' “राज ठाकरे देश तोडायला निघालेत”: आरोपाला त्यांच्याच ‘भाषेत’ उत्तर (राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण भाग २) – InMarathi

“राज ठाकरे देश तोडायला निघालेत”: आरोपाला त्यांच्याच ‘भाषेत’ उत्तर (राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण भाग २)

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

पहिला भाग : राज ठाकरेंच्या भाषणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संदर्भ! – राजसाहेबांचं भाषण अन् माझी वणवण-भाग १

नुकतंच 2010 वर्ष सुरू झालं होतं…आता आमच्या “महाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमीला” काम करण्यास प्रारंभ करून तीन वर्षे पूर्ण होत आली होती. 2009 अखेरीस महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका पार पडल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिल्या फटक्यात तेरा आमदार निवडून आले होते. महाराष्ट्र विधानसभेतील राजसाहेबांच्या पूर्ण प्रचार दौऱ्यात अकादमीचे प्रमुख श्री अनिल शिदोरे हे राजसाहेबांच्या सोबत होते आणि शिदोरेसरांसोबत होत्या अनेक फाईल्स. अकादमीत संकलीत केलेली माहिती…मग ती परप्रांतीय आकडेवारी असो…रोजगाराविषयी माहिती असो…गरिबी, दलितांच्या सामाजिक समस्या, कायदा सूव्यवस्था समस्या, मराठी भाषा, मराठी शाळांतील घटती संख्या…आदिवासी व त्यांचे प्रश्न…शेतीचे प्रश्न…शेतकरी आत्महत्या…आरोग्य…महाराष्ट्राला केंद्राकडून सतत मिळणारा दुजाभाव…पर्यटन, उद्योग, पर्यावरण…अशा अनेक विषयांवर अकादमीने शिदोरेसरांना विषयानुसार फाईल्स तयार करून दिल्या होत्या. त्याच बरोबर जिथे जिथे सभा होणार आहे तिथल्या स्थानिक समस्या, लोकांचे प्रश्न काय आहेत याबाबत आम्ही आधीच प्रत्यक्ष तिथे जाऊन माहिती जमा केलेली होती, त्याच्याही नोट्स शिदोरेसरांना दिलेल्या होत्या.

या माहितीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला राजसाहेबांची भाषणे अपील होत होती. राजसाहेबांनी राजकारणात, प्रचार सभांत एक नवा ट्रेंड सुरू केला होता. राजसाहेबांचं वक्तृत्व तर बहारदार होतंच, त्याला अकादमीने केलेल्या अभ्यासाची, माहितीची जोड मिळाली. त्यामुळे राजसाहेबांचं नुसतं भाषण नसायचे…तर ते कागदपत्रासह माहितीपूर्ण भाषण असायचं. राजसाहेब भाषणांत जनतेसमोर कागदपत्रे वाचून दाखवत.

त्यामुळे जनतेला राजसाहेबांच्या बोलण्यावर अधिक विश्वास वाटू लागला होता. राजसाहेबांच्या भाषणाचा प्रभाव लोकांवर पडायला लागला, लोकांना राजसाहेबांमध्ये एक नवा “राजकीय विकल्प” दिसू लागला. त्यामुळे कार्यकर्तेही उत्साहात होते. अकादमीही झटून काम करत होती.

राजसाहेबांचं माध्यमांना हाताळण्याचं कौशल्य भन्नाट होतं. टायमिंगच्या बाबतीत राजसाहेब म्हणजे “बाप” माणूस होते. कोणत्या वेळेस काय बोललं पाहिजे, किती बोललं पाहिजे, कुठं बोललं पाहिजे याचा जबरदस्त सेन्स राजसाहेबांना आहे. त्यांच्या आवाजाची, व्यक्तिमत्वाची छाप समोरच्यावर पडते…यासर्वांचा दृश्य परिणाम विधानसभेच्या निवडणूकीत दिसून आला.

raj-thakre-marathipizza01

पहिल्या झटक्यातच मनसेचे मराठवाड्यातील कन्नडपासून पुणे, नाशिक, कल्याण, मुंबईतून एकूण तेरा आमदार निवडून आले. एकूण महाराष्ट्रात मनसेला जनतेने भरभरून मतदान झालं होतं.

