तिबेट – चीन – भारत : हा किचकट त्रिकोण समजून घेणं प्रत्येक भारतीयासाठी अत्यावश्यक आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
चिनी साम्राज्यवाद तसा जगाला नवा नाही. आणि त्याचा सगळ्यात जास्त त्रास सहन करावा लागत आहे तो भारताला.
१९६२ च्या युद्धामध्ये अक्साई चीन पर्यंतचा मोठा भूभाग गिळंकृत केल्यानंतर सुद्धा चीन शांत बसायच्या तयारीत नाही.
कधी अरुणाचल प्रदेश कधी लडाख मध्ये कुरबुर करून वाद निर्माण करणार.
मागेचं डोकलाम वर हक्क सांगून नवा वाद उरकून काढल्यावर भारताने इट का जवाब पत्थर से देत डिप्लोमॅट आणि लष्करी दोन्ही लेव्हल वर चीनला माघार घ्यायला लावून वादाला पूर्णविराम दिला.
हम नही सुधरेंगे म्हणत चीनने पुन्हा गलवान व्हॅली आपली आहे म्हणत भारताच्या लडाख भागात घुसखोरी केली. अन नव्या वादाला तोंड फुटलं.
१५ जुन ला दोन्ही राष्ट्रांच्या सैन्यामध्ये झालेल्या चकमकीत दोन्ही बाजूच्या अनेकांना हौतात्म्य पत्कराव लागलं.
अधिकारी बैठकी नंतर झालेल्या या रक्तपातामुळे भारत सरकारने अधिकच आक्रमक होऊन डिप्लोमॅट लेव्हल वर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पण मुळात हा वाद का? आणि नेमकं कारण काय? त्याबद्दलचं सखोल जाणून घेऊया आजच्या या आजच्या या लेखात.
जगातील सगळ्यात मोठ पठार म्हणजे ‘तिबेट’, साक्षात गौतम बुद्धांची भूमी!
जवळपास अडीच लाख वर्ग किलोमीटर एवढी व्याप्ती असलेला भूभाग.
सोप्या शब्दात सांगायचे म्हणजे आजच्या चीनचा एक चतुर्थांश भाग ही मूळ भूमी आहे तिबेटीयन लोकांची.
जगातील सगळ्यात मोठं पर्वत शिखर सुद्धा इथेच. ‘माउंट एव्हरेस्ट.’
१९५१ ला चीन ने तिबेट आपल्या अखत्यारीत आणला आणि तेव्हापासून आजतागायत तिथे अनिर्बंध सत्ता उपभोगत आहे.
१९५९ मध्ये चौदावे तिबेटीयन धर्मगुरू दलाई लामा यांच्या नेतृत्वाखाली तिबेट मध्ये चिनी शासनाच्या विरोधात अयशस्वी उठाव झाला.
हे बंड मोडून काढण्यात चीन यशस्वी झाला आणि दलाई लामा यांना भारतात आश्रय घ्यावा लागला.
आजसुद्धा दलाई लामा यांना मानणारा मोठा वर्ग तिबेट मध्ये आहे. दलाई लामा हे मूलत: तिबेटीयन लोकांचे राजकीय नेतृत्व आणि आध्यात्मिक मार्गदर्शक आहेत.
दलाई लामा हे सांप्रदायिक सीमांच्या पलीकडे एक महत्त्वाची व्यक्ती आहे. ते तिबेटच्या एकीकरणाचे प्रतीक आहेत आणि बौद्ध मूल्ये आणि परंपरा यांचे जतन करणारे मूर्तिमंत उदाहरण आहे.
प्रत्येक दलाई लामा हे बोधिसत्व अर्थात बुद्धाचे अंश मानले जाते. त्यांनी आपला मोक्ष पुढे ढकलला आणि मानवतेच्या सेवेत पुन्हा जन्म घेतला अशी आख्यायिका आहे.
दलाई लामा यांच्या खालोखाल पंचेम लामा हे महत्वाचे पद आहे.
पंचेम लामा हे दलाई लामा यांच्या निवड प्रक्रिया आणि दलाई लामा यांचं फायनल सिलेक्शन या प्रोसेस मध्ये सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती आहे.
इसवी सन १३०० पासून चालत आलेल्या या परंपरे नुसार १४ वे दलाई लामा हे तिबेटीयन समुदायाचे नेतृत्व करत आहेत. ते एक जगतमान्य प्रतिष्ठित व्यक्ती असून नोबेल शांती पुरस्कार विजेते सुद्धा आहेत.
१९४९ मध्ये चीन मधलं रक्तरंजित गृहयुध्द थांबलं आणि माओ झेडोंग याच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट चीन चा उदय झाला.
चीन म्हणजे पूर्वीच्या हान वंशीय साम्राज्याचा भूभाग. तेव्हाचा हाच हान वंशीय भूभाग आपल्या अखत्यारीत यावा म्हणून माओ झेडोंगने आपला साम्राज्यवादी अजेंडा पूढे रेटवत अनेक प्रदेश जिंकून घेतले.
