राजघराण्यापासून सर्वसामान्यांपर्यंत; ऊन-पावसापासून आपल्याला वाचवणाऱ्या ‘छत्री’चा अनोखा प्रवास
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
राज कपूरच्या आवारा सिनेमातील, “प्यार हुआ इकरार हुआ है, प्यार से फिर क्यों डरता है दिल” हे गाणं आठवतंय? पावसात भिजणारे राज कपूर, नर्गिस आणि दोघांमध्ये असलेली एक छत्री आठवेल.
चालबाज सिनेमातील श्रीदेवीवर चित्रित झालेलं, “ना जाने कहाँ से आई है, ना जाने कहाँ को जायेगी, दीवाना किसे बनायेगी, ये लडकी!” हे गाणे आठवून पहा.
पांढरी छत्री घेऊन श्रीदेवीने केलेला डान्स आठवेल. बॉलीवूड मध्ये आपण अनेकदा छत्रीचा वापर झालेला पाहतोय आणि आपणही पावसाळ्यात छत्री वापरतोच की!
पावसाळा आला, की घरातल्या छत्र्या कुठे ठेवल्यात याचा शोध घेतला जातो. तरी आता लगेच बाजारात गेलं तरी तिथे निरनिराळ्या प्रकारच्या ट्रेंडी छत्र्या मिळतात.
जुन्या तुटलेल्या किंवा खराब झालेल्या छत्र्या असतील तर त्या फेकून देऊन नवीन छत्र्या आणल्या जातात. पूर्वी मात्र जुन्या छत्र्यांचीही डागडुजी केली जायची.
आता छत्री इतकी सवयीची झालेली आहे, की पावसाळ्यात तर ती वापरली जातेच पण उन्हाळ्यातही छत्रीचा वापर काहीजण करतात.
चीन, जपान सारख्या देशात उन्हाळ्यातही सूर्यप्रकाशापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी छत्री वापरली जाते. याचं कारण म्हणजे तिथल्या लोकांना असलेला त्वचाविकार.
अशी ही उपयोगी छत्री कधीपासून अस्तित्वात आली हे मात्र फारसे कोणाला माहीत नसतं. आता छत्रीचा वापर पावसाळ्यात जास्त होत असला तरी छत्री मुळात शोधली गेली ती सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी.
माणसाने त्याच्या उत्क्रांतीच्या काळात ही कधी शोधली हे देखील फारसे माहीत नाही.
चौथ्या शतकात चीन, ग्रीस, इजिप्त, मध्य आशिया आणि भारतामध्ये छत्रीचा उल्लेख आढळून येतो. अर्थात त्यावेळेस सामान्य लोक छत्री वापरत नसत. फक्त शाही लोकांकडेच अशी छत्री असायची.
विशेष म्हणजे ही छत्री कोणी वापरायची हे देखील राजघराणी ठरवत असत. त्यांच्या मर्जीतील आणि खास लोकांनाच छत्री वापरता येत असे.
ग्रीस, इजिप्त मध्ये मुख्यतः स्त्रिया या छत्र्या वापरत असत. आजच्यासारख्या छत्र्या तेव्हा उपलब्ध नव्हत्या. तर छत्र्या म्हणजे पक्ष्यांच्या पिसांच्या, पानांच्या आणि चामड्याच्या बनलेल्या असायच्या.
अगदी आतासारख्या छत्र्या नसल्या तरी त्यांचा आकार हा बऱ्यापैकी आताच्या छत्रीसारखाच होता.
त्याकाळी छत्री वापरली जायची ती केवळ उन्हापासून बचाव करण्यासाठी. पावसासाठी छत्री पूर्वी वापरली जात नव्हती. पावसासाठी छत्री वापरण्यात आली ती सतराव्या शतकात.
पहिल्यांदाच कपड्याचा, सिल्कचा वापर करून अशा प्रकारची छत्री तयार करण्यात आली. या छत्रीमध्ये पावसापासून थोडाफार बचाव शक्य होता. आताच्या सारख्या पाण्याला प्रतिरोध करणाऱ्या छत्र्या तेव्हा नव्हत्या.
छत्रीसाठी ‘अम्ब्रेला’ हा जो शब्द आहे, तो एक लॅटिन शब्द आहे. अंब्रा(Umbra) म्हणजे सावली. त्यावरूनच पुढे छत्रीला अम्ब्रेला (Umbrella) हा शब्द रूढ झाला.
गंमत म्हणजे सुरुवातीला ही वस्तू फक्त स्त्रियांच्या वापरासाठी आहे असाही समज युरोपमध्ये होता.
पुढे एक पर्शियन प्रवासी आणि लेखक जोनास हनवे(१७१२-१७८६) याने पहिल्यांदा इंग्लंड मध्ये छत्री वापरायला सुरुवात केली. सुरुवातीला लोक त्याच्या या वागण्यावर हसले, कारण छत्री केवळ स्त्रियांच्या वापरातील वस्तू होती.
पण मग हळूहळू पुरुषांनी देखील छत्रीचा वापर सुरू केला. आणि बघता बघता इंग्लंडमध्ये छत्री प्रसिद्ध झाली.