मला अजून विधानसभा निवडणूक 2009 निकालाचा दिवस आठवतोय… मी सकाळी सात वाजताच अकादमीत जाऊन दूरदर्शनसमोर बसलो होतो…हळूहळू अकादमीतील इतर सहकारी यायला सुरूवात झाली…साधारण अकरा, साडे अकरा वाजता मुंबईतून मनसेचे मंगेश सांगळे विजयी झाल्याची बातमी आम्ही दूरदर्शनवर पाहिली…अक्षरश: नाचलो होतो…! सर्वांसाठी चितळेंचे पेढे मागवले होते…कार्यालय सहायक पेढे घेऊन येईपर्यंत इतर उमेदवार निवडून आल्याच्या बातम्या आल्या. तीन वाजता सर्वांसाठी आईस्क्रिम मागवलं…अकादमीत सतत फोन खणखणत होते…शिदोरेसर मुंबईत होते. शिदोरेसर अकादमीत नसल्यानंतर अकादमीची जबाबदारी / प्रशासकीय कामकाज, मीच पाहात असे. सतत माझा मोबाईल वाजत होता. अनेक कार्यकर्त्यांचे, पत्रकारांचे, आई, बाबा, बायको, बहिणी, काका काकू सर्वांचे अभिनंदनाचे फोन येऊन गेले. माजी आमदार व पुण्याचे मनसेचे नेते श्री दीपक पायगुडेसाहेब स्वत: अकादमीत येऊन आम्हाला पेढे देऊन गेले. आमचं, आमच्या कामाचं कौतूक करून गेले.

त्या दिवशी रात्री अकरा वाजता मी घरी गेलो होतो. (अकादमीतील कुणी प्रत्यक्ष मला बोलले नव्हते, पण मी जाणून होतो – माझ्यासह अकादमीतील सर्व सहकार्‍यांना, राजसाहेबांकडून अभिनंदनाचा फोन येईल अशी अपेक्षा होती. अकादमीतील सर्व सहकार्‍यांना कल्पना होती की, या तेरा आमदार येण्यामागे राजसाहेबांचा करिष्मा, त्यांची भाषणकला, कार्यकर्त्यांची मेहनत कारणीभूत होतीच, पण अकादमीचाही खारीचा का होईना त्या यशामध्ये वाटा होता. ज्याप्रमाणे त्या खारीच्या योगदानाबद्दल प्रभू रामचंद्रांनी त्या खारीच्या पाठीवरून हात फिरवला, अगदी त्याच प्रमाणे आम्हालाही राजसाहेबांकडून शाबासकीचे दोन शब्द ऐकायला मिळावे अशी इच्छा होती आणि अशी इच्छा बाळगण्यात मला काहीही गैर वाटत नाही. आम्हाला उत्तम मानधन मिळत होतेच पण माणसाला फक्त पैसाच लागतो का? माणसाला शाबासकीचीही भूक असते…ही शाबासकीच त्याला पुढील काळात उत्तम काम करण्याची प्रेरणा देत असते…असो.)

मनसे पक्षाची विधानसभेतील कामकाजाची सुरुवातच आ. रमेश वांजळे व आ. राम कदमांच्या अबू आजमी या समाजवादी पक्षाच्या आमदाराने मराठीतून शपथ घ्यावी या आग्रही मागणीवरून झाली. अबू आजमीने मराठीतून शपथ घेण्यास नकार दिला तर आ. राम कदमांनी व आ. रमेश वांजळेंनी, आ. शिशिर शिंदेंनी.. अबू आजमीला “मराठी बाणा” ही काय चीज असते ते सप्रमाण दाखवून दिले.

