हातात शस्त्र न धरता सीमेवर उभा राहिला – अन अशी देशसेवा केली की सर्वजण चाट पडले!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
===
‘देव आहे की नाही ?’ किंवा ‘देवावर कितपत विश्वास ठेवावा ?’ या विषयावर आपल्याकडे कायम दोन प्रवाह पहायला मिळतात.
विज्ञानात आपल्याला प्रत्येक गोष्टीचं उत्तर मिळतं हे जरी खरं असलं तरीही एक वेळ अशी येते जेव्हा डॉक्टर सुद्धा म्हणतात की, “आम्ही आमचे प्रयत्न केले आहेत. बाकी आता देवाची मर्जी.”
आपल्याला संकटातून वाचवणारा म्हणजे देव असं आपण कायम मानतो. ‘मारणाऱ्या पेक्षा वाचवणारा श्रेष्ठ’ हे जर का एकदा पटलं की आपण देवाच्या अस्तित्वावर न विचार करता त्याने लिहून ठेवलेल्या मानवतेच्या गोष्टी आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो हे नक्की.
सामान्य माणसाला हे शक्य ही आहे. पण, एखाद्या सैनिकाला हे शक्य असेल यावर विश्वास बसतो का?
होय, अमेरिकन सैन्यात एक असा सैनिक होता ज्याने शेवटपर्यंत हे धोरण ठेवलं की, “मी कधीच कोणाचा जीव घेणार नाही.” सैन्यात असून सुद्धा त्याने कधीच बंदुक हातात घेतली नाही.
अमेरिकन प्रेसिडेंट च्या हस्ते ‘गोल्ड मेडल ऑफ ऑनर’ ने सन्मानित करण्यात आलेल्या या सैनिकाचं नाव आहे डेस्मंड डॉस. काय आहे त्यांची पूर्ण स्टोरी हे जाणून घेऊया!
७ फेब्रुवारी १९१९ रोजी डेस्मंड डॉस यांचा जन्म अमेरिकेतील Lynchburg या ठिकाणी झाला होता. वयाच्या तेविसाव्या वर्षी म्हणजे १ एप्रिल १९४२ या दिवशी डेस्मंड डॉस ने US आर्मी जॉईन केली.
साडे तीन वर्षांनी ह्याच तरुणाला व्हाईट हाऊस च्या हिरवळीवर US प्रेसिडेंट कडून मेडल ऑफ ऑनर ने सन्मानित करण्यात आलं होतं.
दुसऱ्या महायुद्धात जवळपास १ करोड ६० लाख सैनिकांचा सहभाग होता. त्यापैकी हा सन्मान फक्त ४३१ लोकांना मिळाला होता.
डेस्मंड डॉस आणि इतर सैनिकांमध्ये हा फरक होता की, डेस्मंड डॉस यांनी कोणतंही शस्त्र न वापरता हा सन्मान मिळवला होता. त्यांचं शस्त्र म्हणजे ‘बायबल’ आणि देवावर असलेला त्यांचा अढळ विश्वास.
त्यांनी असं काय केलं? जे लक्षात घेऊन तत्कालीन US प्रेसिडेंट हॅरी ट्रूमान यांनी हे उद्गार काढले,
“I am proud of you. You really deserve this. I consider this a great honor than being president.”
डेस्मंड डॉस यांना कायम एक Army Combat Medic म्हणजे सैन्य लढाईत औषधे पुरवठा करण्याचं काम करायची इच्छा होती. आपल्या देशाची सेवा करण्यासाठी त्यांना हे काम सर्वात योग्य आणि आवडीचं वाटत होतं.
हे काम आवडण्याचं अजून एक कारण होतं ते म्हणजे, या कामासाठी त्यांना बंदूक उचलण्याची गरज पडणार नव्हती. डेस्मंड डॉस यांची निवड ही पायदळ सैन्यात झाली होती.
त्यावेळी डेस्मंड डॉस यांनी बंदूक स्वीकारण्यास नकार दर्शवला होता. त्यांच्या अश्या वागण्यामुळे काही सैनिक त्यांचा फार तिरस्कार करत असत.
पण, डॉस हे त्यांच्या विचारांवर ठाम होते की, मी कोणाचाही जीव घेणार नाही. त्यांचे सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी सुद्धा त्यांना समजावून सांगून थकले होते.
ते डॉस यांना कायम एखादं ओझं असल्यासारखे बघायचे.
शस्त्र घेतल्या शिवाय कोणी सैन्यात काही काम करू शकतो यावर कोणाचाही विश्वास बसणं शक्यच नव्हतं. डॉस यांच्या सहकारी लोकांनी त्यांना रागवायला, जास्त काम द्यायला सुरुवात केली.
डॉस हे आर्मी साठी मानसिक रित्या फिट नाहीयेत असं ते जाहीर करू लागले. एखादी ऑर्डर ऐकली नाही की, त्यांचा कोर्ट मार्शल करूया इतपत सर्व सहकारी प्रयत्न करू लागले.
पण, ते तसं करू शकत नव्हते, ना डॉस हे आर्मीतून बाहेर पडणाऱ्या लोकांसारखे होते. त्यांची एकच इच्छा होती की देव आणि देशाची सेवा शेवटच्या क्षणापर्यंत करायची.
