यवसाय तो चालवू लागला. त्याने तो व्यवसाय अजून वाढवला.

त्यानंतर पाब्लोने मेडेलिनमधील जवळपास ८० टक्के ड्रगच्या व्यवसायावर स्वतःचा कब्जा बसवला आणि मोठ्या प्रमाणावर त्याचे कोकेन अमेरिकेत ट्रान्सपोर्ट होऊ लागले होते.

 

drugs_-inmarathi
hindustantimes.com

 

१९८२मध्ये तो कोलंबियाच्या निवडणुकीत उभा राहिला आणि कोलंबिया कॉंग्रेसमधून निवडून आला. त्यानंतर त्याचे आर्थिक, गुन्हेगारी आणि राजकीय असे तिन्ही महत्त्वाच्या ठिकाणी वर्चस्व कायम झाले.

१९७६ मध्ये त्याने मारीआ व्हिक्टोरीआ हेना व्हेलेजो नावाच्या एका पंधरा वर्षाच्या मुलीशी लग्न केले. तिच्यापासून त्याला दोन मुलं झाली. जुआन पाब्लो आणि मॅन्युएला.

जरी त्याचे लग्न होऊन त्याला दोन मुलं होती तरी पाब्लोची विवाहबाह्य प्रकरणं भरपूर असत. आणि विशेषतः त्याला कोवळ्या, अल्पवयीन मुली अधिक पसंत असत.

अशाच अनेक गर्लफ्रेन्ड्सपैकी एक होती व्हर्जिनिया व्हेलेजो. ती कोलंबियातील सुप्रसिद्ध टीव्ही स्टार होती. अशी अनेक प्रकरणं असली, तरी तो शेवटपर्यंत आपल्या पहिल्या बायकोबरोबर विवाहित स्टेटसमध्येच राहिला.

नार्कोटेररिझम –

 

drug inmarathi
thoughtco.com

 

मेडेलिनमधला एक कुख्यात आणि निर्दयी गुंड म्हणून त्याची लवकरच ख्याती पसरली. आणि शहरातले अनेक राजकारणी, न्यायाधीश आणि पोलिस त्याच्या कारवायांना उघड विरोध करू लागले.

पण या सगळ्यांशी कसे निपटायचे याची पाब्लोची स्वतःची अशी पद्धत होती. या पद्धतीला तो प्लॅटा ओ पोमो (सोने की शिसे) असे म्हणत असे.

त्याच्या वाटेत येणाऱ्या बड्या शत्रूंना तो सुरुवातीला लाच देऊन गप्प करण्याचा प्रयत्न करत असे. जर यावर समोरचा गप्प बसला नाही, तर तो त्याची हत्या घडवून आणत असे. क्वचित अशा माणसाला त्याच्या कुटुंबासहीत संपवून टाकत असे.

अशाप्रकारे त्याने किती माणसांना मारून टाकले असेल याची गणतीच नाही. परंतु कदाचित तो आकडा शेकडो ते हजारोंचाही असू शकतो.

 

murderer-inmarathi
nagpurtoday.in

 

त्याला आपल्या सामाजिक इभ्रतीची पर्वा नव्हती. बेकायदेशीर कृत्य करायला त्याला काहीही वाटत नसे. अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी उभ्या असलेल्या अनेक सदस्यांना त्याने संपवलेले होते.

१९८५ मध्ये सुप्रीम कोर्टात झालेल्या हल्ल्यात सुप्रीम कोर्टाचे अनेक न्यायाधीश मारले गेले होते. त्या हल्ल्यामागे पाब्लोचाच हात होता अशी वदंता आहे.

२७ नोव्हेंबर १९८९ रोजी एस्कोबारच्या माणसांनी एव्हियान्का २०३ या विमानात बॉम्ब लावला, ज्यात ११० लोक ठार झाले होते. हा हल्ला त्याने अध्यक्षपदाच्या एका उमेदवाराला संपवण्यासाठी केला होता.

मात्र तो उमेदवार त्या विमानात नव्हताच. याशिवायही त्याने अगणित न्यायाधीश, पत्रकार, पोलिस आणि आपल्याच क्षेत्रातील कितीतरी गुन्हेगारांना संपवलं.