abu azmi slapped by mns mla marathipizza

पहिल्या दिवसातच मनसे पक्ष व मनसे आमदार स्टार झाले होते. मनसेचे मराठी मुलांना रोजगार, टॅक्सी परवाना फक्त मराठी मुलांनाच मिळावा, प्रत्येक दुकानांवर मराठी पाट्या, युपी बिहारी हटाव, मराठी अस्मिता अशी आंदोलने जोरजोरात सूरू होती. सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाला धास्ती वाटावी इतकी ही आंदोलने यशस्वी होत होती. लोकांचा प्रचंड पाठिंबा राजसाहेबांना मिळत होता. मनसेची हवा काढून घ्यावी या उद्देशाने कॉंग्रेसच्या अशोक चव्हाण सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला –

ज्यांना मराठी उत्तम बोलता येते अशा व्यक्तींनाच मुंबईत टॅक्सी परवाने दिले जातील…!

सर्व महाराष्ट्रात या निर्णयाचे स्वागत झाले. पण, या निर्णयावरून दिल्लीत गदारोळ झाला व कॉंग्रेस हायकमांडच्या दबावाखाली, अशोक चव्हाणांना हा निर्णय बदलायला लागला. अशोक चव्हाणांची या यु-टर्नमुळे चांगलीच गोची झाली होती. इकडे मनसेने पुन्हा युपी बिहारी टॅक्सीचालकांविरूद्ध मुंबईत, ठाण्यात आंदोलन केले. कुणीतरी युपी बिहारी टॅक्सीचालकांना मारहाण केली, एकाची टॅक्सी जाळली….झालं… सबंध देशाच्या हिंदी, इंग्रजी वाहिन्यांवरून मनसेच्या भय्या टॅक्सीचालकांच्या विरोधातील आंदोलनाच्या बातम्या बढचढके दाखवायला सुरूवात झाली. तीच तीच दृश्ये परत परत दाखवत होते…तीन चार दिवस हेच सुरू होते…या प्रकरणी, उद्योगपती मुकेश अंबानींपासून, संघाच्या राम माधव, नितीश कुमार, लालू यादव, पी चिदंबरम, राहूल गांधींपर्यंत सर्वांनी मनसे, राज ठाकरेंवर यथेच्छ टीका केली.

राज ठाकरे देश तोडायला निघाला आहे…

– हे तर पेटंट वाक्य होतं.

अशा सर्व पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली मनपा निवडणुका अजून आठ महिन्यांनी येऊ घातल्या होत्या आणि प्रचाराची सुरूवात म्हणून राजसाहेबांनी ठरवलं की विरोधकांच्या टीकेला डोंबिवलीत तीन फेब्रुवारीला उत्तर द्यायचं. माझ्यासकट अकादमीतील सर्व सहकार्‍यांची धावपळ सुरू झाली. टीका केलेल्या प्रत्येकाला त्याच तोडीचे जबरदस्त उत्तर द्यायचे असे ठरवून आम्ही कामाला लागलो सभेला अवघे सहा दिवस शिल्लक होते.

अकादमीतील सर्वांची बैठक घेतली. दोन दोन जणांच्या टीम तयार केल्या, प्रत्येक टीमला कामे वाटून दिली. बिहार, युपी मधून महाराष्ट्रात रोज किती रेल्वे येतात – इथ पासून ते – राज्य शासनाचा परवाना कायदा मिळण्यापर्यंत कामांचा समावेष होता. मी माझ्याकडे “मोटार वाहन परवाना कायदा” मिळवणे व “पी चिदंबरम” यांना तोडीसतोड उत्तर देण्यासंबंधीची माहिती मिळवण्याची जबाबदारी घेतली होती.

आमच्या अकादमीचे कार्यालय पुणे शिवाजीनगर आर टी ओ ला खेटून होते. मी व माझे सहकारी रोज दुपारी जेवल्यानंतर आर टी ओ मधील पान टपरीवर पान खायला जात असू. त्या पानवाल्याची आणि माझी चांगलीच दोस्ती झाली होती. तो ही राजसमर्थक होता व आम्ही राजसाहेबांसाठी काम करत असल्याने आमच्याबद्दल त्याला विशेष ममत्व होते. एके दिवशी सहज पान खाता खाता पानवाल्याला म्हणलं की “मला आरटीओतून मराठी मोटार परवाना कायद्याची एक प्रत पाहिजे…मिळवून देशील का?” नक्की नाही सांगत पण शंभर टक्के प्रयत्न करतो म्हणाला.