परिणामी १९६२ चं इंडो-चायना युद्ध आणि भारताने गमावलेला अक्साई चीन. याच साम्राज्यवादी विस्ताराच्या तडाख्यातुन तिबेट सुद्धा वाचले नाही.
परिणामी तिबेट ला सुद्धा मोठा रक्तपात पहावा लागला. अजून तिबेटला बरंच काही बघायचं होत.
जस वर पाहिलं की, दलाई लामा यांच्या खालोखाल पंचेन लामा हे महत्त्वाचे पद आहे.
तर, १४ वे दलाई लामा यांनी गेढुन चोएकी निमा या सहा वर्षीय मुलाला आपला उत्तराधिकारी अर्थात १० वा पंचेन लामा घोषित केला.
या घोषणेच्या अवघ्या तीन दिवसात त्या मुलाला चिनी प्रशासनने नजरकैदेत टाकून ग्यानचेन नोरबू याला पंचेन लामा घोषित केले.
चीनच्या या कृत्यावर तिबेटीयन जनतेने आक्षेप नोंदवून संयुक्त राष्ट्रात हे प्रकरण नेलं.
दलाई लामा यांनी नियुक्त केलेल्या त्या सहा वर्षीय मुलाला १९९५ पासून कोणीच पाहिलेलं नाही.
जर तो जीवित असेल तर जगातला सगळ्यात कमी वयाचा राजकीय बंदी म्हणून त्याची ओळख निर्माण होईल.
सध्याचा पंचेन लामा हे चीन नियुक्त केले असल्यामुळे १४ व्या दलाई लामा नंतर नियुक्त होणाऱ्या या नवीन दलाई लामांमुळे तिबेटीयन जनतेची मोठी कोंडी झालेली आहे.
कम्युनिस्ट चिनी शासनाचे अत्याचार,धार्मिक-राजकीय-आर्थिक निर्बंध आणि कोंडी यामुळे एक मागासलेले जीवन तिबेटीयन जनता जगत आहे.
भारत कनेक्शन :
“मी भारतात मागच्या ५० वर्षापेक्षा जास्त काळ राहत आहे, त्यामुळे याच मातीचा मुलगा असल्याची मला जाणीव होत आहे.जगात इतर राष्ट्रांपेक्षा भारत हा सर्वाधिक धर्मनिरपेक्ष मला वाटतो.
जेव्हा मी तिबेट सोडलं तेव्हा मी संकुचित मानसिकतेचा होतो.पण जस मी भारतात आलो तसे माझे विचार बदलत गेले आणि तिबेट सोबत माझा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.”
दलाई लामा यांच्या वरील वक्तव्यावरून भारताने तिबेट आणि तिबेटीयन साठी केलेल्या कार्याची जाणीव होते.
१९५९ च्या अयशस्वी उठावानंतर दलाई लामा भारतात आश्रयीत झाले.
माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांनी दलाई लामा आणि त्यांच्या सोबत आलेल्या लाखो रेफ्युजी लोकांना त्यांचा भूभाग परत मिळेपर्यंत सर्वोतोपरी मदतीचे आश्वासन देऊन भारतात त्यांना सेटल व्हायला मदत केली.
तिबेटीयन जनतेसाठी एक समांतर सरकार हिमाचल प्रदेश मधून चालवले जाते. त्यांचे राजकीय गतीविधी इथूनच कंट्रोल होतात. हिमाचल प्रदेश मधील धर्मशाला मधील मॅकलॉड गंज येथून सगळा कारभार हा पाहिला जातो.
१९६० मध्ये तत्कालीन कर्नाटक सरकारने तिबेटीयन समुदायाच्या सेटलमेंट साठी तब्बल ३००० एकर जमीन उपलब्ध करून दिली. कालांतराने अनेक तिबेटीयन रेफ्युजी इथे येऊन स्थानिक झाले.
अन कर्नाटक सर्वाधिक तिबेटीयन जनतेला आश्रय देणारे राज्य बनले.
तिबेटीयन जनतेची भारताने केलेली मदत आणि पुनर्वसना पाहून अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांनी याची स्तुती केली. तेच चीनने कठोर शब्दात या कृत्याची निंदा केली.
एकूणच दलाई लामा यांना दिलेला आश्रय आणि तिबेट बद्दल भारताची भूमिका यामुळे चीन आणि भारतात कुरापती होत आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
चीनच्या साम्राज्यवादी धोरणाला सुरुंग लावायचं काम केलं ते १४ व्या दलाई लामांनी. आणि त्यांना आश्रय दिला भारताने.
१९६२ च्या युद्धाच्या जखमा आज इतकी वर्षे झाली तरी अजून ही भरलेल्या नाहीत. आणि पुन्हा एकदा त्याच जागेवर दोन्ही देश आज आमने सामने उभे ठाकले आहेत.
जगाला बुद्ध देणाऱ्या देशाला आज बुद्ध मानणाऱ्या देशाचं आवाहन आहे. एकूणच येणारा काळच लवकरच सगळं चित्र स्पष्ट करेल.
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.