त्याच्या सत्तेचा उत्कर्षबिंदू –

 

pablo escobar inmarathi
pinterest.com

 

८०च्या दशकात पाब्लो एस्कोबार हा जगातील सर्वसत्ताधीश गुन्हेगार बनला होता. फोर्ब्स मासिकाच्या यादीनुसार, तेव्हा तो जगातील सातव्या क्रमांकाचा श्रीमंत माणूस होता.

त्याच्या साम्राज्यात त्याचे स्वतःचे सैन्य त्याने बाळगले होते. स्वतःचा खाजगी प्राणीसंग्रहालय, अनेक प्रासाद, आणि कोलंबियामध्ये अगणित प्रॉपर्टी त्याने गोळा केली होती. ड्रग वाहतुकीसाठी त्याने स्वतःची खाजगी विमाने बाळगली होती.

तो आपल्या आड येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला, कुठेही, कधीही संपवू शकत होता.

तो एक चलाख गुन्हेगार होता. सर्वसामान्य लोकांच्या नजरेत आपण हिरो बनून राहिलो, तर आपण आणि आपला व्यवसाय अधिक सुरक्षित राहील. हे त्याला माहीत होते.

म्हणून सर्वसामान्यांच्या मनात स्थान मिळवण्यासाठी त्याने सार्वजनिक शाळा, पार्क्स, स्टेडीयम, चर्चेस आणि गरिबांसाठी घरे बांधण्यात बराच पैसा खर्च केला.

त्याची ही कल्पना यशस्वी झाली आणि तो कोलंबियामधील सर्वसामान्य लोकांच्या गळ्यातला ताईत बनला. लोक त्याला परोपकारी माणूस समजू लागले होते.

कायद्याचा त्रास – 

 

law suit inmarathi 1

 

पाब्लोचा १९७६ मध्ये सर्वप्रथम कायद्याशी सामना झाला. तेव्हा तो इक्वेडोरला ड्रग सप्लाय करून पळत असताना पोलिसांच्या तावडीत सापडला.

एस्कोबारने ज्या अधिकाऱ्याने त्याला पकडलं, त्या अधिकाऱ्याला संपवण्याचे आदेश दिले. आणि त्याच्यावरची केस काढून घेतली गेली.

त्यानंतर मात्र जसजशी त्याची सत्ता आणि संपत्ती वाढत गेली, त्यानंतर मात्र तो कायद्याच्या किंवा पोलिसांच्या कचाट्यात सापडणे दुरापास्त होत गेले.

तो अतिशय निर्दय होता आणि आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला तो मागचा पुढचा कुठलाही विचार न करता संपवून टाकत असे. शक्य असेल तिथे पैसा चारून गप्प करत असे.

मात्र अमेरिकेतून त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याबाबत देशावर दबाव टाकला जात होता. अमेरिकेने आपल्याला पकडू नये यासाठी त्याला आपली सर्व शक्ती नेहमीच पणाला लावावी लागली होती.

१९९१ साली अमेरिकेचा दबाव वाढल्याने कोलम्बियन सरकार आणि एस्कोबारचे वकील यांनी एकत्र येऊन एक वेगळीच व्यवस्था केली. एस्कोबारने स्वतःहून सरकारला स्वाधीन व्हायचे आणि पाचेक वर्ष जेलमध्ये राहायचे.

 

jail-inmarathi
mcdonoughcountysheriff.com

 

त्यासाठी तो स्वतःसाठी स्वतःच हवा तसा तुरुंग तयार करून घेऊ शकत होता आणि त्याला अमेरिकेच्या ताब्यात न देण्याची त्याची अट पाळली जाईल याची खात्री दिली होती.

त्या तुरुंगात, जाकुझी, वॉटरफॉल, बार आणि सॉकर खेळण्याची जागा होती. शिवाय आपले गार्ड कोण असणार हे देखील तोच ठरवत होता.