मी ही माझ्या इतर कामांना लागलो. दोन तीन दिवस गेले. अकादमीत बर्‍यापैकी माहिती जमा झालेली होती. मोटार परवाना कायदा आणि तमिळनाडू, कर्नाटकातील मोटार वाहन कायदे काय आहेत याचा अभ्यास करून नोट्स काढायच्या बाकी होते.. पण अजून आम्हाला महाराष्ट्राचा मोटार परिवहन कायदाच मिळाला नव्हता तर बाकी राज्यांचे कायदे फारच लांब राहिलं. परत पानवाल्याकडे गेलो. तो म्हणाला हडपसरला एक निवृत्त आरटीओ अधिकारी राहातात, ते कायद्याचे अभ्यासकही आहेत. त्यांच्याकडे आपल्याला तो जुना कायदा नक्की मिळेल…! म्हणलं चल जाऊ…! पण त्याचा धंदा सोडून त्याला येता येणं शक्य नव्हतं. रात्री जाऊ म्हणाला. मग रात्री आठपर्यंत अकादमीत काम करत बसलो…आठ वाजता शिवाजीनगरहून आम्ही त्या निवृत्त आरटीओ अधिकार्‍याच्या घरी हडपसरला गेलो. घरात पाऊल ठेवताच जाणवले की हे गृहस्थ कॉंग्रेसी विचारधारेचे दिसतात. घरात हॉलमध्ये पवारसाहेबांसोबत त्या अधिकार्‍याचा फोटो लावला होता.

तो पानवाला त्या अधिकार्‍याच्या चांगलाच परिचयाचा होता. पानवाल्याने मोटार वाहन कायदा पाहिजे, ज्यामध्ये असं लिहिलंय की “परवानाधारकाला मराठी बोलता यायलाच पाहिजे” अशा कायद्याच्या शोधात आहोत. अधिकार्‍यांचे केस उन्हात पांढरे नव्हते झाले. त्यांनी त वरून ताक भात ओळखला. मनसेकडून आलात का विचारले. यांच्याशी खोटं बोलण्यात काही अर्थ नाही याकारणाने, सर्व सत्य परिस्थिती त्यांना सांगितली आणि आश्चर्य घडले…!

त्यांच्या कपाटातून त्यांनी आम्हाला हवा असलेला “मोटर वाहन कायदा” काढून दिला. ते म्हणाले –

राज ठाकरे बोलतो त्यात काहीही चूक नाही…आपल्या मराठी पोरांचे रोजगार हे यूपी बिहारी पळवतात…अन यांना या कॉंग्रेसची साथ आहे…खूशाल हा कायदा घेऊन जा…

रात्रीचे दहा वाजले होते. झेरॉक्सची दुकानं उघडी नव्हती. त्यांच्या घरी परत गेलो व उद्या झेरॉक्स काढून मूळ प्रत आणून देतो सांगितले. घरी पोचायला साडेअकरा वाजले. पण एक महत्वाचे काम पूर्ण झाले होते.

राहुल गांधी, मुकेश अंबानी यांना उत्तर देण्याची तयारी पूर्ण झाली होती. आता सभेला केवळ तीन दिवस उरले होते. पी. चिदंबरम, व राम माधव यांना उत्तर द्यायच्या संबंधी माहिती मिळवणे बाकी होते.