छत्री लोकांमध्ये प्रसिद्ध व्हायला लागली आणि आता व्यापारी लोकांना यामध्ये ‘बिजनेस’ दिसायला लागला. १८३० मध्ये ‘जेम्स स्मिथ अँड सन्स’ नावाचं पहिलं छत्रीचे दुकान इंग्लंडमध्ये, ५३ न्यू स्ट्रीट, लंडन’ इथं सुरू झालं. आजही ते दुकान त्या ठिकाणी आहे.
सुरुवातीला ज्या छत्र्या बनवल्या जायच्या त्याचा मधला दांडा हा लाकडाचा असायचा. आणि ती आजोबांची काठी कशी असते तशी वळलेली मूठ तिला असायची. काही छत्र्यांमध्ये त्या लाकडी दांड्यावर छान कोरीवकाम केलेलं असायचा.
पुढे मग छत्रीमध्ये अनेक नवनवीन बदल होत गेले. मग हळूहळू स्टीलचा वापर सुरू झाला. या स्टीलच्या छत्र्या देखील फक्त स्त्रियांसाठीच बनवल्या जायच्या. सुरुवातीला केवळ कापडाने बनलेल्या छत्र्या आता रेक्झिनने बनायला लागल्या.
आता जी पॉकेट छत्री प्रसिद्ध आहे, ती मात्र बनली १९२८ मध्ये. स्त्रियांच्या पर्स मध्ये बसणारी पॉकेट छत्री हंस हौप्ट ने विकसित केली. या फोल्डेबल छत्र्या बनवण्यासाठी तिने १९२९ मध्ये पेटंट देखील मिळवलं.
ऑस्ट्रियातील कंपनीने अशा छत्र्या बनवल्या त्यांना ‘फ्लर्ट’ म्हटलं गेलं. जर्मनीमध्ये ‘निप्प्स’ कंपनीने लहान फोल्डेबल छत्र्या बनवल्या. निप्प्स याच नावाने या छत्र्या तिथे ओळखल्या जातात.
गोल्फछत्र्या या सामान्य छत्र्यापेक्षा आकाराने मोठ्या असतात. साधारण साठ ते सत्तर इंचापर्यंत त्या पसरलेल्या असतात.
आत्तापर्यंत छत्र्यांमध्ये अनेक बदल झाले. त्याचे वेगवेगळे पेटंटही घेतले गेलेले आहेत. एकट्या अमेरिकेतील पेटंट ऑफिसमध्ये ३००० प्रकारच्या छत्र्यांचे पेटंट घेण्यात आलेले आहे.
ग्राहकांची सगळ्यात जास्त मागणी असलेल्या उत्पादनातील एक उत्पादन म्हणजे छत्री. छत्र्यांचे सगळ्यात जास्त उत्पादन चीनमध्ये होतं. चीनमधल्या शेंगयु शहरामध्ये केवळ छत्र्यांचे जवळपास १००० कारखाने आहेत. तिथूनच जगभरात छत्र्या पोहोचवल्या जातात.
एकट्या अमेरिकेत दरवर्षी ३३ दशलक्ष छत्र्या वापरल्या जातात. ज्यातून साधारणपणे ३४८ दशलक्ष डॉलर्सची उलाढाल होते.
अशी ही छत्री आता माणसाच्या आयुष्यात कायमचा घटक बनली आहे. अगदी लहान मुलांना देखील छत्रीचं खूप आकर्षण असतं, त्यांच्यासाठी छोट्या छत्र्या देखील आजकाल मिळत आहेत.
अगदी हॉटेलमध्ये आउटडोर बसण्यासाठी देखील वेगळ्या प्रकारच्या छत्र्या ठेवलेल्या असतात. बीचवर देखील अशा प्रकारच्या छत्र्या असतात, जेणेकरून समुद्रस्नानाचा आनंद घेऊन त्या छत्र्यांच्या सावलीत येऊन आरामात बसता येते.
इतकंच काय, आज-काल हॉटेलमधील मॉकटेल, कॉकटेल ही पेयं आकर्षक दिसण्यासाठी देखील ग्लासवर एक छोटीशी छत्री ठेवलेली असते!!
आज-काल इको-फ्रेंडली छत्र्यांचा ट्रेंड देखील येऊ घातलाय. कोकाकोलाच्या वापरलेल्या बाटल्यांपासून छत्र्या बनवल्या जात आहेत.
नॅशनल जिओग्राफीने देखील एका बेडकाने पानाचा छत्रीसारखा वापर केला असा फोटो प्रसिद्ध केला.
हाँगकाँगमध्ये सध्या चाललेल्या आंदोलनात, पोलीस आंदोलकांवर मिरीपुडचा वापर करीत आहेत. पोलिसांचा हा मारा चुकवण्यासाठी तिथले आंदोलक छत्रीचा ढालीसारखा वापर करीत आहेत.
आजकाल छत्र्या मध्ये देखील टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे. पाऊस असल्यास मोबाईलवर लिहिणे अशक्य होते, अशावेळेस ते काम आता छत्री करीत आहे. जपानमध्ये तर आता ड्रोन सारख्या छत्र्या आल्या आहेत. वापरकर्त्याच्या वर तो न भिजेल अशा पद्धतीने त्या उडत राहतात.
अहो, इतकंच काय! आता कोरोनामुळे ,”दो गज की दूरी, बहुत जरूरी” हेदेखील आता छत्रीमुळेच शक्य होत आहे.
म्हणून मंडळी, पाऊस आणि कोरोना यासाठी छत्री वापरायला विसरू नका!!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.