अशा तुरुंगात राहून फोनवरून तो आपला बाहेरील व्यवसाय निर्धोकपणे सांभाळत होता. त्याच्या या स्पेशल तुरुंगात इतर कोणतेही कैदी नव्हते. हा तुरुंग खास त्याचा, त्याच्यासाठी बनवला गेलेला होता!

त्याच्या हत्येनंतर हा तुरुंग लोकांनी संपत्तीच्या आशेने खणून उध्वस्त केला.

पळ आणि पाठलाग –

एस्कोबार अशा रितीने नकली तुरुंगात राहून आपले सर्व गुन्हेगारी धंदे व्यवस्थित सांभाळतोय याची कल्पना सगळ्यांनाच होती.

परंतु एक दिवस कहर झाला. पाब्लोने आपल्याशी काही बेईमान, अप्रामाणिक लोकांना त्या तुरुंगात बोलावून त्यांचा छळ करून त्यांची हत्या केली.

हे प्रकरण कोलंबिया सरकारला देखील आवडले नाही. आणि त्यांनी पाब्लोची रवानगी साध्या तुरुंगात केली. आपल्याला अमेरिकेच्या ताब्यात सोपवतील या भीतीने पाब्लोने तिथून पळ काढला आणि तो लपून बसला.

तेव्हा युनायटेड स्टेट्स आणि स्थानिक सरकार यांनी त्याच्याविरोधात कारवाई उभी केली. आता पाब्लोच्या मागे दोन संघटना हात धुवून लागल्या.

एक होती ‘सर्च ब्लॉक’ जी अमेरिका आणि कोलंबिया सरकारने मिळून त्याला पकडण्यासाठी उभी केली होती.

दुसरी होती आजवर पाब्लोने ज्या लोकांना मारले त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीने त्याच्या धंद्यातील प्रतिस्पर्धी कॅली कार्टेल याने उभी केलेली संघटना.

 

मृत्यू –

 

pablo escobar inmarathi3
ww1.yuriybobak.com

 

२ डिसेंबर १९९३ला कोलंबियन सिक्युरिटी फोर्सने अमेरिकेच्या आधुनिक टेक्नोलॉजीच्या सहाय्याने त्याला शोधून काढले. तो मेडेलिनमधील मध्यमवर्गीयांच्या एका वस्तीत लपून राहिला होता.

सर्च ब्लॉक तिथे घुसली आणि त्याला घेरले आणि त्याला शरण येण्यास सांगितले. एस्कोबारने प्रतिहल्ला केला. पोलिस आणि त्याच्यात चकमक झाली.

तिथून एका छपरावरून उडी मारून पळून जात असताना पाब्लोला शेवटी हत्यार टाकावे लागले. त्याच्या डोक्यात, पायावर आणि कानाजवळ गोळ्यांच्या जखमा झाल्या होत्या.

परंतु लोक म्हणत होते, की त्याने त्या क्षणी आत्महत्या केली असावी. तर पोलिसांचा दावा होता की त्यांनी त्याला मारलं.

वारसा –

 

pablo escobar inmarathi2
hdwallpapers.com

 

पाब्लोच्या मृत्युनंतर ९०च्या दशकात मेडेलिन कार्टेलमधील ड्रगचा गुन्हेगारी व्यवसाय संपुष्टात आला. पाब्लोचा प्रतिस्पर्धी कॅली कार्टेल याचे वर्चस्व देखील कोलंबियन सरकारने संपुष्टात आणले.

मात्र मेडेलिनमधल्या गरिबांसाठी आजही दयाळू आणि परोपकारी माणूस म्हणून ख्यातकिर्त आहे. पाब्लोचे आयुष्य हे अनेक पुस्तकांचा, सिनेमांचा, टिव्ही मालिकांचा विषय बनून राहिले.

या कुख्यात गुन्हेगाराच्याविषयी बऱ्यावाईट अनेक वदंता आणि अफवा चर्चेत होत्या. काही लोकांना त्याच्या जीवनाबद्दल कुतुहल होतं.

एकेकाळच्या या कुख्यात ड्रग माफियाचे आयुष्य हे असे नाण्याच्या दोन बाजूंसारखे होते. काही लोकांसाठी तो दयाळू होता तर काही लोकांसाठी निर्दय खुनी.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?