शिदोरेसरांच एक विशेष होतं. काम करताना कधीच मधे मधे लुडबुड करत नसत. काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देत…सकाळी अकादमीत गेलो. शिदोरेसरांनी मला विचारले, “पी. चिदंबरमबद्दल काही ठोस मिळाले की नाही?? “अजून नाही” – मी म्हणालो.. तसे मला म्हणाले, “सकाळच्या पहिल्या विमानाने तू चेन्नईला जा…बघ तिथे काहितरी मिळेल…”

लगेच सकाळचे विमानाचे तिकीट बूक केले. चेन्नईला जाऊन काय व कुठून मिळवायचं ते गूगलवर शोधत बसलो. चेन्नई आरटीओचा पत्ता मिळवला, कायद्यांची पुस्तके कुठे मिळतात त्याचा तपास केला. सर्व प्रिंटआऊट्स सोबत घेतल्या व रात्री घरी आलो. उद्या पहाटे पाच वाजता विमान होतं. साडेसातला चेन्नई विमानतळावर उतरलो. कालच गुगलवरून सर्व माहिती घेतल्याने एअरपोर्टवरून लोकलट्रेनने चेन्नई एग्मोर ला आलो. अन रिक्षाने चेन्नई आरटीओत आलो.

भाषेचा खूप मोठा अडसर होता. इंग्रजीतून संवाद साधत होतो. दोन तीन तास तिथे घालवले पण, मुद्द्याचं काहीच मिळालं नाही. आणि जे मिळालं ते सर्व तमीळ भाषेत होतं. त्यात काय लिहिले आहे मला काय समजणार होतं?! तरीही मी तिथल्या अधिकार्‍यांकडून समजून घेत आवश्यक कायदे घेतले. परत चेन्नई एग्मोरला आलो, जेवलो. आता कायद्यांच्या पुस्तकाच्या दुकानात गेलो…तिथेही तीच परिस्थिती सर्व कायदे तमीळमधून होते. त्याच्या इंग्रजी आवृत्त्या घेतल्या. वाचत बसलो. चार कधी वाजले समजलेच नाही. माझे परतीचे विमान रात्री नऊ वाजता होते आणि अजून मला पी चिदंबरमला ठोस उत्तर देता येईल असे काहीच मिळाले नव्हते.  जरा निराश झालो होतो…एवढे पैसे खर्च करून रिकाम्या हाताने परत जायचे म्हणजे नामुष्की होती. खूप चिंतेत होतो.

टेंशन घालवायचं म्हणून “मरिना” बीचवर गेलो. पाच वाजले होते…बीच समोर मला “गोपाळ कृष्ण गोखलेंचा” पुतळा दिसला…तसा मी काही गोखले/गांधी विचारांना मानणारा नाही. पण चेन्नईमध्ये एका मराठी माणसाचा पुतळा पाहून खूप छान वाटले. मरिना बीचवर माजी मुख्यमंत्री आण्णादुराईंचे भव्य स्मारक आहे, शिल्पं आहेत. ते पाहिलं. आण्णादुराई यांचे छायाचित्र प्रदर्शन होतं…पण तीथे जायचे मनच झाले नाही. समुद्रावर गेलो. दहा पंधरा मिनीटे बसलो…अन काय हुक्की आली कुणास ठाऊक आण्णादुराई स्मारकातील आण्णांदुराईंची छायाचित्रं पाहून तर येऊ, म्हणून तिकडे गेलो….सगळीकडे आण्णादुराईंची छायाचित्रं होती. छायचित्राखाली तमिळमध्ये लिहिलेले असायचे…आता मला काय कळणार होतं …पण तरी पाहात होतो….अन अचानक एका फोटोकडे माझी नजर गेली…आणि, युरेका युरेका असं मनातच ओरडलो…! माझं येणं “सार्थकी” लावणारा फोटो मी समोर पाहात होतो…!

annadurai marathipizza

आण्णादुराई यांचा 1968 सालचा विधानसभेत भाषण करतानाचा फोटो…त्याच्या बाजूला लिहिले होतं…. “तमिळ” – बरोबरची खूण, “इंग्लिश” – बरोबरची खूण आणि हिंदीच्या पुढे लाल रंगात “फुली” मारली होती…”