सैनिकांना डेस्मंड डॉस यांचा स्वभाव कळण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा लागला. ज्या सैनिकांनी त्यांना त्रास दिला होता त्यांना सुद्धा डेस्मंड डॉस हे तितक्याच आत्मीयतेने जखमी झाल्यावर ट्रीट करू लागले.
त्यांनी कधीही कोणाबद्दल मनात अढी ठेवलेली नव्हती. त्यांनी बायबल मधील एक गोल्डन रुल्स पैकी एक नियम तंतोतंत फॉलो केला होता तो म्हणजे,
“लोकांसोबत असं वागा, जसं तुम्हाला त्यांनी तुमच्यासोबत वागणं अपेक्षित आहे.”
डेस्मंड डॉस यांनी Guam आणि Leyte इथल्या बर्फाळ प्रदेशात सुद्धा सैन्याची सेवा तितक्याच तन्मयतेने केली.
जेव्हा सगळे सैनिक हे शत्रू पक्षातील सैनिकांचा जीव घेण्याच्या कामात व्यस्त होते, तेव्हा डेस्मंड डॉस हे जखमी सैनिकांचा जीव वाचवण्यात व्यस्त होते.
शत्रू पक्षातील बंदूक आणि तोफ जशी कडाडायची, तसेच डेस्मंड डॉस हे प्रत्येक सैनिकावर लक्ष ठेवून असायचे आणि जखमी झालेल्या प्रत्येक सैनिकाला ते सुरक्षित ठिकाणी हलवायचे आणि त्यांच्यावर त्वरित आवश्यक तो इलाज करायचे.
ओकीनावा च्या लढाई सुरू होण्यापूर्वी डेस्मंड डॉस यांना त्यांच्या या शौर्यासाठी कांस्य पदक प्रदान करण्यात आले होते.
१९४५ च्या मे महिन्यात अमेरिकन सैन्याने Maeda Escarpment हा भाग स्वतःच्या अधिपत्याखाली घेण्याचा चंग बांधला होता.
हा भाग एक डोंगरी प्रदेश होता ज्याला लोक Hacksaw Ridge या नावाने ओळखत असत.
ज्यावेळी अमेरिकन सैन्य हे त्या डोंगराच्या शिखरावर पोहोचले तेव्हा जपानी सैन्याने अमेरिकन सैन्यावर अचानक हल्ला चढवला.
ऑफिसर्स ने माघार घेण्याचं ठरवलं पण तोपर्यंत काही अमेरिकन सौनिक हे धारातीर्थी पडले होते तर काही जखमी अवस्थेत होते.
‘मागे फिरा’ हा आदेश फक्त एका सैनिकाने ऐकला नव्हता तो म्हणजे डेस्मंड डॉस.
ते देवाचं नाव घेत पुढेच चालत राहिले आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला स्वतः जोपर्यंत गोळी लागत नाही तोपर्यंत आपण सैनिकांचा जीव वाचवत रहायचा.
त्यांच्या या प्रयत्नात त्यांनी ७५ सैनिकांचे जीव वाचवले होते. ५ मे १९४५ चा तो शौर्य दिवस सुवर्ण अक्षरात लिहिला गेला होता.
काही दिवसांनी एका रात्री एका अयशस्वी सैनिकी छाप्यात डेस्मंड डॉस हे पूर्णपणे जखमी झाले होते.
एका ठिकाणी दोन रायफल मॅन लोकांसोबत असताना एक जपानी बॉम्ब डेस्मंड डॉस यांच्या पायाशी येऊन फुटला होता आणि ते काही क्षणासाठी हवेत उंच उडून खाली पडले.
त्यांच्या पायात एका स्फोटकाचा तुकडा घुसला होता. या परिस्थितीत सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना त्यांच्या खांद्यावर एक गोळी लागली.
अश्या परिस्थितीत सुद्धा त्यांनी एका सैनिकाला वाचवलं आणि आपलं सेवा व्रत त्यांनी चालूच ठेवलं आणि स्वतः सुद्धा इतक्या आघाता नंतरही वाचले.
एखादया सिनेमात दाखवतात तशी ही सत्यकथा हॉलीवूड च्या ‘Hackshaw Ridge’ या २०१६ मध्ये रिलीज झालेल्या सिनेमातून लोकांना बघायला मिळाली आहे.
मेल गिब्सन यांच्या दिगदर्शनात बनलेला हा सिनेमा ऑस्कर पर्यंत पोहोचला होता आणि जगभरातून या सिनेमाचं आणि डेस्मंड डॉस यांच्या शौर्याला लोकांनी सलाम केला होता.
१९४६ मध्ये डेस्मंड डॉस यांना आदरपूर्वक आर्मी मधून निवृत्ती देण्यात आली. डेस्मंड डॉस यांना tuberculosis हा आजार झाला होता.
तो आजार नंतर वाढत गेला आणि वयाच्या ८७ व्या वर्षी २३ मार्च २००६ या दिवशी Corporal या पदवीने सन्मानित डेस्मंड थॉमस डॉस यांचं निधन झालं.
त्यांच्या नावाने सुरू केलेली एक सेवाभावी संस्था आजही अमेरिकेत आपलं कार्य करत आहे.
डेस्मंड डॉस यांच्या या जीवप्रवासातून आपण ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ हा बोध नक्कीच घ्यायला पाहिजे.
===
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.