या फोटोने पी चिदंबरमची लूंगी नक्की उतरवता येणार होती हे मला जाणवलं. पण, एक अडचण होती…छायाचित्रांची छायाचित्र काढायला मनाई होती… प्रत्येक ठिकाणी सुरक्षारक्षक होते…मी त्या सुरक्षारक्षकाला विनंती केली की मला या फोटोचा फोटो काढू द्या…त्याला मी काय बोलतोय काही कळले नाही. त्याला इंग्रजी येत नव्हते…आता काय करायचे…अशा वेळी गांधीजींच्या नोटा कामास येतात असा आजवरचा अनुभव होता…त्याला खुणेने पैसे देतो, फोटो काढू दे म्हणलं, ही भाषा त्याला अवगत होती….पाचशेची करकरीत नोट त्याच्या हातावर ठेवली आणि फोटो काढला…सुरक्षारक्षकाचे व मनातल्यामनात “आण्णादुराईंचे” आभार मानत बाहेर पडलो. मस्तपैकी एके ठिकाणी आईस्क्रिम खाल्लं आणि थेट विमानतळ गाठलं.

दुसर्‍या दिवशी सकाळी सकाळी उठून एका तमिळ मित्राकडे गेलो…त्याला फोटो दाखवला, त्यावरचा अर्थ लिहून घेतला…त्या फोटोत तमिळ भाषेत लिहिले होते:

तमिळनाडूराज्यात हिंदी भाषेला कोणतीही स्थान नाही. तमिळनाडूमध्ये केवळ तमिळ व इंग्लिश भाषेचा वापरच केला जाईल. तमिळ व इंग्लिश भाषावापरासंबंधीचे धोरण 23-03-1968 पासून तमिळनाडू विधानसभेत पारीत करण्यात येत आहे. तमिळनाडू राज्यातून “हिंदी” भाषेला हद्दपार करण्यात येत आहे.

हा फोटो म्हणजे पी चिदंबरम यांना भाषिक अस्मितेवरून उत्तर देण्याचा चांगला मार्ग होता. राजसाहेबांना पी. चिदंबरम यांना विचारता येणार होतं की, तुम्हाला तमिळ भाषेबद्दल वाटते ती तुमची अस्मिता…आणि आम्हाला आमच्या मराठीबद्दल वाटणारी अस्मिता म्हणजे, राज ठाकरे देश तोडायला निघाला काय….?

कॅमेरातील फोटो डेवलप करून घेतला. फोटोवरील अर्थ मराठीत टाईप केला व दोन्ही शिदोरेसरांना घरी द्यायला गेलो. तो फोटो व त्यावरील मजकूर सरांना दाखवला. एखाद्या लहान मुलाच्यासमोर कॅडबरीचा बॉक्स ठेवावा व त्याला हव्या तेवढ्या कॅडबरी खायची परवानगी द्यावी, त्यानंतर, त्या मुलाच्या चेहर्‍यावर जे भाव दिसतील…अगदी तेच भाव मला शिदोरेसरांच्या चेहर्‍यावर दिसले. फोटो पाहून त्यांनी माझं अभिनंदन केलं आणि म्हणाले –

जाऊन आराम कर…मी उद्या सकाळी सकाळी राजसाहेबांच्या घरी जाणारच आहे…मी दाखवतो हा फोटो त्यांना …आणि हो…..उद्या डोंबिवलीला सभेला ये.

3 फेब्रुवारीला 2010 रोजी, डोंबिवलीच्या इतिहासातील “न भुतो न भविष्यती” अशी राज साहेबांची सभा झाली. मी मिळवलेला “मोटार वाहन कायदा” राजसाहेबांनी सभेत वाचून दाखवलाच, त्याच बरोबर चेन्नई येथे मी काढलेला “फोटो”ही जनतेला दाखवून पी चिदंबरमला “लुंगी-डांस” करायला लावतील असे वक्तव्य केले. माझी वणवण “सफल” झाली…

राजसाहेब भाषण करत होते, शिदोरेसरांनी फोटो व मोटार वाहन कायद्याविषयी राजसाहेबांना माझ्याबद्दल सांगितले असेल का…हा विचार करत….मी दूर…एका कोपर्‍यात, लाखोंच्या गर्दीत…फक्त, टाळ्यांचा कडकडाट ऐकत होतो…

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?